'आंदोलन तूर्तास थांबवा', राज ठाकरेंचा मनसैनिकांना आठवड्याभरात नवा आदेश

फोटो स्रोत, MNS ADHIKRUT/YOUTUBE
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्रात व्यवहारात मराठी भाषा वापरली जावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्याच्या भाषणामध्ये केलं होतं.
महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या, असा आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला होता.
त्याबरहुकूम राज्यातील काही ठिकाणी मनसैनिकांनी आंदोलनही केलं. मात्र, आता हे आंदोलन थांबवण्याचा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
मात्र, यामुळे ते वारंवार अशा पद्धतीनं छेडलेलं आंदोलन मागे घेतात, ते स्वत:च्याच भूमिकेशी कधी एकनिष्ठ नसतात, अशी टीकादेखील त्यांच्यावर सुरू झाली आहे.
'आंदोलन थांबवण्याच्या' आदेशात राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी आज (5 एप्रिल) आपल्या सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करुन मनसैनिकांना आंदोलन थांबवण्याबाबतचं आवाहन केलं आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली."
"पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची?" असाही सवाल त्यांनी केला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पुढे सरकारला उद्देशून त्यांनी म्हटलंय की, "सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की."
'अस्तित्व दाखवण्याचा खटाटोप'
राज ठाकरे यांनी घेतलेल्या या 'यू-टर्न'वरुन सध्या टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय भूमिकांबाबत आम्ही राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्याशी चर्चा केली.
ते म्हणाले की, "आंदोलनाचा इम्पॅक्ट बघून पुढे जायचं की मागे जायचं, असा निर्णय घेतला जातो. राज ठाकरे यांची अशा प्रकारची, विशेषत: मराठी भाषेसंदर्भातील सगळी आंदोलनं ही 'टोकन-टाईप आंदोलनं' आहेत. त्यात महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील, तशी त्यांची लाईन क्लिअर होईल. आता ते मराठी की हिंदूत्व यापैकी कोणत्या बाजूनं जायचं, याबाबतचा गोंधळ त्यांच्याही मनात दिसतोय."
हा पॅटर्न सध्याच्या सगळ्याच राजकीय नेत्यांमध्ये दिसत असल्याचंही ते सांगतात.
अभय देशपांडे म्हणाले की, "आम्ही काँग्रेससोबत गेलोय, पण हिंदूत्व सोडलेलं नाहीये, असं उद्धव ठाकरे म्हणतात. आम्ही भाजपसोबत गेलोय पण पण शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार सोडला नाही, असं अजित पवार म्हणतात. तसेच, हिंदूत्ववादी पक्षासोबत जाण्याचा इरादा दाखवायचा पण मराठी सोडलेलं नाही, हे अधूनमधून सांगण्याच्या हेतूने अशी आंदोलनं केली जातात. अशा प्रकारे सगळे आपले मूळ खुंटे जे आहेत, त्याच्या आजूबाजूला फिरत आहेत."
राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या भाषणाबाबत बोलताना देशपांडे म्हणाले की, "राज ठाकरे यांनी सगळे पर्याय खुले ठेवले. त्यातलं कोणतंही वाक्य आणि भूमिका कमिटेड नव्हती. हिंदूत्वाकडे गेलो तरी मराठी सोडणार नाही, अशी जाणीव त्यांना द्यायची असेल. अशा आंदोलनातून तुमच्या भूमिकेची, अस्तित्वाची आणि ताकदीची जाणीव करुन द्यायची असते, त्यापलीकडे त्यांचा फारसा प्रभाव पडत नसतो."
मराठी अस्मितेच्या मुद्द्याला फुंकर घालण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा स्पेशल मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात पार पडला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं यानिमित्ताने झालेलं भाषण मागच्या काही गुढीपाडवा मेळाव्यांपेक्षा वेगळं दिसलं, असं म्हणावं लागेल. याला कारणही तसंच होतं, मागच्या काही सभांमध्ये राज ठाकरेंनी घेतलेली प्रखर हिंदुत्वाची भूमिका अनेकांना माहिती आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी तर राज ठाकरे हिंदुहृदयसम्राट देखील झाले होते. पण यंदाच्या मेळाव्यात भव्यदिव्य मंच, हिंदवी स्वराज्याची राजमुद्रा, त्याखाली पक्षाचं नाव आणि सगळ्यात खाली पक्षाचं चिन्ह असलेलं रेल्वे इंजिन. पण सगळ्यात मोठा बदल जर कुठचा असेल तर तो म्हणजे मंचाच्या दोन्ही बाजुंनी भल्यामोठ्या अक्षरात लिहिलेलं एक वाक्य, 'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा'.
देशभरातील हिंदुत्वाबाबत बोलणाऱ्या राज ठाकरेंनी आता महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्याला फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.
राज ठाकरेंनी या भाषणात मांडलेले काही मुद्दे सुधारणावादी आणि पुरोगामीत्वाकडे झुकलेले देखील दिसून आले.
'गंगा नदीच्या स्वच्छतेपासून ते चित्रपट बघणारे हिंदू खरे हिंदू नसतात' अशा मुद्द्यांपर्यंत राज ठाकरेंनी या भाषणात भाष्य केलं.
विद्युत शववाहिन्या, ईव्हीएम, नद्यांच्या स्वच्छतेकडे होणारं राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष असे बरेचसे मुद्दे राज ठाकरे यांच्या भाषणात होते.


