हिरवा पोशाख आणि शुद्ध शाकाहारी फ्लीट वादात, काय आहे झोमॅटोच्या निर्णयावरून झालेला वाद?

फोटो स्रोत, @DEEPIGOYAL
झोमॅटोने हल्लीच त्यांच्या ग्राहकांसाठी 'प्युअर व्हेज फ्लीट' म्हणजेच 'शुद्ध शाकाहारी फ्लीट' सेवा लाँच केली होती. पण कंपनीच्या या निर्णयावरून वाद निर्माण झाल्यानंतर झोमॅटोचे सीईओ दीपेंदर गोयल यांनी त्यात बदल करण्याची घोषणा केली आहे.
100 टक्के शाकाहारी ग्राहकांसाठी झोमॅटोनं 'प्युअर व्हेज मोड' सेवा सुरू केली होती. नव्या सेवेअंतर्गत शाकाहारी ग्राहकांना फूड डिलिव्हरी करणारे डिलिव्हरी बॉइज हिरव्या रंगाचा पोषाख घालणार होते.
या नव्या पोषाखातील फोटो स्वत: कंपनीचे सीईओ दीपेंदर गोयल यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपेंदर गोयल यांनी सुरुवातीला असा दावा केला होता की, शाकाहारी जेवणाच्या स्वतंत्र डिलिव्हरीला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.
मात्र, पुढच्या 11 तासांतच गोयल यांना त्यांची योजना बदलावी लागली.
बदल मागे घ्यावे लागले
या वादानंतर दीपेंदर गोयल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली होती.
त्यात असं म्हटलं होतं की, "लाल आणि हिरव्या या दोन रंगांच्या पोषाखांचा वापर डिलिव्हरी पार्टर्नसमध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे. ही गोष्ट आमच्या पटकन लक्षात आली नाही. हा भेद दूर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आमचे व्हेज व नॉन-व्हेज सर्व डिलिव्हरी पार्टनर्स पूर्वीसारखे लाल पोशाखातच दिसतील."
त्यांनी पुढे लिहिलंय की, "मात्र जे ग्राहक 'प्युअर व्हेज' ऑर्डर निवडतील त्यांना मोबाईल ॲपवर त्याची माहिती मिळू शकेल. त्यांच्या ऑर्डर फक्त व्हेजिटेरियन फ्लीटद्वारेच वितरीत केल्या जाणार आहेत."
"आमच्या रायडर्सची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आमचे काही ग्राहक त्यांच्या घरमालकांककडून अडचणीत येऊ शकतात. तसं झाल्यास ती आमची चूक ठरेल," असंही त्यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स (आयएफएटी) चे अध्यक्ष शेख सलाउद्दीन यांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, "गेल्या वेळी जेव्हा कोणीतरी झोमॅटोला विशिष्ट धर्माचे डिलिव्हरी पार्टनर पाठवण्याची विनंती केली तेव्हा दीपेंदर गोयल म्हणाले होते की अन्नाला कोणताही धर्म नसतो. आता त्यांचे हे विचार कुठे गेले? मी त्यांना थेट विचारू इच्छितो की, ते जात, समुदाय आणि धर्माच्या आधारावर डिलिव्हरी बॉयचं वर्गीकरण करत आहेत का?"
झोमॅटो कंपनी वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी झोमॅटोने एका जाहिरातीबद्दल माफी मागितली होती.
झोमॅटोने जागतिक पर्यावरण दिनी 'लगान' चित्रपटातील कचरा या दलित पात्रावर एक जाहिरात तयार केली. कचरा हे पात्र जाहिरातीत रंगविण्यात आलं. या जाहिरातीमुळे झोमॅटोला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून नोटीस मिळाली होती.
नेमकं प्रकरण काय आहे?
मंगळवारी (19 मार्च) दीपेंद्र गोयल म्हणाले होते की कंपनी "शुद्ध शाकाहारी मोड" लाँच करत आहे, ज्यामध्ये शाकाहारी जेवण ऑर्डर करणाऱ्यांना ॲपवर फक्त शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट दिसतील, मांसाहारी रेस्टॉरंट दिसणार नाहीत."

फोटो स्रोत, Twitter
"आमचे शुद्ध शाकाहारी रायडर्स शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवतील. यासाठी हिरव्या रंगाचे बॉक्स असतील."
"इथून पुढे शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी अन्न एकाच बॉक्समध्ये डिलिव्हर केले जाणार नाहीत."
मात्र कंपनीच्या या निर्णयावर लोकांनी जोरदार टीका केली. शाकाहारी खाणाऱ्यांना शुद्ध असं लेबल लावणं झोमॅटोचं भेदभावाचं धोरण असल्याचं अनेकांनी म्हटलं.
सोशल मीडियावर चर्चेला उधाण
झोमॅटोने प्युअर व्हेज फ्लीटचा पोशाख मागे घेतल्यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय तर अनेकांनी टीका केली आहे
रश्मिलता नावाच्या युजरने ट्वीट केलंय की, " हा भेदभाव थांबवा. आम्ही यावरून बरंच काही पाहिलंय. मी शुद्ध मांसाहारी आहे. या शाकाहारी वर्चस्वाच्या गोष्टी बंद करा."

फोटो स्रोत, Twitter
श्रेया नामक युजरने लिहिलंय की, "ग्रीन फ्लीटमुळे अशी कोणती मदत मिळणार आहे समजत नाही. जर माझी ऑर्डर नीट पॅक केली असेल तर या ग्रीन फ्लीटचा काय उपयोग? चांगलं पॅकिंग असेल तर विषय इथेच संपतो."

फोटो स्रोत, Twitter
आकाश शाह नामक युजर लिहितो की "मी अनेक लोकांना ओळखतो जे शुद्ध शाकाहारी आहेत आणि ऑनलाइन ऑर्डर देत नाहीत. मला आशा आहे की हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. झोमॅटोने त्यांच्या ग्राहकांचं ऐकल्याबद्दल अभिनंदन."

फोटो स्रोत, Twitter
तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळवणारे संगीतकार रिकी केज यांनी ट्विट करून हिरवा पोशाख मागे घेतल्याबद्दल झोमॅटोचं कौतुक केलंय.

फोटो स्रोत, Twitter
त्यांनी लिहिलंय की, "वेगळा पोशाख मागे घेण्याचा निर्णय चांगला आहे पण कृपया व्हेज फ्लीट सुरू ठेवा. ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे ज्याचं कौतुक केलं पाहिजे."
झोमॅटोने हिरवा पोशाख मागे घेतला असला तरी प्युअर व्हेज मोड सुरूच राहणार आहे. यावर अजूनही चर्चा सुरू आहे.











