फळ्यावर पायाने लिहून गणित शिकवणाऱ्या गुलशन लोहार या शिक्षकाची गोष्ट

फोटो स्रोत, Shannawaz Ahmed
- Author, मोहम्मद सरताज आलम
- Role, बीबीसी हिंदीसाठी
जन्मतःच दोन्ही हात नसल्यानं गुलशन लोहार फळ्यावर पायाचा वापर करून लिहितात आणि माध्यमिक शाळांतल्या मुलांना गणित शिकवतात.
पश्चिम सिंहभूम या जिल्ह्यात मुख्य शहरापासून जवळपास 90 किलोमीटर लांब बरांगा गावात त्यांची ही शाळा आहे. झारखंडमधला हा एक अतिशय मागासलेला भाग आहे.
बरांगा हे गाव सारंडा जंगलात वसलंय. गुलशन लोहार यांचाही जन्म याच गावात झालाय. अंपगत्वामुळे शिक्षणापासून ते शिक्षक बनण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवास अनेक अडथळे आले.
सात भावंडात गुलशन लोहार सगळ्यात लहान. जन्मापासूनच दोन्ही हात नसल्यानं त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.
गुलशन लोहार यांचे भाऊ छोटेलाल सांगत होते की एकदा त्यांची आई रायवरी त्यांना म्हणाली, "गुलशन शिकला तर त्याच्या जगण्याला दिशा मिळेल."
त्यावर छोटेलाल यांनी आईला विचारलं, "गुलशनला पेन्सिल, पेन हातातच धरता येत नाही, तर तो शिकेल कसा?"
छोटेलाल पुढे सांगत होते, "तेव्हा आई म्हणाली, पेन पकडण्यासाठी हात नसले तर त्याच्या पायांनाच हात बनवायला हवं."
पायांनी लिहायला आईनं शिकवलं
त्यांचे कुटुंबीय सांगतात की गुलशन तीन वर्षांचे होते तेव्हापासून त्यांच्या आईनं त्यांना शिकवणं सुरू केलं.
"गुलशनच्या डाव्या पायाचा अंगठा आणि पहिलं बोट यांच्या मध्ये खडू घुसवून एक सरळ रेष मारण्याचा सराव आई त्याच्याकडून करून घेऊ लागली," छोटेलाल सांगत होते.
काही दिवसांनी छोटेलाल खडू ऐवजी पेन्सिलचा वापर करून गुलशन यांच्याकडून वहीवर लिहायचा सराव करून घेऊ लागले.

फोटो स्रोत, Shannawaz Ahmed
दीड वर्षांत गुलशन यांचा आत्मविश्वास वाढला तेव्हा छोटेलाल यांनी त्यांना गावातल्या प्राथमिक शाळेत घातलं.
शाळेतल्या सुरुवातीच्या दिवसांतल्या आठवणींबद्दल बोलताना गुलशन म्हणाले की, "मी इतर मुलांसारखा सामान्य नाही हे मला तोपर्यंत लक्षात आलं होतं. इतर सगळी मुलं हातानं लिहित होती. पण मला पायानं लिहावं लागत होतं. त्याचं मला फार वाईटही वाटत होतं."
पण त्याही परिस्थितीत त्यांना छोटेलालचा आधार होता. छोटेलाल त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देत होते.
त्यामुळेच पहिलीपासून ते दहावीपर्यंत दरवर्षी गुलशन शाळेत पहिला नंबर पटकावत होते. 2003 मध्ये त्यांनी पायाने पेपर लिहूनच दहावीची परीक्षा दिली.
दररोज 74 किलोमीटरचा प्रवास
पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातल्या बरांगा गावात जवळपास 50 कुटुंब आहेत. पण दहावीनंतरच्या शिक्षणाची सोय गावात नाही.
त्यामुळे उच्च्य माध्यमिक शिक्षणासाठी म्हणजे, बारावी देण्यासाठी गुलशन यांनी चक्रधरपूर मधल्या जवाहर लाल नेहरू कॉलेजात प्रवेश घेतला.

