इमेलमध्ये वापरण्यात येणाऱ्या या चिन्हाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

    • Author, थॉमस जर्मेन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तैवानमध्ये @ या चिन्हाला ते 'छोटा उंदीर' म्हणतात, तर रशियन भाषेत याला 'कुत्रा' म्हणतात. हिब्रू भाषेत याला 'स्ट्रुडेल' (केकसारखा पदार्थ) म्हणतात आणि डच भाषेत याला 'माकडांची शेपूट' म्हणतात.

@ हे चिन्ह म्हणजे आरसा आहे आणि त्यामागची कहाणी हजारो वर्षे जुनी आहे.

2010 मध्ये न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट (एमओएमए)च्या आर्किटेक्चर आणि डिझाईनच्या वरिष्ठ क्युरेटर असलेल्या पाओला अँटोनेली यांनी एक चाकोरीबाहेरची निवड केली.

त्या म्हणतात, "मला अशा वस्तूंचं प्रदर्शन भरवायचं होतं, ज्यात दिसतं की प्रत्येकाला ड्रॉवरमध्ये संग्रहालयातील दर्जाचं प्रदर्शन ठेवता येईल. यात पोस्ट-इट नोट, एम अँड एम, पेपर क्लिप, ओक्सो गूड ग्रिप्स (किचनमध्ये वापरायची लोकप्रिय साधनं) अशा गोष्टींचा समावेश आहे."

"अशा वस्तू ज्या आपल्या आयुष्याचा भाग आहेत आणि त्या इतक्या चांगल्या प्रकारे काम करत असतात की आता त्याकडे आपलं लक्षही जात नाही."

अँटोनेली म्हणतात, "या वस्तूंच्या बाबतीत संग्रहालय, अंतर आणि नाट्य निर्माण करतं, विशेषकरून जेव्हा तुम्ही या वस्तू वेगळ्या करता, तेव्हा लोकांना त्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू देण्याचं काम करतात. या वस्तूंमागच्या कहाण्यांनी तुम्ही अचानक स्तब्ध व्हाल. तुम्हाला जाणीव होईल की हे सगळं पूर्ण विश्व आहे."

हे प्रदर्शन पूर्ण केल्यानंतर त्यांना हा निर्णय अधिक स्पष्टपणे लक्षात येण्यासारखा वाटला. अँटोनेली यांनी एमओएमएच्या कायमस्वरुपी कलेक्शनसाठी @ चिन्ह मिळवलं.

एका मिनिटासाठी थांबा आणि तुमच्या कीबोर्डकडे, त्यावरील बटणांकडे, त्यांच्या चढउतारांकडे पाहा. जर तुम्ही चलनांसाठीची चिन्हं बाजूला ठेवली तर त्यात @ पेक्षा अधिक सांस्कृतिक वजन असलेलं दुसरं कोणतंही चिन्ह नसेल.

ते इंटरनेटचं प्लम्बिंग म्हणजे जोडणी आहे. ते तुमचं ईमेल एकत्र बांधतं. मजकुरात ते तुमचं आडनाव अधोरेखित करतं. तुम्ही त्याचा वापर आज केला असण्याची शक्यता आहे.

मात्र &, #, %, *, ही सर्व उपयुक्त आणि सर्वत्र आढळणारी चिन्हं आहेत. मग @ या चिन्हाला एवढी शक्ती, इतकं महत्त्व का मिळालं? या चिन्हाचा वापर ही कदाचित आधुनिक काळातील घटना वाटेल.

मात्र तरीही सजवलेल्या या छोट्या 'a' च्या वळणांमागे हजारो वर्षांपूर्वीची एक कहाणी दडलेली आहे. अशी कहाणी जी मानवी इतिहासाच्या पानांवरून उलटत असताना राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि भाषेचे अडथळे दूर करते.

