पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेला मेकॉले कोण होता? तो सध्या चर्चेत का आला आहे?

पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, "मेकॉलेने भारतीयांची मने ब्रिटिश केली. त्याने प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था पूर्णपणे नष्ट केली."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, "मेकॉलेने भारतीयांची मने ब्रिटिश केली. त्याने प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था पूर्णपणे नष्ट केली."

'मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने भारतीयांमध्ये ब्रिटिश वसाहतवादी गुलामीची मानसिकता खोलवर रुजवली असून ही गुलामगिरीची मानसिकता पुढील दहा वर्षांत समूळ नष्ट करा,' असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

त्यानंतर आता मेकॉले हा कधी काळचा ब्रिटीश अधिकारी सध्या चर्चेत आला आहे.

नक्की मेकॉले कोण होता? त्याने भारतीय शिक्षण पद्धतीत कोणते बदल केले होते? पंतप्रधान मोदींनी असं विधान का केलं?

पंतप्रधान मोदींच्या विधानाला काही जण दुजोरा तर काही जण विरोध का करत आहेत? याचा घेतलेला हा धांडोळा...

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

'एक्स्प्रेस' समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या स्मृती व्याखानाच्या सहाव्या पर्वात पंतप्रधान मोदींनी हे विधान केलंय.

या व्याख्यानात भारतीय शिक्षणव्यवस्थेत रुजलेल्या आणि पुढे समाजाच्या मानसिकतेचा भाग बनलेल्या ब्रिटिश विचारप्रणालीवर पंतप्रधान मोदींनी भाष्य केलंय.

ते म्हणाले की, "मेकॉलेने भारतीयांची मने ब्रिटिश केली. त्याने प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था पूर्णपणे नष्ट केली. ब्रिटिश भाषा आणि विचार भारतात रूढ केले. त्याचा परिणाम असा झाला की हजारो वर्षांचे भारतीय ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, परंपरा, जीवनशैलीही नष्ट होत गेली."

'एक्स्प्रेस' समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या स्मृती व्याखानाच्या सहाव्या पर्वात पंतप्रधान मोदींनी हे विधान केलंय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'एक्स्प्रेस' समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या स्मृती व्याखानाच्या सहाव्या पर्वात पंतप्रधान मोदींनी हे विधान केलंय.

"भारतीय लोक ब्रिटिश सांगतील तसे जगायला लागले. त्यामुळे आपले काय याचाच आपल्याला विसर पडला. आपल्या संस्कृती, परंपरा, शिक्षण यांचा गौरव करण्याचे सोडून आपण त्याकडे तुच्छतेने पाहू लागलो. आयात विचार, आयात वस्तू, आयात सुविधा आणि आयात प्रारूपांवर जगू लागलो. दुसऱ्याच्या संकल्पना आपल्याला श्रेष्ठ वाटू लागल्या."

"स्वदेशीला नाकारण्याची ही वृत्ती स्वातंत्र्यानंतरही कायम राहिली. ही गुलामगिरीची प्रक्रिया मेकॉलेने 1835 मध्ये सुरू केली होती. त्याला 2035 मध्ये 200 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पुढील दहा वर्षांत आपल्याला या मानसिकतेपासून मुक्ती मिळवायची आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

मेकॉले कोण होता?

मराठी विश्वकोशामध्ये दिलेल्या माहितीनुसार, टॉमस बॅबिंग्टन मेकॉले या ब्रिटीश अधिकाऱ्याची 1832 मध्ये 'सेक्रेटरी ऑफ द बोर्ड ऑफ कंट्रोल (ऑफ इंडिया)' या पदावर नेमणूक झाली होती.

भारताबद्दलच्या विविध बाबींचा त्याने चांगला अभ्यास केला होता.

पुढे भारताच्या 'सुप्रिम काउन्सिल' चा सदस्य म्हणून 1834 ते 1838 पर्यंत त्याचे भारतातच वास्तव्य होतं. भारतात असताना, त्याने भारतीयांच्या शिक्षणासाठी एक शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणं आणि भारतासाठी फौजदारी कायद्याची एक संहिता तयार करणं अशा दोन मुख्य जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.

