पेपरलीक प्रकरण : NEET परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचं आता काय म्हणणं आहे?

यश कटारिया

फोटो स्रोत, BBC/Seraj

फोटो कॅप्शन, यश कटारिया
    • Author, उमंग पोद्दार आणि सत सिंह
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

एक परीक्षा, ती परीक्षा देणारे 23 लाख विद्यार्थी आणि शेकडो प्रश्न.

4 जूननंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त चर्चा सध्या नीट (NEET) परीक्षेच्या निकालाची होतेय.

आजपर्यंत राष्ट्रीय चाचणी संस्थेनं (NTA) याबाबतीत अनेक स्पष्टीकरणं दिली आहेत.

नीट परीक्षेत कथितरित्या झालेले गैरप्रकार, पेपरफुटीचे दावे आणि एकूण 67 विद्यार्थ्यांना टॉप रँक मिळाल्यामुळे या परीक्षेबाबत अनेक वाद निर्माण झाले आहेत.

सध्या सुप्रीम कोर्टात नीट परीक्षांच्या संदर्भात बऱ्याच याचिका दाखल झाल्या असून या याचिकांवर सध्या सुनावणी सुरु आहे.

14 जून रोजी एनटीएने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की NEET-UG 2024मध्ये 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले होते आणि आता हे मार्क रद्द करण्यात आले आहेत.

एनटीएने असंही म्हटलं आहे की, "ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले आहेत त्यांच्यासाठी ते पुनर्परीक्षा घेत आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले आहेत त्यांना ग्रेस मार्क सोडून पुन्हा परीक्षा द्यायची नसेल तर तोही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे."

काही याचिकाकर्त्यांनी कौन्सिलिंग म्हणजेच समुपदेशनावर बंदी घालण्याची मागणी केली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने याला नकार दिला आहे. आता 8 जुलैला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

नीट परीक्षेच्या निकालात एकूण 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले असल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

या 67 विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थ्यांनी हरियाणातील झज्जर येथील हरदयाल पब्लिक स्कूलमध्ये ही परीक्षा दिली होती.

एवढंच नाही तर याच परीक्षा केंद्रातील दोन विद्यार्थ्यांना 718 आणि 719 गुण मिळाले आहेत. या परीक्षेत 718 किंवा 719 गुण मिळू शकत नाहीत, असा तज्ज्ञांचा दावा होता.

व्हॉट्सअप
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीवरील बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉइन व्हा.

ग्रेस मार्क मिळालेले विद्यार्थी काय म्हणाले?

बीबीसीने झज्जरमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थ्यांशी झालेल्या या संभाषणातून एक गोष्ट जाणवत होती की ग्रेस मार्क मिळालेले हे सर्व विद्यार्थी सध्या निराश आहेत आणि पुढे काय होईल याची भीती त्यांना सतावत आहे.

या परीक्षेशी काहीही संबंध नसणारे लोकही या प्रकरणात सामील झाले आहेत.

हरदयाल पब्लिक स्कूलजवळील एका दुकानदाराने बीबीसीला सांगितलं की, "होय, मी ऐकलंय की या शाळेत वैद्यकीय अभ्यासक्रमाची एक प्रवेश परीक्षा झाली होती. त्या परीक्षेत पेपर फुटल्याचं लोक म्हणत होते. कारण या शाळेत परीक्षा दिलेल्या बऱ्याच मुलांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे."

दीक्षा

फोटो स्रोत, BBC/Seraj

फोटो कॅप्शन, दीक्षा

विद्यार्थ्यांनी बीबीसीला सांगितलं की या परीक्षेची सुरुवात खूप गोंधळात झाली होती कारण त्यांना एका ऐवजी दोन पेपरचे संच देण्यात आले होते.

अशा परिस्थितीत प्रश्नपत्रिका सोडवण्यात त्यांना अडचणी आल्या आणि त्यामुळे पहिली 20 मिनिटं यातच वाया गेली.

ग्राफिक

झज्जरच्या गुढा गावात राहणाऱ्या यश कटारियाला नीट परीक्षेत 718 गुण मिळाले आहेत. त्यानेही हरदयाल पब्लिक स्कूलमध्ये ही परीक्षा दिली होती.