"हे शब्दांचं संक्षिप्त रुप आहे," असं कीथ ह्युस्टन म्हणतात. ते 'शेडी कॅरेक्टर्स: द सीक्रेट हिस्ट्री ऑफ पंक्च्युएशन' या पुस्तकाचे लेखक आहेत. आता प्रश्न असा आहे की मूळात हे चिन्ह कशासाठी होतं. एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे त्याचा मातीच्या भांड्यांशी संबंध आहे.

प्राचीन ग्रीक लोकांना अँफोरा नावाची मातीच्या भांड्यांची शैली आवडायची. तुम्ही ती भांडी पाहिलेली आहेत. उंच, छान दोन हँडल असलेली आणि लांब मान असेलली भांडी.

अँफोरसचा वापर वाईन, धान्य, ऑलिव्ह ऑईल आणि इतर अनेक गोष्टी साठवण्यासाठी केला जायचा.

ही पद्धत भूमध्यसागरी प्रदेशात आणि त्याही पलीकडच्या प्रदेशांमध्ये शतकानुशतके सुरू होती. जसजसा काळ पुढे गेला तसतसं अँफोरा हे मोजमापाचं परिणाम बनलं.

"मी तुम्हाला विशिष्ट संख्येच्या अँफोराएवढी एखादी वस्तू विशिष्ट किंमतीत विकणार आहे, ही कल्पना व्यापाऱ्यांना लोकांपर्यंत पोहचवावी लागली," असं ह्युस्टन म्हणतात.

शेवटी लोकांनी लांब शेपटी गुंडाळलेला 'a' काढण्यास सुरुवात केली. त्यातून बाकीची अक्षरं वगळली गेली.

4 मे 1536 ला फ्रान्सिस्को लापी नावाच्या व्यापाऱ्यानं सेव्हिलहून रोमला एक पत्र पाठवलं. त्यात त्यानं म्हटलं होतं की एक अँफोरा वाईनची किंमत जवळपास 70 ते 80 ड्युकॅट्स आहे. यात अँफोरासाठी @ हे चिन्ह वापरण्यात आलं होतं.

आधुनिक जगात @ चा वापर झाल्याचं ते पहिलं उदाहरण आपल्याला आढळतं. मात्र या चिन्हाची ती सर्वात जुनी नोंद नाही.

तुम्हाला 1375 च्या बल्गेरियन हस्तलिखितांच्या पानांवर @ हे चिन्ह सापडू शकतं.

मात्र, त्याला कोणताही स्पष्ट अर्थ नाही. ते फक्त 'आमेन' या शब्दाच्या पहिल्या अक्षराचा झालेला विकास आहे.

शेकडो वर्षांनंतर, अँफोराचा वापर बंद झाला. मात्र @ या चिन्हाचं वापर अकाउंटंट आणि नोंदी ठेवणाऱ्यांनी वस्तूंची विक्री किती किमतीला होते आहे याची नोंद ठेवण्यासाठी केला होता. त्यामुळे ते अस्तित्वात राहिलं.

"याचं मूळ टाईपरायटरमध्ये आहे. 19 व्या शतकात मुख्यत: अमेरिकेत त्याचा प्रसार झाला," असं गेरी लिओनिडास म्हणतात. ते युकेतील रीडिंग विद्यापीठात टायपोग्राफीचे प्राध्यापक आहेत.

ते म्हणतात, अमेरिकेत मेल ऑर्डर कॅटलॉगचा प्रचंड वापर झाल्यामुळे हे घडलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशासकीय गरजा निर्माण झाल्या. शेवटी त्यातून व्यावसायिक टायपिस्टचा एक संपूर्ण वर्गच निर्माण झाला.

"टाईपरायटर हा, लोकांच्या वाईट हस्ताक्षराचा धोका कमी करण्याचा आणि कार्यालयातील प्रशासनाची कार्यक्षमता आणि अंदाज वर्तवण्याची क्षमता वाढवण्याचा तो एक मार्ग आहे," असं लिओनिडास म्हणतात.

टाईपरायटर खूप गुंतागुंतीचे होते आणि महागडे होते. इतके की त्यांच्या सुरुवातीच्या काही मॉडेलमध्ये एक आणि शून्य हे आकडे नसायचे.

त्यासाठी टायपिस्टना 'O' आणि 'I'चा वापर करावा लागायचा. मात्र 1800 च्या उत्तरार्धापर्यंत, @ चा समावेश करणं महत्त्वाचं झालं होतं.

"आणि टाईपरायटर व्यवसाय आणि अकाउंटिंग प्रक्रियेशी जोडलेले असल्यामुळे @ हे चिन्हं टाईपरायटर्सच्या सर्व आवृत्त्यांमध्ये टिकून राहिलं. कारण त्याचा हा महत्त्वाचा वापर होतो."

कॉम्युटरवर जेव्हा कीबोर्ड आले, तेव्हा त्यात @ हे चिन्हदेखील आलं. मात्र जर तुम्ही अकाउंटंट नसाल तर ते फारसं उपयुक्त नव्हतं. रे टॉमलिन्सन यांच्यामुळे हे चित्र बदललं. ते अर्पानेट या प्रकल्पात काम करणारे संगणक शास्त्रज्ञ होते. हा अमेरिकेच्या सरकारचा प्रकल्प होता, यामुळेच इंटरनेटला पाया घातला गेला.

रे टॉमलिन्सन यांना वाटत होतं की लोकांना कदाचित एकमेकांना संदेश पाठवायचा असेल. टॉमलिन्सन यांनी कोड लिहिल्यानंतर, नेटवर्कमध्ये एखादी विशिष्ट व्यक्ती कुठे आहे, हे दर्शविण्यासाठी त्यांना काहीतरी मार्ग हवा होता. त्यांचं लक्ष कॉम्प्युटरच्या कीबोर्डकडे गेलं. त्याचं उत्तर तिथेच होतं.

मग त्यांनी @ हे चिन्ह व्यवसायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांमधून बाहेर काढला. त्याला पत्त्याच्या मध्यभागी आणला. त्यानंतर 1971 मध्ये त्यांनी पहिला ईमेल पाठवला.

मग इंटरनेट जसं अमेरिकेतून जगभरात पसरलं आणि पुढील अर्धशतकाच्या कालावधीत त्यानं मानवी संस्कृतीवर वर्चस्व निर्माण केलं, तसं त्याच्याबरोबर @ या चिन्हानं देखील घोडदौड केली.

मात्र हे चिन्ह जगभरात वापरलं जात असतानाच एक विचित्र गोष्ट घडली. या चिन्हाला नवनवीन नावं मिळू लागली.

आज इटालियन लोक @ या चिन्हाला 'चिओसिओला' किंवा 'गोगलगाय' म्हणतात. त्यात तुम्हाला साम्य दिसून येतं. हिब्रू भाषेत काहीवेळा या चिन्हाला 'स्ट्रुडेल' म्हणतात. तर झेक भाषेत ते 'झॅविनाक' असतं. त्याचा अर्थ 'रोलमॉप्स' असा असतो. हा एक चवदार खाद्यपदार्थ असतो.

रशियन लोक या चिन्हाला काहीवेळा 'सोबाका' असं म्हणतात. त्याचा अर्थ कुत्रा होतो. हे चिन्ह झोपण्यासाठी वर वळलेल्या पाळीव प्राण्यासारखं दिसतं. यातून मजेदार विनोंदाचा एक प्रदीर्घ इतिहास तयार झाला आहे.

जर तुम्ही रशियन भाषा शिकलात आणि कोणीतरी तुम्हाला 'मला कुत्र्यावर लिहा' असं म्हटलं, तर तुम्हाला त्याचा अर्थ कळू शकेल.

"आजकाल सर्वजण या चिन्हाला 'ॲट' म्हणतात. गेल्या 25 वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टींचं इंग्रजीकरण झालं आहे," असं निक फ्रान्सेन म्हणतात. ते बेल्जियममधील फ्रीलान्स कन्सल्टंट आहेत.

तुम्ही जर तिथे राहत असाल तर तुम्ही कोणत्या भागात राहत आहात यानुसार कदाचित फ्लेमिश (काहीवेळा त्याला बेल्जियन डच म्हणून ओळखलं जातं), फ्रेंच किंवा जर्मन बोलत मोठे होऊ शकता.

मात्र काही दिवसांपूर्वी, मी एक वृद्ध व्यक्तीशी बोलत होतो. त्या व्यक्तीच्या भाषेचं इंग्रजीकरण झालेलं नव्हतं. त्यामुळे मी त्याबद्दल विचार न करताच त्याला 'अपेनस्टार्टजे' म्हणालो. हा @ या चिन्हासाठी पारंपारिक डच शब्द आहे. त्याचा अर्थ 'माकडाची शेपूट' असा होतो.

इंग्रजीमध्ये @ या चिन्हाचा अर्थ फक्त 'ॲट' असाच आहे. अर्थात काहीवेळा त्याच्या व्यावसायिक संदर्भामुळे त्याला 'कमर्शियल ॲट' असंही म्हटलं जातं.

इंग्रजी भाषेत या चिन्हाला कोणतंही विशेष असं नाव नसण्यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे. एखाद्या शब्द किंवा चिन्हाची सुरुवातीची व्याख्या किंवा अर्थच पसरतो.

मात्र जेव्हा लोक याप्रकारची चिन्हं स्थानिक भाषेमध्ये वापरू लागतात किंवा त्याचं स्थानिक भाषेत रुपांतर करू लागतात, तेव्हा ते लक्षात ठेवण्यासाठी त्यांना एखादा मार्ग किंवा पद्धत हवी असते.

समजा तुम्हाला कोणीतरी कॉम्प्युटर दिला, तर तुम्ही त्याकडे पाहता. त्याचं नाव शोधण्याऐवजी तुम्ही ती वस्तू कशी दिसते याचं वर्णन करता. ग्रीकमध्ये याला 'बदकाचं छोटं पिल्लू' म्हणतात.

ज्याप्रमाणे टॉमलिन्सन यांनी स्वत:च्या कामासाठी @ हे चिन्ह वापरलं. त्याचप्रमाणे या चिन्हाचा वापर इतर कारणांसाठी देखील केला जातो आहे.

स्पेन आणि पोर्तुगालमध्ये @ या चिन्हासाठी 'अरोबा' हा शब्द वापरला जातो. हा ॲम्फोराशी संबंधित शब्द असून तो वजन आणि मापाचं मानकदेखील आहे.

मात्र आज @ या चिन्हाचा वापर काहीवेळा स्पॅनिश भाषेत लिंग-तटस्थ शब्द म्हणून देखील केला जातो. त्याचा वापर 'O' या अक्षराऐवजी केला जातो, ज्याचा वापर शब्दांच्या पुल्लिंगी स्वरुपांसाठी केला जातो.

तसंच 'A'अक्षराऐवजी केला जातो, ज्याचा वापर स्त्रीलिंगी रुपासाठी केला जातो. मित्र शब्द लिहिताना, तुम्ही अधिक समावेशक होण्यासाठी कदाचित 'amig@s'या शब्दाचा वापर करू शकता.

हे चिन्ह आपली ओळख, आपल्या व्यक्तिमत्वाचं सादरीकरण याच्याशी जोडलेलं

"'ॲट' मध्ये काहीतरी खूप रंजक बाब आहे. मला वाटतं की ते अद्वितीय आहे. या चिन्हामुळे तसं घडतं," असं लिओनिडास म्हणतात.

