बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मांस विक्री बंद, नागपूर महापालिकेच्या आदेशावर आंबेडकरी अनुयायी काय म्हणाले?

फोटो स्रोत, Nagpur Municipal Corporation/Bhagyashree Raut
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील सगळी मांस विक्रीची दुकानं आणि कत्तलकाने बंद राहतील, असा आदेश नागपूर महापालिकेनं काढला. त्यांच्या सोशल मीडियावरून हा आदेश जाहीर केला.
नागपूर महापालिकेच्या या निर्णयावर सोशल मीडियावरून टीका सुरू झाली. एका सोशल मीडिया युझरने हा निर्णय तुघलकी असल्याचं म्हटलं.
पण, बाबासाहेबांच्या सर्वसामान्य अनुयायांना या निर्णयाबद्दल काय वाटतं? हे जाणून घेण्यासाठी आम्ही नागपुरातील दीक्षाभूमीवर पोहोचलो.
बाबासाहेबांची जयंती असल्यानं दीक्षाभूमीवर अनुयायांची प्रचंड गर्दी होती. नागपूर शहरासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक दीक्षाभूमीवर आले होते. याच अनुयायांची मतं आम्ही जाणून घेतली. महापालिकेच्या या निर्णयाबद्दल याठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या.
निर्णयाबद्दल बाबासाहेबांच्या अनुयायांना काय वाटतं?
दीक्षाभूमीच्या गेटवरच आम्हाला जवळपास वयाच्या साठीत असलेल्या एक महिला भेटल्या. त्यांना आम्ही महापालिकेनं मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचं मत विचारलं.
त्या म्हणाल्या, "मला वाटतं की मांस विक्रीची दुकानं बंद असायला पाहिजे. मांस खाणं चांगल नाही. पंचशील तत्वात बसत नाही. मी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळं आमच्या घरात मटण खात नाही.
'पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि' हे तत्व आहे. त्यात प्राणीमात्रांची हिंसा करू नये. त्याचं पालन पोषण करायला पाहिजे, हे सांगितलं आहे. मग आपण कशाला खायचं?"
बौद्ध धर्माच्या तत्वात मांस खाणं बसत नाही. त्यामुळं बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दुकानं बंद असणं योग्य असल्याचं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
28 वर्षीय मंगेश शिगोरेने मात्र, वेगळी भूमिका मांडली. त्याला हा निर्णय पटलेला नाही.
बाबासाहेबांच्या संविधानाचा दाखला देत त्यानं म्हटलं की, बाबासाहेबांनी प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं होतं. आज 14 एप्रिल आहे. महापालिकेनं कोणावरही अशी बंधन घालू नये. तो त्यांचा उदरनिर्वाहाचा भाग आहे.
बाबासाहेबांची जयंती आहे म्हणून, असं मांसविक्रीवर बंधनं घालणं योग्य नाही. कारण, त्यामधून विक्री करणाऱ्या लोकांना पैसे मिळतात. त्यांचं कुटुंब त्यावर चालतं. त्यांची लहान मुलं असतात, त्यांचं पालन पोषण करतात. त्यामुळे मला हा निर्णय अयोग्य वाटतो.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर आलेली एक तरुणी आम्हाला दीक्षाभूमीच्या गेटवरच भेटली. बाबासाहेबांच्या गुरुंनी दिलेली शिकवण सांगत तिनं या निर्णयाचं स्वागत केलं.
"एखाद्या दिवशी मांस नाही खाल्लं तर काय बिघडणार आहे. प्राणिमात्रांवर दया करावी, हत्या करू नये हे बाबासाहेबांच्या गुरुंनी सांगितलं आहे. आपण त्यांची हत्या करतो आणि मांस मटण आवडीनं खातो.
एक दिवस नाही खाल्लं काय होणार आहे? हा महापालिकेचा निर्णय चांगला आहे. प्राणिमात्रांची हत्या करून विकणं हा कोणता व्यवसाय आहे," असं ती म्हणाली.

