दिल्ली स्फोटः डॉक्टर उमर नबी, आमिर आणि जासिरचे कुटुंबीय काय म्हणतात?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने सोमवारी (17 नोव्हेंबर) दुसरी अटक केली आहे.
    • Author, माजिद जहांगीर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगर

राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाप्रकरणी रविवारी (16 नोव्हेंबर) पहिली अटक केल्याचा दावा केला आहे.

काश्मीरचा रहिवासी आमिर रशीद अली असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

आमिर हा डॉ. उमर नबीचा साथीदार होता आणि दिल्ली स्फोटाच्या कटात त्याचा सहभाग होता, असा दावा एनआयएने केला आहे.

काही दिवसांपूर्वी (10 नोव्हेंबर) लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात किमान 12 जण ठार झाले होते.

डॉ. उमर उन नबी

डॉ. उमर उन नबी हा लाल किल्ला स्फोटात 'आत्मघाती हल्लेखोर' होता, असं एनआयएनं म्हटलं आहे.

ज्या कारचा स्फोट झाला. ती कार डॉ. उमर नबीच चालवत होता, असा आरोप आहे.

श्रीनगरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर पुलवामा जिल्ह्यातील कोइल गावात डॉ. उमर नबी याचं घर आहे. श्रीनगरहून कोइल गावात पोहोचण्यासाठी अनेक गावांमधून जावं लागतं.

कोइल गावात एक अरुंद गल्ली डॉ. उमर नबीच्या घरापर्यंत जाते.

अलीकडेच सुरक्षादलांनी रात्रीतून डॉ. उमर नबीचं घर उद्धवस्त केलं होतं. त्याच्या घराचं आता ढिगाऱ्यात रुपांतर झालं आहे.

घर पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, रात्री 12 ते पहाटे अडीचच्या सुमारास त्यांना तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले.

ते म्हणाले की, उमरच्या घराजवळील लोकांना आधी त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढलं, आणि त्यानंतर स्फोट घडवून आणण्यात आला.

उमरच्या कुटुंबात त्याचे आई-वडील, भाऊ-वहिनी आणि एक बहीण राहते.

डॉ. उमर नबीच्या नातेवाईक
फोटो कॅप्शन, डॉ. उमरने श्रीनगर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून (जीएमसी) एमबीबीएस आणि एमडीचं शिक्षण घेतलं होतं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. उमर नबीच्या वहिनी मुझम्मिल अख्तर यांनी बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना सांगितलं की, डॉ. उमर सुमारे दीड वर्षांपूर्वी काश्मीर सोडून गेला होता आणि फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून शिकवत होता.

त्यांनी सांगितलं, "उमर शेवटचा दोन महिन्यांपूर्वी घरी आला होता. मागील शुक्रवारी माझं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. तो त्यावेळी घरी येण्याबाबत बोलला होता, आणि आज आपल्याला त्यांच्याबद्दल असं काही ऐकायला मिळतंय.

सुमारे दीड वर्षांपूर्वी तो अनंतनागच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होता. नंतर तो फरिदाबादला कामासाठी गेला होता."

कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे उमरने श्रीनगर मधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून (जीएमसी) एमबीबीएस आणि एमडीचं शिक्षण घेतलं होतं.

मुझम्मिल अख्तर यांनी सांगितलं की, त्यांच्याकडे या घराशिवाय दुसरी कोणतीही मालमत्ता किंवा जमीन नाही. त्या म्हणाल्या की, आम्ही मेहनत करून कमवत होतो आणि त्यातून आमचा उदरनिर्वाह सुरू होता.

डॉ. उमरची दुसरी नातेवाईक तबस्सुम आरा यांनी बीबीसीला सांगितलं की, "उमरच्या आईने खूप मेहनत केली आणि घर चालवलं. त्यांनी घरोघरी जाऊन काम करून आपल्या मुलांना शिकवलं."

काही दिवसांपूर्वीच उमरचं लग्न ठरलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली.

आमिर रशीद अली कोण आहे?

पुलवामा जिल्ह्यातील सम्बुरा गावात राहणाऱ्या 30 वर्षीय आमिर रशीद अलीला एनआयएने दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणी अटक केली आहे.

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, आमिर प्लम्बरचं काम करतो. सम्बुरा गावात दोन मजली घरात त्याचं कुटुंब राहतं. ज्यात आई, भाऊ आणि वहिनी राहतात.

आमिरचा मोठा भाऊ उमर रशीदलाही ताब्यात घेतल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.

उमर रशीद आमिरचा मोठा भाऊ आहे. तो इलेक्ट्रिशियनचं काम करतो.

