'त्या पेशंटला मारून टाक ना ...', दोन डॉक्टरांचं कोरोनाकाळातील कथित रेकॉर्डिंग समोर, गुन्हा दाखल

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो
    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कोरोना साथीच्या काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा जीवतोड प्रयत्न करत होती. पण त्याचवेळी वैद्यकीय क्षेत्राची मान शरमेने खाली जाईल, अशी एक घटना आता समोर आली आहे.

एका विशिष्ट समुदायाच्या 'कोरोना रुग्णाला मारून टाक' असं म्हणणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

उदगीर शहरातील या प्रकारानं खळबळ उडाली आहे. तसंच संबंधित डॉक्टरविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुग्णाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात एफआयआर दाखल झाली आहे.

आरोपी डॉक्टरचं नाव शशिकांत देशपांडे आहे. त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

पोलिसांत दाखल एफआयआरनुसार ही घटना 2021 मधील कोरोना काळातली आहे. त्यावेळी हा साथीचा रोग शिगेला पोहोचला होता. रुग्णालये रुग्णांनी भरलेली होती आणि सोयीसुविधांची कमतरता होती.

त्यादरम्यानची ही क्लिप समोर आली आहे.

या प्रकरणी डॉ. शशिकांत देशपांडे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 295 अ (धार्मिक भावना दुखावणे) आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी आरोपी शशिकांत देशपांडे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

पोलीस सध्या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. डांगे यांना नोटीसही बजावली आहे.

"ते जिल्ह्याबाहेर आहेत. आम्ही त्यांचा मोबाईल फोन जप्त करून चौकशी करू," अशी माहिती उदगीरचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एक डॉक्टर म्हणतो, "त्या दायमीला मारून टाक ना, तुला पण पहिल्यापासून त्यांची (विशिष्ट धर्माचा उल्लेख करत) सवय आहे. एवढा मोठा ऑक्सिजन जातोय त्या दायमीला."

यावर दुसरे डॉक्टर म्हणतात, "रात्री कमी केलंय, सगळ्यांना 2 लिटरवर आणलंय."

हे कथित संभाषण उदगीर शासकीय रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक शशिकांत देशपांडे आणि डॉ. शशिकांत डांगे यांच्यातील असल्याचा आरोप आहे.

2021 मध्ये डॉ. शशिकांत देशपांडे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक होते, तर डॉ. शशिकांत डांगे उदगीरच्या कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत होते.

कथित ऑडिओ क्लिपमध्ये डॉ. देशपांडे हे डॉ. डांगे यांना सांगत आहेत की, "त्या विशिष्ट जातीची महिला रुग्ण तिला मारून टाक. तिला खूप ऑक्सिजन जातोय."

यावर डॉक्टर डांगे सांगतात की, "हो हो, रात्री सगळ्यांचे ऑक्सिजन 2 लिटरवर आणले आहे."

याप्रकरणी आता संबंधित महिला रुग्णाच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो

पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये लातूरच्या उदगीर सरकारी रुग्णालयात त्यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे आणि कोविड-19 केअर सेंटरमध्ये नियुक्त असलेले डॉ. शशिकांत डांगे यांचा समावेश आहे.

रुग्ण कौसर फातिमा या दयामी अजीमोद्दीन गौसोद्दीन (53) यांच्या पत्नी आहेत. त्या या आजारातून बऱ्या झाल्या होत्या.

गौसोद्दीन यांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी 24 मे रोजी डॉ. देशपांडे यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून द्वेषपूर्ण कृत्य केल्याच्या कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला.

एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?

तक्रारदाराने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, 2021 मध्ये साथीरोगाच्या काळात त्यांची पत्नी कौसर फातिमा (त्यावेळचे वय 41) यांना कोविड-19 ची लागण झाली होती.