'भारतीय दंडसंहिते'च्या निर्मितीचं काम प्रामुख्याने मेकॉलेनेच पार पाडलेलं होतं.

मराठी विश्वकोषामध्ये दिलेल्या माहितीनुसार, टॉमस बॅबिंग्टन मेकॉले या ब्रिटीश अधिकाऱ्याची 1832 मध्ये 'सेक्रेटरी ऑफ द बोर्ड ऑफ कंट्रोल (ऑफ इंडिया)' या पदावर नेमणूक झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मराठी विश्वकोषामध्ये दिलेल्या माहितीनुसार, टॉमस बॅबिंग्टन मेकॉले या ब्रिटीश अधिकाऱ्याची 1832 मध्ये 'सेक्रेटरी ऑफ द बोर्ड ऑफ कंट्रोल (ऑफ इंडिया)' या पदावर नेमणूक झाली होती.

भारतातील शिक्षण कशा प्रकारचं असावं, याबद्दल ब्रिटिश संसदेने 1813 मध्ये एक कायदा केला होता.

त्या कायद्याप्रमाणे मिशनऱ्यांना भारतात स्थायिक होऊन तेथील रहिवाशांना धार्मिक शिक्षणासह पाश्चात्य शिक्षण देण्याची परवानगी दिली होती.

मात्र, या तरतुदीबाबत काही मतभेद झाले आणि त्यानंतर गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचा एक सदस्य असलेल्या लॉर्ड मेकॉलेने 2 फेब्रुवारी 1835 रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यांस एक अहवाल सादर केला.

त्याला 'मेकॉलेचा खलिता' अथवा 'मिनट ऑन एज्यूकेशन' असं म्हणतात.

आपलं भारतातील काम पूर्ण केल्यानंतर मेकॉले 1838 मध्ये इंग्लंडला परतला. तिथे गेल्यानंतर त्याने इंग्लंडचा इतिहास लिहिण्याचं काम हाती घेतलं.

त्यानं 1848 ते 1855 या काळात चार खंडात इंग्लंडचा इतिहास लिहिला.

'मेकॉलेचा खलिता' आणि आज दोनशे वर्षांनंतर सुरू झालेला वाद

या खलित्यामध्ये मेकॉलेने भारतीयांच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार केला होता.

त्यामध्ये त्याने भारतीयांना पाश्चात्त्य वाङ्‌मय आणि शास्त्रीय ज्ञान शिकवावे, शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे, तसेच संस्कृत आणि अरबी या भाषा शिकविणाऱ्या संस्था हळूहळू बंद कराव्यात असं सुचवलं होतं, असं सांगितलं जातं.

मात्र, इथेच वादाची बीजं आहेत.

या खलित्यामध्ये मेकॉलेने भारतीयांच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या खलित्यामध्ये मेकॉलेने भारतीयांच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार केला होता.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मराठी विश्वकोशामध्ये म्हटलंय की, "मेकॉले यांच्या खलित्याबद्दल अभ्यासकांनी उलटसुलट मतं मांडली आहेत. काहींना तो भारतातील 'नव्या मनूचा प्रणेता' वाटतो, तर काहींना सध्याच्या राजकीय असंतोषाचं कारण त्यांच्या सूचनांमध्ये सापडतं. भारतीय भाषा, धर्म आणि संस्कृती यांना तुच्छ लेखल्याबद्दल काहींना त्यांचा संताप येतो, तर भारतीय भाषांऐवजी इंग्रजी भाषेचा माध्यम म्हणून त्यांनी पुरस्कार केल्यामुळे अनेकजण त्यांना दूषण देतात."

'मेकॉले, काल आणि आज' या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत माजी गृहराज्यमंत्री दिवंगत भाई वैद्य महणतात की, "शैक्षणिक क्षेत्रातही त्याने ऐतिहासिक कामगिरी बजावली. त्याबाबत परस्परविरोधी मते आहेत, हे लक्षात घेता दोन्ही बाजू त्याच्यामुळे भारतातील शैक्षणिक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल झाला, असे मानतात हे उघडच आहे."

