मेक्सिकोची फातिमा बॉश मिस युनिव्हर्स, डोक्यावर मुकूट मिरवण्यापूर्वी केलं होतं स्पर्धेतून वॉकआऊट

मेक्सिकोची फातिमा बॉश मिस युनिव्हर्स

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जोएल गुइंटो, सिंगापूरहून
    • Author, पनीसा एमोचा, बँकॉकहून

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या मिस युनिव्हर्स 2025 चा किताब मेक्सिकोच्या फातिमा बॉशला मिळाला आहे. गोंधळ, वाद-विवादांमुळे यंदाची ही स्पर्धा चर्चेत आली होती.

शुक्रवारी (21 नोव्हेंबर) झालेल्या खास कार्यक्रमात फातिमाला मुकुट परिधान करण्यात आला.

मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एका कार्यक्रमात फातिमाला सर्व स्पर्धकांसमोर फटकारण्यात आलं होतं.

त्यानंतर तिने त्या कार्यक्रमातून 'वॉकआऊट' केलं होतं. या वादामुळे 25 वर्षीय फातिमा चर्चेत आली होती.

त्यानंतर दोन परीक्षकांनी स्पर्धेतून राजीनामा देत माघार घेतली होती. राजीनामा देणाऱ्या एका परीक्षकाने ही स्पर्धा 'फिक्स' असल्याचा दावा केला होता.

हा दिमाखदार सोहळा बँकॉकमध्ये झाला. परंतु, स्पर्धेच्या मध्येच अनेक स्पर्धक या स्पर्धेतून बाहेर पडले आणि दोन परीक्षकांनी राजीनामाही दिला होता.

विश्लेषक सांगतात की, या वादामुळे थाई आणि मेक्सिकन कंपन्यांच्या मालकांमधील सांस्कृतिक आणि धोरणात्मक मतभेद उघड झाले.

1952 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा हा 74 वा हंगाम आहे.

स्पर्धेच्या क्राऊन सेरेमनीमध्ये एक खास बाब पाहायला मिळाली. ही संस्था आता फक्त दरवर्षीच्या टीव्ही शोपुरता मर्यादित न राहता, टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवरही चालणारा मोठा मीडिया ब्रँड होण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून आलं.

भारताची फुलराणी म्हणून ओळख असलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा या स्पर्धेच्या ज्युरीमध्ये समावेश होता.

मिस युनिव्हर्सची सुरुवात अमेरिकेत झाली. ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या मिस वर्ल्डसोबत ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात जास्त काळ चालणाऱ्या सौंदर्य स्पर्धांपैकी एक मानली जाते.

या स्पर्धेचं उद्दिष्ट महिलांना जागतिक प्रश्नांवर जागरुकता करण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं आहे.

हा किताब मिळाल्यावर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होण्याची संधीही मिळू शकते.

थायलंड यंदा चौथ्यांदा मिस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजन करत होतं. फॅन वेबसाइट्सनुसार, त्यांची स्पर्धक हा मुकुट जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती.

भारतीय वंशाची थायलंडची नागरिक प्रवीनेर सिंहही या स्पर्धेत होती. ती जिंकली असती तर 1988 नंतर थायलंडची पहिली, आणि आतापर्यंतची तिसरी मिस युनिव्हर्स ठरली असती.

2018 मध्ये थायलंडने आयोजित केलेली मिस युनिव्हर्स स्पर्धा अलीकडच्या काळातील सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे यंदाचं आयोजन त्याहूनही चांगलं होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती.

स्पर्धेदरम्यान गोंधळ

यंदाच्या हंगामाचं आयोजन थायलंडमधील प्रसिद्ध मीडिया कंपनीचे प्रमुख नोव्हात इट्साग्रासिल यांनी केलं. चाहते त्यांना मिस ग्रँड इंटरनॅशनलचे संस्थापक आणि ती स्पर्धा आयोजित करणाऱ्या कंपनीचे मालक म्हणून ओळखतात.

ही थायलंडमध्ये होणारी एक छोटी स्पर्धा आहे, जी सोशल मीडियावरील तिच्या उपस्थितीसाठी प्रसिद्ध आहे.

