3 माणसं आणि 200 मेंढ्या असलेलं बेट, निसर्गप्रेमींना राहायला येण्यासाठी केलं आवाहन

- Author, नॅथन बेवन
- Role, बीबीसी वेल्स
ग्विनेडच्या लीन द्वीपकल्पाजवळचं (पेनेइन्सुला) एक छोटं बेट, जिथं माणसांपेक्षा मेंढ्या जास्त आहेत. तिथं आता निसर्गावर प्रेम करणारे नवीन लोक राहायला आणि काम करण्यासाठी हवे आहेत.
इनिस एनली, ज्याला बार्डसे आयलंड असंही म्हणतात. हे बेट नेहमी वाऱ्याने आणि समुद्राच्या फवार्यांनी आच्छादलेलं असतं. तिथं वीज किंवा नेटवर्क अशा गोष्टी नाहीत आणि सध्या तिथं फक्त तीनच लोक राहतात.
2023 मध्ये हे बेट युरोपमधील पहिलं 'इंटरनॅशनल डार्क स्काय सँक्चुअरी' बनलं. म्हणजेच, इथलं स्वच्छ आणि प्रदूषण नसलेलं रात्रीचं आकाश. तार्यांनी भरलेलं दृश्य, आत्ताच्या आणि पुढच्या पिढ्यांसाठी जपलं जात आहे.
आणि आता, जवळजवळ 20 वर्षांनंतर, हे बेट चालवणारं ट्रस्ट एक साहसी कुटुंब किंवा जोडप्याचं या खडकाळ किनाऱ्यावर स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत, म्हणजेच ते 'संपूर्ण आयुष्यभराची संधी' देत आहेत.

बार्डसे आयलंड ट्रस्ट म्हणतं की, ज्यांना तिथं राहायची इच्छा आहे, त्यांनी पुढे यावं. निवडलेली व्यक्ती किंवा कुटुंब सप्टेंबर 2026 मध्ये या बेटावर स्थायिक होतील.
एकदा तिथं स्थायिक झाल्यावर, नवीन रहिवासी 200 मेंढ्या आणि 25 वेल्श ब्लॅक गाय सांभाळण्याची जबाबदारी घेतील. त्यांच्याबरोबर असतील सध्या तिथे राहणारे शेतकरी गेरेथ रॉबर्ट्स (अॅबर्डंरॉन).
"गॅरेथ आणि त्यांचं कुटुंब 2007 पासून तिथं राहत आहेत, आणि त्यांना आता बेटाबद्दल चांगली माहिती आहे. तिथं राहण्याचे आव्हान आणि फायदे काय आहेत, हेही त्यांना माहीत आहे," असं ट्रस्टच्या मुख्य अधिकारी सिआन स्टेसी म्हणाल्या. रॉबर्ट्स हे नवीन रहिवाशांना मार्गदर्शन करतील, असंही त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Amanda Ruggeri
हे बेट फक्त 440 एकर (0.69 चौरस मैल) क्षेत्रफळाचे आहे, आणि ते एक राष्ट्रीय निसर्ग संरक्षण क्षेत्र तसेच विशेष वैज्ञानिक महत्त्वाचं ठिकाण (एसएसएसआय) आहे.
'इंटरनॅशनल डार्क स्काय सँक्चुअरी' प्रमाणपत्र मिळाल्यामुळे हे बेट जगभरातील 16 इतर ठिकाणांसोबत जोडलं गेलं, जे पृथ्वीवरील सर्वात दुर्गम आणि अंधारलेले किंवा काळोख असलेले स्थळ म्हणून ओळखले जातात.
वर्षातील काही ठराविक काळासाठी तिथं तात्पुरते राहणारे काही हंगामी रहिवासी (वॉर्डन) आहेत, त्यामुळे सियान यांनी त्याचं वर्णन 'खूपच जिवंत समुदाय' असं केलं आहे.
"मी स्वतः तिथं तीन वर्ष राहिले, हे राहण्यासाठी एक अद्भुत ठिकाण आहे," असं त्या म्हणाल्या.

- घरांत वायफाय किंवा वीज नाही, आणि पाणी सरळ विहिरीतून येतं.
- हे बेट लांबीने सुमारे 1.5 मैल आणि रुंदीने सुमारे अर्धा मैल आहे.
- '20,000 संतांचे समाधीस्थळ' हे बेट मध्ययुगीन काळापासून प्रसिद्ध आहे. त्यावेळी असं मानलं जायचं की, एनलीला तीन वेळा यात्रेवर जाणं म्हणजे रोमला एकदा जाण्याएवढं ते आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचं होतं.
- यात्रेकरू, समुद्री चाचे, मच्छीमार आणि शेतकरी या बेटावर इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून येत आहेत.
- 200 मेंढ्या
- 1821 साली बांधलेलं लाइटहाऊस अजूनही बेटाच्या दक्षिणेकडील बाजूस उभं आहे.
- युरोपमधील पहिलं डार्क स्काय सँक्चुअरी
- हे 30,000 मँक्स शीअरवॉटर पक्ष्यांच्या जोड्यांचं घर आहे.
मध्ययुगीन काळात ब्रिटनमधील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक मानल्या जाणाऱ्या इनिस एनलीला '20,000 संतांचं बेट' असंही म्हटलं जातं.
असं म्हटलं जातं की, हे बेट मोक्ष मिळवण्याच्या शोधात असलेल्या जगभरातील यात्रेकरूंचं अंतिम विश्रांतीस्थान मानलं जातं. 1990 च्या दशकात इथं केलेल्या उत्खननात अनेक मध्ययुगीन समाधी सापडल्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