मात्र, आता त्याने मांडलेल्या खलित्याला 2035 रोजी दोनशे वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत पुढील दहा वर्षांत आपल्याला या मानसिकतेपासून मुक्ती मिळवायची आहे, असं विधान पंतप्रधान मोदींनी केल्यामुळे मेकॉले पुन्हा चर्चेत आला आहे.

त्याच्याबद्दलचे नेमके वाद काय आहेत, ते समजून घेऊयात.

मेकॉलेने शिक्षणपद्धतीत नक्की काय बदल केले होते?

मराठी विश्वकोषानुसार, मेकॉलेनं भारतीयांना पाश्चात्त्य वाङ्‌मय आणि शास्त्रीय ज्ञान शिकवावं, असा महत्त्वाचा सल्ला दिला होता.

त्याबरोबरच, या शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असावं, तसेच संस्कृत आणि अरबी या भाषा शिकविणाऱ्या संस्था हळूहळू बंद कराव्यात असंही त्यानं सुचवलेलं होतं.

7 मार्च 1835 रोजी याबाबत सरकारचा जो ठराव प्रसिद्ध झाला, त्यामध्ये

1. भारतीयांना पाश्चात्त्य वाङ्‌मय आणि शास्त्र हे विषय इंग्रजी माध्यामातून शिकवावेत.

2. संस्कृत आणि अरबी शिकवणारी विद्यालयं बंद करू नयेत; मात्र, या विद्यालयांना नवे अनुदान आणि तेथील अभ्यासकांना नव्या शिष्यवृत्त्या देऊ नयेत.

3. पारंपरिक ग्रंथछपाईसाठी अधिक पैसे खर्च करू नयेत.

4. यापुढे उपलब्ध असलेला निधी पाश्चात्त्य वाङ्‌मय आणि शास्त्रे शिकविण्यासाठी खर्च करावा.

डॉ. जनार्दन वाटवे आणि डॉ. विजय आजगावकर लिखित 'मेकॉले काल आणि आज'

फोटो स्रोत, Shri Sarvottam

फोटो कॅप्शन, डॉ. जनार्दन वाटवे आणि डॉ. विजय आजगावकर लिखित 'मेकॉले काल आणि आज'

यासंदर्भात आम्ही पत्रकार आणि लेखक रवि आमले यांच्याशी चर्चा केली.

ते सांगतात की, "मोदींनी केलेल्या विधानांचा अर्थ असा होतो, की ब्रिटिश शिक्षणपद्धत येण्यापूर्वी येथील शिक्षणव्यवस्था उत्तम होती. इतिहास मात्र याचे पूर्णतः समर्थन करीत नाही. इंग्रज येण्यापूर्वी आपल्या शिक्षणव्यवस्थेचं काय झालं? आणि कोणामुळं झालं? आपल्याकडे पेशवाई होती त्या काळात, येथील शिक्षणाची अवस्था काय होती?"

पुढे ते सांगतात की, "मेकॉलेनं जी शिक्षणपद्धती आणली त्यामुळे इथे आंग्लविद्याविभूषित लोकांचा मोठा गट निर्माण झाला हे खरं. पण त्याचा परिणाम काय झाला? निःसत्व, गुलामगिरीची मानसिकता असणारे काळे इंग्रज तयार झाले? विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या शब्दांत इंग्रजी म्हणजे वाघिणीचे दूध. दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, फिरोजशाह मेहता अशा अनेकांनी त्याचे प्राशन केले. पण त्यातून ते इंग्रज नाही झाले. उलट तेच इंग्रजी सत्तेच्या विरोधात उभे ठाकले. पुढे महात्मा गांधी असोत की सरदार भगतसिंह, नेहरू, पटेल असोत की नेताजी सुभाषचंद्र. सारेच इंग्रजी शिक्षणपद्धतीतून घडले होते."

मेकॉलेचं भारताला गुलाम बनवण्याचं स्वप्न होतं का?

पंतप्रधान मोदींनी अलीकडे जे विधान केलंय, त्यातून हेच प्रतीत होतं की, मेकॉलेचं भारताला गुलाम बनवण्याचं स्वप्न होतं.

