You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभलमधील हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, आतापर्यंत काय घडलं?
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला. शाही जामा मशिदीचा सर्व्हे करत असताना हा हिंसाचार झाला होता.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत देखील विरोधी पक्षांनी संभलमधील हिंसाचाराचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे.
संभलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे. या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. खबरदारी म्हणून तिथे मोठ्या संख्येनं सुरक्षा दलांना तैनात करण्यात आलं आहे.
सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत या परिसरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
का झाला हिंसाचार?
मृत पावणाऱ्यांची संख्या चारहून अधिक असल्याची शंका व्यक्त केली जाते आहे. त्या शंकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे.
मुरादाबादचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) मुनिराज यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "असं अजिबात नाही. काल आम्ही तीन मृतदेहांचं शवविच्छेदन केलं होतं. तिन्ही मृतदेहांना दफन करण्यात आलं आहे. मुरादाबादमध्ये उपचार करत असताना आजच एकाचा मृत्यू झाला आहे."
"आतापर्यंत त्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालेलं नाही. या मृत्यूमागचं कारण शवविच्छेदन झाल्यानंतरच समोर येऊ शकेल. पाचव्या मृत्यूबद्दल कोणतीही खातरजमा झालेली नाही."
संभलचे पोलीस अधीक्षक (एसपी) कृष्ण कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की संभल मध्ये दगडफेकीच्या घटनेसंदर्भात जवळपास 2500 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले की दगडफेक करणाऱ्या सर्वजणांची ओळख सीसीटीव्हीद्वारे पटवली जाणार असून सर्वांनाच तुरुंगात पाठवलं जाईल.
कधी झाला हिंसाचार
रविवारी संतप्त जमावानं अनेक गाड्यांना आग लावल्यानंतर या हिंसाचाराची सुरूवात झाली होती. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराचे नळकांडे फोडले तसंच लाठीमार देखील केला होता.
मुरादाबाद चे विभागीय आयुक्त आंजनेय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वाजता सर्व्हे करून झाल्यानंतर जेव्हा सर्व्हे करणारी टीम निघाली तेव्हा जमावानं त्यांच्यावर तिन्ही बाजूंनी दगडफेक केली. यानंतर सर्व्हे करणाऱ्या टीमला सुरक्षितपणे तिथून निघता यावं यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
त्यांनी सांगितलं की या दरम्यान तिन्ही बाजूंनी जमाव आमने-सामने आला होता. त्याचवेळेस गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात पोलीस अधीक्षकांच्या पीआरओच्या पायाला गोळी लागली तर उप जिल्हाधिकाऱ्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं. तसंच 15-20 पोलीस जवान देखील जखमी झाले.
संभलचे समाजवादी पार्टीचे खासदार जियाउर्रहमान बर्क यांनी हिंसाचार आणि गोळीबारासंदर्भात बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांना सांगितलं की पोलिसांनी गोळीबार केला आणि शहरात तणावाचं वातावरण आहे.
खासदारांनी उपस्थित केले प्रश्न
विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की संभलमध्ये सरकारनं केलेला 'पक्षपातीपणा आणि घाईघाईनं केलेली कारवाई खूपच दुर्दैवी' आहे.
एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर राहुल गांधी यांनी लिहिलं आहे, "उत्तर प्रदेशात सध्या सुरू असलेल्या वादासंदर्भात राज्य सरकारचा पक्षपातीपणा आणि सरकारनं घाईघाईनं केलेली कारवाई खूपच दुर्दैवी आहे. हिंसाचार आणि गोळीबारात ज्या लोकांनी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक गमावले आहेत, त्यांच्याबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो."
"प्रशासनानं सर्वच पक्षकारांची बाजू ऐकून न घेता आणि असंवेदनशीलपणे केलेल्या कारवाईमुळे तेथील वातावरण आणखी चिघळलं आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांना थेट भाजपा सरकारच जबाबदार आहे."
राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की भाजप सत्तेचा वापर हिंदू-मुस्लीम समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी करतं आहे. ही बाब राज्याच्या हिताची नाही आणि देशाच्याही हिताची नाही.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं लवकरात लवकर हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधी म्हणाले, "सर्वांनी शांतता राखावी आणि आपसातील सौहार्द कायम राखावं असं मी आवाहन करतो. आपण सर्वांनी एकजुटीनं राहत, भारत म्हणजे जातीयवाद आणि द्वेष नाही हे दाखवून द्यायचं आहे. एकता आणि राज्यघटनेच्या मार्गावर आपण पुढे जायचं आहे."
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील संभलच्या घटनेवरून सरकारवर टीका केली आहे.
सोमवारी संसदेबाहेर ओवैसी म्हणाले, पोलिसांनी मशीद समितीला विश्वासात घ्यायला हवं होतं. जे लोक सर्व्हे करण्यासाठी येत होते, ते चिथावणीखोर वक्तव्यं देत येत होते. त्याचे व्हिडिओ आहेत.
ओवैसी म्हणाले, "हा गोळीबार नाही तर हत्या आहे. जे अधिकारी याला जबाबदार आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे. उच्च न्यायालयाच्या एखाद्या विद्यमान न्यायमुर्तींद्वारे या घटनेची चौकशी झाली पाहिजे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. संभल मध्ये अन्याय होतो आहे."
भाजपाचं प्रत्युत्तर
संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी उत्तर प्रदेशातील संभलमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल सरकार आणि सत्ताधारी भाजपावर टीका केली. ते म्हणाले की 'जातीयवादाच्या आधारे लोकांचं ध्रुवीकरण करण्याची ही योजना' आहे.
मात्र भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी संभलमध्ये झालेल्या हिंसाचाराला ठरवून केलेला "नियोजनबद्ध हिंसाचार" म्हटलं आहे. ते म्हणाले की ज्या लोकांना पोटनिवडणुकीत भाजपाच्या विजयानं धक्का बसला आहे, त्यांच्याच चिथावणीद्वारे हा हिंसाचार झाला आहे.
पोट निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाला नऊ पैकी सात जागांवर विजय मिळाला आहे.
तर समाजवादी पार्टीचे नेते धर्मेंद्र यादव म्हणाले की ही दुर्दैवी घटना आहे. आमची पार्टी या घटनेचा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित करणार आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं, "आम्ही स्थगितीसाठी नोटिस दिली आहे. सभागृहात हा मुद्दा आम्ही नक्कीच मांडणार आहोत."
संभलचे खासदार जियाउर्रहमान बर्क म्हणाले की ही घटना "पूर्वनियोजित" होती. तिथे मुस्लिम समुदायाला लक्ष्य केलं जातं आहे.
काँग्रेसचे सहारनपूरचे खासदार इमरान मसूद यांनी आरोप केला आहे की हा हिंसाचार राज्य सरकार पुरस्कृत आहे.
सोमवारी लोकसभेत देखील सभागृहाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी हा मुद्दा सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.