1. लाव रे तो व्हीडिओ
राज ठाकरेंच्या सभांमधून सुप्रसिद्ध झालेला एक शब्दप्रयोग म्हणजे 'लाव रे तो व्हीडिओ.' कधी या तर कधी त्या पक्षांच्या नेत्यांचा किंवा मुद्द्याचा व्हीडिओ दाखवून स्वतःच्या भूमिकेनुसार मांडणी करण्याचं कसब असलेल्या राज ठाकरेंनी यावेळी गंगा नदीला लक्ष्य केलं.
गंगा नदीतल्या प्रदूषणाचा व्हीडिओ दाखवून ते म्हणाले, "कुंभमेळ्यातून आणलेलं पाणी पिणार नाही असं सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान केला. ज्या नदीला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो त्यांची अवस्था ही भीषण आहे. गंगा साफ करावी असं पहिल्यांदा राजीव गांधी यांनी म्हटलं. त्यांनी ते कामही सुरू केलं. तेव्हापासून अजूनही गंगा साफ होतेय. मोदींनीही तेच सांगितलं.
आपल्याकडच्या देशातल्या नद्यांची अवस्था अशी आहे की पाणी पिण्याचं सोडाच पण अंघोळही करू शकत नाही. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर अनेकजण आजारी पडल्याचं एकाने सांगितलं. प्रश्न हा कुंभमेळ्याचा अपमान करण्याचं किंवा गंगेचा अपमान करण्याचं नाही. प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा. महाराष्ट्रातल्या नद्यांचीही हीच परिस्थिती आहे. सावित्री नदीची अवस्थाही तीच आहे. देशभरात 311 नदीपट्टे हे प्रदूषित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे."

फोटो स्रोत, MNS ADHIKRUT/YOUTUBE
2. औरंगजेबाच्या कबरीजवळ मोठा बोर्ड लावा
मागच्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला देखील राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून स्पर्श केला. याबाबत बोलताना ते म्हणाले "औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिसली पाहिजे. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथं गाडला गेला. हा आमचा इतिहास आहे. तिकडे लहान लहान मुलांच्या ट्रीप गेल्या पाहिजे."

फोटो स्रोत, MNS ADHIKRUT/YOUTUBE
3. मृतदेह जाळण्यासाठी विद्युतदाहिन्या वापरल्या पाहिजेत
राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या पक्षीय मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जंगलतोडीबाबतही चिंता व्यक्त केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, "सगळीकडे झाडं जगवा झाडे लावा असे बोर्ड लावले जातात. मात्र, दुसरीकडे हिंदुचे अंत्यसंस्कार लाकडावर होतात. जंगलतो़ड झाल्याशिवाय लाकूड येणार नाही. याला पर्याय म्हणून विद्युतदाहिन्या आल्या आहेत. देशभर विद्युतदाहिन्या झाल्या पाहिजेत.
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगलात गेले होते परदेशी माणसांबरोबर. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. त्यांना प्राण्यांचीही आवड आहे. जंगले जगवली पाहिजेत. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईत आहे ते जगात कुठेही नाही. पण सध्या सगळीकडे जंगलतोड सुरु आहे."
4. चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत
मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या छावा सिनेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, "चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. विकी कौशल मेल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान समजले काय? सध्या माथी भडकवण्याचे काम सुरु आहे. इतिहासाच्या मुळाला गेला ना तुमच्या अपेक्षांची भांडी फुटतील. छत्रपती शिवाजी महाराज हा एक चमत्कार आहे. हा एक विचार आहे."

