बीबीसी बोर्ड सदस्य शुमीत बॅनर्जींनी राजीनामा देत केली, वरीष्ठ पातळीवरील 'प्रशासकीय समस्यां'वर टीका

- Author, अॅलेक्स फिलिप्स आणि हेलेन बुश्बी
- Role, कल्चर रिपोर्टर
बीबीसीच्या बोर्डमधील सदस्य शुमीत बॅनर्जी यांनी कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ पातळीवर 'गव्हर्नन्स इश्यूज्' अर्थात प्रशासकीय समस्या असल्याचं सांगून राजीनामा दिला आहे.
बीबीसी बोर्ड सदस्य असलेले शुमीत बॅनर्जी यांनी यासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं.
या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, बीबीसीचे दोन वरिष्ठ कर्मचारी म्हणजेच टिम डेव्ही आणि डेबोरा टर्नेस पदावरून का हटत आहेत, याबद्दलच्या चर्चेत त्यांचं मत विचारण्यात आलं नव्हतं. त्यांना या चर्चेत सहभागीही करून घेण्यात आलं नव्हतं.
बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेव्ही आणि न्यूज सीईओ डेबोरा टर्नेस यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बॅनर्जी यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे, असं बीबीसीने एका निवेदनात म्हटलं आहे. बीबीसी न्यूजने बॅनर्जी यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संपर्क साधला आहे.
बीबीसीमधील या प्रशासकीय समस्यांना जबाबदार धरताना, बॅनर्जी यांनी थेट टीका केल्याचे दिसून येत आहे.
टिम डेव्ही आणि डेबोरा टर्नेस यांचा राजीनामा
दरम्यान, यापूर्वी बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेव्ही आणि न्यूज सीईओ डेबोरा टर्नेस यांनी राजीनामा दिला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाचे संपादन करून बीबीसी पॅनोरमा डॉक्युमेंटरीने प्रेक्षकांची दिशाभूल केल्याचा आरोप आणि टीका झाल्यानंतर त्यांनी हे राजीनामे दिले आहेत.
पाच वर्षे या पदावर राहिलेले टिम डेव्ही अलिकडच्या काळात अनेक वाद आणि पक्षपाताच्या आरोपांमुळे दबावाखाली होते.
एका निवेदनात टिम डेव्ही म्हणाले, "काही चुका झाल्या आहेत आणि डायरेक्टर जनरल म्हणून त्याची अंतिम जबाबदारी माझी आहे."
या राजीनाम्यांमुळे बीबीसीमध्ये बदल घडून येईल अशी आशा अनेक ब्रिटिश नेत्यांनी व्यक्त केली आहे, तर ट्रम्प यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
बीबीसीचे डायरेक्टर जनरल आणि हेड ऑफ बीबीसी न्यूज दोघांचाही एकाच दिवशी राजीनामा देणं ही एक अनाकलनीय घटना आहे.
रविवारी (9 नोव्हेंबर) संध्याकाळी या निर्णयाची घोषणा करताना टिम डेव्ही म्हणाले, "इतर कोणत्याही सार्वजनिक संस्थेप्रमाणेच बीबीसीही परिपूर्ण नाही. आपल्याला नेहमी खुले, पारदर्शक आणि जबाबदार राहायला हवे. हे माझ्या राजीनाम्याचा एकमेव कारण नाही, पण बीबीसी न्यूजबाबत सुरू असलेल्या सध्याच्या वादांनी माझ्या निर्णयावर स्वाभाविकच प्रभाव टाकला आहे. एकूणच बीबीसी चांगलं काम करत आहे, परंतु, काही चुका झाल्या आहेत आणि डायरेक्टर जनरल म्हणून त्याची अंतिम जबाबदारी माझी आहे."
तर डेबोरा टर्नेस यांनी बीबीसीवरील पक्षपातीपणाचे आरोप फेटाळून लावले.
टर्नेस यांनी रविवारी रात्री दिलेल्या निवेदनात म्हटलं की पॅनोरामा वाद "आता अशा पातळीवर पोहोचला आहे जिथे तो बीबीसीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहे. "अंतिम जबाबदारी माझीच आहे."
त्या म्हणाल्या, "सार्वजनिक जीवनात नेत्याने पूर्णपणे जबाबदार राहायला हवे, आणि म्हणूनच मी पद सोडत आहे. काही चुका झाल्या आहेत, परंतु मी हे पूर्णपणे स्पष्ट करू इच्छिते की अलीकडील काळात बीबीसी न्यूजवर संस्थात्मक पक्षपातीपणाचे जे आरोप करण्यात आले आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत."

