कुत्र्याचं फक्त नख लागल्यानं महिलेला झाला रेबीज, चार महिन्यानंतर रुग्णालयात मृत्यू

कुत्र्याचं नख लागल्यानं महिलेला झाला रेबीज

फोटो स्रोत, Facebook

    • Author, रेचल रसेल
    • Role, बीबीसी न्यूज

युकेमध्ये रेबीजचा संसर्ग अत्यंत दुर्मिळ मानला जातो.

पण, या आजारामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आपण किती सुरक्षित आहोत हे लोकांनी गृहीत धरू नये असा इशारा एका ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यानं दिला आहे.

बार्न्सली येथील 59 वर्षीय महिला यव्होन फोर्ड यांचा शेफील्ड येथील रुग्णालयात 11 जूनला मृत्यू झाला. कुत्र्याच्या पिल्लाचे नख लागल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला.

फोर्ड यांची मुलगी रॉबीन थॉमसन यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून आईबद्दल माहिती दिली आहे.

रॉबीन त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, "आईला दोन आठवड्यांपूर्वी लक्षणं जाणवू लागली होती. सुरुवातीला डोकेदुखी होती. त्यानंतर चालणं, बोलणं, गिळणं आणि झोपणंसुद्धा अशक्य झालं होतं."

फोर्ड यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फोर्ड या फेब्रुवारीमध्ये उत्तर आफ्रिकेतील देशात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा तिथं भटक्या कुत्र्यासोबत थोडासा संपर्क आला.

युकेला परतल्यानंतर बार्न्सली येथील रुग्णालयात त्यांना रेबीज झाल्याचं निदान झालं. त्यानंतर त्यांना शेफील्डच्या रॉयल हॅलमशायर रुग्णालयात हलवण्यात आलं. याच रुग्णालयात त्यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला.

प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा 'रेबीज' हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा 'रेबीज' हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे.

एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर युकेकडून विदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत.

विदेशात प्रवास करायचा असेल तर आधी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि सगळ्या लशी घ्याव्यात असं यूकेचे हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे (UKHSA) चे प्राध्यापक अँड्रयू ली म्हणाले.

युके 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच रेबीजमुक्त असल्याचं प्राध्यपक ली यांनी बीबीसीला सांगितलं.

ते म्हणाले, "आपल्याकडे वटवाघळांच्या काही प्रजाती वगळता जंगली किंवा पाळीव प्राण्यांमध्येही रेबीज आढळत नाही. खरोखरच हे दुर्मिळ आहे. सध्या युकेमध्ये रेबीजचा एक रुग्ण सापडला असून ती महिला विदेशातून प्रवास करून आली होती."

एखाद्याला लागण झाल्यानंतर लक्षणं दिसायला काही महिने लागू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विदेशात प्रवास करताना रेबीज झालेल्या प्राण्यांनी कोणाला चावा घेतला असेल, त्यांचं नख लागलं असेल किंवा चाटलं असेल तर शक्य तितक्या लवकर जखम धुवून काढावी आणि लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यावे, असंही आवाहनही प्राध्यापक ली यांनी केलं आहे.

रेबीजमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर लसीकरणाबद्दल सल्ला घेणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्याचं एका फार्मासिस्टनं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रेबीजमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर लसीकरणाबद्दल सल्ला घेणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्याचं एका फार्मासिस्टनं म्हटलं आहे.

ते पुढे म्हणतात, "तुम्ही लवकर उपचार घेतले तर बरे होण्याची शक्यता जास्त असते. पण, तुम्ही उपचार घ्यायला उशीर केला आणि विषाणूचा संसर्ग झाला तर आधी तो मज्जासंस्था आणि त्यानंतर मेंदूवर हल्ला करतो.

एकदा संसर्ग या टप्प्यावर पोहोचला की व्यक्ती या आजारातून बरी होऊ शकत नाही.

लोकांना उपचार लवकर मिळाले नाहीत आणि त्यांचं लसीकरणही झालेलं नसेल तर आजार झाल्यानंतर डॉक्टरसुद्धा काही करू शकत नाही. दुर्दैवानं हा आजार प्राणघातक ठरतो."

रेबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये पण काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रेबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये पण काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो.

रेबीज म्हणजे नेमकं काय?

