You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'म्हणूनच मी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केले' ; चर्चेत असलेल्या मुलाखतीत जया बच्चन काय म्हणाल्या?
राज्यसभेच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी दिलेली एक मुलाखत गाजत आहे.
या मुलाखतीत त्यांनी आपली नात नव्या नवेली हिच्या लग्नाबद्दल, पापाराझी यांच्याशी असलेलं त्यांचं नातं आणि त्यांचे पती अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबाबत आपली मतं व्यक्त केली आहेत.
त्या रविवारी (30 नोव्हेंबर) मोजो स्टोरी या युट्यूब चॅनलवरील 'वी द वुमन' कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार बरखा दत्त यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
वयाच्या 13 व्या वर्षी चित्रपट कारकिर्दीची सुरुवात करण्याबद्दल जया बच्चन म्हणाल्या की, माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी मला ते सर्व खेळासारखे वाटायचे. तेव्हा माझे खूप लाडही व्हायचे. मी थोडीशी लाडावलेली होते.
जया बच्चन यांनी सत्यजित रे यांच्या 'महानगर' चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
नव्या नवेलीच्या लग्नाबाबत त्या काय म्हणाल्या?
बरखा दत्त यांनी जया बच्चन यांना "लग्न ही कालबाह्य संस्था झाली आहे का?" असा प्रश्न विचारला. त्यावर जया बच्चन यांनी सहमती दाखवली.
त्यांना त्यांची नात नव्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, "नव्यानं लग्न करावं, अशी माझी इच्छा नाही. मी आता आजी आहे."
"नव्या काही दिवसात 28 वर्षांची होईल. मी तिला सल्ला देण्यासाठी आता खूप वयोवृद्ध झाले आहे. गोष्टी खूप बदलल्या आहेत. आजच्या काळातील मुलं जास्त स्मार्ट आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.
पापाराझींबद्दल काय म्हणाल्या?
सोशल मीडियावर जया बच्चन पापाराझींना फटकारतानाचे अनेक व्हीडिओ दिसतात.
पापाराझींशी असलेल्या नात्याबद्दल विचारले असता जया बच्चन म्हणाल्या, "माझे माध्यमांशी असलेले संबंध उत्तम आहेत. मी 'मीडियाचा प्रोडक्ट' आहे. पण पापाराझींशी असलेले माझे नाते शून्य आहे."
"हे लोक कोण आहेत? त्यांना भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे का? तुम्ही त्यांना मीडिया म्हणता. मी मीडियामधून आले आहे. माझे वडील पत्रकार होते. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे," असं मत जया बच्चन यांनी व्यक्त केलं.
त्या पुढे म्हणाल्या, "त्यांना वाटतं की ते त्यांच्या मोबाईल फोनवरून तुमचा फोटो काढतील. ते कोणत्या प्रकारच्या कमेंट करतात. ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत, ते कुठून आले आहेत. त्यांचे शिक्षण कोणत्या प्रकारचे आहे."
सोशल मीडियावर बोलताना जया बच्चन म्हणाल्या, "माझ्या एका स्टाफ सदस्याने मला सांगितले की, 'मॅडम, मी कोणताही सोशल मीडिया वापरत नाही. कारण तिथे तुमचा द्वेष केला जातो.' मी तिला म्हणाले की, मला त्याची अजिबात पर्वा नाही. मला त्याने फरक पडत नाही."
अमिताभ बच्चन, राजकारण आणि चित्रपट कारकिर्द
पती अमिताभ बच्चन आणि त्यांच्यातील तुलनेविषयीच्या प्रश्नावर जया बच्चन म्हणाल्या की, त्यांना अमिताभ यांची शिस्त खूप आवडते.
अमिताभ बच्चन यांच्या शिस्तीबद्दल त्या म्हणाल्या, "ते माझ्यासारखे उघडपणे बोलत नाहीत. मात्र, त्यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आपला मुद्दा कसा मांडायचा हे माहिती आहे. मला तसं करता येत नाही. हाच आमच्यात फरक आहे. त्यांचं व्यक्तिमत्व वेगळे आहे, म्हणूनच मी त्यांच्याशी लग्न केलं."
अमिताभ बच्चन यांनी राजकारणात येणं आणि त्याला कुटुंबाचा पाठिंबा याबद्दल विचारले असता, जया बच्चन म्हणाल्या, "त्यांच्या राजकारणात येण्याला मी पाठिंबा दिला होता."
त्या म्हणाल्या, "मी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. मी राजकारणात आल्यानंतर तेव्हा माझे घरचे घाबरले होते. त्यांना भीती होती की, मी काहीही बोलेन."
कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर अभिनय सोडणे कठीण होते का? या प्रश्नावर जया बच्चन म्हणाल्या, "एके दिवशी माझ्या मुलीने मला विचारले की, काय करते आहेस? मी म्हणाले, 'शूटसाठी मेकअप करतेय.' ती म्हणाली, 'तू नको जाऊ, पप्पांना जाऊ दे.' मग मला वाटले की, थांबण्याची वेळ आली आहे आणि मी चित्रपटांना नकार देऊ लागले."
"याशिवाय, मला एकसारख्या भूमिका मिळत असल्याने मी थकले होते. नवीन भूमिका येत नव्हत्या."
चित्रपट कारकिर्दीत परतण्याबद्दलच्या प्रश्नावर जया बच्चन म्हणाल्या, "श्वेताच्या (बच्चन) लग्नानंतर मला एकटं वाटत होतं. मला यापूर्वी कधीही इतके अस्वस्थ वाटले नव्हते. असं का होत होतं हे मला माहीत नाही. मी श्वेतासाठी खूप कडक आई होते, तरीही मी रडू आवरू शकले नाही."
"सुदैवाने, त्यावेळी गोविंद निहलानी माझ्याकडे आले आणि विचारले की, तुम्ही 'हजार चौरासी की मां' या चित्रपटात आईची भूमिका कराल का?' मी लगेच 'हो, मी करेन' म्हणाले," असंही त्यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)