तो म्हणाला की, “पेपर सुरू झाल्यावर आम्हाला दोन संच मिळाले. त्यानंतर शिक्षक म्हणाले की आत्ताच पेपर सोडवू नका, आम्ही तुम्हाला यातला कोणता संच सोडवायचा ते सांगू. यामध्ये 20-25 मिनिटं वाया गेली."

यश म्हणाला की, “संपूर्ण भारतात Q, R, S, T संच होते पण आमच्या केंद्रात M, N, O, P संच दिले गेले. दोन्ही संचातील प्रश्न पूर्णपणे वेगळे होते."

यशला सुरुवातीला 718 गुण मिळाले होते, पण जेव्हा NTA ने ग्रेस मार्क्स काढले तेव्हा त्याचे गुण 640 वर आले. म्हणजे त्याला ग्रेस मार्क्स म्हणून 78 गुण देण्यात आले होते.

तो म्हणाला की, "मला माहित नव्हतं की आम्हाला ग्रेस मार्क्स दिले जातील."

रितेश अहलावत

फोटो स्रोत, BBC/Seraj

फोटो कॅप्शन, रितेश अहलावत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रितेश अहलावत नावाच्या आणखी एका विद्यार्थ्याला याच अडचणीचा सामना करावा लागला. तो म्हणाला की, "वेळेअभावी मला 15 प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत."

रितेशला ग्रेस मार्क म्हणून तब्बल 100 गुण देण्यात आल्याचं त्याने सांगितलं.

परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, पेपरचे दोन संच तयार करण्यात आले होते, त्यापैकी एक आपत्कालीन परिस्थितीसाठी होता, परंतु हरियाणातील दोन केंद्रांवर समन्वयाच्या अभावामुळे तिथे परीक्षा द्यायला आलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीसाठीचा संच देण्यात आला.

हरदयाल पब्लिक स्कूलशिवाय आणखीन एका शाळेचं नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे विजय स्कूल आहे. या केंद्रावर परीक्षेला बसलेली दीक्षा बारवाल म्हणते की, “आम्हाला प्रश्नपत्रिका मिळायला 25 मिनिटं उशीर झाला. जर मला वेळेवर पेपर मिळाला असता तर माझी परीक्षा आणखीन चांगली गेली असती."

विजय शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांना पेपर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 30 मिनिटांचा वेळ दिला. त्यामुळेच विजय स्कूलमध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळू शकले नाहीत.

पण या शाळेत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. कारण त्यांना ज्यादा वेळ दिला जाईल हे सुरुवातीला सांगितलं गेलं नव्हतं.

दीक्षा म्हणते की या गोंधळामुळे ती चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकली नाही आणि नीटचे परीक्षा पुन्हा एकदा घेण्याची ती मागणी करत आहे.

नेमकी चूक कुणाची?

विजय स्कुलच्या मुख्याध्यापिका रुपाक्षी नारंग सांगतात की, "त्यांना योग्य सूचना देण्यात आल्या नाहीत, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला."

त्या म्हणाल्या की, "शहर समन्वयक आम्हाला प्रश्नपत्रिका देण्यासाठी दोन बँकांमध्ये घेऊन गेले, ज्यामुळे गोंधळ झाला."

बीबीसीने झज्जर शहराचे नीट परीक्षेचे समन्वयक व्हीएन झा यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.

जेव्हा विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत देण्यात आलेल्या अनाकलनीय गुणांबाबत एनटीएला विचारणा केली असता, या संस्थेने ग्रेस मार्क्सचा हवाला दिला आहे.

ग्राफिक

एनटीएने सांगितलं की, त्यांनी कॉमन लॉ ऍडमिशन टेस्टबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या 2018 च्या निकालाचा आधार घेऊन 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले आहेत. पण लवकरच एनटीएवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले.

'करिअर्स 360' चे संस्थापक आणि अध्यक्ष महेश्वर पेरी म्हणाले ली, “कायद्याच्या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी प्रवेशपरीक्षा ही ऑनलाईन माध्यमातून घेतली जाते. त्यामुळे परीक्षा नेमकी कधी सुरु होणार आहे याची स्पष्ट माहिती तुम्हाला असते. पण, नीट परीक्षेत झालेला उशीर शोधण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे वापरण्यात आले होते."

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट(NEET) परीक्षेला बसतात. या वादानंतर लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे, कारण सध्या तरी या परीक्षेचे पुढे काय होणार हे स्पष्ट होत नाही.

