आई-बाप सालगडी राहिलेल्या मातंग समाजातील प्रशांतनं 55 लाखांची स्कॉलरशिप कशी मिळवली?

- Author, गणेश पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'मी मांगवाड्यातून बाहेर पडताना मागे वळून पाहिलं.
कुजलेल्या वाशांच्या आधारावर तरलेली ती कुडे,
सुरकुतलेली माझी माणसं
आणि जमीनदार मालकांनी डांबून ठेवलेल्या त्यांच्या इच्छा-आकांक्षा'...
सोलापूरच्या प्रशांत रणदिवे या तरुणाच्या कवितेतील या ओळी आहेत.
शेकडो वर्षांपासून व्यवस्थात्मक अन्यायामुळे मातंग आणि एकंदर दलित वर्गाची काय अवस्था झालीय, हेच मला माझ्या कवितेतून सांगायचं आहे, असं तो सांगतो.
"मी मातंग समाजातून येतो. आम्ही मांग म्हणूनही ओळखलो जातो. माझा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास आहे. पण योगायोगानं शाळेपासून कॉलेजपर्यंत शिक्षण घेण्यासाठी मला योग्य मार्गदर्शन मिळालं. आई-वडिलांनीही शिक्षणासाठी पाठिंबा दिला.
"त्यामुळे मी आता युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे सोशल अँथ्रोपोलॉजी या विषयात मास्टर्स करण्यासाठी जातोय. माझा हा पहिला विमान प्रवास आहे. पहिला विमानाचा प्रवास जो लंडनकडे जातोय. त्याबद्दल मला खूप छान वाटतंय," असं सांगताना प्रशांतच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता.

प्रशांतला यूके सरकारकडून पूर्ण निधी असलेली चेवेनिंग स्कॉलरशिप मिळाली आहे. या स्कॉलरशिपअंतर्गत लंडनमधील त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च यूके सरकारकडून केला जाणार आहे.
यात व्हिसा फी, कॉलेजची संपूर्ण फी, लंडनमधला निवास आणि जेवणाचा खर्च, तसंच भारतातून लंडनला जाण्या-येण्याचे विमान तिकीट यांचा समावेश आहे.
ही स्कॉलरशिप एका वर्षाच्या मास्टर्स अभ्यासक्रमासाठी दिली जाते.
चेवेनिंग स्कॉलरशिप्स भारतातल्या सर्व नागरिकांसाठी खुल्या आहेत, पण त्यासाठी ग्रॅज्युएशन डिग्री झाल्यावर किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे.
दिल्लीतील यूके दुतावास येथे काम करणाऱ्या चेवेनिंग स्कॉलरशिप विभागाच्या प्रमुख सुप्रिया चावला यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये भारतातून निवड झालेल्या स्कॉलरपैकी बहुतांश म्हणजे 60 टक्क्यांहून जास्त विद्यार्थी हे टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून आलेले आहेत. त्यातले बरेच जण हे घरातले पहिले शिकलेले, म्हणजे त्यांच्या कुटुंबात कुणीही याआधी उच्च शिक्षण घेतलेलं नव्हतं, असे आहेत. ज्या मुला-मुलींमध्ये नेतृत्वाची क्षमता आहे आणि त्यांना भविष्यात मोठ्या पातळीवर कार्य करायचं आहे, अशा उमेदवारांची निवड केली जाते.
चावला पुढे सांगतात, "हे सर्व विद्यार्थी निव्वळ त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर निवडले गेले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी यूकेमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी 'चेवनिंग' ने संधी उपलब्ध करून दिली आहे."
प्रशांत हा त्यापैकी एक आहे.
प्रशांतला प्रतिष्ठेची चेवेनिंग स्कॉलरशिप मिळणं जास्त महत्त्वाचं ठरतं, कारण, मातंग समाजात शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे. त्यातल्या त्यात कॉलेज आणि विद्यापीठात जाऊन उच्चशिक्षण घेणं तर अगदी नगण्य आहे.

