निमिषा प्रियावर ज्याच्या हत्येचा आरोप आहे, त्याचा भाऊ शिक्षा माफ करण्याबद्दल काय म्हणाला?

फोटो स्रोत, UGC
- Author, सिराज
- Role, बीबीसी तमिळ
केरळमधील नर्स निमिषा प्रियाला येमेन या देशामध्ये एका खून प्रकरणात झालेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी 16 जुलैला करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यांची फाशी आता पुढे ढकलण्यात आली आहे. तलाल महदी नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणात निमिषा यांच्या केसचे पॉवर ऑफ ॲटर्नी सॅम्युअल जेरोम यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
'बीबीसी तमिळ'शी बोलताना ते म्हणाले की, "सगळं काही योग्य आणि सकारात्मक दिशेनं चाललं आहे. आज दिवसभरात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मृत्युदंड रद्द केला जाणार नाही. फक्त निमिषाची फाशी पुढे ढकलली जाईल. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल."
त्यांनी असंही सांगितलं की, "आतापर्यंत महदीच्या कुटुंबीयांनी माफी दिलेली नाही. फक्त त्यांच्या माफीमुळेच मृत्युदंड रद्द होऊ शकतो. त्यामुळे आता मृत्युदंड पुढे ढकलणं हाच एकमेव पर्याय आहे. यामुळे आपल्याला त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणी करण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ मिळेल."
येमेन सरकारकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आम्ही अधिकृत आदेशाची वाट पाहत आहोत.
तलाल महदीचे भाऊ काय म्हणाले?
तलाल महदी यांचे भाऊ अब्दुल फतेह महदी यांनी पासपोर्ट जप्त करण्याचा, तसेच धमकावण्याचे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.
अब्देल सांगतात, हा आरोप खोटा आहे आणि त्याला काहीही आधार नाही.
ते म्हणाले, "कट रचणारी (निमिषाने) आपला पासपोर्ट तलालने जप्त केल्याचा किंवा त्यानेही ठेवून घेतल्याचा उल्लेख केलेला नाही."
तलालनं 'निमिषाचं शोषण' केलं हीसुद्धा 'अफवा' असल्याचं अब्देल सांगतात.
तलाल आणि निमिषा यांच्यात इतर लोकांमध्ये असतं तसंच नातं होतं असं अब्देल यांनी म्हटलं आहे.
अब्देल म्हणाले, "त्या दोघांचा परिचय झाला मग त्यांनी एक मेडिकल क्लिनिक काढण्यासाठी व्यावसायिक भागीदारी सुरू केली. त्यानंतर त्यांचा विवाह झाला, हे नातं तीन ते चार वर्षं सुरू होतं." ते म्हणाले, "सत्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे."
निमिषाला माफ करण्याबद्दल अब्देल म्हणाले, "त्यांना माफ करण्याबद्दल आमचं मत एकदम स्पष्ट आहे. याबाबतीत ईश्वराचा कायदा लागू व्हावा असं आम्हाला वाटतं. त्यापेक्षा कमी काहीच नको."
याआधी काय झालं होतं?
मूळच्या केरळच्या असणाऱ्या आणि येमेनमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या निमिषा प्रिया या 2017 पासून येमेनमधील सना मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद आहेत.
तलाल अब्दो महदी नावाच्या व्यक्तीच्या हत्येसाठी निमिषा यांना शिक्षा झाली आहे आणि आता त्यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला आहे.
येमेनमध्ये इस्लामिक शरिया कायदा लागू असल्याने, त्या कायद्यातील 'ब्लड मनी' तरतुदीच्या माध्यमातून निमिषा प्रियाला वाचवता येईल, असं तिच्या कुटुंबीयांना वाटतं.
इस्लामिक कायदेपद्धती शरीयानुसार तो एक न्यायाचा प्रकार आहे. तो हत्या, दुखापत करणं, संपत्तीचं नुकसान करणं यासारख्या अनेक गुन्ह्यांत वापरला जातो.
यासाठी, निमिषाच्या आई प्रेमा कुमारी यांनी भारत सरकारकडून विशेष परवानगी घेतली होती आणि एप्रिल 2024 मध्ये त्या येमेनला गेल्या होत्या.

एकीकडे निमिषाचे कुटुंबीय तिला वाचवण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे तिला 16 जुलै रोजी मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी सांगितलंय.
सॅम्युअल जेरोम हे निमिषा प्रिया यांच्या आई प्रेमा कुमारी यांच्यावतीने खटला हाताळणाऱ्या अधिकृत व्यक्ती आहेत. मात्र, बीबीसीने या गोष्टीची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.
फाशीला अवघे काही दिवस शिल्लक असताना, निमिषाच्या आई प्रेमा कुमारी आणि सामाजिक कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी 11 जुलैच्या रात्री व्हीडिओ मुलाखतीद्वारे बीबीसी तमिळशी संवाद साधला.
या मुलाखतीचा सारांश पुढीलप्रमाणे -
निमिषाला शिक्षेबद्दल सांगितलं होतं का?
प्रश्न : 16 जुलैला शिक्षा देण्यात येणार आहे, याबद्दल निमिषाला माहिती देण्यात आली आहे का?
या प्रश्नाला उत्तर देताना सॅम्युअल जेरोम यांनी म्हटलं, "7 जुलै रोजी मला सना मध्यवर्ती कारागृहाच्या प्रमुखांचा फोन आला की, त्यांनी शिक्षेची तारीख निश्चित केली आहे. मला सांगण्यापूर्वी, तुरुंग प्रशासनाने सांगितलं की, त्यांनी निमिषालाही ही बातमी कळवली आहे. मी त्यावेळी वैयक्तिक कामासाठी भारतात होतो. ही बातमी ऐकताच मी लगेचच येमेनला रवाना झालो."
निमिषाच्या आई प्रेमा कुमारी म्हणाल्या की, फाशीची शिक्षा जाहीर होताच निमिषाने त्यांना येमेनमधील सना मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग प्रशासनामार्फत एक टेक्स्ट मेसेज पाठवला होता.
"मात्र, तिने शिक्षेबद्दलच्या निर्णयाबद्दल मला काहीही सांगितलं नाही. तिने फक्त विचारलं की, मी ठीक आहे का? मी तिची काळजी करु नये, याकरीता तिने मला काहीही सांगितलं नसावं. सॅम्युअल जेरोमनं मला हे सांगितल्यानंतरच मला याबाबत कळलं," असं प्रेमा कुमारी सांगतात.
गेल्या वर्षी येमेनला गेलेल्या प्रेमा कुमारी यांनी तुरुंगात निमिषा यांची दोनदा भेट घेतली होती.

प्रश्न: जेव्हा तुम्ही निमिषाला पहिल्यांदा तुरुंगात भेटलात, तेव्हा तुम्ही काय बोललात? त्यावेळच्या भावना काय होत्या?
या प्रश्नाला उत्तर देताना प्रेमा कुमारी म्हणाल्या, "मी निमिषाला तब्बल 12 वर्षांनी पाहत होते. गेल्या वर्षी 23 एप्रिलला मी तिला पहिल्यांदा पाहिलं. त्या दिवशी, मी येमेनमधील दूतावास अधिकाऱ्यांसोबत तिला भेटायला गेले होते. मात्र, कदाचित मी तिला भेटू शकणार नाही, अशी चिंता मला वाटत होती."
"त्यानंतर, जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा तिच्यासोबत आणखी दोन जण होते. त्यांनी देखील तिच्यासारखेच कपडे घातलेले होते. ती माझ्याकडे धावत आली, तिने मला मिठी मारली आणि ती रडायला लागली. मीही रडू लागले."
"माझ्यासोबत जे लोक होते, त्यांनी मला सांगितलं की, मी रडू नये. स्वत:ला सावरावं. पण, मी तिला तब्बल 12 वर्षांनी भेटत होते. मी मेले तरी मी ते क्षण कधीच विसरू शकणार नाही. पण, निमिषा मला असं दाखवू पाहत होती की, ती खूपच आनंदी आहे."
प्रश्न: तुम्ही निमिषाचे पती थॉमस तसेच तिच्या मुलीसोबत या मृत्युदंडाच्या शिक्षेबाबत काही बोलला आहात का?
"मी थॉमससोबत बोलले, त्यानंतर मग मी माझ्या नातीसोबतही बोलले. जेव्हा केव्हा मी माझ्या नातीसोबत बोलते तेव्हा ती मला विचारते की, मी आईला फोन केला तर ती येईल का?"
"ती म्हणते की, मी आईला फोन करून सांगते की, मला तुला भेटायचं आहे, तू लवकर ये. मी नातीला म्हणाले होते की, मी तिच्या आईला फोन करेन. हे सगळं मी निमिषाला भेटल्यानंतर तिलाही सांगितलं. मात्र, आता मी माझ्या नातीसमोर कशी उभी राहू शकते? मी आता अशीच घरी जाऊ शकत नाही, हे मी निमिषालाही सांगितलं," प्रेमा कुमारी सांगतात.

प्रश्न : या प्रकरणात तुम्हाला भारत सरकारकडून कोणती राजनैतिक मदत मिळाली आहे का?
या प्रश्नाला उत्तर देताना सॅम्युअल जेरोम म्हणाले, "भारतीय दूतावासाकडून पहिल्यापासूनच या प्रकरणामध्ये मदत केली जात आहे. मात्र, जेव्हा 2017 मध्ये निमिषाला अटक झाली होती, तेव्हा तिथे गृहयुद्ध सुरू असल्यानं भारतीय दूतावास कार्यरत नव्हता."
त्यावेळी, येमेनमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी मला बोलवलं आणि म्हटलं की, जर तुम्ही या प्रकरणी भारत सरकारची मदत घेतली नाहीत, तर तुमचा हा खटला योग्य आणि न्यायिक पद्धतीने चालवला जाणार नाही. त्यानंतर मग मी भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री व्ही. के. सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि मदत मागितली.
"ते तातडीने माझ्याशी बोलले आणि आवश्यक ती मदत पुरवण्याचं आश्वासनही दिलं. त्यानंतर त्यांनी पूर्व आफ्रिकेतील जिबूती देशातील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून येमेनला एक संदेश पाठवला. आम्ही ते पत्र घेतलं आणि हुथी परराष्ट्र मंत्रालयाला दिलं. त्यानंतरच निमिषाला अल-बैदाहून सना शहरात आणण्यात आलं. तिची योग्य प्रकारे चौकशी करण्यात आली."
"खरं तर व्ही.के. सिंग यांनी पाठवलेल्या त्या पत्रामुळेच निमिषा आजही जिवंत आहे," असंही सॅम्युअल जेरोम म्हणाले.
तलाल अब्दो महदी यांच्या कुटुंबीयांची काय आहे भूमिका?
प्रश्न: महदीच्या कुटुंबाने निमिषाला माफ करण्यास नकार दिलाय का?
याबाबत बोलताना सॅम्युअल जेरोम म्हणाले, "आतापर्यंत तरी, ना त्यांनी नकार दिलाय, ना त्यांनी माफीसाठी सहमती दर्शवली आहे."
प्रश्न: सुरुवातीपासूनच या खटल्याच्या सुनावणीमध्ये महदीच्या कुटुंबीयांची भूमिका काय राहिली आहे?
याबाबत सॅम्युअल जेरोम म्हणाले, "महदीची हत्या उत्तर येमेनमध्ये झाली होती. मात्र, निमिषाला येमेनच्या मारिब भागातून अटक करण्यात आली होती. महदीच्या कुटुंबानेच निमिषाला मारिब शहरातील तुरुंगामधून उत्तर येमेनला परत आणलं."
"ते तिला त्यांच्या स्वतःच्या वाहनातून अल-बैदा येथे घेऊन गेले. जर निमिषा दक्षिण येमेनमध्ये असती, तर तिच्यावरचा खटला कायदेशीर पद्धतीने चालला नसता. त्यामुळे निमिषाचा खटला कायदेशीर पद्धतीने चालवण्यामागचं एक कारण महदीचं कुटुंबही आहे. मात्र, त्यांनी निमिषाला एका वेगळ्या उद्देशानं उत्तर येमेनमध्ये आणलं होतं."

पुढे ते म्हणाले, "महदीचं कुटुंब हे 'ओसाब' या आदिवासी समुदायातून येतं. त्यांचं मूळ सना शहराजवळील तमार नावाच्या भागात आहे. पण ते व्यवसाय करतात आणि त्या कारणास्तव अल-बैदा परिसरात राहतात. थोडक्यात, एखादा तिरुनेलवेलीतला कुणीतरी व्यक्ती कामासाठी चेन्नईमध्ये राहतो, असं हे आहे. अल-बैदा हे स्वाथिया आदिवासी गटाचं मूळ आहे."
"जर महदी तिथे मारला गेला असता, तर त्यासाठी स्वाथिया जमातीला जबाबदार धरलं जाण्याची शक्यता होती. कारण जर येमेनमधील त्यांच्या सीमेवर राहणाऱ्या दुसऱ्या जमातीच्या सदस्याचा मृत्यू झाला, तर स्थानिक जमातीला जबाबदार धरलं जातं. त्यावेळी निमिषा गुन्हेगार आहे, हे त्यांनाही माहिती नव्हतं. अशा पार्श्वभूमीवर, परिस्थिती अशी होती की, या दोन आदिवासी गटांमध्ये संघर्ष सुरू झाला असता."
"मात्र, त्यानंतर जेव्हा महदीच्या कुटुंबाला सत्य कळालं, तेव्हा ते त्यांचं स्वत:चं वाहन घेऊन मारिब शहरात गेले आणि त्यांनी निमिषाला उत्तर येमेनमध्ये आणलं. त्या वेळी ते त्यांच्या रागाच्या भरात निमिषाला काहीही करायचं ते करू शकले असते, पण त्यांनी निमिषाला सुरक्षितपणे अल-बैदा येथे आणलं."
"त्यानंतर, जेव्हा हुथी परराष्ट्र मंत्रालयाकडून आदेश आला की, निमिषाला सना कारागृहात पाठवावं, तेव्हा महदीच्या कुटुंबीयांनी ते मान्य केलं आणि तिला पाठवलं," असंही ते म्हणाले.
प्रश्न: येमेनच्या न्यायालयांनी दोषी ठरवलेलं असताना निमिषाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यामागचं नेमकं कारण काय आहे?
"निमिषाने गुन्हा केला आहे. तिने त्याबाबतची शिक्षा भोगली आहे. आता आम्ही निमिषाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण शरिया कायद्यातच क्षमा करण्यासाठीचा एक मार्ग आहे. आणखी एकाचं आयुष्य हिरावून घेणं हे दुसऱ्या गमावलेल्या आयुष्यासाठीचं उत्तर असू शकत नाही."
"निमिषाला एक मुलगी आहे आणि या मुलीची आई या वयात येमेनमध्ये त्रास सहन करत आहे. महदीची बाजू समजून घेणाऱ्यांनी तिची बाजूदेखील पाहिली पाहिजे. मात्र, महदीच्या कुटुंबानं माफ केलं तरच निमिषाला वाचवता येईल, अशी परिस्थिती आहे. अन्यथा, तिला दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल," असं सॅम्युअल जेरोम म्हणाले.
येमेनमधील लोक आणि माध्यमं काय म्हणत आहेत?
प्रश्न: येमेनमधील लोक आणि माध्यमं या खटल्याकडे कशाप्रकारे पाहत आहेत?
याविषयी बोलताना सॅम्युअल जेरोम म्हणाले, "खरं तर येमेनची जनता आणि माध्यमं निमिषाकडे रागाने पाहतात. कारण, त्यांच्यादृष्टीने तिने त्यांच्या एका नागरिकाची हत्या केली आहे. त्याच वेळी, निमिषाला चांगल्या प्रकारे ओळखणारे काही लोक असंही मानतात की, तिला वाचवण्यात आलं पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न: निमिषाची ही शिक्षा पुढे ढकलण्यासाठी इतर काही उपाय आहेत का?
"मला माहिती नाही. याबाबत मी भारतीय दूतावासाशी चर्चा करतो आहे. या प्रकरणी जे काही करता येईल, ते सगळं आम्ही करू," असं सॅम्युअल जेरोम म्हणाले.
भारत सरकारकडून कोणत्या राजनैतिक हालचाली झाल्या आहेत?
निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी 'द सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन कौन्सिल' या गटाने गुरुवारी (10 जुलै) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
निमिषा प्रियाला राजनैतिक कृतीद्वारे वाचवण्यासाठी भारत सरकारकडून आदेश मिळावा, यासाठीही ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि जयमल्या बागची यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकेची दखल घेतली असून 14 जुलैला सुनावणी घेण्यास सहमती दर्शविली आहे.
दुसरीकडे, निमिषाला 16 जुलैला येमेनमध्ये मृत्युदंड देण्यात येणार असल्याची माहिती मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी दिली. त्यामुळे, या खटल्याचं स्वरूप आणि कमी वेळ शिल्लक राहिला असल्याने तातडीची निकड लक्षात घेऊन भारताच्या अॅटर्नी जनरलना याचिकेची प्रत सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.
काय आहे हे प्रकरण?
बीबीसी प्रतिनिधी गीता पांडे यांच्या डिसेंबर 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, प्रशिक्षित नर्स असलेल्या निमिषा प्रिया 2008 मध्ये केरळहून येमेनला गेल्या होत्या. येमेनची राजधानी असलेल्या सनामधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना काम मिळालं होतं.
टॉमी थॉमस यांच्याशी लग्न करण्यासाठी 2011 मध्ये निमिषा केरळला आल्या होत्या. लग्नानंतर ते दोघेही येमेनला गेले. डिसेंबर 2012 मध्ये त्यांना एक मुलगी झाली.
थॉमस यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, त्यांना कोणतीही चांगली नोकरी न मिळाल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या. त्यामुळे 2014 मध्ये ते आपल्या मुलीसह कोचीला परत आले.
त्याच वर्षी निमिषानं कमी पगाराची नोकरी सोडून एक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. येमेनमधील कायद्यानुसार असं करण्यासाठी एक स्थानिक भागीदार असणं आवश्यक आहे. तेव्हाच महदी यांची या कहाणीत एंट्री झाली.
महदी यांचं एक कपड्याचं दुकान होतं. निमिषा ज्या क्लिनिकमध्ये काम करायच्या त्याच क्लिनिकमध्ये त्यांच्या पत्नीनं मुलीला जन्म दिला होता. जानेवारी 2015 मध्ये निमिषा भारतात आल्या होत्या, तेव्हा महदी देखील त्यांच्यासोबत आले होते.

निमिषा आणि त्यांच्या पतीनं आपले मित्र आणि कुटुंबीय यांच्याकडून आर्थिक मदत घेत जवळपास 50 लाख रुपये जमवले होते. त्यानंतर एक महिन्यानं निमिषा स्वत:चं क्लिनिक सुरू करण्यासाठी येमेनला परतल्या.
त्यांचे पती थॉमस आणि मुलीला येमेनला आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. तेव्हाच येमेनमध्ये यादवी युद्धाची सुरुवात झाली.
त्यादरम्यान भारतानं येमेनमधून आपल्या 4,600 नागरिकांना आणि 1,000 परदेशी नागरिकांना बाहेर काढलं होतं. मात्र, त्यावेळेस निमिषा भारतात परतल्या नाहीत.
मात्र, निमिषा यांची परिस्थिती लवकरच खराब होण्यास सुरुवात झाली. त्यांनी महदीविरोधात तक्रार करण्यास सुरुवात केली.
निमिषा यांच्या आई, प्रेम कुमारी यांनी 2023 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका केली होती. त्यात म्हटलं, "महदी यांनी निमिषा यांच्या घरातून त्यांच्या लग्नाचे फोटो चोरले होते. नंतर त्या फोटोंना एडिट करून त्यांनी दावा केला की त्यांचं निमिषाशी लग्न झालं आहे."
यामध्ये असंही म्हटलं होतं की, महदी यांनी अनेक वेळा निमिषा यांना धमक्या दिल्या. तसंच "त्यांचा पासपोर्ट देखील ताब्यात घेतला होता. निमिषा यांनी जेव्हा या गोष्टीची तक्रार पोलिसांत केली, तेव्हा पोलिसांनी निमिषालाच 6 दिवस अटकेत ठेवलं."
2017 मध्ये निमिषा यांचे पती थॉमस यांना महदी यांच्या हत्येची माहिती मिळाली होती.
थॉमस यांना येमेनमधून माहिती मिळाली की, 'निमिषा यांना पतीच्या हत्येच्या' आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
थॉमस यांच्यासाठी ही गोष्ट खूपच धक्कादायक होती, कारण ते स्वत:च निमिषाचे पती आहेत. मात्र, महदी यांनी निमिषा यांचे फोटो एडिट करून स्वत:चं लग्न निमिषाशी झाल्याचा दावा केला होता.
महदी यांचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह वॉटर टँकमध्ये मिळाला होता. त्यानंतर एक महिन्यानं निमिषा यांना येमेन-सौदी अरेबिया सीमेवरून अटक करण्यात आली होती.
बीबीसीच्या बातमीनुसार, 'दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, महदी यांनी क्लिनिकच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून ते क्लिनिक स्वत:च्या मालकीचं असल्याचा दावा केला होता. क्लिनिकमधून ते पैसेही घेत होते आणि निमिषा यांचा पासपोर्टदेखील त्यांनी ताब्यात घेतला होता.'
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)










