जिग्ना व्होरा: ती पत्रकार जिच्यावर सहकाऱ्याच्या खुनासाठी छोटा राजनची मदत घेतल्याचा आरोप होता

जिग्ना व्होरा, जे.डे, मीडिया, गुन्हे, कायदा

फोटो स्रोत, TWITTER/NETFLIXINDIA

फोटो कॅप्शन, जे.डे हत्या आणि जिग्ना व्होरा या कथानकावर बेतलेली सीरिज नेटफ्लिक्सवर आली आहे.
    • Author, जयदीप वसंत
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

दिनांक - 27 जून 2011.

मुंबईतील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर जोतिर्मय डे यांच्या हत्येनंतर 16 दिवसांनी मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन हत्येतील 7 आरोपींना अटक केल्याची घोषणा केली.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस सहआयुक्त हिमांशू रॉय त्यांच्याबरोबर होते.

मुंबईतील पवई येथे घराजवळ वरिष्ठ पत्रकार जोतिर्मय डे यांची दिवसाढवळ्या हत्या झाली.

गुन्हेविषयक बातम्यांचं वृत्तांकन करणारे पत्रकार (क्राईम रिपोर्टर) आणि पोलिसांचा कामानिमित्ताने नियमित संबंध येतो. त्यामुळे पोलिसांवर नैतिक दडपण होतं. सरकारलाही चिंता वाटू लागली.

जे.डे यांनी माफियांविरोधात वृत्तांकन केलं होतं. वृत्तांकनाच्या परिमाणातूनच हत्या झाल्याच्या अटकळी बांधण्यात येत होत्या.

जे.डे यांनी छोट्या राजनचं अंडरवर्ल्डमधलं वर्चस्व कमी होत असल्याबद्दल लिहिलं होतं. यामुळे छोटा राजनचा जे. डे यांच्यावर राग असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.

त्या पत्रकार परिषदेला जिग्ना व्होरा नावाच्या पत्रकार उपस्थित होत्या. त्या शेवटच्या रांगेत बसल्या होत्या. जिग्ना यांना कल्पनाही नसेल की ज्या हत्येसंदर्भात वृत्तांकनसाठी त्या उपस्थित होत्या, त्याच खटल्यात पुढे त्यांचं आरोपी म्हणून नाव येईल.

जिग्ना यांनी पत्रकार जे.डे यांच्याबरोबर काम केलं होतं. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री नव्हती पण ते एकमेकांच्या परिचयाचे सहकारी होते.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जे.डे यांच्या हत्येसाठी जिग्ना यांनी छोट्या राजनला प्रवृत्त केलं होतं असा आरोप पोलिसांनी केला होता. जिग्ना यांनीच छोट्या राजनला भडकावल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.

जिग्ना यांनीच छोटा राजन टोळीला जे. डे यांच्या मोटरसायकलचा नंबर आणि फोटोही दिला असं पोलिसांचं म्हणणं होतं.

या खूनाच्या आरोपांसाठी जिग्नाला मोक्काअंतर्गत कलमं लावण्यात आली. मास्टरमाईंड, मुख्य आरोपी, मुख्य सूत्रधार हे शब्द जिग्ना यांच्या दैनंदिन कामाचा भाग होते. ही सगळी विशेषणं आपल्या नावाशी जोडली जातील असं त्यांना कधी वाटलं नसेल.

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'स्कूप' नावाची वेबसीरिज आली आहे. सत्यघटनेवर आधारित या वेबसीरिजचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक असलेल्या मेहता यांनीच स्कॅम1992: द हर्षद मेहता स्टोरी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं होतं. सुचेता दलाल यांनी पदार्फाश केलेल्या आर्थिक घोटाळ्यावर ही सीरिज बेतलेली होती.

जिग्ना व्होरा यांनी 'बिहाइंड द बार्स इन भायखळा : माय डेज इन प्रिझन' हे पुस्तक लिहिले आहे, तिच्या अटक आणि तुरुंगातील दिवसांबद्दल, त्यात तिने तिच्या आयुष्याची पार्श्वभूमीही उलगडली आहे.

