शरद पवारांना घडवणाऱ्या त्यांच्या आई शारदाबाई, ज्या होत्या पवार कुटुंबीयातील पहिल्या राजकारणी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एका मुलाचा ढिगाऱ्याखाली सव्वा वर्षाचा असताना डोळ्यांदेखत मृत्यू, काही वर्षांनी आणखी एका मुलाचा दोन महिन्याचा असताना मृत्यू आणि त्यानंतर आणखी काही वर्षांनी तिसऱ्या मुलाचा हातातोंडाशी आला असताना ऐन पस्तीशीत खून… अशा एखाद्या आईवर डोंगर कोसळवणाऱ्या घटना.
यातूनही स्वत:ला सावरत एक बाई जिद्दीनं शिकते, लोकल बोर्डात सलग 14 वर्षे सदस्य राहते, वेगवेगळ्या कमिट्यांचं नेतृत्व करते, शेती करते, अकरा-बारा मुलांना प्रसंगी अंगावरचे दागिने विकून शिकवते… हे कुणालाही स्वप्नवत वाटावं असं जगणं आहे – ‘शारदाबाई गोविंदराव पवार’ – या बाईचं.
शारदाबाई पवारांच्या चरित्रात लेखिका सरोजिनी नितीन चव्हाण म्हणतात, ‘काळोखातून चंद्रकोर प्रकट व्हावी, कलेकलेनं ती वाढत राहावी आणि एकेदिवशी तमाम सृष्टीनं पौर्णिमा अनुभवावी, असं शारदाबाईंचं आयुष्य.'
‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आई’ अशी त्यांची अनेकजण ओळख सांगत असले, तरी ती त्यांची नंतरची ओळख. कारण शारदाबाई पवार या स्वतंत्र ओळखीच्या कर्तृत्वाच्या व्यक्ती होत्या.
गेली 55 वर्षे सतत राजकीय पटावर कार्यरत असलेल्या शरद पवारांमुळे त्यांच्या आईची ओळख त्यांच्या नावानं केली जाते.
12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस आणि त्यांच्या आई शारदाबाई पवार यांचा जन्मदिन. हे निमित्त साधत शारदाबाई पवारांच्या आयुष्यातील काही ठळक आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगण्याचा आमचा हा प्रयत्न.
1) कोल्हापूर ते पुणे आणि ‘सेवासदन’मधील शिक्षण
कोल्हापुरातील पन्हाळगडाच्या जवळ गोलिवडे गाव आहे. या गावातल्या कृष्णराव भोसले आणि लक्ष्मीबाई भोसले या दाम्पत्याला 12 डिसेंबर 1911 रोजी मुलगी झाली, तिचं नाव शारदा, अर्थात, शारदाबाई.
दोन थोरल्या बहिणी, त्यापाठोपाठ शारदाबाई आणि सर्वात धाकटा भाऊ.
गोलिवडे गाव राजर्षी शाहू छत्रपतींच्या कोल्हापूर संस्थानातलं. त्यामुळे शारदाबाई लहानपणापासूनच पुरोगामी विचारांच्या वातावरणातल्या.
मोठी बहीण कमलाबाई हिचं श्रीपतराव उर्फ काकासाहेब जाधव यांच्याशी लग्न झालं. काकासाहेब राजर्षी शाहूंचे निकटवर्तीय. त्या काळा तते बॅचलर इन अॅग्रिकल्चर करून मुंबई सरकारच्या शेतकी खात्यात डिस्ट्रिक्ट अॅग्रिकल्चरल ओव्हरसियर म्हणून कामाला होते.
काकासाहेब आणि कमलाबाईंना मुलगी झाली. प्रमिळा तिचं नाव. काहीच दिवसात कमलाबाईंचं निधन झालं. परिणामी प्रमिळाला सांभळण्याची अडचण झाली.
यावेळी शारदाबाईंच्या आईने मुलीच्या मुलीला म्हणजे प्रमिळा सांभळण्याची जबाबदारी घेतली. मग काकासाहेबांनाही आधार वाटला. परिणामी शारदाबाई, लहान भाऊ आणि आई काकासाहेबांसोबत राहू लागले. 1915 च्या दरम्यानचा काळ. शारदाबाई तेव्हा चार-पाच वर्षांच्या होत्या.
काही दिवसात शारदाबाईंचं पितृछत्रही हरपलं.
या काळात शारदाबाई राजर्षी शाहूंनी स्थापन केलेल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगमध्ये (आताचं श्री शाहू छत्रपती मराठा विद्यार्थी वसतिगृह) इंग्रजी चौथीत शिकत होत्या. इथंच त्या पीईपर्यंत शिक्षण घेतलं.