आणखी एक परीक्षा रद्द

नीट (NEET) प्रमाणेच, आणखीन एक परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येते आणि ती म्हणजे युजीसी-नेट (UGC-NET).

या वर्षी देशभरातील विद्यापीठांमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सुमारे दहा लाख मुलांनी ही परीक्षा दिली होती, पण दुसऱ्याच दिवशी ती परीक्षा रद्द करण्यात आली.

याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, "डार्क नेटवरील युजीसी-नेट (UGC-NET) परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि मूळ परीक्षेची प्रश्नपत्रिका एकमेकांशी जुळत होती आणि त्यामुळेच आम्ही ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे."

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचं आयोजन व्यवस्थित झालं असल्याचं एनटीएने सांगितलं आहे. असं असलं तरी अनेक विद्यार्थी आणि विरोधी पक्षाचे नेते पोलिस तपासाकडे बोट दाखवून ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत आहेत.

23 जून रोजी एनटीएने ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा परीक्षा आयोजित केलेली आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कमी वेळ मिळाल्याचं कारण एनटीएने दिलेलं आहे. पण यामुळे संपूर्ण प्रश्न सुटला आहे का?

पेपरफुटी आणि कॉपीची समस्या

गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावेळी विद्यार्थ्यांनी नीट (NEET) परीक्षेत अधिक गुण मिळवले आहेत.

करिअर 360 चे संस्थापक आणि अध्यक्ष महेश्वर पेरी म्हणतात, “2023 मध्ये 600 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची रँक जवळपास 26 हजार होती, पण यावेळी तेच गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास 80 हजारांची रँक मिळेल. यावेळी जेवढे गुण विद्यार्थ्यांना मिळाले आहेत तसे गुण यापूर्वी कधीही मिळालेले नव्हते. असं नेमकं का घडलं? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मात्र काहीकेल्या मिळत नाहीये."

याशिवाय, अशा बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत ज्यावरून नीट परीक्षेबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत.

ग्राफिक

बिहारमध्ये ज्या दिवशी नीटची परीक्षा झाली त्याच दिवशी एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःहून तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीत असं म्हटलं आहे की, 'एका संघटित टोळीने नीटचा पेपर फोडल्याची माहिती त्यांना(पोलिसांना) मिळाली होती.'

माध्यमांनी यासंदर्भात दिलेल्या बातम्यांनुसार पोलिसांनी या प्रकरणी एकूण १३ जणांना अटक केली असून त्यापैकी चार जणांनी परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

आणखीन एका वृत्तानुसार, एका विद्यार्थ्याने आपल्या कबुलीजबाबात सांगितलं की, त्याला परीक्षेच्या एक दिवस आधीच त्याला प्रश्नपत्रिका देण्यात आली होती आणि सर्व उत्तरं लक्षात ठेवण्यास सांगण्यात आलं होतं.

मात्र, बीबीसीने या बातम्यांची पुष्टी केलेली नाही.

गुजरातमधील गोध्राचे पोलीस अधीक्षक हिमांशू सोलंकी म्हणाले की, "बिहार व्यतिरिक्त गुजरात पोलिसांना गोध्रा येथे नीट परीक्षेत फसवणुकीच्या तक्रारी मिळाल्या आहेत."

त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना जे प्रश्न माहित आहेत तेच प्रश्न सोडवण्यास सांगितलं गेलं होतं. उरलेल्या प्रश्नांची उत्तरं दुसरं कुणीतरी येऊन सांगेल जेणेकरून त्यांना चांगले गुण मिळतील असं सांगण्यात आलं होतं.

सोळंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून अद्याप तपास सुरू आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने चूक कबूल केली

नीट आणि युजीसी नेटबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या भूमिकेवर बरेच प्रश्न निर्माण झाल्यानंतर एनटीएने त्यांची चूक मान्य केली आहे. विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देताना चुका झाल्याचं त्यांनी कबूल केलं आहे.

सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितलं की, एनटीएने विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस मार्क्स मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ते म्हणाले की ज्या पद्धतीने हे ग्रेस मार्क देण्यात आले त्यामुळे बरेच वाद निर्माण झाले आहेत. परीक्षेत सोडून देण्यात आलेल्या प्रश्नांपुरतेच ग्रेस मार्क न देण्यात आल्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत.

एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंग

त्यामुळे ग्रेस मार्क देण्यात आलेल्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.

या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतल्यामुळे रँकिंगमध्ये फारसा बदल होणार नसल्याचं तज्ज्ञांना वाटतं.

या विषयातले तज्ज्ञ म्हणतात की “ज्या ज्या वेळी या 1563 विद्यार्थ्यांबद्दल बोललं जातं त्या त्या वेळी या परीक्षेत घडलेल्या इतर गोष्टींकडे आपण डोळेझाक करत असतो. यावेळी 54 हजार विद्यार्थी एकाच क्रमांकावर अडकले आहेत."

विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी

नीट (NEET) परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेचा फटका विद्यार्थ्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनाही बसला आहे. जे विद्यार्थी पुन्हा ही परीक्षा देत आहेत तेही त्यावर खूश नाहीत.

झज्जरमध्ये राहणारा विद्यार्थी यश कटारिया म्हणतो की, “नीट (NEET)च्या पुनर्परीक्षेसाठी फार कमी वेळ देण्यात आला आहे. 9 दिवसांचा कालावधी यासाठी दिला आहे एवढ्या वेळात संपूर्ण अभ्यासक्रम पुन्हा एकदा पूर्ण करणं अवघड आहे. संपूर्ण देशात नीट (NEET)ची परीक्षा संपूर्ण देशात पुन्हा एकदा घेण्यात यावी."

पुन्हा एकदा नीटच्या परीक्षेला बसणारा रितेश अहलावत म्हणतो की, "मला डॉक्टर व्हायचे आहे यावर मी अजूनही ठाम आहे, जर या वर्षी परीक्षा चांगली झाली नाही, तर मी इतर पर्याय पाहीन."

रितेश अहलावतचे वडील अनिल अहलावत

फोटो स्रोत, BBC/Seraj

फोटो कॅप्शन, रितेश अहलावतचे वडील अनिल अहलावत

यश कटारियाचे वडील ओमप्रकाश कटारिया म्हणतात की, “आमच्या मुलांची परीक्षा घेण्याऱ्यांसोबत मी सरकारला देखील दोषी मानतो. मुलांच्या भविष्याशी खेळलं जात आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी.”

रितेश अहलावत कोटामध्ये तयारी करत असताना त्याचे वडील अनिल अहलावत त्याच्याकडे दोन महिन्यांसाठी राहायला गेले होते.

ते म्हणतात की, “मी माझ्या मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी गेलो होतो, पण या परीक्षेचा आम्हा सर्वांवर मोठा परिणाम झाला आहे. मुले अजूनही मानसिक त्रासातून जात आहेत. पालकांसोबतच मुलांवरही दबाव असतो. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ते नीट (NEET)बाबत काही नवीन निर्णय घेतला आहे का हे पाहत राहतात. दिवसभर बातम्या आणि युट्युबवर चिकटून राहतात.”

यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे, परंतु एनटीएचे म्हणणे आहे की त्यांनी तक्रारींच्या सुनावणीसाठी एक समिती स्थापन केली होती, याच समितीने ग्रेस मार्क दिले आहेत.\

ग्राफिक

ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले नाहीत त्यांचीही अशी इच्छा आहे की ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी.

दीक्षाचे वडील बसंत सिंग सांगतात की, “घरात गोंगाट होत होता, म्हणून मी तिला घराजवळील पीजीमध्ये अभ्यासासाठी शिफ्ट केलं होतं. पण सध्या या परीक्षेच्या बाबतीत जे काही घडत आहे ते फक्त मुलांचेच नाही तर पालकांचेही मन हेलावणारं आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी आमची इच्छा आहे.”

राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA)

आता ही परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेच्या क्षमतेवर तज्ज्ञ प्रश्न उपस्थित करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणारी एक स्वायत्त संस्था आहे.

नीट (NEET) आणि युजीसी-नेट (UGC-NET) या परीक्षांव्यतिरिक्त, या संस्थेकडून इतरही परीक्षा घेतल्या जातात. ज्यामध्ये आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी जेईई (JEE) आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात असणाऱ्या महाविद्यालयांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा समावेश आहे.

एनटीएच्या स्थापनेपूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ नीट (NEET) ची परीक्षा घेत असे.