मुंबईत जन्म आणि वादळी आयुष्य

जिग्ना यांचा जन्म मुंबईत गुजराती वैष्णव समाजातल्या एकत्र कुटुंबात झाला. त्यांचे वडील नोकरीनिमित्ताने दुबईला गेले. तिथे ते मर्सिडीझ चालवायचे, त्यांची राहणी विलासी होती. त्यामुळे त्यांच्याकडे पैसेच शिल्लक राहायचे नाहीत. आजीआजोबा, आई, मावशी, मामा अशा सगळ्यांबरोबर जिग्ना यांचं बालपण गेलं.

त्यांनी रुपारेल कॉलेजातून कायद्याचं शिक्षण घेतलं. एका लॉ फर्ममध्ये त्यांनी इंटर्न म्हणूनही काम केलं. वकील, गुन्हेगार यांच्याशी त्यांच्याशी संपर्क येऊ लागला. हा टप्पा त्यांच्या कारकीर्दीत पुढे निर्णायक ठरणार होता.

थोड्याच दिवसात त्यांचं लग्न एका अभियंत्याशी झालं. लग्नात 100 तोळे सोनं दिल्याचं जिग्ना यांनी पुस्तकात म्हटलं आहे. जिग्ना यांचे वडील भारतात परतल्यानंतर टाटा इंडिका ही गाडी ते चालवतील आणि अन्यवेळी नवरा चालवेल असं ठरलं होतं.

जिग्ना व्होरा, जे.डे, मीडिया, गुन्हे, कायदा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जिग्ना व्होरा

लग्न झालं, हनिमूनहून परतल्यानंतर जिग्ना यांना पतीला दारुचं व्यसन असल्याचं समजलं. दारुला निमित्त काहीही चालायचं - आनंदाचं, दु:खाचं. कुटुंबाचा विचार करुन त्यांनी वैवाहिक जीवन सुरूच ठेवलं.

जिग्ना आणि त्यांच्या नवऱ्याला मुलगी झाली. एक महिन्यांची असतानाच जिग्ना यांच्या मुलीचं निधन झालं. काही महिन्यांनी जिग्ना पुन्हा गरोदर राहिल्या आणि याखेपेस मुलगा झाला.

नवऱ्याच्या छळामुळे जिग्ना यांनी घर सोडायचा निर्णय घेतला. जिग्ना मुंबईला जायला निघाल्या त्या परतल्याच नाहीत.

परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली. सासरच्यांनी लग्नात दिलेलं सोनं परत देण्याचं आश्वासन दिलं पण ते आश्वासन कागदावरच राहिलं. जिग्ना यांनी मुलाला घेऊन नवं आयुष्य सुरू केलं. यावेळी त्यांनी कायद्याऐवजी पत्रकारितेचं क्षेत्र निवडलं.

दोन शिष्य - ज्योती आणि जिग्ना

सोमय्या कॉलेजमध्ये जिग्ना यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांचा मुलगा सकाळी शाळेत जात असे आणि त्या संध्याकाळी पत्रकारितेचा अभ्यास करत असत. मुंबईतील ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर हुसैन झैदी यांच्याशी तिचा संबंध येणार होता.

जिग्ना यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम सोडला आणि फ्री प्रेस जर्नलसाठी काम करू लागल्या. मुंबईतल्या एका जुन्या इमारतीत त्यांचं कार्यालय होतं. कायद्याचा अभ्यास त्यांना उपयोगी पडू लागला. 10 महिन्यात त्यांचा पगार अडीचपट वाढला.

जिग्ना व्होरा, जे.डे, मीडिया, गुन्हे, कायदा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जे.डे यांची हत्या झाली होती.

वृत्तपत्रांमधील व्यावहारिक युद्ध

2005 मध्ये मुंबईतल्या वर्तमानपत्रांमध्ये एक व्यावहारिक युद्धच झालं. टाइम्स ऑफ इंडियाने मुंबई मिरर नावाच्या टॅब्लॉईडची घोषणा केली.

