जगातील 5 देश जे राहण्यासाठी मानले जातात सर्वात आरामदायक आणि सर्वोत्तम

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लिंडसे गॅलोवे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सध्या जगात अनेक ठिकाणी युद्धं सुरू आहेत, प्रत्येक देश आपापल्या सीमांची काळजी घेत आहे, अनेक देशांमध्ये तणाव वाढला आहे.
त्यात आणखी व्यापारी तणावाची भर पडली आहे. पण अशा परिस्थितीतही काही देश तणावविरहित आणि कमालीच्या शांततेत पुढं जात आहेत.
2025 च्या ग्लोबल पीस इंडेक्स (जीपीआय) अहवालानुसार, जगभरात देशांमध्ये होणाऱ्या संघर्षांची संख्या दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक झाली आहे.
या वर्षी तीन नवीन संघर्ष सुरू झाले आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपापली सैन्य ताकद वाढवण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हा अहवाल इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसने तयार केला आहे. यामध्ये 23 वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या म्हणजेच घटकांच्या आधारे देशांचं मूल्यमापन केलं जातं.
यात बाह्य संघर्ष, संरक्षण खर्च, देशांतर्गत सुरक्षा आणि दहशतवादाची परिस्थिती यांसारख्या घटकांचा समावेश असतो.

या यादीत जे देश सातत्याने टॉपवर आहेत, ते जवळपास 20 वर्षांपासून आपल्या धोरणांमध्ये स्थिर आहेत.
याचा अर्थ असा की, जर एखाद्या देशाची धोरणं शांततापूर्ण आणि स्थिर असतील, तर ते दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात.
आम्ही शांत देशांतील लोकांशी त्यांच्या धोरणांचा आणि सामाजिक मूल्यांचा जीवनातील शांततेवर होणारा परिणाम यांबद्दल बोललो.
1. आइसलँड
वर्ष 2008 पासून आइसलँड जगातील सर्वात शांत देश आहे.
या वर्षी यात आणखी 2 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे, ज्यामुळे आइसलँड इतर देशांपेक्षा पुढे गेला आहे.
आइसलँडमध्ये सुरक्षा आणि विश्वास हा लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे.
इंट्रेपिड ट्रॅव्हल नॉर्थ युरोपच्या जनरल मॅनेजर इंगा रोस अँटोनियुसदोत्तिर म्हणतात, "हिवाळ्यातील थंडी कधी कधी कठीण असते, पण लोकांमधील आपुलकीचं नातंच खरी सुरक्षा देतं.
इथं तुम्ही रात्री एकटं बाहेर जाऊ शकता, कसलीही भीती वाटत नाही. कॅफे आणि दुकानांबाहेर मुलं गाड्यांमध्ये आरामात झोपलेली दिसतात, तर त्यांचे पालक जवळच जेवत असताना किंवा काम करताना दिसतात. इथल्या पोलिसांकडे बंदूकसुद्धा नसते."