यावर्षीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचं आयोजन करण्याचा परवाना नोव्हात यांच्याकडं, तर स्पर्धेचं मुख्य व्यवस्थापन मेक्सिकोचे उद्योजक राऊल रोचा यांनी केलं.

थायलंडचे नोव्हात इट्साग्रासिल आणि मेक्सिकोचे राऊल रोचा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, थायलंडचे नोव्हात इट्साग्रासिल आणि मेक्सिकोचे राऊल रोचा
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सुरुवातीच्या काळात या स्पर्धेत उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील महिलांचं वर्चस्व होतं. परंतु, गेल्या काही दशकांत दक्षिण-पूर्व आशियात विशेषतः थायलंड, फिलीपिन्स आणि इंडोनेशियामधून या स्पर्धेचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.

इथे या स्पर्धेला गरिबीतून बाहेर पडण्याचा किंवा सेलिब्रिटी होण्याचा शॉर्टकट मार्ग मानला जातो.

यंदाच्या आयोजनात या महिन्याच्या सुरुवातीलाच नाट्यमय वळण मिळालं होतं.

प्री-इव्हेंट कार्यक्रमात नोव्हात यांनी मिस मेक्सिको फातिमा बॉशला इतर अनेक स्पर्धकांसमोर सोशल मीडियावर प्रमोशनल कंटेंट पोस्ट न करण्याबद्दल फटकारलं होतं.

फातिमाने यावर आक्षेप नोंदवला. तेव्हा नोव्हात यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावलं आणि फातिमाच्या बाजूने उभं राहणाऱ्यांनाही स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्याची धमकी दिली.

फातिमा बॉश त्या हॉलमधून बाहेर गेली आणि तिच्या मागे इतर अनेक स्पर्धकही तिला पाठिंबा देत बाहेर पडले.

मिस युनिव्हर्स संघटनेने नोव्हात यांच्या वागणुकीला 'दुर्भाग्यपूर्ण' म्हटलं. त्याचवेळी राऊल रोचा यांनी मेक्सिकोहून व्हीडिओद्वारे थाई भागीदार नोव्हात यांना 'असं न करण्याचा' सल्ला दिला.

नोव्हात इट्साग्रासिल यांनी नंतर यासाठी माफी मागितली आणि माझ्या काही शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

पण स्पर्धा योग्यरित्या चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांची एक टीम तिथे पाठवण्यात आली.

प्रसिद्ध संगीतकार ओमार हारफूश यांनी निवड प्रक्रियेत 'गडबड' झाल्याचा आरोप केला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रसिद्ध संगीतकार ओमार हारफूश यांनी निवड प्रक्रियेत 'गडबड' झाल्याचा आरोप केला.

त्याच्या एका आठवड्यानंतर स्पर्धेतील दोन परीक्षकांनी राजीनामे दिले, त्यापैकी एका परीक्षकाने निवड प्रक्रियेत 'गडबड' झाल्याचा आरोप केला.

फ्रेंच वंशाचे लेबनीज संगीतकार ओमार हारफूश यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून आठ सदस्यांच्या ज्युरीमधून राजीनाम्याची घोषणा केली.

त्यांनी आरोप केला की, "शुक्रवारी अंतिम स्पर्धेपूर्वीच एका गुप्त समितीने स्पर्धक स्टेजवरयेण्याआधीच अंतिम स्पर्धक निवडले होते."

हारफूश यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू क्लॉड मॅकेलेले यांनीही 'अनपेक्षित वैयक्तिक कारणांमुळे' स्पर्धेतून माघार घेण्याची घोषणा केली.

मिस युनिव्हर्स संघटनेने हारफूश यांचे आरोप फेटाळले आणि "कोणत्याही बाहेरील गटाला अंतिम स्पर्धक निवडण्याचा अधिकार देण्यात आला नसल्याचे" सांगितले होते.