फोटो स्रोत, Shannawaz Ahmed
सुरुवातीला काही दिवस गुलशन कॉलेजात पोहोचले, की त्यांना पाहण्यासाठी गर्दी जमा होत असे. "जसं काही मी जगातलं एक आश्चर्य होतो.
कॉलेजातली मुलं आपापसात माझ्याबद्दल चर्चा करायची. मी हातांशिवाय कसा लिहू-वाचू शकतो याबाबत त्यांना नवल वाटत असे."
चक्रधरपूर त्यांच्या गावापासून 74 किलोमीटर लांब होतं. तिथं जाण्यासाठी आणि संध्याकाळी परत येण्यासाठी दररोज त्यांना आठ किलोमीटर पायी चालत जावं लागे.
मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर 2005 मध्ये गुलशन 65 टक्के मिळवून बारावी पास झाले.
मुख्यमंत्र्यांनी उचलला शिक्षणाचा खर्च
त्याच जवाहरलाल नेहरू कॉलेजातून बीएड करायचं गुलशन यांनी ठरवलं. पण फीसाठी लागणारे 24 हजार रूपये कसे जमा करायचे हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान होतं.
"एवढे पैसे भरणं आम्हाला परवडणारं नव्हतं. तेव्हा गुलशनने मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा तगादा लावला," छोटेलाल सांगतात.
2008 मध्ये छोटेलाल त्यांना घेऊन रांचीला गेले. तेव्हा शिबू सोरेन मुख्यमंत्री होते.

फोटो स्रोत, Shannawaz Ahmed
रात्र रेल्वे स्टेशनवर काढून दोघे भाऊ दिवसभर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घराबाहेर उभे असायचे. अनेक दिवस प्रयत्न केल्यानंतर शिबू सोरेन त्यांना भेटले.
गुलशनची प्रमाणपत्र पाहिल्यावर शिबू सोरेन फारच प्रभावित झाले.
गुलशन सांगतात, "गुरूजींनी मुख्यमंत्री निधीतून 24 हजार रूपयांचा चेक दिला. तेव्हा 'बाळा, तुझं शिक्षण थांबता कामा नये,' असं ते म्हणाले."
2009 मध्ये बीएड पूर्ण केल्यानंतर गुलशन यांनी पुढेही शिक्षण घेतलं. 2012 मध्ये त्यांनी राज्यशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
एका गुणाने हुकलं मेरीट
पदव्युत्तर शिक्षणानंतर गुलशन यांनी झारखंड शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) तयारी सुरू केली. 2013 मध्ये त्यांनी परीक्षा दिली. पण फक्त एका गुणांनी त्यांचं मेरीट हुकलं.
तोपर्यंत त्यांचे सगळे भाऊही मुलाबाळांसोबत वेगळे राहून मजूरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्यामुळे गुलशन यांना आर्थिकदृष्ट्या आणखीनच ताण जाणवू लागला.
तेव्हा गुलशन यांनी नोकरीसाठी पश्चिम सिंहभूमच्या जिल्हा उपायुक्तांची भेट घेतली.
तेव्हा अबुबकर सिद्दीकी जिल्हा उपायुक्त होते. त्यांच्या सांगण्यावरून आणि 2014 मध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) यांच्या निधीतून गुलशन यांची त्यांच्या जन्मगावातल्या, बरांगामधल्या, शाळेत प्रती तास मानधनावर गणित शिक्षक म्हणून नेमणूक झाली.

फोटो स्रोत, Shannawaz Ahmed
या शाळेचे मुख्यध्यापक राजीव प्रकाश महतो सांगतात, "त्यावेळी आमच्या शाळेत गणित विषय शिकवण्यासाठी एकही शिक्षक नव्हता. गुलशन सरांनी ही कमतरता भरून काढली."
मुख्यध्यापक पुढे सांगत होते, गणित विषयासाठी शिक्षक नसल्यानं पूर्वी शाळेतल्या विद्यार्थांना पहिली श्रेणी मिळवणं फार अवघड जात होतं. पण गुलशन यांच्या मेहनीतनं विद्यार्थ्यांचे निकाल चांगले येऊ लागले.
"पहिली श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. त्याचं सगळं श्रेय गुलशन सरांनाच जातं. गणितात पदव्युत्तर किंवा कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलं नसलं, तरी गेली 11 वर्ष ते अगदी मन लावून गणित शिकवतात," असं मुख्यध्यापक म्हणाले.