10 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा पोलिसांनी दोन्ही भावांना घरातून नेल्याचं आमिरच्या वहिनी कुलसूम जान यांनी सांगितलं.

त्या सांगतात, "रात्री 11 वाजले होते. पोलीस आमच्या घरी आले. त्यांनी आमिर आणि उमर दोघांना सोबत नेलं. पोलीस म्हणाले की, त्यांची काही चौकशी करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पंपोर पोलीस स्टेशनला गेलो, पण त्या दिवशी आम्हाला आत जाऊ दिलं नाही."

"तिसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो. त्या दिवशी आम्हाला उमरला भेटण्याची परवानगी मिळाली. उमरसोबत आम्ही बोललो. पोलीसांनी सांगितलं की, ते तपास करत आहेत आणि काळजी करण्याची काही गरज नाही."

"त्याच दिवशी सायंकाळी गावातील लंबरदारला पोलिसांचा फोन आला आणि त्यांला सांगण्यात आलं की, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन उमरला घेऊन जाऊ शकता.

आमिर रशीद अलीच्या आई
फोटो कॅप्शन, आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी आमिर रशीद अलीच्या आईने केली आहे.

आम्ही पोलीस स्टेशनला त्याच्यासोबत गेलो आणि उमरला घरी परत आणलं. पोलिसांनी सांगितलं की, दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता उमरला हजेरीसाठी पोलीस ठाण्यात आणावं लागेल."

त्यांनी पुढे सांगितलं की, त्याच दिवशी सायंकाळी एनआयएचे लोक येथे आले आणि सांगितलं की, दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता उमरला श्रीनगरमधील डल गेट येथील त्यांच्या कार्यालयात आणा.

कुलसुम जान सांगतात की, दुसऱ्या दिवशी ते उमरला घेऊन पोलीस ठाण्यात गेले आणि त्यानंतर त्यांना काहीच माहिती नाही. त्यांनी 10 नोव्हेंबरपासून आमिर रशीदशी भेटही झाली नसल्याचे सांगितले.

उमर कधीच दिल्लीला गेला नाही, असा दावाही त्यांनी केला.

त्या सांगतात, "तो साधारणपणे आपली मजुरी करून सायंकाळी घरी यायचा, जेवण करायचा आणि झोपी जायचा. आता त्याच्याबद्दल जे काही सांगितलं जात आहे, त्याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. जे आम्हाला माहीत आहे, तेच आम्ही सांगत आहोत."

आमिरच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 पासून तो प्लम्बरचं काम करतोय. त्यापूर्वी तो शाल तयार करण्याचं काम करत होता.

आमिरच्या वहिनी कुलसूम जान
फोटो कॅप्शन, आमिरच्या वहिनी कुलसूम जान यांनी सांगितलं की, 10 नोव्हेंबरच्या रात्री उशिरा पोलिसांनी दोन्ही भावांना घरातून नेलं.

शाल तयार करण्याच्या कामात तोटा झाल्यानंतर आमिरने ते काम बंद केलं होतं.

तो दहावीपर्यंत शिकला असून त्याचा मोठा भाऊ उमरचं बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे.

आमिरचं अद्याप लग्न झालेलं नाही. तर उमर विवाहित असून त्याला एक मुलगा देखील आहे.

आमिरच्या आईने सम्बुरा गावातून बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं की, "त्यांच्या मुलाबद्दल जे काही सांगितलं जात आहे, त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. आपला मुलगा काय करत आहे, हे पाहण्यासाठी त्याचे आई-वडील कायम त्याच्या मागे जाऊ शकत नाही."

त्या सांगतात, "आमिर एक सामान्य माणसासारखं घरकाम करायचा. यावेळी पिक कापण्यासाठी कामगार नव्हते, तेव्हा त्याने स्वतः एकट्यानेच सर्व पिक कापले. माझ्या प्रत्येक कामात तो मदत करायचा. शेजाऱ्याने त्याला काही काम सांगितलं, तरी तो कधी त्यांना नकार देत नसत."

आमिरची आई म्हणते, "खुदा कसम, आम्हाला त्याच्यावर कोणतीही शंका नाही. मी तुम्हाला काहीही खोटं सांगत नाही. त्याच्यावर कधीही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस रेकॉर्ड स्वच्छ आहे.

इथे जेव्हा दगडफेक व्हायची, तेव्हा अनेक लोक पकडले गेले किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, पण या दोन्ही भावांवर कधीच गुन्हे दाखल झाले नाहीत किंवा कुणी त्यांना हात लावला नाही."

आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी आमिरच्या आईने केली आहे.

एनआयएने आमिर रशीदबद्दल काय सांगितलं?