प्रशांत मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या भोवाळी गावचा. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आई-बापाला कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं.
त्यांनी सालगडी, ऊसतोड मजूर, शेतमजुरी असं सगळं केलं. पैशाची चणचण असल्यामुळे रणदिवे कुटुंबानं बर्याचदा गावोगावी स्थलांतर केलं.
शेवटी 2012 ला ते अकलूजला येऊन स्थायिक झाले.
प्रशांत उच्चशिक्षणासाठी लंडनला जात आहे, ही अभिमानाची गोष्ट असली, तरी गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबातील मुलांसाठी परदेशात शिक्षण घेणे किती आव्हानात्मक असते, याची जाणीव त्याला आणि त्याच्या वडिलांना आहे.
प्रशांतचे वडील, मोहन रणदिवे यांना आता आपल्या मुलाचा सार्थ अभिमान वाटतो.
मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्यांनी जीवाचे रान केले, ते वडील प्रशांतच्या जिद्दीचं कौतुक करतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू नकळतपणे गालांवर ओघळतात.

"मला गावाकडची माणसं म्हणाली, गाव सोडून गेला. तिकडं सालावर गेलाय. आता हा पोरंबी सालावर ठेवणार. माझ्या डोक्यात तेवढाच शब्द होता. आपल्यावर जे आलं ते पोरांवर येऊ द्यायचं नाही.
"कायबी होऊ द्या इकडं. आपण दिलेल्या पैशाचं प्रशांतने चिज केलं. आम्ही रानात जेवढं कष्ट केलं त्यापेक्षा याला जास्त कष्ट लागलंय," असं मोहन रणदिवे सांगतात.
मातंग समाजातून परदेशात शिकायला जाणं का अवघड आहे?
मातंग जात ही भारतातील अनुसूचित जातींपैकी एक असून मुख्यतः महाराष्ट्र राज्यात आढळते. ऐतिहासिकदृष्ट्या या समाजाला इतर दलित समाजाप्रमाणे किंबहुना तुलनेने जास्त भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागला आहे.
आपल्या समाजाविषयी बोलताना प्रशांत म्हणाला, पारंपरिकदृष्ट्या, या समाजातील लोक केरसुन्या बांधणे, हलगी वाजवणे, तोरण विणकाम, शेतमजुरी, सालगडी, बांधकाम आणि ऊसतोड यांसारखी वेगवेगळी श्रमाची कामे करतात.
"मातंग, बौद्ध, चांभार आणि इतर दलित समाजातील बऱ्याच लोकांना जमिनी नाहीयेत. त्यामुळे माझ्या माणसांना मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही. हातावरचं पोट असल्याने कुणाकडंही शिल्लक पैसे राहात नाहीत. अगदी कुणी आजारी पडलं तरी कुठल्यातरी सावकाराकडून 5-10 टक्क्यांनी पैसे घ्यावे लागतात. इतकी बीकट अवस्था आहे," असं त्याने सांगितलं.
भारतातील दलित वर्गाला दीर्घकाळ अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. सरकारी कायदे आणि सामाजिक सुधारणांमुळे असे प्रकार आता फार कमी झाले आहेत. पण प्रशांतच्या मते या समाजातील व्यक्तींना आजही भेदभावाचा सामना करावा लागतो.