मेकॉलेवर हा आरोप फार आधीपासूनच होताना दिसतो. पंतप्रधान मोदींनी हे विधान केल्यामुळे आता हा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मेकॉलेवर हा आरोप करण्यासाठी त्याची दोन विधानं उद्धृत केली जातात.

ती पुढीलप्रमाणे -

1. ''मी भारतात खूप फिरलो. उभा-आडवा भारत पालथा घातला. मला तिथे एकही भिकारी, एकही चोर पाहायला मिळाला नाही. हा देश इतका समृद्ध आहे आणि लोक इतके सक्षम योग्यतेचे आहेत की आपण हा देश कधी जिंकू शकू असे मला वाटत नाही. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल तर तोच मोडायला हवा. त्यासाठी त्यांची प्राचीन शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल. भारतीय लोक जर असे मानू लागले की परदेशी आणि विशेषत: इंग्रजी ते सारे चांगले, त्यांच्या संस्कृतीपेक्षा उच्च, थोर आहे, तरच ते त्यांचा आत्मसन्मान गमावून बसतील आणि मग ते आपल्याला हवे आहेत तसे बनतील- एक गुलाम राष्ट्र.''

- लॉर्ड मेकॉलेने 2 फेब्रुवारी 1835 रोजी ब्रिटिश पार्लमेन्टमध्ये केलेल्या भाषणातील कथित अंश

2. ''मी आहे त्या दयाघन येशूचा परमभक्त. त्या ईशपुत्राचा दिव्य संदेश या अडाणी देशाच्या गळी उतरवण्यासाठी मी फार वेगळा उपाय योजला आहे. मी भारतीय लोकांच्या हाती गॉस्पेलच्या प्रती कोंबण्याची मुळीच घाई करणार नाही. त्यांनी प्राणपणे जपलेल्या श्रद्धांच्या मुळाशी मी अशी काही विखारी वाळवी पेरणार आहे, की अल्पावधीत ती त्यांच्या स्वाभिमानाचा वृक्ष पोखरून टाकील. एकदा ते खोड तसे पोखरले गेले की त्या क्षुद्र श्रद्धा कोलमडून पडायला कितीसा वेळ लागणार? मग आपले मूíतभंजक तत्त्वज्ञान रुजायला कितीसा विलंब लागणार? आपण देऊ केलेल्या शिक्षणामुळे नि:सत्त्व बनलेल्या भारतीयांना येत्या तीस वर्षांतच गॉस्पेलची सावली हवीहवीशी वाटू लागेल आणि तेच त्यासाठी आपली मिनतवारी करू लागतील याबद्दल मी अगदी नि:शंक आहे.''

- मेकॉलेने 1836 मध्ये आपल्या वडिलांना पाठवलेल्या कथित पत्रातील अंश

मेकॉलेवर हा आरोप फार आधीपासूनच होताना दिसतो. पंतप्रधान मोदींनी हे विधान केल्यामुळे आता हा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेकॉलेवर हा आरोप फार आधीपासूनच होताना दिसतो. पंतप्रधान मोदींनी हे विधान केल्यामुळे आता हा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मात्र, मेकॉले यांच्या नावावर खपवली जाणारी ही दोन्ही विधानं निराधार आणि असत्य असल्याचा दावा 'मेकॉले काल आणि आज' या पुस्तकात डॉ. जनार्दन वाटवे आणि डॉ. विजय आजगावकर यांनी केला आहे.

आपल्या पुस्तकात ते दावा करतात की, लॉर्ड मेकॉलेने 2 फेब्रुवारी 1835 रोजी ब्रिटिश पार्लमेन्टमध्ये केलेल्या भाषणातील अशं हा त्याच्या मूळ भाषणातील नाही.

यासंदर्भात पत्रकार आणि लेखक रवि आमले सांगतात की, "मेकॉलेच्या खलित्यामागे कुटील हेतू होते. त्याला इथे गुलाम मानसिकतेची कारकुनांची फौज तयार करायची होती. काळे इंग्रज निर्माण करायचे होते. आत्मसन्मान गमावलेले गुलाम राष्ट्र उभारायचे होते, असा आरोप अनेक वर्षांपासून केला जात आहे. त्याला पुरावा म्हणून ही वरील विधानं दिली जातात."

