You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुतिन-जिनपिंग यांच्यात 'अमर होण्याबाबत' काय चर्चा झाली, हे खरंच शक्य आहे का? जाणून घ्या वैज्ञानिक तथ्य
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अवयव प्रत्यारोपणाच्या (ऑर्गन ट्रान्सप्लांट) मदतीने अमर होता येईल का? या रोचक विषयावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली.
याच (सप्टेंबर) आठवड्यात बीजिंगमध्ये झालेल्या चीनच्या लष्करी परेडदरम्यान हा प्रकार घडला.
पुतिन जे म्हणाले, ते मँडरिनमध्ये भाषांतर करून अनुवादकाने शी जिनपिंग यांना सांगितलं, "मानवी अवयवांचं वारंवार प्रत्यारोपण करून माणूस वाढत्या वयाचा असला तरी तरुण राहू शकतो आणि कदाचित अनिश्चित काळापर्यंत त्याला आपलं वृद्धत्व टाळता येऊ शकतं."
त्यांनी असंही सांगितलं की, या शतकातच माणूस 150 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकेल, असा अंदाज आहे.
या संभाषणादरम्यान, दोन्ही नेत्यांच्या हसण्यावरून ते कदाचित विनोदी मूडमध्ये होते, असं वाटलं. मात्र, खरंच यात काही तथ्य असू शकतं का?
अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातून जगभरातील अनेक लोकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत.
एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांटनुसार, फक्त ब्रिटनमध्ये गेल्या 30 वर्षांत 1 लाखाहून अधिक लोकांचे जीव वाचवण्यात आले आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या प्रगतीमुळे आता प्रत्यारोपण केलेले अवयव दीर्घकाळ काम करू शकतात.
काही रूग्ण तर असे आहेत, ज्यांचे किडनी प्रत्यारोपण होऊन 50 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, तरी ते काम करत होते.
कोणताही अवयव किती काळ नीट काम करेल, हे दाता आणि रुग्णाच्या आरोग्यावर अवलंबून असतं आणि तो अवयव किती चांगल्या प्रकारे सांभाळला गेला यावरही.
उदाहरणार्थ, एखाद्या रुग्णाला जिवंत दात्याकडून नवीन किडनी मिळाली, तर ती साधारणपणे 20 ते 25 वर्षे काम करू शकते. मृत व्यक्तीकडून मिळालेल्या किडनीचे सरासरी आयुष्य हे 15 ते 20 वर्षे असू शकते.
प्रत्यारोपण केलेल्या वेगवेगळ्या अवयवांचं आयुष्यही वेगवेगळं असतं.
जर्नल ऑफ मेडिकल इकॉनॉमिक्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, लिव्हर (यकृत) सुमारे 20 वर्षे, हृदय 15 वर्षे आणि फुफ्फुस सुमारे 10 वर्षे कार्यरत राहतात.
अमर होणं कितपत शक्य आहे?
पुतिन आणि शी जिनपिंग कदाचित अनेक अवयव प्रत्यारोपणांबद्दल बोलत होते.
परंतु, प्रत्येक शस्त्रक्रियेस एक मोठा धोका असतो. प्रत्येकवेळी ऑपरेशन टेबलवर जाणं म्हणजे जुगार खेळण्यासारखे आहे.
नवीन अवयव मिळाल्यानंतर रुग्णाला आयुष्यभर भरपूर औषधं (इम्यूनोसप्रेसंट्स) घ्यावी लागतात, जेणेकरून त्यांचं शरीर नवीन अवयव स्वीकारू शकेल.
या औषधांचे साइड इफेक्ट्स देखील होऊ शकतात, जसं उच्च रक्तदाब किंवा संसर्गाचा (इन्फेक्शन) वाढलेला धोका.
तरीही कधीकधी रुग्णाचं शरीर प्रत्यारोपित अवयव नाकारू लागतं. म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (इम्यून सिस्टिम) त्या अवयवाला बाहेरचं समजून त्यावर हल्ला करू लागते.
निर्मित अवयव म्हणजेच तयार केलेले भाग
आता शास्त्रज्ञ असे अवयव तयार करण्यावर काम करत आहेत, जे शरीर नाकारणार नाही. यासाठी जनुकीय बदल (जेनेटिकली ऑल्टर्ड) केलेल्या डुकरांचा दाता म्हणून वापर केला जात आहे.
ते 'क्रिस्पर' नावाच्या जनुक संपादन (जीन एडिटिंग) तंत्राचा वापर करून डुकराचे काही जनुकं काढून टाकतात आणि काही मानवी जनुकं जोडतात, जेणेकरून प्रत्यारोपित केला जाणारा अवयव मानवी शरीराशी जुळू शकेल.
यासाठी विशेष प्रकारच्या डुकरांचे प्रजनन केलं जातं. कारण त्यांच्या अवयवांचा आकार मानवासारखा असतो. हे संशोधन अजून प्राथमिक टप्प्यात आहे, तरीही या तंत्राने एका हृदय आणि एका किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आलं आहे.
ज्या दोन व्यक्तींनी ही शस्त्रक्रिया केली, त्यांना या नव्या क्षेत्राचे पायनियर मानलं जातं. दोघेही आता जिवंत नाहीत, पण त्यांनी झीनोट्रान्सप्लांटेशन (म्हणजे वेगळ्या प्रजातीचे अवयव घेणे) संशोधनाला पुढे नेलं.