नीट

फोटो स्रोत, Getty Images

2004 ते 2010 पर्यंत NCERT चे संचालक असलेले कृष्ण कुमार म्हणतात की, “एनटीएकडे कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत. यातील लोक दर सहा-आठ महिन्यांनी बदलत राहतात."

ते म्हणाले की, “संपूर्ण व्यवस्थेत अराजकता पसरली आहे. तुम्ही यासाठी कोणत्याही एका व्यक्तीला जबाबदार ठरवू शकत नाही."

तज्ञ महेश्वर पेरी म्हणतात की, “एनटीएमध्ये पारदर्शकता आणि मोकळेपणाचा अभाव आहे. त्यांना कुणीतरी काही प्रश्न विचारले तरच एनटीए उत्तरं देत असते. हे पाहता ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. यामुळे या संस्थेच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे."

पेरी म्हणतात की, “एखाद्या हत्येसाठी वापरलेलं हत्यार सापडलं नाही म्हणून खून झालाच नाही असं भासवण्याचा हा प्रकार आहे.”

पुढे काय होईल?

आता 8 जुलै रोजी सुप्रीम कोर्ट या सर्व याचिकांवर सुनावणी करणार आहे. नीट (NEET)ची समुपदेशन प्रक्रिया वेळापत्रकानुसार 6 जुलैपासून सुरू होत असली तरीही, परीक्षा व्यवस्थित झाली नसल्याचे आढळून आल्यास, न्यायालयाला ती रद्द करण्याचा अधिकार आहे, असं न्यायालयाने म्हटलेलं आहे.

कृष्ण कुमार म्हणतात की, “मला खात्री आहे की ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल. हे असं चालू शकत नाही."

दरम्यान, सरकारने आणखी एक समिती स्थापन केली आहे.

सुप्रीम कोर्ट

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सुप्रीम कोर्ट

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात, “सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करत आहे. परीक्षा प्रक्रिया, पारदर्शकता, डेटा आणि एनटीएची सुरक्षा प्रक्रिया सुधारण्यासाठी ही समिती शिफारसी देईल.

ते म्हणाले की, “नीट प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल."

कथित पेपर लीक प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन

राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे (National Testing Agency - NTA) घेतल्या जाणाऱ्या परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तज्ञांचा सहभाग असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती मंत्रालयाला परीक्षा प्रक्रिया यंत्रणेतील सुधारणा, माहिती साठ्याच्या नियमाधारीत व्यवस्थेतील सुधारणा आणि राष्ट्रीय चाचणी संस्थेची संरचना, तसंच कार्यपद्धतीबद्दल शिफारसी सादर करणार आहे.

परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील उच्च शिक्षण विभागाने तज्ञांचा सहभाग असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

ही समिती विभागाला खाली दिलेल्या मुद्यांवरच्या शिफारसी सादर करेल :

  • परीक्षा प्रक्रियेच्या यंत्रणेतील आवश्यक सुधारणा,
  • माहितीसाठ्याच्या सुरक्षा विषयक नियम सुधारणा.
  • राष्ट्रीय चाचणी संस्थेची संरचना आणि कामकाज
 बीबीसी मराठीवरील बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉइन व्हा.
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीवरील बातम्यांसाठी बीबीसीच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉइन व्हा.

या समितीत कोण कोण आहे?

1. डॉ. के. राधाकृष्णन, अध्यक्ष, इस्रोचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्ष, प्रशासक मंडळ, आयआयटी कानपूर.

2. डॉ. रणदीप गुलेरिया, सदस्य, माजी संचालक, एम्स दिल्ली.

3. प्रा. बी. जे. राव, सदस्य, कुलगुरू, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ.

4. प्रा. राममूर्ती के, सदस्य, प्राध्यापक एमेरिटस, सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग, आयआयटी मद्रास.

5. पंकज बन्सल, सदस्य, सहसंस्थापक, पीपल्स स्ट्राँग आणि संचालक मंडळ सदस्य- कर्मयोगी भारत.

6. प्रा.आदित्य मित्तल, सदस्य, अधिष्ठाता - विद्यार्थी व्यवहार, आयआयटी दिल्ली

7. गोविंद जयस्वाल, सदस्य सचिव, सहसचिव, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार

हा आदेश जारी झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत समिती आपला अहवाल मंत्रालयाला करेल, असंही शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलंय.