'मराठी का हर्फ भी नहीं जानता' म्हणणाऱ्या मोहम्मद रफींनी श्रीकांत ठाकरेंकडे एवढी मराठी गाणी कशी गायली?

मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे

फोटो स्रोत, Dilip Thakur

फोटो कॅप्शन, मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे
    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी

"मी दीड वर्षांचा असेन तेव्हाची गोष्ट. दादा सांगायचे. मला फिट्स यायच्या. एकदम केव्हाही. एकदा अशीच फिट आलेली असताना मी आईच्या मांडीवर डोळे मिटून पडलेलो. डॉक्टरांना बोलावलेलं. दादा येरझाऱ्या घालत होते. दादांची त्यावेळी नाटक कंपनी होती. खालून त्यांच्याच कंपनीतला एक व्हायोलिनवाला चालला होता. दादांनी त्याला वर बोलावलं.

तो आल्यावर दादा म्हणाले- साज लगाया है क्या? तो म्हणाला, जी हाँ.

दादांनी सांगितलं की, सिर्फ भैरवके आलाप छेडो. त्याने सुरूवात केली- साग मप गम रे सा- आणि मी उठून बसलो. डॉक्टरांनी विचारलं की, दादा हे काय आहे? दादा म्हणाले की, हा संगीतकार आहे. याला ते मिळत नव्हतं, त्यामुळे फिट यायची!

त्यानंतर दादा जेव्हा सतार वाजवायचे, कोणालातरी मला घेऊन बसवायचे. यानंतर फिट हा प्रकार माझ्या वाटेला कधीच गेला नाही..."

श्रीकांत ठाकरे यांनी आपल्या 'जसं घडलं तसं' या आत्मचरित्राच्या सुरूवातीलाच हा किस्सा सांगितला आहे.

वडील प्रबोधनकार ठाकरे आणि भाऊ बाळासाहेब ठाकरे...पण श्रीकांत ठाकरे हे या दोन्ही ओळखीच्या सावलीत वावरले नाहीत. शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना साथ दिली, पण स्वतःचीही वेगळी ओळख घडवत गेले.

आज श्रीकांत ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.

श्रीकांत ठाकरे

फोटो स्रोत, Dilip Thakur

प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून श्रीकांत यांना अनेक गुण मिळाले होते. भाऊ बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे तेही उत्तम व्यंगचित्रकार होते. शब्दांवर त्यांची पकड होती. उर्दू भाषा त्यांना अवगत होती. शिवसेनेच्या स्थापनेनंतर मार्मिक या साप्ताहिकाची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. फोटोग्राफीचा छंद होता. होमिओपथीचाही अभ्यास केला होता.

थोडक्यात, वडिलांनी सांगितल्याप्रमाणेच श्रीकांत ठाकरे यांनी 'हर हुन्नर' शिकून घेतला होता.

पण तरीही संगीताशी अगदी लहानपणापासून जुळलेलं त्यांचं नातं विशेष होतं...शोभा गुर्टू, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, हरीहरन सारख्या गायकांनी त्यांच्याकडे गाणी गायली. पण त्यांचे खास सूर जुळले होते मोहम्मद रफी यांच्यासोबत. रफी यांनी जी मराठी गाणी गायली, ती केवळ श्रीकांत ठाकरे यांच्याकडेच.

मोहम्मद रफी मराठीत गायला कसे तयार झाले, ही गाणी तयार कशी झाली, ठाकरे आणि रफी यांचे सूर जुळले कसे याबद्दलचे काही किस्से जाणून घेऊया. त्याचबरोबर वादक आणि संगीतकार म्हणूनही त्यांची जडणघडण समजून घेऊ.

बडे गुलाम अली खाँ यांच्याकडून कौतुक

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

श्रीकांत ठाकरे यांची वाद्यांशी ओळख अतिशय लहानपणीच झाली...म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासूनच.

साधारणपणे 1935 च्या दरम्यानची गोष्ट. प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी बुलबुलतरंग नावाचं वाद्य आणलं होतं. बाळासाहेब तेव्हा शाळेत जायचे, तर श्रीकांत ठाकरे अजून शाळेत जायला लागले नव्हते.