15 एप्रिल 2021 रोजी तिला उदगीर येथील सरकारी रुग्णालयात इन पेशंट म्हणून दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयाच्या व्यवस्थापनाखाली नांदेड रोडवरील नेत्र रुग्णालयासमोरच्या इमारतीत डॉ. डांगे कोविड रुग्णांना उपचार करत होते.

याच ठिकाणी पीडित महिलेला 10 दिवस उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. ती दाखल झाल्याच्या सातव्या दिवशी पीडित रुग्णाचे पती डॉ. डांगे यांच्या शेजारी बसले होते.

डॉ. डांगे जेवण करत होते. त्यावेळी डॉ. देशपांडे यांचा फोन आला होता. त्यानंतर डॉ. डांगे यांनी फोन स्पीकरवर ठेवला आणि रुग्णालयाबाबत त्यांचं संभाषण सुरू झालं.

डॉक्टर शशिकांत देशपांडे
फोटो कॅप्शन, डॉक्टर शशिकांत देशपांडे

कॉलमध्ये डॉ. देशपांडे यांनी बेडच्या उपलब्धतेबद्दल विचारपूस केली. डॉ. डांगे यांनी त्यांना सांगितले की, खाटा रिकाम्या नाहीत.

तेव्हा डॉ. देशपांडे यांनी "दयामी रुग्णाला मारून टाका. तुम्हाला अशा लोकांशी वागण्याची सवय झाली आहे," असं म्हटल्याचं दायमी यांनी तक्रारीत म्हटलं.

दायमी यांच्या तक्रारीनुसार, डांगे आणि देशपांडे यांच्या संभाषणादरम्यान जातीवरून अपशब्द वापरला.

दायमी यांनी सांगितले की, त्यांना हे ऐकून धक्का बसला होता. मात्र, त्यावेळी त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू असल्याने त्यांनी गप्प राहण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी त्यांची पत्नी बरी झाली आणि तिला डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, 2 मे 2025 रोजी कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर समोर आली.

दायमी यांनी सांगितले की, पुन्हा त्याच त्रासदायक टिप्पण्यांमुळे ते खूप दुखावले गेले आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.

विशेषतः धर्माशी संबंधित अपमानास्पद टिप्पण्यांचा कथित वापर झाल्यानं त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली.

रुग्णाच्या नातेवाईकांचं म्हणणं काय?

याप्रकरणी बोलताना दायमी यांचे नातेवाईक म्हणाले, "या प्रकरणाने आम्हाला खूप धक्का बसला आहे. जातीवरून जर डॉक्टर रुग्णांची तपासणी करत असतील, तर आमच्या समाजाने जायचं कुठं?

अशापद्धतीने किती लोकांचा जीव गेला आहे याबद्दल प्रशासनाने सखोल चौकशी करायला पाहिजे."

उदगीर शहर पोलीस ठाणे
फोटो कॅप्शन, उदगीर पोलीस ठाणे

या प्रकरणावर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते ॲड. अल्ताफ काझी म्हणाले की, "डॉक्टरी पेशा खरोखरच 'मानवसेवा म्हणजे ईश्वरसेवा' या तत्वावर आधारलेला असतो. विशेषतः आपत्ती किंवा महामारीच्या काळात डॉक्टर समाजासाठी आशेचा किरण असतो.

त्यामुळे जेव्हा एखादा डॉक्टर रुग्णाच्या हत्येस चिथावणी देतो किंवा धार्मिक द्वेषाची भाषा वापरतो, तेव्हा तो फक्त एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या विश्वासाचा घात करतो."

हे संभाषण खरे असेल, तर हे केवळ नैतिक आणि व्यावसायिक अपयश नाही, तर मानवतेविरुद्धचा एक अमानुष गुन्हा आहे, असंही ते म्हणाले.

डॉ. शशिकांत देशपांडे यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल होऊन स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. हे विधान किंवा कृती सत्य असल्याचे तपासात सिद्ध झाल्यास, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ॲड. काझी यांनी केली.

दरम्यान, बीबीसीनं डॉक्टर देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यास याठिकाणी अपडेट केली जाईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.