ब्रेस्ट ट्युमरमधून वाचून 'मिस वर्ल्ड 2025' ठरलेली ओपल सुचाता कोण आहे?

फोटो स्रोत, Getty Images
थायलंडची ओपल सुचाता चुआंग्सरी 2025 ची 'मिस वर्ल्ड' ठरली आहे.
72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या निकालात अव्वलस्थानी राहून ओपल सुचाताने हा किताब पटकावला आहे.
इथियोपियाची हॅसेट देरेझ या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर मार्टीनिक की ऑरेली योहाचिमने तिसरा क्रमांक मिळवला.
तेलंगणाच्या हैदराबाद येथे 7 मे 2025 रोजी सुरु झालेली ही मिस वर्ल्ड स्पर्धा अखेर 31 मे रोजी संपली आणि ओपल सुचाताच्या रूपाने जगाला एक नवीन 'मिस वर्ल्ड' मिळाली आहे.
या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नंदिनी गुप्ताला 'टॉप 20'मध्ये स्थान मिळवण्यात यश आलं. पण ती ही स्पर्धा जिंकू शकली नाही. हैदराबादच्या हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये या भव्यदिव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं.
दोन दिवसांपूर्वी मिस वर्ल्ड ठरलेल्या सुचाताने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिलं होतं, "ही स्पर्धा केवळ थायलंडचं प्रतिनिधित्व कारण्यापुरतीच मर्यादित नव्हती. तर माझ्यासाठी ही स्पर्धा म्हणजे आजवर ज्यांचा आवाज ऐकला गेला नाही त्या महिलांना आवाज देण्याचा हा एक भाग होता. ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत त्यासाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येक महिलेचं प्रतिनिधित्व मी करत होते."
तिच्या प्रवासाबद्दल लिहिताना ती म्हणाली, "मिस वर्ल्ड ही केवळ एक स्पर्धा नसून हा एक मंच आहे, हे एक वचन आहे. केवळ दिखाऊ सौंदर्याची ही स्पर्धा नसून, खरोखर प्रभावी काम करणाऱ्यांसाठीची ही स्पर्धा आहे."
"या प्रवासातून मी हेच शिकले की तुमचं सौंदर्य हळूहळू लोप पावतं पण जगण्याचा उद्देश तसाच राहतो."
'मला राजदूत बनायचं आहे'
मिस वर्ल्डच्या वेबसाईटवर ओपल सुचाताबद्दल दिलेल्या माहितीनुसार, तिला राजदूत व्हायचं आहे. सध्या सुचाता आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करत आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांसोबतच तिला मानसशास्त्र आणि मानववंशशास्त्रातही खूप रस आहे.
ओपल सुचाताने स्तनांच्या कर्करोगावर काम करणाऱ्या संघटनांसोबत काम केलं आहे. तिला स्वतःला सुद्धा स्तनांच्या ट्युमर झाला होता आणि त्यातून ती वाचली आहे.

फोटो स्रोत, OPAL SUCHATA
तरुण महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी ती नेहमीच बोलत असते. ती एक पशुप्रेमी देखील आहे, तिच्याकडे 16 मांजरं आणि पाच कुत्रे आहेत.
मिस वर्ल्डच्या सुंदर मुकुटासोबतच ती 1 मिलियन डॉलर्सची मानकरी देखील ठरलीय.
मिस वर्ल्ड संघटना आणि त्यांच्या भागीदार संस्थांकडून ही बक्षिसाची रक्कम विजेत्यास दिली जाते.
शेवटच्या फेरीपर्यंत कोणत्या स्पर्धक पोहोचल्या होत्या?
मार्टिनिक की ऑरेली योहाचिम, इथिओपियाची हॅसेट देरेझ, पोलंडची माया क्लाज्दा आणि थायलंडची ओपल सुचाता या चार स्पर्धकांनी मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा बहुमान मिळवला.
आतापर्यंत भारताच्या सहा महिलांना मिस वर्ल्डचा खिताब मिळाला आहे. त्यामध्ये यामध्ये रीटा फारिया (1966), ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखे (1999), प्रियांका चोप्रा (2000) आणि मानुषी छिल्लर (2017) यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, MISS WORLD/FB
विजेत्यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले?
अंतिम फेरीत, ज्युरी सदस्यांनी चार स्पर्धकांना विशेष प्रश्न विचारले.
नम्रता शिरोडकरने पोलंडच्या माया क्लाज्दा हिला, दग्गुबती राणा हिने इथिओपियन स्पर्धकाला, माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने मार्टिनिक स्पर्धकाला आणि सोनू सूदने थाई स्पर्धकाला प्रश्न विचारले.
या प्रश्नांच्या उत्तरांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली.