बीबीसी पॅनोरमा डॉक्युमेंटरीवर पक्षपातीपणाचे आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण संपादित करून बीबीसी पॅनोरमा माहितीपटाने प्रेक्षकांची दिशाभूल केल्याच्या वर्तमानपत्रातील वृत्तानंतर टिम डेव्ही आणि डेबोरा टर्नेस यांचे राजीनामे आले आहेत.
टर्नेस गेल्या तीन वर्षांपासून न्यूज आणि करंट अफेयर्सच्या सीईओ होत्या.
'द टेलिग्राफ'ने लीक झालेल्या एका बीबीसी मेमोच्या तपशीलांचा अहवाल दिला होता, ज्यामध्ये असं सूचित करण्यात आलं की, या कार्यक्रमात ट्रम्प यांच्या भाषणातील दोन भाग एकत्र संपादित करून असं दाखवले की त्यांनी जानेवारी 2021 मधील कॅपिटॉल हिल दंगलींना स्पष्टपणे प्रोत्साहन दिले.
हा लीक झालेला मेमो मायकेल प्रेस्कॉट यांचा होता, जे बीबीसीच्या संपादकीय मानक समितीचे माजी स्वतंत्र बाह्य सल्लागार होते. त्यांनी जून महिन्यात ते पद सोडलं होतं.

फोटो स्रोत, BBC/Jeff Overs
प्रेस्कॉट यांनी 'ट्रम्प: अ सेकंड चान्स?' या डॉक्युमेंटरीबद्दल चिंता व्यक्त केली होती. हा कार्यक्रम गेल्या वर्षी प्रसारित झाला होता आणि स्वतंत्र प्रॉडक्शन कंपनी ऑक्टोबर फिल्म्स लिमिटेडने बीबीसीसाठी तयार केला होता. त्या कंपनीकडूनही प्रतिक्रिया मागवण्यात आली होती.
बीबीसीचा अंतर्गत मेमो प्रकाशित झाल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. व्हाइट हाऊसनेही बीबीसीला '100 टक्के फेक न्यूज' असं म्हटलं होतं.
ट्रम्प यांनी काय म्हटलं?
डोनाल्ड ट्रम्प रविवारी (9 नोव्हेंबर) राजीनाम्याच्या या वृत्तावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "बीबीसीतले वरिष्ठ अधिकारी एकतर राजीनामा देत आहेत किंवा त्यांना काढून टाकलं जात आहेत. कारण माझं 6 जानेवारीचे भाषण एडिट करताना ते पकडले गेले.."
त्यांनी लिहिले, "हे लोक अप्रामाणिक आहेत. त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. हे लोकशाहीसाठी अत्यंत लाजिरवाणे आहे."