दैनिक भास्कर समूहाने डेली न्यूज अँड अनलिसिस नावाच्या पेपरची घोषणा केली.

त्याचवर्षी दिल्लीस्थित हिंदुस्तान टाईम्सने मुंबई आवृत्ती सुरु करणार असल्याचं स्पष्ट केलं. या व्यापारी युद्धाचा फायदा पत्रकारांना झाला. त्यांना नोकरी मिळाली, पगार वाढले.

मुंबई मिरर सुरू झाल्यानंतर वर्षभरात जिग्ना यांनी तिथे काम करायला सुरुवात केली.

जे. डे यांची उंची 6 फूट 3 इंच एवढी होती. शारीरिकदृष्ट्या ते धष्टपुष्ट होते. कमांडो किंवा लष्करात सहज भरती होऊ शकले असते.

त्यांना ज्योती आणि कमांडर या नावांनी त्यांचे सहकारी हाक मारत असत. बायलाईनमध्ये बातमीला जे.डे असं लिहिलेलं असे.

जिग्ना व्होरा, जे.डे, मीडिया, गुन्हे, कायदा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, छोटा राजनच्या अटकेमुळे आणि प्रत्यार्पणामुळे हे प्रकरण लांबले होते

जे.डे यांनी क्राईम रिपोर्टिंगची धुळाक्षरं गिरवली. हळूहळू या बिटवर त्यांनी जम बसवला. झैदी सांगतात की एकाक्षणी जे.डे क्राईम रिपोर्टिंगला कंटाळले. त्यांना हे बिट सोडायचं होतं. त्यावेळी झैदी यांनी त्यांना पुस्तक लिहिण्याचा सल्ला दिला.

मुंबईतलं प्रसिद्ध सायंदैनिक मिड डेमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन एडिटर होते. जिग्ना आणि जे.डे यांचा परिचय होता पण फार बोलणं व्हायचं नाही.

झैदी यांच्या म्हणण्यानुसार, जे. डे आपल्या कामाबाबत अतिशय गुप्तता बाळगत असत. कोणत्या बातमीवर काम करत आहेत याची वाच्यता करत नसत. दहा वाजता बातमी द्यायची असेल तर साडेआठ नऊ वाजता लिहून पूर्ण करायचे. दुसरीकडे जिग्ना यांच्या कामात सुसूत्रता नव्हती, पण त्या महत्वाकांक्षी होत्या.

झैदीच्या म्हणण्यानुसार, त्यांचे एक शिष्य क्राईम रिपोर्टिंगचे अमिताभ बच्चन होते, तर दुसरे विनोद खन्ना. दोघांनाही पडद्यावर पाहण्यात आणि एकमेकांशी स्पर्धा करण्यात मजा आली. मात्र, एका क्षणी दोघांमधील हाणामारी मीडिया आणि पोलिसांसाठी मुद्दा ठरला.

सामान्यत: पोलिसांना गुन्हेगाराला अटक केल्यानंतर 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावे लागते, परंतु जे. डे यांच्या हत्येतील आरोपींविरुद्ध दहशतवादविरोधी 'मकोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) ची कलमे लावण्यात आली आणि पोलिसांना तीन महिन्यांची अतिरिक्त मुदत दिली.

दरम्यान, एका महिला पत्रकाराचा यात समावेश असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली. सुरुवातीला 'फॉर्म्युला बेस्ड' बातमीत नाव स्पष्ट नव्हते.

जिग्ना यांनी पुस्तकात लिहिलं की माझं नाव सातत्याने येऊ लागलं. मी येताच सहकारी चर्चा थांबवत असत. बाहेरून त्यांनी याबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

छोटा राजनने पत्रकार म्हणून केलेले संभाषण पोलिसांकडून कटाची चर्चा म्हणून मांडले जात होते. याबाबत संपादक हुसैन जैदी यांच्याशीही बोलले असता, त्यांनी जिग्ना निर्दोष असल्याचं सांगितलं.