कदाचित हारफूश हे 'बियॉंड द क्राउन' या कार्यक्रमाबद्दल बोलत असतील, असं संघटनेनं म्हटलं. हा कार्यक्रम एक 'सोशल इम्पॅक्ट इनिशिएटिव' आहे, जो मुख्य स्पर्धेपासून वेगळा आयोजित केला जातो आणि यासाठी वेगळी निवड समिती असते.

यानंतर बुधवारी (19 नोव्हेंबर) रात्री झालेल्या प्राथमिक गाउन राउंडमध्ये मिस जमैका स्टेजवर कोसळली. तिला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

संघटनेत गोंधळ

खरंतर मिस युनिव्हर्स संघटना नेतृत्व बदलाच्या टप्प्यात असतानाच वादांची ही मालिका समोर आली आहे.

यंदाच्या प्री-पेजेंट (स्पर्धेपूर्वीचे) कार्यक्रमांपूर्वी थायलंडच्या मीडिया कंपनीच्या मालक आणि ट्रान्सजेंडर महिला ऐन जाक्राजूतातिप यांनी संघटनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. त्यांची जागा ग्वाटेमालाचे मुत्सद्दी मारियो बुकारो यांनी घेतली.

वर्ष 2022 मध्ये ऐन यांनी अमेरिकेतील एंटरटेनमेंट कंपनी अँडेव्हरकडून ही पेजेंट स्पर्धा विकत घेतली होती.

यानंतर त्यांनी ही स्पर्धा अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी त्यात मोठे बदल केले.

त्यांनी ट्रान्सजेंडर महिला, विवाहित महिला आणि मातांना स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली. तसेच स्पर्धकांसाठी वयोमर्यादा देखील काढून टाकली.

जेकेएन ग्लोबल ग्रुपच्या सीइओ ऐन जाक्राजूतातिप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेकेएन ग्लोबल ग्रुपच्या सीइओ ऐन जाक्राजूतातिप

वर्षानुवर्षे या कार्यक्रमाचे प्रेक्षक कमी होत असल्याचे पाहून त्यांनी मिस युनिव्हर्स ब्रँडमधून पैसे कमवण्याचे मार्ग शोधले. जसं की, पाण्याच्या बाटल्या आणि बॅग ब्रँडच्या नावाने विकणं.

वर्ष 2023 मध्ये त्यांची कंपनी जेकेएनने 'अडचणीचे' कारण सांगत दिवाळखोरीसाठी अर्ज केला.

राजीनामा देण्यापूर्वी एन जाक्राजूतातिप यांनी राऊल रोचा यांना त्यांच्या व्यवसाय भागीदाराच्या कंपनीत समाविष्ट केलं. नंतर त्यांनी नोव्हात इट्सराग्रासिल यांच्याकडे 2025 ची स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी दिली.

संघटनेसाठी हा बदलाचा काळ 'खूप कठीण' होता, असं अमेरिकेची ब्यूटी क्वीन आणि पेजेंट कोच डॅनी वॉकरने बीबीसीला सांगितलं

त्या म्हणतात की, याचा परिणाम असा झाला की आता महत्त्वाच्या भूमिका थायलंड आणि मेक्सिकोमध्ये विभागल्या गेल्या आहेत.

त्या म्हणतात की, जेव्हा अँडेव्हरने किंवा त्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं, तेव्हा नेतृत्वाची रचना अत्यंत स्पष्ट होती.

मिस आयव्हरी कोस्ट ऑलिव्हिया यास, मिस मेक्सिको फातिमा बॉश, मिस व्हेनेझुएला स्टेफनी ॲड्रियाना अबस्ली नसीर, मिस फिलिपाइन्स अतिसा मनालो आणि मिस थायलंड प्रवीनेर सिंह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मिस आयव्हरी कोस्ट ऑलिव्हिया यास, मिस मेक्सिको फातिमा बॉश, मिस व्हेनेझुएला स्टेफनी ॲड्रियाना अबस्ली नसीर, मिस फिलिपाइन्स अतिसा मनालो आणि मिस थायलंड प्रवीनेर सिंह

पाउला शुगार्ट यांनी मिस युनिव्हर्स संघटनेत आधीच्या दोन मालकांसोबत अध्यक्ष पदावर काम केलं आहे.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की "चाहते आणि बाहेरील लोकांमध्ये गोंधळ आहे. नेतृत्व खरोखर कोण करत आहे, हे कोणाला माहितीच नाही आणि एखादा प्रश्न विचारायचा तर कोणाकडे जावं हेही कळत नाही. हे ब्रँडसाठी खूप वाईट आहे."

