अजित पवार म्हणतात, 'सत्यजितबाबत बाळासाहेब थोरातांना अलर्ट केलं होतं' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा...
1. थोरातांना अलर्ट केलं होतं- अजित पवार
“नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतंय याची बातमी आपल्याला आधीच मिळाली होती. त्याबाबत आपण बाळासाहेब थोरात यांना अलर्ट केलं होतं. पण बाळासाहेब थोरात यांनी आपल्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवणुकीत दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारी अर्जावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “दोन-तीन दिवसांआधी कानावर येत होतं. त्यावेळी मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो की, असं काहीतरी कानावर ऐकू येतंय. तुम्ही काळजी घ्या. तुम्ही बघा, काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरातांना आदल्या दिवशी सांगितलेलं होतं”.
अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, “तुम्ही काळजी करु नका. आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थित पार पाडू. उद्या डॉक्टर तांबे यांचाच फॉर्म भरला जाईल.”
2. स्वत:ला विकलं तेवढं पुरे, मुंबईला विकू नका - आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, facebook
“महालक्ष्मी रेसकोर्स मुद्द्यावर कागदपत्रांसहित लवकरच बोलणार आहे. हे आता बिल्डर, कॉन्टॅक्टर सरकार झालं आहे. माझी मुंबई विकू नका, स्वतःला विकलं तेव्हढं पुरे, माझ्या मुंबईचं ATM करू नका”, अशी टीका शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
सत्ताधाऱ्यांकडून मुंबईला लुटलं जात आहे. ज्या 400 किमीचे टेंडर जे तीन वर्षात काढायला हवे, ते एका वर्षात काढले असल्याचंही ते म्हणाले. गद्दार स्थानिक आमदार यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला. पण, अद्याप कोणतीही कारवाई नाही. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा नाही. राज्यपालांवर कारवाई नाही असं आदित्य म्हणाले. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, “खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. 5 हजार रस्त्यांचं कोटींचं टेंडर ही धुळफेक आहे. 450 किमी 6084 कोटींचं टेंडर आहे, फेब्रुवारीत काम सुरु केलं तरी काम कधी होणार? रस्त्याखाली 42 युटीलिटी,16 एजन्सी काम करतात. वाहतूक पोलीस परवानगी आवश्यक. बीएमसीचा पैसा दुसऱ्या कमिटीला देऊ शकतात काय? 400 किमी रस्ते शक्यच नाही”, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
3. ...तर भारताचा अफगाणिस्तान होईल - चंद्रशेखर राव

फोटो स्रोत, Getty Images
“धार्मिक आणि जातीय कट्टरतेला प्रोत्साहन दिल्यास समाजात उभी फूट पडून नरक बनेल. तसेच, भारतात अफगाणिस्तानप्रमाणे तालिबानसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे तरुणांनी सतर्क रहावे” असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
महबूबाबाद आणि कोठागुडेम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचं मुख्यमंत्री केसीआर यांनी उद्घाटन केलं. त्यानंतर संबोधित करताना केसीआर म्हणाले, “केंद्रात पुरोगामी विचारांचे आणि निप:क्षपाती सरकार असेल तर देश, राज्य प्रगती करू शकेल. केंद्राने राज्य सरकारला मदत न केल्याने तेलंगणाचे सकल उत्पादन ( जीडीपी ) वाढले नाही,” असा आरोप केसीआर यांनी केला.
“देशाची अवस्था तालिबानसारखी झाली, तर गुंतवणूक येईल का? नोकऱ्या मिळतील का? सध्याचं उद्योगधंदे राहतील का? देशात अशांतता निर्माण होत, लाठीचार्ज आणि गोळीबारसारखे वातावरण निर्माण झाले, तर समाज कसा राहणार? देशाला चुकीच्या मार्गावर नेण्याचं प्रयत्न होत आहेत,” असेही केसीआर यांनी सांगितलं.
“देशात पाणी आणि विजेची संसाधने उपलब्ध आहेत. तरी, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्या-राज्यात पाण्यावरून वाद सुरु आहे. दिल्लीतही पिण्याचे पाणी आणि विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही, हे लज्जास्पद आहे. असे असतानाही मोठी-मोठी भाषणे केली जातात,” असा टोला केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे लगावला.
4. हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा स्पेनवर विजय
ओडिशामधील राऊरकेला येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली आहे. सलामीच्या लढतीत भारताने स्पेनवर 2-0 असा विजय मिळवला. भारताकडून अमित रोहिदास आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
भारताची पुढची लढत 15 जानेवारीला इंग्लंडशी होणार आहे. अमितला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.
अन्य सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा 8-0 असा धुव्वा उडवला. अर्जेंटिनाने दक्षिण आफ्रिकेला 1-0 असं नमवलं. इंग्लंडने वेल्सवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला.
5. सूर्यकुमार यादवची कसोटी संघात निवड, पृथ्वी शॉ ट्वेन्टी20 संघात

फोटो स्रोत, Getty Images
ट्वेन्टी20 प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालं आहे. बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धची ट्वेन्टी20 आणि वनडे मालिका तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी संघ जाहीर केला. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली हे संघात नाहीयेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळणार आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या पृथ्वी शॉ याचं संघात पुनरागमन झालं आहे. के.एल.राहुल आणि अक्षर पटेल हे दोघे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी वैयक्तिक कारणांमुळे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची निवड करण्यात आलेली नाही.
गाडीला झालेल्या अपघातामुळे विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत. पंत खेळू शकणार नसल्याने कसोटी संघात के.एस.भरत आणि इशान किशन यांना समाविष्ट करण्यात आलं आहे.
गेले पाच महिने दुखापतीमुळे मैदानापासून दूर असलेल्या रवींद्र जडेजाचंही पुनरागमन झालं आहे. मात्र फिटनेस चाचणीनंतर त्याच्या समावेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. दुखापतीतून पूर्ण न सावरल्यामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कोणत्याही संघात निवड झालेली नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