  • रेबीज हा एक विषाणू असून जो मानवाचा मेंदू आणि मज्जासंस्थेवर हल्ला करतो.
  • रेबीजची लक्षणं सहसा 3 ते 12 आठवड्यांमध्ये दिसतात. पण, काही रुग्णांमध्ये अगदी काही दिवसांतच लक्षणं दिसतात किंवा काही महिने, वर्ष सुद्धा लागू शकतात.
  • चावलेल्या किंवा नख लागलेल्या ठिकाणी सुन्नपणा जाणवणे किंवा मुंग्या येणे, खूप चिंता वाटणे किंवा उत्साही वाटणे, गिळायला आणि श्वास घ्यायला त्रास होणे, अर्धांगवायू होणे ही रेबीजची लक्षणं असतात.
  • रेबीजची लक्षणं एकदा दिसू लागल्यानंतर हा आजार नेहमीच प्राणघातक ठरतो. पण, विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर वेळेत दिलेले उपचार अत्यंत प्रभावी ठरतात आणि आजारापासून बचाव होतो.
  • विदेशात एखाद्या प्राण्यानं चावा घेतला असेल किंवा नख लागलं असेल किंवा डोळे, नाक, तोंड किंवा उघड्या जखमेवर प्राण्यानं चाटलं तर त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी असा सल्ला एनएचएसने आपल्याला वेबसाईटवरून दिला आहे.
लोकांनी विदेशात जाण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि त्यांचे सर्व लसीकरण पूर्ण करावे, असं यूकेचे हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे (UKHSA) चे प्राध्यापक अँड्रयू ली म्हणाले.

फोटो स्रोत, REUTERS/Athit Perawongmetha/File Photo

फोटो कॅप्शन, लोकांनी विदेशात जाण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि त्यांचे सर्व लसीकरण पूर्ण करावे, असं यूकेचे हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे (UKHSA) चे प्राध्यापक अँड्रयू ली म्हणाले.

विदेशात जाणाऱ्या लोकांनी प्रवासासाठी वैद्यकीय सल्ला घ्या आणि योग्य लसीकरण करून स्वतः आणि आपल्या प्रियजनांचे रक्षण करा, असे आवाहन प्राध्यापक ली यांनी केले आहे.

"युकेमध्ये आपण संसर्गजन्य रोगांपासून सुरक्षित आहोत हे गृहीत धरतो. पण, आपण हे विसरतो की यूके बाहेरच्या अनेक देशांमध्ये रेबीजसारखे आजार सर्वसामान्य आहेत. त्यामुळे लोकांनी विदेशात जाण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि त्यांचे सर्व लसीकरण पूर्ण करावे.

आफ्रिका आणि आशियातील काही देशांमध्ये रेबीजचा धोका जास्त आहे. त्या देशात जाताना नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्राण्यांपासून दूर राहावे", असाही सल्ला त्यांनी दिला.

2000 ते 2024 दरम्यान विदेशात प्राण्यांसोबत संपर्क येऊन मानवाला रेबीजचा संसर्ग झाल्याच्या सहा घटना युकेमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत.

लसीकरणाबद्दल सल्ला घेणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ

रेबीजमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर लसीकरणाबद्दल सल्ला घेणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असल्याचं एका फार्मासिस्टनं म्हटलं आहे.

फार्मासिस्ट ओलोकान्मी म्हणाले, की आम्हाला याबद्दल विचारायला बरेच फोन आले आहेत. आमच्या फॉर्मसीमध्ये लसीचा साठा आहे. पण, मागणी वाढल्यानंतर पुरवठ्यात कमतरता निर्माण होऊ शकते, असंही ते म्हणाले.

आम्हाला वारंवार लशीच्या पुरवठ्याबद्दल समस्या येतात. विशेषतः लशींची मागणी जास्त असते या समस्या निर्माण होतात. रेबीज देखील त्यापैकीच एक आहे.

लशीचा पुरवठा होईपर्यंत वाट पाहावी लागेल किंवा दुसऱ्या उत्पादकांकडे जावं लागेल. पण, त्यामुळे लशींची किंमत वाढेल. सध्या तीन डोसच्या रेबीज लशीची किंमता 300 डॉलरपर्यंत आहे.

ओलोकान्मी म्हणाले आशिया, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिकेसारख्या उच्च जोखमीच्या देशांत प्रवास करण्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे की नाही याबद्दल सल्ला घेणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.