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
दीक्षाभूमीवरून परत जाणाऱ्या मंदा वैरागडे म्हणाल्या की, बाबासाहेबांनी संविधानात व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सांगितलं आहे.
पण, आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. बाबासाहेब नसते तर आम्ही नसतो. बाबासाहेबांनी आम्हाला एक नवीन जन्म दिला आहे. त्यामुळे आजचा दिवस मांस विक्री बंद राहायला पाहिजे. आजच्या दिवशी मांस विक्री करतात, काही लोक दारू पिऊन दंगा करतात. त्यामुळं ही दुकानं बंदच असायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
त्याचवेळी, बाबासाहेबांवरील कविता म्हणत म्हणत दीक्षाभूमीच्या गेटमधून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या 50 वर्षीय प्रेमराज सोगेंनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
"संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे. कोणीही माणूस काहीही खाऊ शकते. महापालिकेचा निर्णय आम्हाला मान्य नाही. बाबासाहेबांनी कधीच म्हटलं नाही हे खाऊ नका, ते खाऊ नका.
आम्हाला आधी मेलेल्या जनावराचं मांसही भेटत नव्हतं, आता खाऊ शकत आहोत, तर आता कशाला बंदी आणायला पाहिजे. हे निर्णय मनुस्मृतीचे आहेत, आमच्या संविधानाचे नाहीत. हा निर्णय अयोग्य आहे," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
तर लोकांनी स्वतःच दुकानं बंद ठेवायला हवी होती, असं इथलेच एक अनुयायी डी. एम. रामटेके यांना वाटतं.
ते म्हणाले, "आपण संविधानाचं अनुसरण करणारे आहोत. त्यामुळं व्यक्ती स्वातंत्र्यानुसार दुकानं बंद असलीच पाहिजे असं नाही. पण, आजच्या दिवशी दुकानं स्वयंप्रेरणेनं बंद ठेवायला हवी. कारण, आज बाबासाहेबांची जयंती आहे."
तर दीक्षीभूमीच्या परिसरातच कुटुंबासोबत झाडाच्या सावलीत बसलेल्या अनिता मेश्राम म्हणतात की, मांसाची दुकानं बंद हा निर्णय योग्य वाटत नाही. मांस कोणी खावं कोणी खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
भारत देशात सर्व धर्माचे लोक राहतात. तुम्हाला खायचं नसेल तर नका खाऊ. पण, इतर लोक खातील ना. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण आपले विचार इतरांवर लादू शकत नाही. त्यांच्यावर बळजबरी करू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.
बाबासाहेबांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही अमूक दिवशी मांसाहार करू नका, तमुक दिवशी मांसाहार करू नका. याबद्दल कुठे लिहिलेलंही नाही, असंही त्यांनी सांगितलं.
आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना काय वाटतं?
आंबेडकरी चळवळीमधील सामाजिक कार्यकर्त्या छाया खोब्रागडे यांनीही महापालिकेच्या या निर्णयावर टीका करतात.
त्या म्हणाल्या, "हा निर्णय घेण्याइतकीच महापालिकेची बुद्धी छोटी आहे. बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे असे निर्णय कसे काय घेऊ शकतात. हा फालतू निर्णय आहे.
जयंतीनिमित्त आंबेडकरांना ही आदरांजली असेल का? अजिबात नाही. असे निर्णय घेऊन बाबासाहेबांना छोटं दाखवण्याचा हा डाव आहे. त्यांनी हे करण्यापेक्षा बाबासाहेबांच्या स्मारकाकडं लक्ष द्यावं."

फोटो स्रोत, Getty Images
तर दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडं मांस विक्री आणि दारुबंदीसाठी मागणी करणारे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आणि मानवाधिकार संरक्षण मंचचे पदाधिकारी आशिष फुलझेले यांनी निर्णयाचं स्वागत केलं.
"आम्हीच दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. पण, आता महापालिकेनं हा निर्णय घेतला असेल तर चांगलंच आहे. यासोबतच मद्यविक्रीची दुकानं सुद्धा बंद असायला हवीत," असं ते म्हणाले.
एखाद्या महापुरुषाची जयंती असली की, त्यावेळी हे सर्व प्रकार बंद असले पाहिजे. लोक मनापासून जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करतात. जयंती गोडधोडानं साजरी व्हायला पाहिजे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
गेल्या काही वर्षांत असा अनुभव आला की, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत बरेच जण दारू पिऊन गोंधळ घालतात. त्यामुळं मिरवणुकीचं स्वरुप बिघडतं. हे प्रकार घडू नये. या दिवशी चांगलं वातावरण असायला पाहिजे यासाठी आम्ही मांसविक्री आणि दारूची दुकानं बंद ठेवण्याची मागणी केली होती, असं त्यांनी सांगितलं.
महापालिकेनं काय सांगितलं?
सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर आम्ही नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्याशी संपर्क साधला.
महापालिकेनं असे आदेश का काढलेत? याबद्दल आयुक्त म्हणाले, "विविध सामाजिक संस्थांच्या मागणीनुसार महानगरपालिका ठराव क्रमांक 240, दिनांक 02/07/2018 अन्वये शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे."

फोटो स्रोत, Nagpur Municipal Corporation
निर्णय 2018 मध्येच घेतला आहे, पण आताच या निर्णयावर टीका का व्हायला लागली?
त्याचं कारण म्हणजे नागपूर महापालिकेच्या सोशल मीडिया हँडलवरून हा आदेश बाबासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी प्रसारीत करण्यात आला.
त्यानंतर त्या आदेशाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर लोकांनी महापालिकेवर टीका केली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











