ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये मुदतपूर्व निवडणुकीचा निर्णय का घेतला?

युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी 22 मे रोजी पावसात पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली.
    • Author, पॉल सेडन
    • Role, बीबीसी न्यूज

युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एक-एक मत मिळवण्यासाठी लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर करताना हा निर्धार व्यक्त केला. 4 जुलै रोजी युकेमध्ये निवडणुका होत आहेत.

पंतप्रधान सुनक यांनी 10 ड्राऊनिंग स्ट्रीट या ठिकाणाहून भर पावसात केलेल्या भाषणात या निवडणुकीची घोषणा केली. कंझरव्हेटिव्ह पक्षाला सलग पाचव्यांदा सत्तेत आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

सुनक यांच्या या पावलामुळं निवडणुका लवकर होणार आहेत. त्यामुळं टोरीस यांची लेबर पक्षाबरोबर जुळवून घेण्याची संधी हुकणार आहे.

टोरींची (कंझरव्हेटिव्ह) अराजकता दूर करून बदल घडवून आणण्याची ही वेळ असल्याचं लेबर पार्टीचे सर कीर स्टार्मर म्हणाले.

लेबर पार्टीला देशातील जनमत चाचण्यांमध्ये मोठी आघाडी मिळाली आहे. तसंच प्रचंड नियोजनबद्ध कार्यक्रमासह ते प्रचारासाठी सज्ज झाले आहेत.

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शुक्रवारी संसद विसर्जित केली जाईल. पाच आठवड्यांच्या अधिकृत निवडणूक कार्यक्रमासाठी पुढील आठवड्यात गुरुवारी संसद अधिकृतरित्या बंद होईल.

त्यामुळं सरकारला कोणतंही प्रलंबित अधिकृत विधेयक मंजूर करायचं असेल तर त्यासाठी सरकारकडं दोनच दिवस शिल्लक आहेत. म्हणजेच सरकारला काही नियोजित बाबी पूर्ण करता येणार नाहीत.

ऋषी सुनक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऋषी सुनक

निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होतील, अशी शक्यता व्यक्त केला जात होती.

पण वार्षिक महागाईचा दर तीन वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी सकाळपासून याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पंतप्रधानांचे प्रश्न सुरू असतानाही याबाबत काही घोषणा होणार अशी काही माहिती नव्हती. ब्रिटनमधील प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंतही याबाबत काही स्पष्ट नव्हतं.

1945 नंतर पहिल्यांदाच युकेमध्ये जुलै महिन्यात निवडणुका होत आहेत.

पंतप्रधान सुनक यांनी निवडणुकांची घोषणा करताना महागाईच्या दराच्या संदर्भातही उल्लेख केला. त्यावरून निवडणुकीच्या प्रचारात आर्थिक सुधारणा आणि राहणीमानासाठीचा वाढलेला खर्च हे मुद्दे ठळकपणे मांडले जातील याचे संकेत मिळाले आहेत.

घटलेला महागाईचा दर आणि वर्षाच्या सुरुवातीला मंदीतून सावरणं हे त्यांनी आखलेली धोरणं प्रभावी असल्याचा पुरावा आहे, असंही पंतप्रधान सुनक म्हणाले.

पण त्यांचं भाषण ठरलं होतं त्याप्रमाणं होऊ शकलं नाही. कारण मध्येच पावसाचा व्यत्यय आला आणि त्याचवेळी काही कार्यकर्ते लेबर पार्टीचं नवं अँथेम 'थिंग्स कॅन ओन्ली गेट बेटर' वाजत होतं.

कंझर्वेटिव्ह पक्षाचे अधिवेशन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कंझर्वेटिव्ह पक्षाचे अधिवेशन

त्याचबरोबर सुनक यांनी अपेक्षित वेळेपेक्षा आधी निवडणुका घेण्याचा निर्णय का घेतला? याबाबत कंझर्वेटिव्ह पक्षातील काही जणांमध्येच संभ्रम पाहायला मिळत आहे.

"मला काही समजलेच नाही. अर्थव्यवस्था सुधारत आहे. तिला आणखी स्थिर होण्यासाठी वेळ का दिला नाही?" असं एक टोरी खासदार बीबीसी बरोबर बोलताना म्हणाले.

सुनक यांनी प्रचंड पावसामध्ये भाषण केलं यावर एक मंत्री नाराज होते.

"जर ते मिस्टर फर्लो आहेत हेच दाखवणं मूळ मुद्दा असेल तर मग त्यांनी एखाद्या ब्रिफिंग रूममध्ये भाषण का केलं नाही?" "लेबर पार्टीचे खासदार आनंदी आहेत, पण आम्ही नाही. यावरून सगळं स्पष्ट होतं," असंही ते म्हणाले.

'...तर स्थिती आणखी बिघडणार'

यानंतर टीव्हीवर एक प्रतिक्र्या देताना सर कीर स्टार्मर म्हणाले की, टोरींच्या ‘अराजकते’नं अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवलं आहे. त्यामुळं राजकीय स्थैर्य परत आणण्यासाठी ही त्यांच्या पक्षाला मिळालेली संधी आहे.