फोटो स्रोत, Getty Images
इंगा म्हणतात की, देशातील लैंगिक समानतेच्या धोरणांमुळे महिला सुरक्षित आणि आत्मविश्वासू बनल्या आहेत.
त्यांचं म्हणणं आहे की, "समान संधी आणि मजबूत सामाजिक व्यवस्था समाजाला सर्वांसाठी सुरक्षित आणि चांगलं बनवते."
जर तुम्हाला आइसलँडची ही शांतता अनुभवायची असेल, तर स्थानिक लोकांसारखं इथं जीवन जगा, असा सल्ला इंगा देतात.
त्यांचं म्हणणं आहे की, "गरम पाण्याच्या तलावात पोहायला जा, हॉट टबमध्ये अनोळखी लोकांशी बोला किंवा एखाद्या डोंगरावर चढाई करा. खरी आइसलँडची मजा तुम्हाला त्याच्या संगीत, कला आणि प्रत्येक ऋतूत बदलणाऱ्या निसर्गात मिळेल."
2. आयर्लंड
विसाव्या शतकाच्या शेवटी संघर्षातून जाऊनही आज आयर्लंड शांतता आणि स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं.
या देशाला दरवर्षी लष्करीकरणातील घट आणि कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा वादाचं प्रमाण कमी केल्यामुळे उच्च गुण मिळतात.
सामाजिक सुरक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रणातही जगातील 10 सर्वात सुरक्षित देशांमध्ये त्यांचा समावेश होतो.
किल्डेयरचे रहिवासी आणि किल्किया कॅसलमधील 'डायरेक्टर ऑफ एक्सपीरियन्स' जॅक फिट्सिमन्स सांगतात, "इथले लोक खरंच एकमेकांची काळजी घेतात. जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे मदत मागितली, तर ती व्यक्ती तुमची मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल."
ते म्हणतात, "इथले लोक मैत्रीपूर्ण आहेत आणि समुदायामुळे सर्वांना आपुलकी वाटते. अशावेळी तुम्ही लहान गावातील असाल किंवा मोठ्या शहरातील, त्यात फरक पडत नाही. मजबूत सामाजिक व्यवस्था आणि समुदाय कल्याणावर लक्ष केंद्रित केल्यामुळे असमानता आणि तणाव दोन्ही कमी झाले आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
आंतरराष्ट्रीय स्तरावर आयर्लंडने लष्करी तटस्थतेचे धोरण स्वीकारलं आहे. त्यामुळेच ते नाटोचा भाग नाहीत.
इथे वाद-विवाद संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवण्यास प्राधान्य दिले जाते.
देश आपल्या निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाची काळजी घेतो आणि पर्यटकांचं नेहमीच उत्साहानं स्वागत केलं जातं.
फिट्सिमन्स म्हणतात, "इथे आतिथ्य हा संस्कृतीचा भाग आहे. परदेशी पाहुण्यांप्रती आमचं नैसर्गिक आदरातिथ्य त्यांना नेहमीच प्रभावित करतं."
ते म्हणतात, "इथे जीवनाचा वेग थोडा कमी आहे. लोक अजूनही गप्पा मारणं आणि कथा-कथनास महत्त्व देतात. तुम्ही कधीही एखादा किल्ला, शांत जंगल किंवा लहान पबमध्ये वाजणाऱ्या पारंपरिक संगीतापासून दूर नसता. हा आपुलकीचा आणि शांततेचा अनुभवच आयर्लंडला विशेष बनवतो."
3. न्यूझीलंड
या वर्षी न्यूझीलंड दोन क्रमांकांनी प्रगती करत जगातील तिसरा सर्वात सुरक्षित देश बनला आहे.
सुरक्षा आणि शांततेत सुधारणा, तसेच आंदोलनं आणि दहशतवादाच्या घटनांमध्ये घट ही याची मुख्य कारणं आहेत.
प्रशांत महासागरातील हा सुंदर बेटांचा देश भौगोलिकदृष्ट्या बाह्य संघर्षांपासून सुरक्षित आहे. देशाच्या अंतर्गत धोरणांमुळे नागरिकांमध्ये स्थिरता आणि विश्वास वाटतो.
ग्रीनर पास्चर्स फर्मच्या संचालक मिशा मॅनिक्स-ओपी म्हणतात, "न्यूझीलंडचे शस्त्रास्त्रांशी संबंधित कायदे जगातील सर्वात कडक कायदे आहेत. यामुळे लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना मजबूत होते."

फोटो स्रोत, Getty Images
त्या सांगतात, "इथे मुलं एकटीच शाळेत चालत जातात. लोक घराची दारं उघडी ठेवतात आणि रस्त्यावर कुणाची गाडी खराब झालेली दिसली, तर लोक स्वतः थांबून मदत करतात. इथे लोकांचा व्यवस्था आणि एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे."
मॅनिक्स-ओपी म्हणतात, "इथे केवळ सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सेवाच नाही तर निसर्गाशी जोडलं जाणं हाही लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. लोक समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारतात, जंगलात चालतात किंवा अगणित तारा असलेल्या आकाशाखाली बसून शांतता अनुभवतात."
त्या म्हणतात, "पोस्टकार्डसारख्या सुंदर दृश्यांव्यतिरिक्त, न्यूझीलंडची खरी सुंदरता इथे राहणाऱ्या लोकांमध्ये आहे. माओरी संस्कृती आजही जिवंत आहे आणि जीवनाची संथ, शांत गती लोकांच्या विचारसरणीत बदल घडवून आणते."
4. ऑस्ट्रिया
यावर्षी ऑस्ट्रिया जागतिक शांतता निर्देशांकात (ग्लोबल पीस इंडेक्स) एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर आला आहे.
आयर्लंडप्रमाणेच ऑस्ट्रिया देखील आंतरराष्ट्रीय राजकारणात तटस्थ राहतो. या धोरणामुळे तो नाटोसारख्या लष्करी आघाडीपासून दूर राहतो. ऑस्ट्रिया आपली ऊर्जा आणि संसाधने देशाच्या अंतर्गत विकासावर केंद्रित करतो.
एसपीए हॉटेल जगधॉफचे मालक आर्मिन फुर्चट्शेलर म्हणतात, "ऑस्ट्रियाचे जुने तटस्थता धोरण म्हणजे देश संघर्षात अडकत नाही, तर आपल्या लोकांमध्ये गुंतवणूक करतो.
येथे मजबूत सामाजिक रचना, चांगल्या आरोग्य सेवा आणि उच्च दर्जाची शैक्षणिक व्यवस्था लोकांमध्ये स्थिरता आणि विश्वास निर्माण करते."