फोटो स्रोत, Reuters
सोमवारी (10 नोव्हेंबर) बीबीसीचे अध्यक्ष समीर शाह संसदीय समितीसमोर साक्ष देणार आहेत. त्याचवेळी हे राजीनामे समोर आले आहेत.
संसदीय समितीसमोर शाह ट्रम्प यांच्या भाषणाच्या एडिट केलेल्या आवृत्तीबद्दल माफी मागतील, अशी अपेक्षा केली जात होती.
'संपूर्ण बोर्डाला त्यांच्या निर्णयाचा आदर'
बीबीसीचे अध्यक्ष समीर शाह यांनी टिम डेव्ही आणि डेबोरा टर्नेस या दोघांनीही बीबीसीसाठी केलेल्या सेवेसाठी त्यांचे आभार मानले आहेत.
"बीबीसीसाठी हा एक दुःखद दिवस आहे," असे शाह म्हणाले.
ते पुढे म्हणाले की त्यांना "त्यांच्यावर वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सातत्याने आलेले जे दडपण होते, त्यामुळे त्यांना आज हा निर्णय घ्यावा लागला आहे. संपूर्ण बोर्ड त्यांच्या या निर्णयाचा आणि त्यामागील कारणांचा आदर करते."
बीबीसीवर टीका
लीक झालेला मेमो मायकेल प्रेस्कॉट यांनी लिहिला होता. ते बीबीसीच्या एडिटोरियल स्टँडर्ड्स कमिटीचे स्वतंत्र बाह्य सल्लागार होते आणि जूनमध्ये त्यांनी या पदावरून राजीनामा दिला होता.
मेमोमध्ये त्यांनी बीबीसीच्या ट्रान्सजेंडर मुद्द्यांच्या वार्तांकनाबद्दलही चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, बीबीसीच्या तज्ज्ञ एलजीबीटी रिपोर्टर्सनी 'प्रो ट्रान्स अजेंडा' वाढवण्यासाठी संबंधित बातम्या प्रभावीपणे 'सेन्सॉर' केल्या.
त्यांच्या लीक झालेल्या मेमोमध्ये त्यांनी लिहिले आहे की जेव्हा अशाप्रकरे चिंताजनक मुद्दे समोर येतात, तेव्हा बीबीसी व्यवस्थापनाची निष्क्रियता पाहून त्यांना 'निराशा' वाटते.
त्यानंतर, गुरुवारी बीबीसीने प्रेझेंटर मार्टिन क्रॉक्सॉलशी संबंधित 20 तक्रारी मान्य केल्या. आरोपानुसार, क्रॉक्सॉल यांनी यावर्षीच्या सुरुवातीला बीबीसी न्यूज चॅनेलवर लाइव्ह स्क्रिप्ट वाचताना त्यात बदल केले.

फोटो स्रोत, Jeff Overs / BBC
अलिकडच्या काही महिन्यांत, गाझावरील एका माहितीपटाच्या निवेदकाची ओळख उघड न केल्याबद्दलही बीबीसीलाही टीकेचा सामना करावा लागला. तो हमासच्या अधिकाऱ्याचा मुलगा होता.
'बीबीसीने प्रतिक्रिया देण्यात वेळ घेतला'
काही मीडिया विश्लेषकांनी देखील बीबीसीच्या या वादाला हाताळण्याच्या पद्धतीवर टीका केली.
बीबीसी टीव्ही न्यूजचे माजी प्रमुख रॉजर मोसे यांनी म्हटलं की, बीबीसीने अलीकडील आरोपांवर प्रतिक्रिया देण्यात बराच वेळ घेतला.
त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, यांचे भाषण ज्या पद्धतीने एडिट केले गेले ते कुठल्याही प्रकारे योग्य ठरवता येऊ शकत नाही.
मोसे यांनी हेही सांगितलं की, मेमोत उपस्थित केलेले इतर मुद्दे, जसे की ट्रान्सजेंडर विषयांसंबंधी भाषा, यावरुन बीबीसीला वेळोवेळी आपल्या संपादकीय धोरणात बदल करण्याची आणि पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे.

फोटो स्रोत, BBC/Patrick Olner
चॅनल 4च्या हेड ऑफ न्यूज डोरोथी बर्न यांनी बीबीसीवर टीका करत म्हटलं की, ट्रम्प यांचे भाषण संपादित करून त्यांनी 'एक मूलभूत चूक' केली असून, 'माफी मागण्यातही खूप वेळ घेतला.'
बीबीसीमध्ये 20 वर्षे काम केलेले टिम डेव्ही यांनी ठामपणे म्हटलं की, "आमची पत्रकारिता आणि आशयाची अजूनही गोल्ड स्टँडर्ड म्हणून प्रशंसा केली जाते."
ते म्हणाले, "पुढील काही महिन्यांत 'सुनियोजित बदल' करून नवीन डायरेक्टर जनरलची नियुक्ती केली जाईल. यामुळे पुढील रॉयल चार्टरमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक उत्तम संधी मिळेल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