ही बदल घडवण्याची वेळ आहे, असंही त्यांनी म्हटलं. तसंच एनएचएस आणि सार्वजनिक सेवांचं व्यवस्थापन तसंच गुन्हेगारीचा सामना करण्याबाबत त्यांनी कंझर्वेटिव्ह पक्षावर टीकाही केली.

टोरीजना आणखी पाच वर्षे दिली तर स्थिती आणखी खराब होईल, असंही ते म्हणाले.

एसएनपीचे नेते जॉन स्विनी यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच स्कॉटलँडमधील पहिले मंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. "ही निवडणूक म्हणजे टोरी सरकारला हटवून स्कॉटलँडला प्राधान्य देण्याची संधी आहे," असं ते म्हणाले.

लेबर पार्टीचे खासदार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लेबर पार्टीचे खासदार
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तर लिबरल डेमोक्रॅट्सचे नेते सर एड डेवी यांनी, "ऋषी सुनक यांच्या नेतृत्वातील 'भयंकर' कंझर्वेटिव्ह सरकारला सत्तेबाहेर करण्याची संधी” असेल असं म्हटलं. तर ग्रीन पार्टीच्या सह नेत्या कार्ला डेनियर यांनी त्यांच्या पक्षानं आणखी किमान चार नवे खासदार निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचं म्हटलं आहे.

रिफॉर्म युकेचे नेते रिचर्ड टाइस म्हणाले की, टोरीजनं "ब्रिटनला मोडकळीस आणलं आहे" पण लेबर "ब्रिटेनला दिवाळखोर बनवतील. त्यामुळं फक्त त्यांचा पक्षच "सध्याच्या परिस्थितीत ब्रिटनला वाचवू शकेल, अशी धोरणं ठरवू शकतो," असंही ते म्हणाले.

सुनक यांचं हे भाषण संसदेच्या 650 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात असल्याचं म्हटलं जात आहे.

ही निवडणूक 2010 नंतर पहिल्यांदाच करण्यात आलेल्या मतदारसंघ परिसीमनानुसार लढवली जात आहे. लोकसंख्येनुसार मतदारसंघात बदल करण्यात आले होते. तसंच या निवडणुकीत प्रथमच मतदारांना ओळखपत्र दाखवावं लागणार आहे.

बकिंघम पॅलेसनं निवडणूक मोहिमेवरून लक्ष विचलित करणाऱ्या किंवा तशी शक्यता असलेले कार्यक्रम रद्द केले असल्याचं शाही परिवारानं म्हटलं आहे. तसंच यामुळं ज्यांच्यावर परिणाम झाला त्यांची माफीही राजा आणि राणीनं मागितली आहे.

राजकीय अस्थिरता

यापूर्वीच्या म्हणजे 2019 मधील निवडणुकीत बोरीस जॉन्सन यांनी 80 जागांचं बहुमत मिळवलं होतं. संसदेच्या माध्यमातून ब्रेक्झिट बाबतचा करार मंजूर करण्यासाठी झालेल्या संघर्षानंतर ही निवडणूक झाली होती.

सर कीर स्टार्मर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सर कीर स्टार्मर

त्यानंतर ब्रिटनच्या राजकारणात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं. कोव्हिडच्या साथीचा फटका हे त्याचं एक कारण होतं. तसंच अनेक घोटाळयांमुळं कॅबिनेटमधील बंडखोरी पाहता जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता.

त्यांच्यानंतर लिज ट्रस 49 दिवस पंतप्रधान राहिल्या. त्यानंतर त्यांनीही राजीनामा दिला. सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर केलेल्या "मिनी बजेट"मधील कर आणि खर्च यासंदर्भातील तरतुदींवरील प्रतिक्रियेमुळं त्यांनी हा निर्णय घेतला होता.

2015 नंतर पहिल्यांदाच निवडणुकांच्या तारखेसाठी संसदेत मतदानाची गरज नसेल. कारण दोन वर्षांपूर्वीच मतदानाच्या तारखेसंदर्भातील कायदा दोन वर्षांपूर्वीच पलटण्यात आला होता.

कंझर्वेटिव्हसमोर लेबर पार्टीचे आव्हान

युकेच्या निवडणुकीत स्पर्धेत असलेल्या पक्षांचा विचार करता सध्या संसदेत सत्ताधारी कंझर्वेटिव्ह पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. कंझर्वेटिव्ह पक्षाची संसदेत सत्ता आहे.

कंझर्वेटिव्ह पक्षाला या निवडणुकीत प्रामुख्यानं लेबर पार्टीच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

त्याचबरोबर लिबरल डेमोक्रॅट्स, ग्रीन पार्टी, गेल्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला एसएनपी म्हणजे स्कॉटिश नॅशनल पार्टी आणि युकेआयपी या पक्षांचंही आव्हान कंझर्वेटिव्ह पक्षासमोर असणार आहे.

गेल्या निवडणुकीचा विचार करता सर्वाधिक 365 खासदारांसह कंझर्वेटिव्ह पक्षानं निवडणुकीत विजय मिळवला होता. तर त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या लेबर पार्टीचे 203 खासदार विजयी ठरले होते.

एसएनपी म्हणजे स्कॉटिश नॅशनल पार्टी 48 खासदारांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. लिबरल डेमोक्रॅटचे 11 खासदार 2019 मध्ये निवडून आले होते.

हेही वाचलंत का?