खूप प्रयत्न करूनही बाळासाहेबांचा बुलबुलतरंगवर काही हात बसत नव्हता. त्यामुळे तो खोक्यात घालून ठेवून दिला. एकदा ते शाळेत गेल्यावर श्रीकांत यांनी तो बुलबुलतरंग काढला आणि त्यावर 'जा के मथुरा के कान्हाने घागर फोडी' हे त्यावेळेचं लोकप्रिय गाणं वाजवायला सुरूवात केली. त्यांच्या आईने ते ऐकलं आणि प्रबोधनकारांना सांगितलं.

प्रबोधनकारांनी म्हटलं की, बिलांडी (ते श्रीकांत यांना प्रेमाने या नावाने हाक मारायचे.) वाजवून दाखव.

श्रीकांत यांनी वाजवून दाखवल्यावर प्रबोधनकारांनी विचार केला की, कोणी न शिकवताही याचं स्वरज्ञान चांगलं आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून प्रबोधनकारांनी त्यांना स्वतःच सतार शिकवायला सुरूवात केली.

त्यानंतर श्रीकांत ठाकरे यांनी काही काळ त्यांच्याच शाळेतले संगीत शिक्षक सी. व्ही. पंतवैद्य यांच्याकडे व्हायोलिनचे धडे गिरवायला सुरूवात केली.

मात्र काही वर्षांनीच ते मुंबई सोडून इंदोरला गेले आणि त्यानंतर श्रीकांत यांनी स्वतःच वेगवेगळी वाद्य शिकून घ्यायला सुरूवात केली. मात्र, गुरू म्हणून त्यांचंच नाव लावलं.

बाळासाहेब ठाकरे-श्रीकांत ठाकरे

फोटो स्रोत, Dilip Thakur

फोटो कॅप्शन, बाळासाहेब ठाकरे-श्रीकांत ठाकरे

प्रबोधनकारांनी श्रीकांत ठाकरे यांना एकच मंत्र दिला होता- 'जा, अनुभव घे.' त्यामुळे श्रीकांत ठाकरे नाटक, गायन-वादनाच्या कार्यक्रमांना नियमितपणे जायचे.

एकदा ते असेच एका कार्यक्रमाला गेले होते....बडे गुलाम अली खाँ यांच्या गायनाचा. कार्यक्रमासाठी गर्दी जमत होती. खाँ साहेबांना यायला उशीर होत होता. त्यांच्या कार्यक्रमाआधी कोणाचा तरी कार्यक्रम ठेवायचं ठरलं. बाबूराव मोहिले (संगीतकार अनिल मोहिलेंचे वडील) यांनी श्रीकांत ठाकरे यांना व्हायोलिन वाजवायला सांगितलं.

"मी एक राग सुरू केला असतानाच खाँसाहेबांचं आगमन झालं. ते हळूहळू येत पुढच्याच ठिकाणी बसले. 15-20 मिनिटं वाजवल्यानंतर मी तीन-चार आवर्तनं घेऊन थांबवलं. त्याबरोबर खाँसाहेब जोरात म्हणाले- अरे बच्चे, बहुत सुरेले बजाते हो, और सुनाव! मी दुसरा राग सुरू केला. तो थांबल्यावर खाँसाहेब स्टेजवर आले आणि मला व्हायोलिनसकट उचलून म्हणाले- मेरे साथ बजाओ."

अशारीतीने अगदी लहान वयातच श्रीकांत ठाकरे यांनी थेट बडे गुलाम अली खाँ यांना साथसोबत केली होती.

रेडिओवरचे दिवस

बाबूराव मोहिले यांनीच श्रीकांत ठाकरे यांना रेडिओवर परीक्षा द्यायला लावली. श्रीकांत ठाकरे ती परीक्षा पासही झाले.

त्यानंतर 10 मार्च 1944 ला रेडिओवर श्रीकांत ठाकरे यांचा रेडिओवर प्रोग्राम झाला. पण हा प्रोग्राम ऐकायला आपली आई नव्हती याची खंत त्यांना लागून राहिली. 27 फेब्रुवारी 1944 लाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.

मॅट्रिक पूर्ण होण्याच्या आधीच श्रीकांत ठाकरेंनी शाळा सोडली. त्यानंतर ते चित्रपटसृष्टीत रेकॉर्डिंगच्या कामांना जाऊ लागले. नंतर ऑल इंडिया रेडिओवर त्यांनी नोकरी सुरू केली...महिना 120 रुपये पगारावर.

अगदी मोठ्या गायकांपासून ते नवख्या कलाकारांपर्यंत त्यांनी अनेकांसोबत वादन केलं. जीएम दुर्रानी, मदन मोहन, भीमसेन जोशी, उस्ताद फैयाज खान अशा अनेकांसोबत त्यांनी वादनकार म्हणून काम केलं.

श्रीकांत ठाकरे रेकॉर्डिंगच्या वेळी

फोटो स्रोत, Dilip Thakur

चार वर्षं ऑल इंडिया रेडिओला काम केल्यानंतर श्रीकांत ठाकरे रेडिओच्या नोकरीतून बाहेर पडले.

या सगळ्यामध्येच श्रीकांत ठाकरे यांची संगीतकार म्हणून स्वतःला घडवण्याची धडपड, शिकणंही सुरू होतं. अगदी हिंदी सिनेमाच्या गाण्यांची पुस्तकं घेऊन चाल लावायचे आणि पडद्यावरचं गाणं ऐकून आपल्या आणि त्या गाण्यातलं डाव-उजवं याची तुलना करायचे.

काही शायर शोधून त्यांच्याकडून लिहून घ्यायचे आणि चाली लावायचे.

गजलांसाठी ते स्वतः उर्दू भाषा शिकले... केवळ बोलायला नाही, तर अगदी लिहायला, वाचायलाही. त्यानंतर स्वतःही गजलही लिहायला लागले.

या सगळ्या दरम्यान श्रीकांत ठाकरे यांचा चित्रपट निर्मिती-लेखनाचा प्रयत्न करून झाला. चित्रपट गीतांनाही संगीत दिले. त्याचवेळी त्यांची आणि मोहम्मद रफी यांचे सूर जुळले.

मराठी न येणाऱ्या रफींनी कशी गायली गाणी?

श्रीकांत ठाकरे आणि त्यांचे मित्र प्रभाकर निकळंकर यांनी एका सिनेमाची निर्मिती केली- शूरा मी वंदिले. या चित्रपटात एक गजल असावी अशी श्रीकांत ठाकरेंची इच्छा होती.

सिनेमातल्या एका सिच्युएशनसाठी गजल लिहिली. पण गाणार कोण? या प्रश्नाचं उत्तर म्हणून एकच नाव त्यांच्या मनात आलं- मोहम्मद रफी.

रेडिओवरील कार्यक्रमांमुळे त्यांची रफींसोबत ओळख होती. ते त्यांच्याकडे गेले आणि गजल गाण्याबद्दल सांगितलं.

"रफीसाहेब म्हणाले की, मैं मराठीका एक हर्फ भी नहीं जानता, मैं कैसे गाऊं? त्यांचं वाक्य संपतं न संपते तोच उर्दूमध्ये मी लिहिलेला कागद त्यांना दाखवला. त्याबरोबर ते नोकराला म्हणाले की, अरे जाओ, बाजा लेकर आओ. लगेच हार्मोनियम आणली आणि माझ्या पुढ्यात ठेवली. मी गजल गाऊन दाखवली. त्याबरोबर ते म्हणाले- मराठी में इतनी अच्छी गजल होती है? त्यावर श्रीकांत ठाकरेंनी म्हटलं की, जी हाँ, आपके जैसे गानेवाले होते है, वैसे हमारे जैसे तर्ज बनानेवाले भी होते है."

रफी साहेबांनी ही गजल गायली- बेकरार जीवा दुःखी होऊ नको.

मराठीतलं आपलं हे गाणं यशस्वीरीत्या गायल्यानंतर रफी श्रीकांत ठाकरेंना म्हणाले की, दादा क्यों नही हम प्रायव्हेट गाने करेंगे.

श्रीकांत ठाकरेंनी एचएमव्ही कंपनीचे रेकॉर्डिंग ऑफिसर श्रीनिवास खळेंना विचारलं. ते 'हो' म्हणाले आणि एकापाठोपाठ एक सुरेल गीतांचा सिलसिला सुरू झाला.

