शरीराच्या चांगल्या पॉश्चरसाठी ताठ बसणं हाच एकमेव उपाय नाही, जाणून घ्या 3 सोप्या टिप्स

फोटो स्रोत, Getty Images
- Author, यास्मिन रुफो
- Role, बीबीसी न्यूज
"ताठ बसा! पोक काढून बसू नका!" अशा सूचना आपण सर्वांनी लहानपणापासून अनेकदा ऐकल्या आहेत.
अनेक वर्षांपासून आपल्याला सांगितलं जातं की, शरीराची चांगली स्थिती किंवा पॉश्चर म्हणजे सरळ, ताठ उभं राहणं, खांदे ताणलेले मागे असणं आणि एखाद्या काठी किंवा रॉडप्रमाणे पाठीचा कणा सरळ असणं.
मात्र, प्रत्यक्षात हे खरं नसू शकतं. डॉ. झँड वॅन टुलेकेन डॉक्टर आहेत आणि बीबीसीचे कार्यक्रमदेखील सादर करतात.
त्यांच्या मते, शरीराच्या चांगलं पॉश्चर किंवा स्थितीबद्दल आपल्याला जे माहित आहे असं वाटतं ते खूप जुनं झालं आहे.
किंबहुना, दिवसभर शरीर ताठ किंवा सरळ ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होऊ शकतं, असं डॉ. झँड यांनी मॉर्निंग लाईव्हला सांगितलं.
तुमच्या शरीराचं पॉश्चर सुधारण्यासाठी आणि पाठीची काळजी घेण्यासाठी तीन सोप्या आणि उपयुक्त टिप्स जाणून घेऊया.
1. हालचाल करत राहा
शरीराचं पॉश्चर हे स्थिर नसतं, ते बदलणारं असतं. त्यामुळे पॉश्चरच्या किंवा शरीराच्या स्थितीच्या बाबतीत होऊ शकणारी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे कित्येक तास एकाच स्थितीच राहणं. मग ते डेस्कवर काम करणं असो की सोफ्यावर झोपणं असो किंवा स्मार्टफोन पाहत राहणं असो.
डॉ. झँड म्हणतता की शरीराचं पॉश्चर चांगलं ठेवण्याचं महत्वाचं सूत्र म्हणजे त्यात बदल करत राहणं.
पॉश्चर दुरुस्त करणारे अनेक पट्टे, स्ट्रॅप आणि खुर्च्या आहेत. जे तुमचं आयुष्य बदलण्याचं आश्वासन देतात. मात्र तुमचं पॉश्चर सुधारण्यासाठी "तुम्ही फक्त दिवसभर हालचाल करत राहिलं पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
कमरेचं कुशन किंवा एर्गोनॉमिक खुर्चित बसणं तुम्हाला अधिक आरामदायी वाटू शकतं. तसंच पॉश्चर सुधारण्यासाठीचे पट्टे तुम्हाला कुबड काढण्यापासून रोखू शकतात.
मात्र, यातील कोणतीही गोष्ट तुमच्या शरीराची हालचाल, ताकद आणि तुमच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींची जागा घेऊ शकत नाही.
"तुमच्याकडे सर्वोत्तम खुर्ची असू शकते, मात्र जर तुम्ही त्या खुर्चीत आठ तास बसून राहिलात तर तुम्हाला पाठदुखी होईल."
डॉ. झँड असाही इशारा देतात की पाठ सरळ ठेवणारे किंवा पॉश्चर सुधारणारी काही साधनं तुम्हाला एकाच स्थितीत राहण्यास भाग पाडू शकतात. त्यामुळे तुमच्या हालचाली मर्यादित होतात किंवा त्यांना बंधनं येतात. तुम्ही जे केलं पाहिजे त्याच्या हे उलटं आहे.
तुम्ही उभं राहिलं पाहिजे, शरीर ताणलं पाहिजे आणि अधूनमधून विश्रांती घेतली पाहिजे. अगदी छोटे बदल किंवा हालचालींमुळे देखील तुमच्या स्नायूंना विश्रांती आणि बळ मिळू शकतं, असं ते म्हणतात.
2. शरीरात शक्ती निर्माण करा
मजबूत स्नायूंमुळे, शरीराची स्थिती किंवा पॉश्चर चांगलं राहतं. मात्र त्याचा अर्थ त्यासाठी तुम्ही जिममध्ये जाण्याची आवश्यकता आहे किंवा तुम्ही ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करावी असा नाही.
डॉ. झँड म्हणतात की यासाठी पाठ आणि कोअर (शरीराचा मध्यवर्ती भाग म्हणजे पोटाच्या अवतीभोवती भाग) मजबूत करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा.

फोटो स्रोत, Getty Images
हात वर डोक्यावर करणं आणि डोकं एका बाजूनं दुसऱ्या बाजूला वळवणं यासारख्या साध्या हालचालींमुळे "शरीरावर ताण कमी होऊ शकतो आणि त्यामुळे लगेचच बरं वाटू शकतं."
"शरीरानं स्वत:लाच आधार द्यावा हे त्यातून अपेक्षित आहे," असं डॉ. झँड म्हणतात.
तुमच्या शरीराला आवश्यक तितकं ताणण्यासाठी, तसंच शरीरातील विशिष्ट बिंदूंना लक्ष्य करण्यासाठी पिलेट्स (विशिष्ट प्रकारे केल्या जाणाऱ्या हालचाली किंवा व्यायाम) आणि योगासनांसारखे व्यायाम करणं हा एक चांगला मार्ग असू शकतो, असं ते म्हणतात.
एनएचएसच्या वेबसाईटवरही ताकद वाढवण्यासाठी, शरीराला बळकटी देण्यासाठी घरच्या घरी करण्याचे काही सोपे व्यायाम प्रकार सुचवले आहेत.
3. तुमचा दृष्टीकोन बदला
पॉश्चरचा मुद्दा फक्त स्नायूंपुरता मर्यादित नाही. तर त्याचा संबंध तुमच्या दृष्टीकोनाशी, मानसिकतेशी आहे.
ज्याप्रकारे आपण बसतो, उभं राहतो आणि हालचाल करतो, त्यातून आपण जे करत आहोत, त्याचा आपल्यावर किती ताण येतो आहे हे दिसतं.
लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर खांदे वाकवून काम करण्याचा संबंध तुमच्या कामाच्या डेडलाइन इतकाच डेस्कच्या सेटअपशीदेखील असू शकतो. त्यामुळे तुमचं काम किंवा अभ्यासासंदर्भातील तुमच्या दृष्टीकोनावर विचार करणं महत्त्वाचं आहे.
"शरीरातील वेदना फक्त स्नायूंशी निगडीत नसतात. त्याचा भावनिक आणि मानसिक गोष्टींशीही संबंध असतो," असं डॉ. झँड म्हणतात.
ते म्हणतात, पूर्वी लोकांना त्यांच्या शरीरातील वेदनेसाठी त्यांच्या डेस्कवरील सेटअपवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं जात असे. तुमच्यावरील "ताण, तुम्ही कितीवेळ काम करत आहात आणि तुम्ही कोणताही व्यायाम करता की नाही", या गोष्टींचाही तुमच्यावर परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेतलं जात नसे.

फोटो स्रोत, Getty Images
"तुमच्या बसण्याची जागा किंवा आसन किती उचं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे, मात्र त्याचबरोबर इतर गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत," असं ते पुढे म्हणतात.
त्यामुळे, तुमच्या पॉश्चरमध्ये सुधारणा करण्याचा संबंध तुमचा पाठीचा कणा ताणण्याइतकाच तुमचं वेळापत्रकातील दगदग, तणाव कमी करून ते सोपं करण्याशीदेखील असतो.
काही बाबतीत, शरीराच्या खराब पॉश्चरचा संबंध ( फक्त पाठदुखीच नाही) एखाद्या आजारपणाशी किंवा शारीरिक समस्येशीदेखील असू शकतो. त्यासाठी जर आवश्यकता असेल तर तुम्ही डॉक्टरचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे.
एनएचएसनुसार, जर तुम्हाला पाठदुखीची समस्या असेल तर तुम्ही सक्रिय राहण्याचा हालचाली करण्याचा प्रयत्न करावा. तसंच अँटि-इन्फ्लेमेटरी औषधं घ्यावीत आणि काही व्यायाम करण्याचा, स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करावा.
जर तुम्ही काही आठवडे घरच्या घरी उपचार करूनदेखील तुमची पाठदुखी बरी होत नसेल किंवा जर वेदना वाढत चालली असेल, तर तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