फोटो स्रोत, Shannawaz Ahmed
शाळेत विज्ञान शिकवणाऱ्या सुनिता या शिक्षिका सांगतात, "गुलशन सर अपंग आहेत. पण त्यांच्यात इतर शिक्षकांच्या तुलनेत काही कमी आहे, असं कधीही वाटलं नाही. मुलांनाही ते फार आपलेसे वाटतात. गणित ते खूप सोपं करून शिकवतात."
दहावीत शिकणारी त्यांची विद्यार्थीनी नेहा महतो सांगते, "मी सहावीत या शाळेत आले. गुलशन सर हात नसताना पायांनी शिकवायला लागले तेव्हा मी पाहातच राहिले. "
पाचवी ते दहावीच्या मुलांना गणित शिकवणारे गुलशन लोहार यांना शिक्षक बनल्यानंतरच्या त्यांच्या भावना विचारल्या असता ते म्हणाले, "आपल्याच गावातल्या शाळेत सेवा करण्याची संधी मिळणं ही अत्यंत सन्माननीय गोष्ट आहे."

फोटो स्रोत, Shannawaz Ahmed
"मला शिकवण्याासाठी एका तासाचे 139 रूपये मिळतात. महिन्याभराचं मानधान जवळपास 13 ते 14 हजार रुपये एवढं होतं," ते पुढे सांगत होते.
पण ते पूर्णवेळ शिक्षक नसल्यानं त्यांना 'नो वर्क, नो पे' ही अट लागू होते. म्हणजे, एखाद्या दिवशी काही कारणामुळे त्यांना काम करणं जमलं नाही तर तो दिवस त्यांची बिनपगारी रजा म्हणून ग्राह्य धरला जातो.
त्यामुळे एखाद्या महिन्यात सुट्ट्या जास्त झाल्या तर गुलशन यांचं महिन्याचं मानधनही कमी निघतं.
"आता मी पुन्हा टीईटीची तयारी करत आहे. झारखंडमध्ये शिक्षक भरती झाल्यावर मी पूर्णवेळ शिक्षक होईन. तेव्हा माझा पगारही वाढेल आणि थोडं आर्थिक स्थैर्य येईल," गुलशन सांगतात.
पत्नीचाही घेतला अभ्यास
दाट जंगलात वसलेल्या बरांगा गावातल्या एका कौलारू घरात गुलशन लोहार यांचं कुटुंब रहातं. त्यांची पत्नी अंजली आणि एक तीन वर्षांची मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे.
"माझ्यानंतर गुलशनची काळजी कोण घेईल असं आई लहानपणापासून म्हणायची. आता अंजली माझी काळजी घेते. तिनं माझ्यासाठी फार मोठा त्याग केला आहे. माझ्या प्रत्येक कामाची जबाबदारी तिनं उचलली आहे."

फोटो स्रोत, Shannawaz Ahmed
अंजली सोय सांगतात की, "सकाळी उठल्यावर त्यांना शौचालयात घेऊन जाणं, मग ब्रश करणं, आंघोळ करणं, कपडे घालणं अशा सगळ्या कामात मी त्यांना मदत करते. नंतर नाश्ता करून ते शाळेत जातात."
लग्नाबद्दल विचारल्यावर अंजली स्मितहास्य करत सांगतात, "2017 मध्ये आमचा प्रेमविवाह झाला होता."
"गुलशन माझ्यासाठी फार खास आहे. त्यांच्यामुळे मी शाळेत पहिला नंबर पटकवू शकले. माझा बारावीपर्यंतचा, पदवीचा आणि आता पदव्युत्तर अभ्यासही त्यांनीच करून घेतला," अंजली पुढे सांगतात.
गुलशन अंजली यांचीही टीईटीची तयारी करून घेत आहेत. भविष्यात त्याही शिक्षिका बनतील अशी आशा त्यांना वाटते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