ते पुढे म्हणतात, "तुम्ही जेव्हा तुमचं नाव लिहिता, तेव्हा कॅपिटल किंवा मोठ्या अक्षरांचा वापर करता. अशावेळी तुमच्या पहिल्या आणि आडनावामध्ये एक जागा मोकळी असते."

"मात्र @ हे चिन्ह म्हणून नावांना एकसमान करतं आणि कोणतीही मोकळी जागा काढून टाकण्यास भाग पाडतं. आपल्याला स्वत:साठी एक खास, एकच शब्द शोधून काढावा लागेल. आपण आपली ओळख कशी सादर करावी याबद्दल विचार करायला ते आपल्याला भाग पाडतं."

संशोधनातून असं काहीतरी समोर येतं जे तुम्ही कदाचित अनुभवलं असेल: एखाद्या पातळीवर, आडनावाची निवड करणं ही भावनिक प्रक्रिया असू शकते.

सामान्यपणे लोकाना त्यांचं हँडल फक्त वेगळं असावं असं वाटत नाही, तर त्यांना ते योग्य देखील हवं असतं. त्यातून त्यांचं प्रतिनिधित्व व्हावं, चांगलं दिसावं आणि चांगलं वाटावं असं वाटतं.

तसंच त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा ओळखीबद्दल काहीतरी त्यातून व्यक्त व्हावं असं लोकांना वाटतं.

युजरनेमचा वापर आपण कोण आहोत हे व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या वास्तविक जगातील ओळखीपासून वेगळं ऑनलाइन व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी केला जातो.

ऑनलाइन संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या भाषाशास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे की युजरनेम आपल्या स्वत:च्या ओळखीशी इतके जोडले गेले आहेत की ते बदलणं भावनिकदृष्ट्या खूपच तीव्र स्वरुपाचं असू शकतं.

जवळपास तुमचं नाव बदलण्यासारखं किंवा तुमचं दिसणं, तुमचं स्वरुप बदलण्यासारखं असू शकतं. इंटननेटवर बहुतांश ठिकाणी @ हे तुमच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे.

अर्थात, @ या चिन्हाबद्दल आपल्या भावना तीव्र आहेत, असं लिओनिडास म्हणतात. आपलं स्वत:च्या अस्तित्वाबद्दलचं जे आकलन आहे, त्याच्याशी ते जोडलेलं आहे.

'पिरोएट: टर्निंग पॉईंट्स इन डिझाईन' हे एमओएमएचं प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन @ या चिन्हाचं कौतुक करण्यासाठी तुमच्या कीबोर्डवर एक पर्यायी सेटिंग देतं. असं चिन्ह ज्याचं मूळ हजारो वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीक सेरॅमिक्समध्ये आहे.

"या टप्प्यावर, चित्रपट कसे तयार होता हे समजून घेण्याचं किंवा संगीत कसं तयार होतं, याचं आपण आकलन करू शकतो. मात्र तीच गोष्ट वस्तूंच्या बाबतीत करण्याचं प्रशिक्षण आपल्याला देण्यात आलेलं नाही."

"मला @ या चिन्हाबद्दल जे सांगायचं आहे ते म्हणजे आनंद, युरेकाचा क्षण, डिझाईन केलेल्या जगाचा भाग असल्याचा आनंद आणि अभिमान आहे. अशी भावना जी मला त्या चिन्हाच्या छोट्याशा बटणात किती दडलं आहे याची जाणीव झाल्यावर निर्माण झाली."

@ हे चिन्हं सध्या न्यूयॉर्कच्या एमओएमएमधील 'पिरोएट: टर्निंग पॉईंट्स इन डिझाईन' या प्रदर्शनात मांडण्यात आलं आहे. ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे.

(थॉमस जर्मेन हे बीबीसीचे वरिष्ठ तंत्रज्ञान पत्रकार आहेत. त्यांनी गेल्या दशकातील बहुतांश काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रायव्हसी आणि इंटरनेट संस्कृतीचा व्यापक विस्तार यावर काम केलं आहे.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.