फोटो स्रोत, Sakal Prakashan
मग काकासाहेबांनीच राजर्षी शाहू छत्रपतींच्या मदतीने अभ्यासात हुशार असलेल्या शारदाबाईंना पुण्यास शिकण्यासाठी धाडले. पुण्यात शिकण्यासाठी रमाबाई रानडेंच्या ‘सेवासदन’ची निवड केली गेली. हे वर्ष होतं 1919 चं.
मुलींच्या शिक्षणाबाबत आजूबाजूचा समाज फारसा आग्रही नसताना आणि जुनाट परंपरांना जोपसणारा असताना, मोठ्या बहिणीचे पती काकासाहेब जाधवांसारख्या पुरोगामी व्यक्तीमुळे शारदाबाई पुण्यात ‘सेवासदन’मध्ये शिकण्यासाठी गेल्या. ‘सेवासदन’मध्येच शारदाबाईंनी 1926 पर्यंत व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत म्हणजे सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.
रमाबाई रानडेंच्या ‘सेवासदन’मध्ये खऱ्या अर्थाने तल्लख बुद्धीच्या शारदाबाईंना ज्ञानाची कवाडं उघडी झाली. ‘आपण समाजाचं देणं लागतो’ या भावनेला अधिक बळ ‘सेवासदन’मध्येच शारदाबाईंना मिळाल्याचं सरोजिनी चव्हाण लिहितात.
2) साताऱ्याचे पवार बारामतीच्या काटेवाडीत कसे आले?
सरोजिनी चव्हाण शारदाबाईंवरील चरित्रात सांगतात, काकासाहेब जाधव हे नोकरीनिमित्त बारामतीत असताना, नीरा डावा कालवा इथं काम करत असताना, त्यांच्या बारामतीतल्या प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळख होत असे. तिथेच त्यांना गोविंदराव जिजाबा पवार भेटले.
गोविंदराव तेव्हा नीरा कॅनॉल्स सोसायट्यांच्या सहकारी खरेदी-विक्री संघात तालुका सुपरवायझिंग युनियनचे सुपरवायझर होते. हे पवार कुटुंबीय मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळ गावचे.
मग हे पवार कुटुंबीय बारामतीच्या काटेवाडीत कसे आले, तर याबाबत सरोजिनी चव्हाण शारदाबाईंवरील चरित्रात याबाबत विस्तृतपणे लिहितात.
'लॉर्ड डलहौसीने साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांचा दत्तक वारसा नामंजूर केला. त्यामुळे सातारा जिल्ह्यात जनक्षोभ उसळला. संतप्त लोकांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारलं. यात पवार कुटुंबीय अग्रेसर होते. पण इंग्रजांनी हे बंड मोडून काढले. यात नांदवळसह अनेक गावं उद्ध्वस्त झाली. मग हे पवार कुटुंबीय नीरा नदीच्या काठाने बारामतीजवळ काटेवाडीत आले आणि तिथेच स्थायिक झाले.'
तर या गोविदारावांचा कामानिमित्त काकासाहेब जाधवांकडे येणे-जाणे असे. अशाच एकावेळी त्यांनी शारदाबाईंना पाहिलं आणि त्या गोविंदरावांना आवडल्या. मग त्यांनी काकांसाहेबांकडे शारदाबाईंसाठी मागणी घातली.
काकासाहेबांनीही होकार दिला. मात्र, गोविदराव पवारांच्या घरी हे लग्न मान्य नव्हतं. मग काकासाहेबानी सत्यशोधकी पद्धतीने त्यांचं लग्न लावून दिलं. 1926 मध्ये गोविंदराव आणि शारदाबाई यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली.
3) गरोदर असताना लोकल बोर्डाच्या बैठकीसाठी दौंड-पुणे रेल्वेप्रवास
शारदाबाईंबद्दल लिहिताना पती गोविंदराव पवार यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. याचं कारण त्यांच्या पाठिंब्यावरच शारदाबाई सार्वजनिक आयुष्यात एक एक पायरी वर चढत गेल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन समाजातील कुणी बाई अशी शिकते, लोकल बोर्डात जाते, सगळ्या मुलांना हवं तेवढं शिकवते, हे कल्पनावत होतं. पण गोविंदरावांच्या पाठिंब्यांनं आणि जिद्दीनं शारदाबाईनं ते केलं.