10 नोव्हेंबरला दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या प्रकरणात आत्मघाती हल्लेखोराच्या एका साथीदाराला अटक करण्यात आल्याचे एनआयएने सांगितलं.

एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, एका काश्मिरी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने आत्मघाती हल्लेखोरासोबत दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता.

एजन्सीने त्या आरोपीचं नाव आमिर रशीद अली असल्याचं सांगितलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात वापरण्यात आलेली कार ही आमिर रशीद अलीच्या नावाने नोंदवलेली होती.

मोबाईल
फोटो कॅप्शन, एनआयएने आमिर रशीद अलीला दिल्लीतून अटक केल्याचा दावा केला आहे.

एनआयएन आमिर रशीद अलीला दिल्लीतून अटक केल्याचा दावा केला आहे.

एनआयएने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, "एनआयएच्या तपासात समोर आलं की, जम्मू-कश्मीरमधील पंपोरच्या सम्बुरा गावातील या आरोपीने कथित आत्मघाती हल्लेखोर उमर नबीसोबत दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता."

आमिर आयइडी म्हणून वापरण्यात आलेल्या कारच्या खरेदीसाठी मदत करण्यासाठी दिल्लीला आला होता, असं एनआयएने सांगितलं.

डॉ. उमर उन नबीची आणखी एक कार जप्त करण्यात आल्याचं तपास यंत्रणेनं सांगितलं आहे.

या प्रकरणातील पुरावे सादर करण्यासाठी कारची तपासणी केली जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत 73 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यात 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळील स्फोटात जखमी झालेले लोकही आहेत, असंही एनआयएने म्हटलं आहे.

आणखी एक अटक

एनआयएने सोमवारी म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी काश्मीरचा रहिवासी जासिर बिलाल वानी उर्फ दानिश याला श्रीनगरहून अटक करण्यात आली आहे

जासिरने दिल्ली स्फोटापूर्वी ड्रोन आणि रॉकेट बनवण्याचा प्रयत्न केला आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी तांत्रिक मदत केली होती, असं एजन्सीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

जासिर उमर नबीबरोबर दिल्ली स्फोटाच्या कटात सहभागी होता, असा दावा तपास यंत्रणेनं केला आहे.

जासिरचे वडील बिलाल अहमद वानी यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता.

बिलाल वानी यांना श्रीनगरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला.

एनआयएचे अधिकारी दिल्ली स्फोटातील आत्मघाती हल्लेखोराच्या आणखी एका साथीदाराला अटक करताना

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, एनआयएने दिल्ली स्फोटातील आत्मघाती हल्लेखोराच्या आणखी एका साथीदाराला अटक केली आहे.

बिलाल अहमद वानी यांच्या भावजय नसिमा अख्तर यांनी माध्यमांना सांगितलं की, "माझ्या दिरानं आत्महत्या केली. कारण त्यांची बदनामी होत होती. डॉ. अदीलला अटक करण्यात आली आहे, तो आमचा शेजारी आहे.

आम्हाला काय माहिती तो कसा आहे? आई-वडील मुलाला सांगतात की चांगल्या लोकांत राहा. पण कोण कसा आहे, हे आपल्याला कसं कळणार? एखाद्याने चूक केली, तर त्याची शिक्षा सगळ्यांना देता येत नाही."

त्या म्हणाल्या, "माझे पती नवील अहमद वानी यांनाही पकडण्यात आलं आहे, ते लेक्चरर आहेत. ते त्यावेळी ड्युटीवर होते. दानिशलाही पकडलं गेलं आहे. आम्ही निर्दोष आहोत आणि सरकारकडे विनंती करतो की त्यांना सोडावं."

डॉ. अदीलला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून अटक केली होती.

(आत्महत्या ही एक गंभीर स्वरुपाची मानसिक आणि सामजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल, तर भारत सरकारच्या, 1800 233 3330 या जीवनसाथी हेल्पलाइनवर मदत मागू शकता. शिवाय तणावासंदर्भात तुम्ही मित्र आणि नातेवाईकांशी देखील चर्चा केली पाहिजे.)

पोलीस तपासात आतापर्यंत काय समोर आलं?

10 नोव्हेंबर 2025 रोजी जम्मू-काश्मीर पोलिसांनी तीन पानांचं एक निवेदन जारी केलं होतं.

पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केल्याचा दावा केला आहे. हे लोक बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंद या कट्टरवादी संघटनेशी संबंधित होते, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

या लोकांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये अटक करण्यात आलेल्या यादीत डॉ. मुझम्मिल आणि डॉ. अदील यांच्या नावाचाही समावेश आहे.

तपास यंत्रणांनी काश्मीमधून काही डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यातील काही जणांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.