दुसरा मार्ग असा आहे की, मानवी पेशींमधून पूर्णपणे नवीन अवयव तयार केले जावेत.
स्टेम सेल्समध्ये अशी क्षमता असते की, ते शरीरातील कोणत्याही प्रकारच्या पेशी किंवा ऊतींमध्ये (टिश्यू) वाढू शकतात.
आतापर्यंत पूर्णपणे कार्यरत आणि प्रत्यारोपणासाठी योग्य मानव अवयव तयार करण्यात कोणतेही संशोधन यशस्वी झालेलं नाही. परंतु, शास्त्रज्ञ त्याच्याजवळ जात आहेत.
डिसेंबर 2020 मध्ये ब्रिटनमधील संशोधकांना (यूसीएल आणि फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट) मानवी थायमस तयार करण्यात यश मिळालं. हा इम्यून सिस्टिमचा एक महत्त्वाचा अवयव आहे.
त्यांनी स्टेम सेल्स आणि बायोइंजिनीअर्ड स्कॅफोल्डच्या मदतीने हा अवयव तयार केला. जेव्हा ते उंदरांमध्ये प्रत्यारोपण केलं, तेव्हा ते चांगलं काम करत असल्याचं दिसून आले.
लंडनमधील ग्रेट ऑरमंड स्ट्रीट हॉस्पिटलच्या शास्त्रज्ञांनी रुग्णाच्या ऊतींमधून स्टेम सेल घेऊन मानवी आतड्याचा एक भाग तयार केला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान प्रत्यारोपणासाठी मार्ग मोकळा करू शकतं आणि मुलांच्या आतड्याशी संबंधी समस्या दूर करण्यास मदत करू शकतं.
परंतु, हे संशोधन आजारांवर उपचार करण्यासाठी आहे, लोकांचं आयुष्य 150 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी नाही.
रिव्हर्स एजिंग शक्य आहे का?
टेक बिझनेसमन ब्रायन जॉन्सन आपलं वय कमी (रिव्हर्स एजिंग) करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी डॉलर्स खर्च करत आहेत.
अद्याप त्यांनी कोणत्याही अवयवाचं प्रत्यारोपण केलेलं नाही, परंतु आपल्या 17 वर्षांच्या मुलाचा प्लाझ्मा आपल्या शरीरात टाकला आहे.
नंतर त्यांनी ही प्रक्रिया थांबवली, कारण त्याचा काही फायदा झाला नाही आणि अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनासारख्या एजन्सींचा दबावही वाढला.
किंग्स कॉलेज लंडनचे डॉ. ज्युलियन मॅट्झ म्हणतात की, अवयव प्रत्यारोपणाच्या पलीकडेही अनेक प्रयोग सुरू आहेत, जसं की प्लाझ्मा रिप्लेसमेंट, पण हे सर्व अजूनही चाचणीच्या टप्प्यात आहेत.
ते म्हणतात, "या पद्धतींनी जास्तीत जास्त मानवी आयुर्मान खरंच वाढेल की नाही, हे अजून निश्चित नाही. पण शास्त्रज्ञांसाठी हे खूपच रोचक असं क्षेत्र आहे."
वयाची मर्यादा
प्रोफेसर नील मॅबॉट हे एडिनबर्ग युनिव्हर्सिटीच्या रोसलिन इन्स्टिट्यूटमधील इम्यूनोपॅथॉलॉजीचे तज्ज्ञ आहेत. मानवाला 125 वर्षे जगणं शक्य आहे, असं त्यांना वाटतं.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती फ्रान्सच्या जीन कॅलमेंट होत्या. त्या 1875 ते 1997 पर्यंत जगल्या. मृत्यूसमयी त्या 122 वर्षांच्या होत्या."
त्यांनी म्हटलं, "जरी प्रत्यारोपणानं खराब झालेले अवयव बदलता येत असले तरी पण वय वाढल्यावर आपलं शरीर हळूहळू कमजोर होत जातं आणि शारीरिक ताण सहन करण्याची आपली क्षमता कमी होते."
ते पुढे म्हणतात, "वय वाढल्यावर शरीराची संसर्गाशी लढण्याची ताकद कमी होते, शरीर नाजूक होतं आणि दुखापतीनंतर बरं होण्याची क्षमता कमी होते. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा ताण आणि इम्यूनोसप्रेसंट औषधांचा प्रभाव जास्त वयाच्या रुग्णांवर खूप गंभीर ठरू शकतो."
त्यांचं म्हणणं आहे की, आपण आयुर्मान वाढवण्याऐवजी 'निरोगी जीवन जगण्यावर' लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
"आयुष्य वाढलं, पण ते वृद्धापकाळातील आजारांशी झुंज देण्यात, सातत्याने रुग्णालयात जाण्यात आणि त्यासाठी वारंवार अवयव प्रत्यारोपण करावं लागत असेल तर असं वाढलेलं आयुष्य काय कामाचं. ही एक वाईट कल्पना ठरू शकेल," असं स्पष्ट मत प्रा. मॅबॉट व्यक्त करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)