'च' अक्षर नसलेलं गाणं

एचएमव्ही साठीच्या गाण्यांची सुरुवात एक भजन आणि एका गजलने झाली. पण ही गजल जरा उडत्या चालीची होती- तुझे रुप सखे गुलजार असे, हा छंद जीवाला लावी पिसे.

भजन होतं- खेळ तुझा न्यारा.

सात-आठ दिवसांची तालीम झाल्यावर रेकॉर्डिंग झालं. खरंतर चार गाण्यांची रेकॉर्ड काढली जायची. पण काही कारणाने या दोनच गाण्यांची रेकॉर्ड काढली गेली. पण ती लोकप्रिय झाली आणि पुढच्या गाण्यांना ग्रीन सिग्नल मिळाला.

पुढची गाणी होती- शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, हा रुसवा सोड सखे, हे मना आज कोणी बघ तुला साद घाली.

या गाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कुठेही 'च' अक्षर असलेला शब्द वापरला नव्हता. कारण उर्दूत तो नाहीये, म्हणजे चहामधला 'च' आहे, पण चमच्यामधला 'च' नाही.

'विरले गीत कसे झाली मनाची शकले' या गाण्यात एका अंतऱ्यात मीच मला असे शब्द होते. तो 'च' उच्चारताना नेमकं काय करायचं हे त्यांनी रफींना शिकवलं.

मोहम्मद रफीही गाण्यांच्या न थकता तालमी करायचे, हे श्रीकांत ठाकरेंनी आवर्जून नमूद केलं.

 श्रीकांत ठाकरे- हार्मोनियम वाजवताना

फोटो स्रोत, Dilip Thakur

फोटो कॅप्शन, श्रीकांत ठाकरे- हार्मोनियम वाजवताना

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात श्रीकांत ठाकरेंचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रफींसोबतच्या तालमींच्या आठवणी सांगितल्या होत्या.

"रफी साहेब मुळात उत्तरेतले. तिथल्या भाषा या संस्कृत प्रचुर नाहीत. त्यामुळे मराठीतली जी काही अक्षरं आहेत-ळ, ज्ञ, ज, च ही त्यांच्याकडून काढून घेणं कसब होतं. माझ्या बाबांना उर्दू उत्तम बोलता, वाचता आणि लिहिता यायचं. मला आठवतंय, मी शाळेत होतो. रफी साहेब आमच्या घरी यायचे. लुंगी-कुर्ता. आले की आईला विचारायचे जेवायला काय आहे. कारण त्यांना चमचमीत जेवायला आवडायचं.

"महिना-महिना गाण्याची तयारी चालायची. कारण आधी उच्चारांची तयारी. मला विशेष वाटतं की, एखादा माणूस एखाद्या भाषेसाठी एवढा वेळ द्यायचं हे विशेष. माझ्या वडिलांची तयारी, समजून सांगणं त्यांना विशेष वाटलं म्हणूनही त्यांनी तेवढा वेळ दिला."

श्रीकांत ठाकरे यांच्या या गाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे वेगळ्या वाद्यांचा वापर. 'हा छंद जिवाला लावी पिसे'मध्ये त्यांनी मँडोलीन वापरलं आहे. 'शोधिसी मानवा'सारख्या भक्तीगीतात त्यांनी चक्क सॅक्सफोनचा वापर केलाय.

आपल्या या प्रयोगाबद्दल त्यांनी लिहिलंय- "या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी मी अनिल मोहिलेला सांगितलं की, मला एक चांगला सॅक्सफोनवाला आणून दे. तो म्हणाला- अहो, हे तर भजन आहे. यात सॅक्स कसा चालेल?

'तू आण रे मग बघू!'

त्याला हवा होता तो नाही मिळाला. त्याने दुसरा आणला. त्याला प्रथम तोंडमंत्र दिला की, फूक तुटता काम नये आणि या सॅक्सची खासियत अजिबात वाजवू नकोस, सरळ साधं वाजव. एवढं त्याला सांगितलं, त्याच्याकडून वाजवून घेतलं आणि मला हवा तसा त्याने तो वाजवला. अजूनपर्यंत ते गाणं वाजवलं जातं, तेव्हा ऐकणारे ते फ्लूट आहे, असंच समजतात. कारण हा नवीन प्रयोग होता."

शोभा गुर्टूंच्या एका गाण्यात तर त्यांनी 'कानून' या एका हाताने वाजवायच्या पर्शियन वाद्याचाही वापर केला आहे.