झैदी आणि गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय यांची भेट घेण्याचं ठरलं. झैदी यांच्या मुलाखतीदरम्यान रॉय यांनी जिग्ना यांची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. रॉय म्हणाले की जिग्ना निर्दोष आहे आणि तिला अटक होऊ देणार नाही असा त्यांचा विश्वास आहे.

मीडिया कर्मचाऱ्याचीच मीडिया ट्रायल

नोव्हेंबर-2011 च्या पहिल्या पंधरवड्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी करण्यात आली. व्यावसायिक शत्रुत्व आणि त्यांचे वास्तव्य इत्यादींबाबत चौकशी करण्यात आली.

जे. डे यांच्याशी वैर असल्याचं वृत्त त्यांनी नाकारलं. जे. डे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते कुठे राहतात याबद्दल माहिती नसल्याचं जिग्ना यांनी स्पष्ट केलं.

जिग्ना यांच्याकडे लिओ नावाचा कुत्रा होता. तो त्यांच्यापासून अंतर ठेऊ लागला. जिग्नाची आई म्हणाली, 'जेव्हा एखाद्याला दूर जायचे असते तेव्हा कुत्रे त्याच्याशी अंतर ठेवू लागतात. हा त्यांचा मायेपासून मुक्त होण्याचा मार्ग आहे.' मला वाटते की हे विधान केवळ उत्सुकता वाढवण्यासाठी नव्हते तर ते भविष्यसूचक देखील होते.

जिग्ना यांच्या घरचे 25 नोव्हेंबर 2011 रोजी श्रीनाथद्वराला जाण्याच्या तयारीत होतं. त्याचवेळी गुन्हे शाखेचं पथक त्यांच्या घरी थडकलं.

चौकशीसाठी तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल असं पोलिसांनी सांगितलं. पुढे काय वाढून ठेवलं आहे याची जिग्ना यांना कल्पना आली. शुक्रवारी अटक करण्यात आली. न्यायालयीन कामकाज शनिवार-रविवार नसल्याने जामिनाचा मार्गही बंद झाला.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत जिग्ना यांना नेण्यात आलं. याठिकाणी अनेक कुख्यात आरोपी, गुंड यांना आणलं जाताना जिग्ना यांनी पाहिलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी गोपनीय माहिती मिळवली होती. आता जिग्ना स्वत:च आरोपी झाल्या होत्या.

आपल्याबरोबर काम करणारी सहकारी एका पत्रकाराच्या हत्येत आरोपी झाल्याने माध्यमविश्वात खळबळ उडाली. जिग्ना यांना पोलीस स्थानकात आणण्यात आलं तेव्हा मीडियाने त्यांना घेरलं. लाईव्ह कव्हरेज सुरूच होतं.

जिग्ना पुस्तकात लिहितात, जी माणसं मी रोज पाहायचे त्यांच्यासमोर मी आरोपी झाले होते. गुन्हेगारांचं भावविश्व कसं असेल याचा मी विचार करायचे. आता मीच एक कथित गुन्हेगार झाले होते. मीडिया एखाद्याचं आयुष्य प्रकाशून टाकू शकतात. एवढ्या मीडियामुळे मी पार भांबावून गेले.

पोलीस कोठडीत असताना जिग्ना यांच्या राहणीमानासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या स्टेनोसारखं मीडिया वागत आहे, असं झैदी म्हणाले.

पत्रकाराच्या हत्येप्रकरणी माध्यमांना दोन गटात विभागणे हा पोलिसांचा मास्टरस्ट्रोक होता.

झैदी यांच्या म्हणण्यानुसार जिग्ना आणि जे.डे दोघेही त्यांचे विद्यार्थी होते. एकमेकांबद्दल ते कटूतेने बोलले नाहीत. जिग्ना यांच्या अटकेनंतर प्रसारमाध्यमांचं एक शिष्टमंडळ राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यासमोर तत्कालीन जेसीपी (गुन्हे) रॉय यांनी छोटा राजन आणि जिग्ना यांच्या संभाषणाच्या 38 टेप्स सादर केल्या होत्या.