पुढे ते सांगतात की, "कोईनराड एल्स्ट् हे बेल्जिअन संशोधक-लेखक सांगतात, 1835 ला मेकॉले इंग्लंडमध्ये नव्हतेच. ते भारतात होते. शिवाय या मूळ इंग्रजी उताऱ्यातील विचार तर सोडाच, भाषाही त्यांची व तेव्हाची नाही. ती फारच अलीकडची आहे. मग ही फेकूगिरी केली कोणी? एल्स्ट यांच्या म्हणण्यानुसार हा उतारा पहिल्यांदा अमेरिकेतील ग्नॉस्टिक सेंटर या धार्मिक वाङ्मय प्रसिद्ध करणाऱ्या संस्थेच्या 'द अवेकनिंग रे' या मासिकात (खंड 4, क्र. 5) प्रसिद्ध झाला. तिथून तो हिंदुत्ववादी नियतकालिकांनी उचलला. हे सांगणारे एल्स्ट् हे प्रखर हिंदुराष्ट्रवादाची भलामण करणारे लेखक आहेत, हे लक्षात ठेवलेलं बरं. जाता जाता या कोईनराड एल्स्ट यांनीही मेकॉले यांचे इंग्रजी शिक्षण देण्यामागचे हेतू शुद्ध होते, असंही प्रमाणपत्र दिलं आहे."

शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांच्याशीही आम्ही चर्चा केली.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "भारतातील आधुनिक शिक्षणव्यवस्थेचा पाया लॉर्ड मेकॉले यांनी रचला. त्यांच्या धोरणांमुळे भारतीय समाजाला इंग्रजी भाषेचा परिचय झाला आणि त्यातून जगाचा व्यापक दृष्टीकोन मिळाला. मेकॉलेपूर्वी शिक्षण विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित होते. पण त्यांच्या हस्तक्षेपानंतर 'सर्वांसाठी शिक्षण' ही भावना भारतीय समाजात हळूहळू दृढ होत गेली."

यासंदर्भात आम्ही शिक्षणतज्ज्ञ सुखदेव थोरात यांच्याशीही चर्चा केली.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "मेकॉलेने आणलेल्या शिक्षणपद्धतीमुळे भारतीयांमध्ये गुलामगिरी आली वा संकुचितपणा आला, असं काही मला वाटत नाही. उलट, भारत पाश्चात्त्य ज्ञानासाठीही खुला होऊ शकला. मेकॉलेनं भारतीय पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या सोबतच युरोपियन शिक्षण पद्धतीही आणली. याचा अर्थ असा की, संस्कृत आणि पुराणामध्ये जे होतं, त्याला एक समांतर म्हणून हे शिक्षण आणलं. याचा अर्थ त्याने संस्कृत आणि उर्दूवर बंधनं नव्हती आणलेली."

पुढे ते सांगतात की, "पण, भारतीयांना पाश्चात्य शिक्षणाची दारं त्याने खुली करून दिली. त्याच्यामुळे, भारतीयांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. विशेषत: वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारित ज्ञान भारतात येऊ शकलं. संकुचित होण्याऐवजी भारतीयांची दृष्टी अधिक विस्तारली, असंच म्हणावं लागेल."

तर भाऊसाहेब चासकर सांगतात की, "भारतातील शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या प्रवासात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. मेकॉले यांच्या पद्धतीमुळे एकीकडे भारतीय भाषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असला तरी दुसरीकडे आधुनिक विज्ञान शिक्षणाची बीजंही शिक्षणातून पेरली गेली हे वास्तव नजरेआड करता येत नाही.

शिक्षणाचा आशय हा महत्त्वाचा भाग तेव्हाही 'नियंत्रित' केला जात होता तसाच स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाच्या दृष्टीने प्रगत देशांच्या तुलनेत आजही आपण त्यात मागेच आहोत."

संदर्भ:

1. मराठी विश्वकोश

2. मेकॉले काल आणि आज - डॉ. जनार्दन वाटवे, डॉ. विजय आजगावकर - श्री सर्वोत्तम प्रकाशन

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)