श्रीकांत ठाकरे यांना स्वतःलाही वेगवेगळी वाद्यं वाजवता यायची.

राज ठाकरेंनी म्हटलं होतं, की "त्यांना स्वतःला अनेक वाद्यं वाजवता यायची. मला एखादं वाद्य वाजवता यावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण ते काही जमलं नाही.

ते वेगळ्या प्रकारचे शिक्षक होते. ते आम्हालाही एखादं गाणं समजून सांगायचे. गाणं लागलं की, याचा संगीतकार कोण आहे, त्याची स्टाईल कशी आहे, त्याचं गाणं कसं ओळखायचं हे समजावून सांगायचे."

'दादा, एक कोली गीत बनाइये!'

मोहम्मद रफी आणि एचएमव्हीसोबत श्रीकांत ठाकरेंनी 'हसा मुलांनो हसा, प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, नको आरती की नको पुष्पमाला' अशी एकापेक्षा एक गाजलेली गाणी केली.

त्यानंतर एकदा एका गाण्यासाठी ते रफींकडे गेले होते, तेव्हा ते गाणं फारसं जमत नव्हतं. त्यावेळी रफी म्हणाले की, 'दादा छोड दिजिए इसको, एक कोली गीत बनाइये!'

"मी 'हो' म्हणालो आणि तिथून सटकलोच. ते म्हणाले होते की, किसी भी लडकी के साथ गाऊंगा हे मात्र लक्षात ठेवलं. वंदना विटणकरांना सांगितलं लिहायला. त्यांनी कोळी समाजतलीच गायिका पुष्पा पागधरे हिचं नाव सुचवलं. तिची रिहर्सल करून रफीसाहेबांकडे घेऊन गेलो. तिथे आणखी एक रिहर्सल केली. रफी साहेबांनीही समाधान व्यक्त केलं."

हे गाणं म्हणजे- 'अग पोरी, संबाल दर्याला तुफान आयलंय भारी'

श्रीकांत ठाकरे

फोटो स्रोत, Dilip Thakur

फोटो कॅप्शन, श्रीकांत ठाकरे

या गाण्याच्या रेकॉर्डची प्रचंड विक्री झाली.

पण नंतर मोहम्मद रफी आणि एचएमव्हीचे वाद झाले. ते पॉलिडॉर या रेकॉर्डिंग कंपनीसोबत गेले. ही कंपनी मराठी गाणी करत नव्हती. शिवाय दूरदर्शनवरही त्यांचे हिंदी-मराठी कार्यक्रम सुरू होते. त्यामुळे रफींसोबतचं त्यांचं काम थांबलं.

शोभा गुर्टू, निर्मलादेवींनीही गायलेली गाणी

शोभा गुर्टू यांनीही श्रीकांत ठाकरेंकडे काही प्रसिद्ध गजल गायल्या. उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या या, माझिया प्रियाला प्रीत कळेना...या त्यांपैकीच काही.

प्रसिद्ध गायिका निर्मलादेवी यांच्याकडूनही श्रीकांत ठाकरे यांनी मराठीतून गाणी गाऊन घेतली. निर्मला देवी म्हणजे अभिनेता गोविंदा याच्या आई. त्यांचा पत्ता शोधत ते विरारला गेले होते.

ताप भरलेला असतानाही त्या तालमीला आल्या होत्या. सुरेश भटांची गजल होती- मी एकटीच माझी असते कधी कधी.

दुःख हे साधू किती आणि बोल कशी रे तुझी रीत या दोन गजलही निर्मलादेवींनी श्रीकांत ठाकरेंकडे गायल्या.

भूपेंद्र, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, उत्तरा केळकर, हरीहरन, सुरेश वाडकर यांनीही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी श्रीकांत ठाकरेंकडे गाणी गायली.

राज ठाकरेंनी म्हटलं होतं की, "शिवसेना निर्माण झाली नसती तर माझ्या वडिलांनी संगीत क्षेत्रात खूप जास्त काम केलं असतं. कारण शिवसेना स्थापन झाली, त्यांच्यावर मग मार्मिकची जबाबदारी आली. ती वाढत गेली. त्यातूनही त्यांनी बरीच गाणी केली."

संगीत हा श्रीकांत ठाकरेंच्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग होता की, लग्नानंतर त्यांनी आपल्या पत्नीचं नाव बदलून मधुवंती ठेवलं. मुलीचं नाव जयवंती, तर मुलाचं स्वरराज (राज यांचं नाव स्वरराज ठेवण्यात आलं होतं.)

ते 'मार्मिक'मध्ये सिनेमा परीक्षणाचा कॉलम लिहायचे. त्याच्यासाठी नाव होतं- शुद्ध निषाद

'अष्टपैलू' श्रीकांत ठाकरे

श्रीकांत ठाकरेंचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्व मोठं होतंच...पण त्यांनी इतरही अनेक क्षेत्रात कामगिरी केली.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर हे श्रीकांत ठाकरेंना 'पप्पा' म्हणायचे. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा एक लेख त्यांनी बीबीसी मराठीवर लिहिला होता.

त्यांनी म्हटलं होतं की, एकाच वेळेस वादक, संगीतकार, चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार, चित्रपट समीक्षक, मार्मिकचे कार्यकारी संपादक, उर्दूचे अभ्यासक, होमिओपॅथिकचे जाणकार, इतकेच नव्हे तर त्यांनी बराच काळ फोटोग्राफीचीही हौस मौज केली अशा अनेक गोष्टींतून त्यांची चौफेर वाटचाल झाली.

'बन्या बापू' या नावाने त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये पॉकेट कार्टून काढली. मार्मिकमध्ये 'शुद्धनिषाद' नावाने ते 'सिने प्रिक्शान' लिहायचे.

श्रीकांत ठाकरे यांच्या अखेरच्या दिवसांबद्दल दिलीप ठाकूर सांगतात- "अखेरच्या आजारपणाच्या काळात 'कृष्णकुंज'वर मी त्यांना भेटायला जायचो, तेव्हा अशाच काही गोष्टींची आठवण मी त्यांना करुन देत गप्पांत रमवायचा प्रयत्न करायचो. अगदी त्यांच्या निधनाच्या चारच दिवस अगोदर मी नेहमीप्रमाणेच त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते काहीसे थकलेले वाटले."

"अखेर 10 डिसेंबर 2003 रोजी दुपारी दुर्दैवी बातमी आलीच."

श्रीकांत ठाकरे

फोटो स्रोत, Dilip Thakur

दिलीप ठाकूर पुढे सांगतात, "आजही मी जेव्हा पप्पांचा विचार करतो, तेव्हा त्यांच्या अफाट अष्टपैलुत्व, प्रतिभा यांची खरंच म्हणावी तशी कदर आणि कौतुक झाले का असा प्रश्न पडतो. पण आता उत्तर मिळणार नाही.

"शिवसेनाप्रमुखांचा भाऊ असल्याचा त्यांनी कोणताही फायदा अथवा आधार घेण्याचीही आवश्यकता नव्हती, तेवढे ते समर्थ होते. आणि तसे काही करणे त्यांचा स्वभाव नव्हताच. ते खूप डिफिकल्ट होते असे म्हटले जाई, पण कामचुकारपणा, बेशिस्त, आगाऊपणा या गोष्टी सहन न होताच ते फटकळपणे पटकन बोलत हे त्या पिढीतील अनेकांत दिसे.

"गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी एकही वादक चुकलेला त्यांना चालत नसे. याचा अर्थ त्याचे कामात लक्ष नाही असे ते मानत.

"मार्मिकमध्ये शुद्धलेखनाची एकही चूक त्यांना मान्य नसे. 'सामना'तील आपल्या लेखनातील काना-मात्रा अगदी बरोबर आहेत हे ते अगोदरच सांगत. त्यामुळे कंपोझरपासून प्रूफ रिडरपर्यंत सगळेच सावध असत.

".... आणखीन बरेच काही सांगता येईल आणि तरीही तो जणू ट्रेलर ठरावा इतके आणि असे श्रीकांतजी ठाकरे चतुरस्र, सखोल, मनस्वी आणि कुटुंबवत्सल होते."

संदर्भ- जसं घडलं तसं, श्रीकांत ठाकरे यांचं आत्मचरित्र

फोटो- ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांच्या संग्रहातून

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)