त्या दिवसांची व्यथा

तुरुंगातल्या दिवसांबद्दल जिग्ना यांनी सविस्तर लिहिलं आहे. रिपोर्टर म्हणून काम करत असताना तुरुंग, कैद्यांचं जीवन, अडचणी यावर जिग्ना यांनी लिहिलं होतं. आता त्यांनाच ते आयुष्य अनुभवायचं होतं.

जिग्ना व्होरा, जे.डे, मीडिया, गुन्हे, कायदा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, तुरुंगातले दिवस

जिग्ना लिहितात, 9 डिसेंबर रोजी भायखळा तुरुंगात मला नेण्यात आलं. खिडकीविरहित एका छोट्या खोलीत दोन महिला पोलिसांनी माझे कपडे काढले. मला अंतर्वस्त्रही काढायला सांगितलं. माझी मासिक पाळी सुरू आहे हे ठाऊक असूनही मला अंतर्वस्त्र काढायला सांगितलं. सॅनिटरी पॅडचीही तपासणी करण्यात आली.

तुरुंगात अमली पदार्थ किंवा प्रतिबंधक पदार्थ आणू नये म्हणून आरोपीची कसून तपासणी करण्यात येते. मी तुरुंगातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विकृत हास्य होतं.

आरोपींना दरवाजा नसलेलं शौचालय असतं. आंघोळीसाठी गरम पाण्याचीही व्यवस्था नसते. जिग्ना यांना अस्थमाचा त्रास होता. कोंदट, अस्वच्छ बरॅकमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. वायूव्हिजन नसल्याचा त्यांना सर्वाधिक त्रास झाला.

ज्या हायप्रोफाईल कैद्यांबद्दल त्यांनी वृत्तांकन केलं होतं. त्यांच्याबरोबर त्यांना तुरुंगात घालवावा लागला.

सलीम जावेद

जिग्ना व्होरा, जे.डे, मीडिया, गुन्हे, कायदा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह याही मुंबईच्या भायखळा तुरुंगात कैद होत्या.

पुस्तकात जिग्ना यांनी आठ महिन्यांच्या तुरुंगवासात भेटलेल्या कैद्यांबद्दल लिहिलं आहे. प्रोमिता नावाची एक कैदी होती जिचा तुरुंगात अतिशय धाक होता. तिचे महिला पहारेकऱ्यांशी समलैंगिक संबंध होते.

जिग्ना यांनी मुंबईतल्या मटकाकिंगची आधीची बायको आणि गँगमन यांच्या संबंधांबद्दल लेख लिहिला होता. त्या महिलेने प्रियकरासोबत मिळून मटकाकिंग सुरेश भगत यांची हत्या केली होती.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनाही याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील सूत्रांमार्फत जिज्ञाने त्याच्याबद्दल लिहिले.

जिग्ना यांनी पुस्तकात, वाचकांना अर्धवस्त्रांकित आणि पारदर्शक कपड्यात फिरणाऱ्या सलमाबीबीची ओळख करून दिली. कामाच्या ठिकाणी गृहिणीच्या घरातून चोरी केल्याच्या आरोपावरून ती तुरुंगात आली होती.

तिच्या पतीचे नाव सलीम होते, ज्याच्यापासून तिला तीन मुली होत्या. फातिमाच्या तुरुंगात असताना लहान मुलींची काळजी घेण्याची जबाबदारी तिच्या धाकट्या भावाकडे आली. सलीमशी घटस्फोट घेतल्यानंतर फातिमाने तिचा रिक्षाचालक मित्र जावेद याच्याशी संबंध ठेवले.

तुरुंगातील आफ्रिकन कैद्यांसाठी ती जागा इतकी कठोर नव्हती. कैद्यांना, मुख्यतः ड्रग्ज किंवा लैंगिक-तस्करीच्या आरोपाखाली, त्यांच्या देशांच्या तुलनेत तिप्पट अन्न आणि उपचार मिळत होते.

