माल्ल्या ते मोदी; 'या' 5 फरारांच्या प्रत्यर्पणाच्या प्रतीक्षेत भारतीय तपास यंत्रणा

फोटो स्रोत, Getty Images
बडे उद्योगपती, व्यावसायिक यांनी देशातील बँकांकडून प्रचंड मोठ्या रकमांचं कर्ज घ्यायचं, नंतर त्या कर्जाची परतफेड करायची नाही आणि देशाबाहेर पलायन करून आरामात आलिशान आयुष्य जगायचं.
भारतीय तपास यंत्रणा त्यांच्या प्रत्यर्पणासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना यश येत नाहीये. अशा फरार आर्थिक गुन्हेगारांची अनेक प्रकरणं अलीकडच्या काळात देशासमोर आली आहेत.
मेहुल चोकसीच्या ताज्या अटकेमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याला केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयच्या विनंतीवरून बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. ऑल इंडिया रेडिओनं एक्स या सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
हिरे व्यापारी मेहुल चोकसी आणि त्याचा भाचा नीरज मोदी या दोघांवर पंजाब नॅशनल बँकेची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
अशाच प्रकारे घोटाळे किंवा फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या लोकांच्या यादीत आणखी काही व्यावसायिक आहेत.
वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ते तपास यंत्रणांना हवे आहेत. मात्र, ते भारतातून फरार झाले आहेत. भारतीय तपास यंत्रणा या व्यावसायिकांच्या प्रत्यर्पणाची वाट पाहत आहेत.
मेहुल चोकसीसह यात इतरही नावं आहेत. या लेखात अशा फरार व्यावसायिकांबद्दल जाणून घेऊया.
1. मेहुल चोकसी
पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं 2018 च्या सुरुवातीला समोर आलं होतं. त्यावेळी पंजाब नॅशनल बँकेनं मेहुल चोकसी, नीरव मोदीसह इतर काही जणांविरोधात तक्रार नोंदवली होती.
बँकेनं दावा केला होता की, या सर्व आरोपींनी बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर हातमिळवणी करून कट केला आणि बँकेचं आर्थिक नुकसान केलं.

फोटो स्रोत, Getty Images
फेब्रुवारी 2018 मध्ये अंतर्गत तपास पूर्ण झाल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला या घोटाळ्याची माहिती दिली होती.
एकेकाळी मेहुल चोकसी भारतातील हिरे व्यापाराचा पोस्टर बॉय होता.
2. नीरव मोदी
पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात नीरव मोदी हा देखील एक आरोपी आहेत. जानेवारी 2018 मध्ये नीरव मोदीनं भारतातून पलायन केलं होतं.
19 मार्च 2019 ला नीरव मोदीला लंडनमधील होबर्नच्या मेट्रो बँक शाखेतून अटक करण्यात आली होती. नीरव मोदी तिथे खातं उघडण्यास गेला होता. मे 2020 मध्ये लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात नीरव मोदीच्या प्रत्यर्पणाचा खटला सुरू होता.

फोटो स्रोत, Getty Images
नीरव मोदीचं कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून हिऱ्यांच्या व्यापारात आहे. मेहुल चोकसी गीतांजली समूह या रिटेल ज्वेलरी कंपनीचा प्रमुख होता. नीरव मोदीनं मेहुल चोकसीबरोबर जवळपास 10 वर्षे व्यवसाय केला.
त्यानंतर नीरव मोदीनं भारतात फायरस्टार डायमंड नावानं एक कंपनी सुरू केली होती.
3. विजय माल्ल्या
भारत सरकारचा दावा आहे की किंगफिशर कंपनीचे मालक विजय माल्ल्यायाच्यावर भारतीय बँकांचं 9 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज आहे.
विजय माल्ल्यावर आरोप आहे की, त्यानं त्याच्या किंगफिशर एअरलाईन्स या कंपनीसाठी बँकांकडून मोठ्या रकमेचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जाची परतफेड न करताच तो परदेशात पळून गेला. किंगफिशर एअरलाईन्सची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे ती कंपनी बंद पडली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मार्च 2016 मध्ये विजय माल्ल्यानं ब्रिटनमध्ये पलायन केलं होतं. तेव्हापासून तो लंडनमध्येच राहतो आहे. विजय माल्ल्याचं भारतात प्रत्यर्पण करण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा ब्रिटनच्या न्यायालयात कायदेशीर लढाई लढत आहेत.
1992 मध्ये भारत आणि ब्रिटन मध्ये प्रत्यर्पण करार झाला होता. मात्र, हा करार झाल्यापासून फक्त एकाच व्यक्तीचं प्रत्यर्पण झालं आहे.
4. ललित मोदी
ललित मोदी हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलचा माजी प्रमुख आहे. त्यानंदेखील भारतातून पलायन केलं असून तो 2010 पासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे.
आयपीएलच्या प्रमुखपदी असताना लिलाव प्रक्रियेत कथितरित्या घोटाळा केल्याचा आरोप ललित मोदीवर आहे.
अर्थात ललित मोदीनं हे आरोप नेहमीच नाकारले आहेत. दरम्यान त्याचं भारतात प्रत्यर्पण करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
2008 मध्ये आयपीएलची स्थापना करण्यात ललित मोदीची महत्त्वाची भूमिका होती. आता आयपीएल अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होणारी स्पर्धा बनली आहे.
2010 मध्ये आयपीएलच्या दोन फ्रँचायझी टीमच्या लिलाव प्रक्रियेदरम्यान घोटाळा केल्याचा मुख्य आरोप ललित मोदी विरोधात आहे. त्याचबरोबर परवानगी शिवाय आयपीएलचे प्रसारण आणि इंटरनेट अधिकार विकल्याचाही आरोप ललित मोदीवर झाला होता.
2013 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) ललित मोदीवर क्रिकेटशी संबंधित गोष्टींवर सहभाग घेण्यास कायमस्वरुपी बंदी घातली होती.
5. नितिन संदेसरा
नितिन संदेसरा हा गुजरातमधील एक मोठा व्यावसायिक आहे. तो स्टर्लिंग बायोटेकचा मालक आहे. 5,700 कोटी रुपयांच्या बँक फ्रॉड आणि मनी लाँडरिंग प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे.
नितिन संदेसराला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. या प्रकरणात हितेश नरेंद्रभाई पटेल, दीप्ती संदेसरा आणि चेतन संदेसरा यांच्यावर देखील आरोप आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2017 मध्ये या प्रकरणात दोन तपास यंत्रणांनी तपासाची सुरूवात करण्याच्या काही दिवस आधीच संदेसरा कुटुंब भारतातून दुबईमार्गे पलायन करून नायजेरियात गेलं होतं. तेव्हापासून संदेसरा कुटुंबानं नायजेरिया आणि अल्बानिया या दोन देशांचं नागरिकत्व घेतलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