इच्छाशक्तीच्या बळावर शारदाबाई वयाच्या 26-27 व्या वर्षी राजकारणात उतरल्या. 1938 च्या जूनमध्ये शारदाबाईंनी जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. पुणे जिल्ह्यातून एक जागा महिलांसाठी राखीव असायची. शारदाबाईंनी अर्ज भरला आणि त्या बिनविरोध विजयी झाल्या. पुढे सलग 14 वर्षे त्या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. विशेष म्हणजे, पुणे लोकल बोर्डात एवढी वर्षे त्या एकमेव महिला सदस्या होत्या.
इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे, ती म्हणजे, लोकल बोर्ड म्हणजे आजच्या काळातील जिल्हा परिषदेचं रूप तेव्हा लोकल बोर्ड होतं.

फोटो स्रोत, Rajhans Prakashan
शरद पवार 'लोक माझा सांगाती...' या आत्मकथेत लिहितात की, 'बाईंनी कोणत्याही कौटुंबिक कारणानं कधीही लोकल बोर्डाची बैठक चुकवली नाही. बारामतीहून पुण्याला प्रवास हा त्या काळी जिकिरीचा होता. बऱ्याचदा हा प्रवास दत्त सर्व्हिसेसच्या प्रवासी वाहनानं होत असे. तो प्रवास न कंटाळता, न थकता बाई करत असे.'
पोटात सहा-सात महिन्यांचं बाळ घेऊन बारामती ते दौंड आणि दौंड ते पुणे असा रेल्वेनं प्रवास करत शारदाबाई बोर्डाच्या बैठकांना हजेरी लावत, असं सरोजिनी चव्हाण शारदाबाईंच्या चरित्रात सांगतात. बांधकाम, शेती, शिक्षण अशा विविध समित्यांवर त्यांनी तत्कालीन परकीय सत्तेतही लोकोपयोगी कामं केली.
4) तीन मुलांचा मृत्यू सोसणारी आई
वसंतराव आणि दिनकरराव अशी दोन मुलं झाल्यानंतर घर छोटं पडू लागलं. मग गोविंदरावांनी मोती बागेतील एका शेतकऱ्याच्या वस्तीवरील दोन खोल्या मिळवल्या. मग पवार कुटुंब तिथं राहायला आलं. इथं शारदाबाईंना अनंतराव आणि यशवंत अशी दोन मुलं झालं. एकदिवस खूप पाऊस पडत होता आणि वसंतरावर, दिनकरराव बाहेर अंगणात खेळत होते. छोट्या अनंताला घेऊन शारदाबाई सहजच घराबाहेर गेल्या होत्या. जाताना चिमुकल्या यशवंतच्या हातात अनारसा दिला. यशवंत तेव्हा सव्वा वर्षांचा होता. तो रांगत रांगत पडक्या भिंतीजवळ गेला. तेवढ्यात जोराचा वारा आला आणि भिंत कोसळली.
यशवंत भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आला. आजूबाजूला आरडाओरड झाली. मात्र, ढिगारा हटवेपर्यंत यशवंतनं श्वास सोडला होता. याचा मोठा धक्का शारदाबाईंना बसला.
1943 ला शारदाबाईंचा आणखी एक मुलगा दगावला. त्यांचही नाव यशवंत असंच ठेवण्यात आलं होतं.
2 सप्टेंबर 1962 चा दिवस तर शारदाबाईंसाठी काळीज पिळवटून टाकणारा ठरला. वसंतराव पवार या पस्तीशीतल्या मुलाची हत्या झाली.
शरद पवारांनी या घटनेबद्दल त्यांच्या आत्मकथेत लिहिलंय - वसंतराव नावाजलेले फौजदारी वकील होते. त्यांच्याकडे एक केस आली. जमिनीच्या मालकीवरून एका कुटुंबातल्या दोन भावंडांत तेढ होती. वसंतरावांकडे त्यापैकी एक भाऊ आला आणि त्यांना खटला चालवण्याची विनंती केली. वसंतरावांनी तो खटला चालवला आणि जिंकलाही.

फोटो स्रोत, Facebook/Sarojini Chavan
ज्याच्या बाजूनं वसंतराव उभं राहिले, त्याला शेती करण्यात रस नव्हता. त्यानं शेती विकायला काढली. वसंतरावांनी त्यापैकी काही शेती खरेदी केली. त्या कुटुंबातच खटला हरलेला भाऊ प्रचंड दुखावलेला होता. एके दिवशी वसंतराव शेतात फेरफटका मारायला गेले असताना, त्या भावानं गोळ्या घालून त्यांची हत्या केली.
सरोजिनी चव्हाण लिहितात की, वसंतरावांच्या मृत्यूनंतर बाई त्या धक्क्यातून कधीच बाहेर आल्या नाहीत. त्या काय अस्वस्थ असायच्या. रात्रंदिवस पायरीवर बसून राहायच्या.