सीमा नावाच्या महिलेने तुरुंगातून सुटल्यावर जिग्नाला तिचा नंबर दिला आणि सुटका झाल्यावर तिला आठवड्याला एक लाख रुपये मिळतील अशी नोकरी मिळवून देण्याचे सांगितले. वेश्याव्यवसायासाठी तुरुंगवास भोगलेली सीमा कोणते काम देत आहे याचा विचार करत असताना जिग्नाच्या डोळ्यात अश्रू तरळले.

तुरुंगातून सुटल्यावर जिग्ना यांनी मुलाखतीत सांगितलं की भारतीय तुरुंगाच्या सुधारणांबाबत कोणतीही चर्चा होत नाही. तुरुंग म्हणजे नवीन गुन्हेगार तयार होतील असं प्रशिक्षण केंद्र आणि भरती युनिट आहे.

वाढदिवस, आरोप आणि बचाव

जिग्ना व्होरा, जे.डे, मीडिया, गुन्हे, कायदा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोलिसांनी सादर केलेल्या गोष्टी

21 फेब्रुवारी 2012 रोजी जिग्ना यांचा 37वाढदिवस होता. त्याचदिवशी पोलिसांनी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं. डिसेंबर-2011 मध्ये गुन्हे शाखेने या प्रकरणातील दहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले, मात्र त्यात जिग्नाचे नाव नव्हते. त्यामुळे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

जिग्ना यांच्याविरोधात तीन मुख्य आरोप होते, त्यात एसएमएसद्वारे जे. डे यांना दिलेल्या धमक्या, छोटा राजनने जे.डे यांच्या विरोधात चिथावणी दिल्याच्या टेप्स आणि पत्रकाराशी छोटा राजनच्या संभाषणात जे.डे यांच्या चित्राचा, मोटार बाईकचा वापर आणि त्याच्याविरोधातील लेख हे प्रमुख पुरावे होते.

मात्र, याच काळात छोटा राजनला भारतात आणण्यात आले, त्यामुळे हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडून घेऊन सीबीआयकडे सोपवण्यात आले. छोटा राजनवर सर्व खटले चालवणारी एकमेव एजन्सी होती. मात्र त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली.

पोलिसांच्या आरोपपत्रात जिग्ना यांनी मराठीत साक्ष दिली. जे.डे यांना धमकी देणारा संदेश जिग्ना यांनी लिहिल्याचं चार्जशीटमध्ये लिहिलं होतं. ज्या नंबरवरून जे.डे यांना धमकीचा मेसेज आला तो जिग्ना यांचाच असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही.

छोटा राजनने जिज्ञाला चिथावणी दिल्याचे रेकॉर्डिंग पोलिसांनी न्यायालयात सादर केले नाही. जिग्ना गुजराती आहेत. त्यांची आई बंगाली आहे पण त्यांनी मराठीत मेसेज केला.

मे 2018 रोजी मकोका कोर्टाने निकाल दिला. 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ऑगस्ट 2019मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जिग्ना यांची खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.

हे सगळं माझ्याबाबतीत का घडलं याचा फैसला मी नशिबावर सोपवला आहे. हिलिंग आणि खगोलचा अभ्यास त्यांनी सुरू केला. त्याचवेळी वेबसीरिजसाठी लिखाण आणि पुस्तकंही त्या लिहू लागल्या.

साडेसात वर्षांच्या कालावधीत जिग्ना यांनी आजोबा, आजी आणि आईला गमावलं. पाचगणीत शिकणाऱ्या मुलालाही त्रास झाला.

11 मे 2018 रोजी एडीजीपी हिमांशू रॉय यांनी राहत्या घरी परवानाधारक रिव्हॉल्वहरने आत्महत्या केली. कर्करोगाने त्रस्त होऊन त्यांनी हे पाऊल उचललं असं सांगण्यात येतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)