फोटो स्रोत, Getty Images
स्टुबाई खोऱ्यातील न्यूस्टिफ्टमध्ये राहणारे फुर्चट्शेलर सांगतात, "इथले लोक मध्यरात्री नदीकिनारी फिरायला जातात, घरांचे दरवाजे उघडेच ठेवतात आणि कॅफे बाहेर सायकली कुलूप न लावता ठेवतात. इथली सुरक्षितता ही केवळ आकडेवारी नाही, तर तो जगण्याचा एक अनुभव आहे."
ते म्हणतात, "इथे येणारे लोक काही दिवसांतच तणावमुक्त होतात. शांत झोप घेतात आणि निसर्गाशी एकरूप होतात. हीच या ठिकाणची खरी सुरक्षितता आहे, जिथे माणूस स्वतःला पूर्णपणे अनुभवू शकतो."
5. सिंगापूर
या वर्षीही सिंगापूरने आपला सहावा क्रमांक कायम ठेवला आहे. टॉप 10 मध्ये असलेला तो एकमेव आशियाई देश आहे. जपान बाराव्या तर मलेशिया तेराव्या स्थानावर आहे.
सुरक्षा आणि शिस्तीच्या बाबतीत सिंगापूर जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. इथला प्रति व्यक्ती संरक्षण खर्च खूप जास्त आहे. यात फक्त उत्तर कोरिया आणि कतार सिंगापूरपेक्षा पुढे आहेत.
इथे जवळजवळ कोणताही संघर्ष अस्तित्वात नाही. मजबूत अंतर्गत सुरक्षा लोकांमध्ये शांतता आणि विश्वासाची भावना निर्माण करते.
स्थानिक रहिवासी शिनरन हान म्हणतात, "मी रात्री उशिरा चालत जातो, पण मला अजिबात भीती वाटत नाही. इतर मोठ्या शहरांमध्ये घरी परतताना जसा ताण जाणवतो, तो इथे जाणवत नाही."
"इथल्या लोकांचा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, आणि त्यामुळे इथे शांत, काळजी घेणारं आणि समाधान देणारं वातावरण तयार झालं आहे," असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
सिंगापूरमध्ये एलजीबीटी हक्कांबाबत अजूनही पारंपरिक विचार दिसतात आणि तिथे समलैंगिक विवाहावर बंदी आहे. तरीही समाजात परिवर्तनाच्या दिशेने प्रगती दिसू लागली आहे.
आता पिंक डॉट प्राइड फेस्टिवलसारखे कार्यक्रम आधीपेक्षा मोठ्या आणि अधिक सुरक्षित वातावरणात आयोजित केले जात आहेत.
या वर्षीच्या रॅलीत लोकांना आधीपेक्षा जास्त सुरक्षित वाटलं. कारण सिंगापूरचे तरूण समाजात स्वीकारार्हता वाढवण्याच्या दिशेने पुढे येत आहेत.
हान सल्ला पाहुण्यांना सल्ला देतात की, इथे मिळणाऱ्या सुरक्षिततेच्या स्वातंत्र्याचा पूर्ण आनंद घ्या.
"पहाटे दोन वाजता नदीकिनारी फेरफटका मारा, रात्री उशिरा स्ट्रीट फूड एन्जॉय करा किंवा पार्कमध्ये फेरफटका मारा, इथे सर्व काही खूप मोकळं आणि सुरक्षित वाटतं. मग तुम्ही स्थानिक नागरिक असाल किंवा पर्यटक," असं ते म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