प्रशांत सांगतो, "आमचा समाज हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या अशा सगळ्या पातळींवर अजूनही मागासलेला आहे. माझ्या पूर्वजांनी अस्पृश्यतेचा सामना केला. आताच्या घडीला अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात राहिली नाही, तरी पण याबाबत माझी स्वतःची उदाहरणं आहेत. लोक आजही म्हणतात तुमचा विटाळ होईल."
"मातंग समाजातील पोरांना तुम्ही मांग किंवा मांगाचे आहात, असं म्हणून हिणवलं जातं. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास खचलेला असतो. दुसऱ्या बाजूला आर्थिक साधने नसल्याने तुमच्या कौशल्याचा कुठल्याच प्रकारे विकास होत नाही. तुम्ही तुमच्या शेठ, सावकारांवर अवलंबून राहता. मोठमोठ्या जमीनदारांवर तुमचा उदरनिर्वाह अवलंबून असतो."
कठीण परिस्थिती असतानाही प्रशांतने शिक्षणाची वाट सोडली नाही. समाजातल्या सर्व स्तरातून मदत मिळाल्याचं त्याच्या बोलण्यातून समोर आलं.
पण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनतीसोबत डोळ्यांसमोर एखादा आदर्श आणि त्याची प्रेरणा असणं महत्त्वाचं असल्याचं तो ठामपणे सांगतो.

बीबीसी मराठीशी बोलताना तो म्हणाला, "माझ्या आयुष्यातला खरा बदल बाबासाहेब आंबेडकरांमुळंच झाला. चळवळीत आल्याने बाबासाहेबांची पुस्तकं वाचायला मिळाली. आधी मुक्ती कोण पथे वाचलं, मग ॲनिहिलेशन ऑफ कास्ट वाचलं, जातींचे निर्मूलन वाचलं.
हीच किती मोठी गोष्ट आहे की, आपल्यातलाच एक ज्याने भारताचं संविधान लिहिलं. आपल्यातलाच माणूस त्याने क्रांती केली. आपल्यातलाच एक माणूस देशातला सगळ्यात मोठा लीडर झाला. जगभरात त्यांचे एवढे पुतळे आहेत. ही बाब अत्यंत प्रेरित करायची."
चेवेनिंग स्कॉलरशिप कशी मिळवायची?
प्रशांतला 55 लाख रूपयांहून अधिक रक्कमेची चेवेनिंग स्कॉलरशिप मिळाली आहे.
पण ही स्कॉलरशिप कुणाला मिळते? त्यासाठी काय तयारी करावी लागते? याविषयी प्रशांतने सविस्तर माहिती दिली.
चेवेनिंगच्या तयारीच्या संदर्भात एक मूलभूत गोष्ट म्हणजे यात 4 महत्त्वाचे प्रश्न असतात. लीडरशिप, नेटवर्किंग, करिअर प्लॅन आणि तुमचे कोर्सेस तुम्ही का निवडत आहात, या प्रश्नांची तुम्हाला सखोल उत्तरं द्यावी लागतात.

प्रशांत म्हणाला, "तयारीच्या प्रोसेसमध्ये एक पार्ट महत्त्वाचा आहे की, तुम्ही चेवेनिंगच्या वेबसाईटवर जाऊन समजून घेतलं पाहिजे की, चेवेनिंग एक्झॅक्टली आहे काय? त्याची पात्रता काय आहे. ते प्रश्न काय आहेत, ते कॉपी करून घ्यावेत. प्रत्येक प्रश्नावर व्यवस्थित चिंतन केलं पाहिजे. या प्रश्नांना मी कसा पात्र ठरू शकतो हाही विचार केला पाहिजे."

फोटो स्रोत, British High Commission, New Delhi
चेवेनिंगचं एक युट्यूब चॅनेल आहे. ते तुम्ही रेफर केलं पाहिजे. सोबत चेवेनिंगमध्ये आधी सिलेक्ट झालेल्यांसोबत तुम्ही बोललं पाहिजे. त्यांना त्यांच्या आधीच्या अर्जाविषयी विचारलं पाहिजे, असंही त्यानं सांगितलं.
दरम्यान, प्रशांत आणखी एक गोष्ट आवर्जून सांगतो, "खास करून मागासवर्गातील मुलांकडे अस्सल अनुभव आहेत. आपण जे जगलोय, भोगलंय, जे आजूबाजूला पाहिलंय. आपण जे काम केलंय, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्व आहे. त्या कामाला व्यवस्थित मांडता आलं, तर मला वाटतं आपल्यापेक्षा बेस्ट चेवेनिंग स्कॉलर कुणीच असू शकणार नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