5) शेकापच्या असूनही पवारांना काँग्रेसमध्ये जाण्यास न रोखणाऱ्या
खरंतर शरद पवार नव्हे, तर शारदाबाई या पवार कुटुंबातील पहिल्या राजकारणी. त्यांनी लोकल बोर्डात काँग्रेसचा आधार घेतला, मात्र त्यांची बिजं लढवय्यी शेतकऱ्याची होती.
कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे अशा मंडळी पवारांच्या घरात येत-जात असत. पुढे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यानंतर शारदाबाई वैचारिकदृष्ट्या या पक्षाच्या जवळ गेल्या. पण काँग्रेसच्या विचारांच्या शरद पवारांना त्यांनी कधी अडवणूक केली नाही. 'लोक माझे सांगाती...' या राजकीय आत्मकथेत शरद पवार याबद्दल सांगतात, 'आम्ही दोघं (शारदाबाई आणि शरद पवार) हिरिरीनं आपापली मतं मांडायचो. बाईंमध्ये वैचारिक सहिष्णुता असल्यानं आपलं म्हणणं त्यांनी कधीही लादलं नाही. फक्त मांडायच्या. म्हणायच्या, तुझी मतं वेगळी आहेत. त्या बाबतीत अधिक खोलात जाऊन अभ्यास कर आणि मग अंतिम काय ते ठरव.' पण शरद पार पुढे काँग्रेसच्या विचारांसोबतच राहिले. शारदाबाई पवार मात्र शेवटपर्यंत शेकापच्या विचारांच्याच राहिल्या. मात्र, शेकाप आणि काँग्रेसबद्दल शारदाबाईंचे ठाम असे विश्लेषण होते. त्यांचं म्हणणं होतं की, “काँग्रेसप्रणित समाजवादी समाजरचना तळागातल्या जनतेला कसा न्याय मिळवून देईल? सध्याचा काँग्रेसप्रणित समाजवाद हा आधी समृद्धी, नंतर वाटप असा आहे. तो मला पटत नाही. काँग्रेसला समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचे कार्य करावयाचे असेल, तर काँग्रेसही प्रथम श्रमजीवी, शेतकरी, कामगार व गरीब मध्यमवर्ग यांचा विश्वास संपादन करणारी असली पाहिजे, तर संपत्तीच्या वाटपामध्ये गरिबांना आधी न्याय मिळेल आणि त्यातून खऱ्या अर्थाने एकसंध समाजाची निर्मिती होऊ शकेल.” बाईंच्या या वाक्यातून त्यांच्यावरील केशवराव जेधे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा पगडा स्पष्टपणे दिसून येतो. मात्र, असं असलं तरी त्यांनी शरद पवारांच्या राजकीय विचारांना विरोध केला नाही. शरद पवार 1967 साली ज्यावेळी पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा अनंतराव पवार (अजित पवार यांचे वडील) यांनी शरद पवारांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यावेळीही शारदाबाईंनी अनंतरावांना आधाराच दिला. आपली विचारसरणी त्या आड आणली नाही.

फोटो स्रोत, Facebook/Sarojini Chavan
शरद पवारांचं यश आपल्याला पाहता यावं, असं शारदाबाईंना नेहमी वाटत असे. 1972 साली शरद पवार दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर त्यांना गृह, सामान्य प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा या खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं. हेच यश शारदाबाईंना पाहता आलं. कारण दोनच वर्षांनी म्हणजे 12 ऑगस्ट 1974 रोजी त्यांचं निधन झालं. निधनापूर्वी काही दिवसांपासून त्या बेशुद्धावस्थेतच होत्या. त्याच अवस्थेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शारदाबाईंच्या चरित्रकार सरोजिनी चव्हाण यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला शारदाबाईंच्या आयुष्यभराचं वर्णन करताना त्यांना रानफुलाची उपमा दिलीय. सरोजिनी चव्हाण लिहितात, "अनेक रानफुळे अतिशय सुवासिक असतात. तथापि, ती रानातच उमलतात, फुलतात. आपला आसमंत सुगंधाने दरवळून टाकतात आणि तेथेच कोमेजूनही जातात. समारंभाच्या व्यासपीठापर्यंत ती पोहोचण्याची शक्यताही नसते. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या अशा फुलांची समाजाला फारशी माहितीही होत नाही. शारदाबाईंची व्यक्तिरेखा या रानफुलासारखीच."
संदर्भ :
- शारदाबाई गोविंदराव पवार - सरोजिनी नितीन चव्हाण
- माझी वाटचाल - प्रतापराव पवार
- लोक माझे सांगाती... - शरद पवार











