फॅशन ब्रँड झाराच्या जाहिरातींमध्ये 'स्किनी मॉडेल्स' दाखवल्याचा आरोप; जाहिरातींवर बंदी

फोटो स्रोत, Zara
- Author, शॅर्लेट एडवर्ड्स
- Role, बीबीसी न्यूज
प्रसिद्ध फॅशन ब्रँड झाराच्या दोन जाहिरातींमध्ये अतिशय बारीक अशा सडपातळ शरीरयष्टीच्या 'स्किनी मॉडेल्स' झळकल्या होत्या. त्यांची शरीरयष्टी गरजेपेक्षा जास्त कृश असल्याचं म्हणत ब्रिटनच्या अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स अथॉरिटी (ASA) ब्रिटनच्या जाहिरात मानक प्राधिकरणाने या जाहिरातींवर बंदी घातली आहे.
यामागे सदर मॉडेल्स गरजेपेक्षा जास्त दुबळ्या, अस्वस्थ आणि आजारी वाटत असल्याचं कारण पुढे आलंय.
अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स अथॉरिटी (ASA) च्या म्हणण्यानुसार, एका जाहिरातीत सदर मॉडेल घट्ट बांधलेल्या केसांसह अतिशय दुबळी दिसत होती. तिचा चेहरा कोमेजलेला दिसत होता.
तर दुसऱ्या जाहिरातीत खोल गळ्याचा शर्ट (लो कट डिझाइन) घालून पोझ देताना त्या मॉडेलचे कॉलरबोन जास्त उठून दिसत होते. या दोन्ही मॉडेल्सची देहयष्टी कुपोषित असल्यासारखी भासत होती.
एएसएने जाहिरातींना 'बेजबाबदार' म्हटले आहे आणि म्हटले आहे की त्या त्यांच्या सध्याच्या स्वरूपात पुन्हा दाखवता येणार नाहीत. तसेच, यापुढे झाराद्वारा दाखवण्यात येणाऱ्या जाहिराती 'जबाबदारीने तयार' करण्यात आल्याची खात्री केल्यानंतरच त्या प्रसिद्ध कराव्यात, असंही सदर आदेशात म्हटलं आहे.
या जाहिरातींवर आक्षेप आल्यानंतर झाराने सदर जाहिराती काढून टाकल्या आहेत.
झाराकडून यावर स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. कंपनीने म्हटलंय की, ज्या जाहिरातींवर आक्षेप घेण्यात आल्या त्यांचे फोटोशूट करताना दोन्ही मॉडेल्सकडे त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र होतं. त्यानुसार फोटोशुट दरम्यान दोन्ही मॉडेल्सची तब्येत उत्तम असल्याचं स्पष्ट होतं.

फोटो स्रोत, Zara
बंदी घालण्यात आलेल्या दोन्ही जाहिराती झाराच्या वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
यापैकी एक जाहिरात लहान ड्रेससाठी होती. ज्यामध्ये कॅमेऱ्याचे अँगल वापरून विविध छटांच्या मदतीने शूट करण्यात आलेले मॉडेलचे हात-पाय "अगदीच बारीक" दाखवण्यात आले होते, असं एएसएनं म्हटलं आहे.
ASA च्या मते, या जाहिरातीत मॉडेलचे हात आणि पाय 'लक्षणीय बारीक' दाखवण्यात आले होते. ज्यामुळे तिची शरीरयष्टी 'असंतुलित' दिसत होती.
'बाहेर निघालेली गळ्याची हाडं'
आणखी एक बंदी घातलेली जाहिरात शर्टची होती. त्यात मॉडेल अशा स्थितीत असल्याचं म्हटलं जात होतं की त्यामुळे त्या मॉडेलची 'बाहेर आलेली' हाडं म्हणजे कॉलरबोन त्या जाहिरातीचं 'मुख्य वैशिष्ट्यं' बनलं.
एएसएनं झाराच्या दोन इतर जाहिरातींची चौकशी केली. मात्र या दोन्हींवर बंदी घालण्यात आली नाही.
झारानं आक्षेप घेतलेले सर्व फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि सांगितलं की त्यांच्याकडे कोणतीही थेट तक्रार आलेली नाही.
या रिटेल व्यवसाय करणाऱ्या कंपनीनं एएसआयला सांगितलं की, 'प्रकाशयोजनेतील आणि रंगसंगतीतील अतिशय किरकोळ बदल' वगळता कोणत्याही फोटोमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत.
त्यांनी पुढे सांगितलं की त्यांनी 'फॅशनिंग अ हेल्दी फ्युचर' नावाच्या अहवालातील शिफारशींचं पालन केलं आहे. 2007 मध्ये हा अहवाल युके मॉडेल हेल्थ इन्क्वायरीकडून प्रकाशित करण्यात आला होता.
झारा कंपनीनं सांगितलं की त्या अहवालातील तीन शिफारशींचं त्यांनी विशेषकरून पालन केलं आहे. या शिफारशींमध्ये म्हटलं होतं की "या मॉडेल्सनी आहारातील विकार ओळखण्यात तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांकडून त्यांचं आरोग्य चांगलं असल्याचं सांगणारं वैदयकीय प्रमाणपत्र द्यावं."

फोटो स्रोत, Zara
यावर्षाच्या सुरुवातीला रिटेल व्यवसाय करणाऱ्या इतर कंपन्यांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आल्यानंतर हे घडलं आहे. कारण या जाहिरातींमध्ये असलेल्या मॉडेल्स खूपच बारीक किंवा सडपातळ शरीरयष्टीच्या होत्या.
जुलै महिन्यात, मार्क्स अँड स्पेन्सरच्या एका जाहिरातीवर बंदी घालण्यात आली होती. कारण त्या जाहिरातीत असणारी मॉडेल 'अतिशय कृश किंवा आजारी वाटावी इतकी बारीक' दिसत होती.
एएसएनं म्हटलं आहे की या जाहिरातीत मॉडेलनं दिलेली पोज तसंच परिधान केलेले कपडे, तसंच 'मोठे टोकदार बूट' त्या 'मॉडेलच्या बारीक पायांवर' भर देतात. त्यामुळे ही जाहिरात 'बेजबाबदार' ठरते.
या वर्षाच्या सुरुवातीला, नेक्स्ट या रिटेल कंपनीच्या निळ्या स्किनी म्हणजे बारीक जीन्सच्या जाहिरातीवर देखील बंदी घालण्यात आली होती.
एएसएनं म्हटलं आहे की या जाहिरातीत कॅमेऱ्याचे अँगल वापरून मॉडेलच्या बारीक पायांवर भर देण्यात आला होता. ती जाहिरात 'बेजबाबदार' ठरवण्यात आली.
नेक्स्ट कंपनीनं म्हटलं आहे की जाहिरातींवर लक्ष ठेवणाऱ्या एएसएच्या निर्णयाशी ते असहमत आहेत. ते म्हणाले की जाहिरातीमधील मॉडेल जरी बारीक किंवा सडपातळ असली तरी ती 'निरोगी आणि तंदुरुस्त शरीरयष्टीची' आहे.
नेक्स्ट कंपनीच्या जाहिरातीवरील बंदीमुळे बीबीसीच्या वाचकांना प्रश्न पडला असेल की ज्या जाहिरातींमध्ये स्थूल किंवा जास्त वजन असलेल्या मॉडेल दाखवण्यात आल्या आहेत, त्यांच्यावर बंदी का घातली जात नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