फोटो स्रोत, NOAH SEELAM/AFP VIA GETTY IMAGES
या स्पर्धेवरून वाद देखील निर्माण झाला होता
मिस वर्ल्ड स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेली 'मिस इंग्लंड 2025' ठरलेल्या मिला मॅगीने स्पर्धेच्या आयोजकांवर गंभीर आरोप केले होते.
एका ब्रिटिश नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत मिला म्हणाली की, "त्यांनी मला मी एखादी वेश्या आहे असा विचार करायला भाग पाडलं."
मिस इंग्लंड मिला मॅगी 7 मे 2025 रोजी हैदराबाद येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आली होती. मात्र, 16 मे रोजी ती परत निघून गेली.
ही बातमीही वाचा :'मला एखाद्या वेश्येसारखी वागणूक दिली गेली', हैदराबादमधील स्पर्धेबाबत 'मिस इंग्लंड' काय म्हणाली?
मायदेशी परतल्यानंतर मिला मॅगीने 'द सन' या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, "मी तिथे परिवर्तनाचं उदाहरण बनून गेलेली होते. पण मला एखाद्या कठपुतळीसारखं बसवलं गेलं. माझ्या नैतिकतेने मला तिथे बसण्याची परवानगी दिली नाही. आयोजकांना असं वाटलं की, मी तिथे फक्त मजा करण्यासाठी आलेली आहे. मला एखाद्या वेश्येसारखी वागणूक दिली गेली. श्रीमंत पुरुष प्रयोजकांसमोर आमची परेड घेण्यात आली, त्यानंतर मी तिथून परतण्याचा निर्णय घेतला."
"मिस वर्ल्डचा काळ आता संपला आहे. या स्पर्धेत दिले जाणारे मुकुट आणि पट्टे निरर्थक आहेत, तिथे जग बदलण्याची भाषा आता बोलता येत नाही. तुम्ही सकाळी स्वयंपाकघरात बसावं, मेकअप करावा आणि दिवसभर बॉल गाऊन्स घालून फिरावं एवढीच त्यांची अपेक्षा आहे."
'द सन'ने याबाबत लिहिलेल्या लेखात असं म्हटलं आहे की, मिला मॅगीला तिथे आलेल्या मध्यमवयीन पुरुषांचं सतत मनोरंजन करण्यास सांगितलं गेलं आणि यामुळे ती वैतागली होती.

फोटो स्रोत, MISSWORLD.COM
मिला मॅगी द सनच्या मुलाखतीत म्हणाली, "सहा पाहुण्यांच्या एका टेबलासमोर दोन-दोन मुलींना ठेवण्यात आलं. त्या पाहुण्यांचं पूर्ण संध्याकाळ मनोरंजन करण्याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या. मला ते खूप चुकीचं वाटलं. मी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तिथे गेलेली नव्हते. मिस वर्ल्ड स्पर्धेत काही नैतिकता असली पाहिजे. पण आता या स्पर्धा आधीसारख्या जुन्या पद्धतीनेच होत आहेत. या पद्धती कालबाह्य झाल्या आहेत. तिथे मी एखादी वेश्या असल्यासारखं वाटलं."
"मी तिथे ज्या विषयाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी गेले होते, त्याबाबत बोलायला लागायचे तेव्हा समोरची मंडळी अतिशय गैरलागू आणि कमी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायचे. यामुळे मला माझं म्हणणं मांडण्यात अडचणी आल्या. मला हे अजिबात अपेक्षित नव्हतं. त्यांनी आम्हाला लहान मुलांसारखी वागणूक दिली," असं मिला म्हणाली.
मिला मॅगीने तिच्या आईला फोन करून तिथे तिचं शोषण होत असल्याचं सांगितलं, असं 'द सन'ने त्यांच्या लेखात म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