महिला आणि लॅटिन अमेरिका विषयक अभ्यास केलेले थितिफोंग दुआंगखोंग हे शिक्षणतज्ज्ञच नाहीत तर त्यांना ब्यूटी पेजेंटचाही अनुभव आहे.

ते म्हणतात की, अशा स्पर्धांच्या आयोजकांना सांस्कृतिक फरकांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे.

मिस युनिव्हर्स स्पर्धेचं भविष्य काय असेल?

गेल्या काही वर्षांत मिस युनिव्हर्सचे प्रेक्षक सातत्याने कमी होत आहेत. याचं एक कारण म्हणजे चाहते सोशल मीडियाकडे वळले आहेत.

यापूर्वी हा किताब पटकावणारे आणि उपविजेतेही टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर गेले आहेत. त्यांचे लाखो फॉलोअर्ससह आहेत. आता ते इन्फ्लुएन्सर झाले आहेत.

मिस ग्रँड इंटरनॅशनलमध्ये सहभागी होणाऱ्या महिला अशा प्रकारच्या इ-कॉमर्स जगाचा एक भाग बनाव्यात अशी नोव्हात यांची अपेक्षा होती. एक जग जिथे ते थेट प्रक्षेपणाद्वारे (लाइव्ह ब्रॉडकास्ट) वस्तू विकू शकतात. नोव्हात यांना मिस युनिव्हर्सला या जगाची ओळख करून द्यायची होती.

परंतु, लॅटिन अमेरिकेत ब्यूटी क्वीन अजूनही ग्लॅमरस टेलिव्हिजन सेलिब्रिटी म्हणूनच ओळखल्या जातात.

तिथे प्रेक्षकांसाठी एक मिस युनिव्हर्स रियालिटी शो तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये मिस युनिव्हर्स लॅटिना निवडली गेली. डॉमिनिकची ही विजेता आता बँकॉकमध्ये मुख्य मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी झाली होती.

मिस युनिव्हर्स स्पर्धेभोवती सुरू असलेला हा वाद संघटनेच्या व्यवसायाशी संबंधित आहे. पण मुकुट जिंकलेल्या ब्यूटी क्वीन अजूनही त्यांच्या व्यासपीठाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करत आहेत.

सौंदर्यस्पर्धा

फोटो स्रोत, Getty Images

वर्ष 2018 ची विजेती कॅट्रियोना ग्रेने आपल्या 1.38 कोटी इन्स्टाग्राम फॉलोअर्सला फिलिपाइन्समधील वादळामुळे बेघर झालेल्या लोकांसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केलं आहे.

या स्पर्धेत महिलांना वस्तूप्रमाणे सादर केल्याचा आरोपही सातत्याने केला जातो.

पण जिथे 2025 मध्ये बहुतेक स्पर्धकांनी टू-पीस बिकिनी घातली, तिथे काही रुढीवादी देशांच्या स्पर्धकांना स्विमसूट राउंडमध्ये संपूर्ण शरीर झाकणाऱ्या कपड्यांची परवानगी देण्यात आली होती.

पाउला शुगार्ट म्हणतात, "ही स्पर्धा सर्वांसाठी नाही यात काही शंका नाही. काही लोक नेहमीच असहमत असतील. पण जोपर्यंत त्याचे मूळ उद्दिष्ट सुरक्षित असेल, तोपर्यंत समाजात अशा स्पर्धांची एक भूमिका राहील."

त्या म्हणतात की, संघटनेच्या केंद्रस्थानी महिलांना सशक्त करण्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे.

"जर आपण या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना सशक्त केलं नाही, तर मिस युनिव्हर्सला काहीच महत्त्व नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)