फोटो स्रोत, MNS ADHIKRUT/YOUTUBE
5. लाडकी बहीण योजना बंद होणार
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, "अजित पवार म्हटले आहे की, 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर वाट्टेल ते बोलणार आणि निवडणूक संपली, लोकांनी भाबडेपणाने मतदान केलं, की ऐनवेळी पैसे भरायला सांगितलं जात आहे.
लाडकी बहिण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार म्हणत आहेत. तसं केलं तर, वर्षाला महाराष्ट्र सरकारवर 63 हजार कोटी रुपयांचं कर्ज होईल. म्हणजे पाच वर्षात तीन ते चार लाख कोटी कर्ज होईल. हे फक्त वाटण्यासाठीचं कर्ज आहे आणि ते हे वाटू शकणार नाहीत. हीही योजना बंद होणार. कर्ज काढून कोणी दिवाळी साजरी करायला सांगितली आहे. मूळ रोजगाराचे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातील मराठी मुलांच्या रोजगाराचे प्रश्न सोडवा. आस्थापना येत आहेत आणि बाहेरच्या लोकांना कंत्राटी कामगार म्हणून भरलं जात आहे."

फोटो स्रोत, MNS ADHIKRUT/YOUTUBE
6. संतोष देशमुख हत्या
राज ठाकरे म्हणाले, "बीडमध्ये संतोष देशमुख यांना किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. तुमच्या अंगात, नसानसात एवढी क्रुरता भरली असेल, तर मी जागा दाखवेन, तिथं जा. हे सगळं पवनचक्क्या, त्या प्रकल्पातून निर्माण होणार राख, खंडणी यामुळे झालं. मी आजपर्यंत ऐकलं होतं की, राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतात. या प्रकरणात विषय पैशाचा होता. वाल्मिक कराड आणि जी नावं येतात त्या सगळ्यांचा खंडण्यांशी संबंध आहे. संतोष देशमुखने त्या खंडणीला विरोध केला. उद्या त्या जागी संतोष देशमुख नसता, दुसरा कुणीही असता तरी त्यांनी हेच केलं असतं."
या प्रकरणाला वंजाऱ्यानं मराठ्याला मारलं असं लेबल लावलं. यात वंजाऱ्यांचा आणि मराठ्यांचा काय संबंध. मात्र, तुम्हाला गुंतवलं जातंय. मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका."
शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, दिवसाला 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याकडे पाहू नये, रोजगार निर्माण होत नाहीत, तरी त्याकडे लक्ष देऊ नये, असं या राजकीय नेत्यांना वाटतं. त्यांनी सगळ्यांना जातीपातीत अडकवलं आहे. कुणीही जातीचं भलं केलेलं नाहीये आणि कुणीही जातीचं भलं केलेलं नाही.
7. मशिदींवरच्या भोंग्याबाबत योगींनी ऐकलं पण महाराष्ट्राचं काय?
मशिदीवरचे भोंगे आणि धर्मांधतेबाबत बोलताना तुर्कीचं उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले, "हे सगळे देश धर्मांधतेतून बाहेर पडत आहेत आणि आम्ही धर्मांधतेकडे जात आहोत. धर्म प्रत्येकानं जोपासला पाहिजे, पण उंबरठ्याच्या आत. बाकीच्यांनी धर्म रस्त्यावर आणला, तर आम्ही बुलडोजर फिरवू. मी जेव्हा मशिदींवरील लाऊड स्पिकर बंद करा म्हटलं तेव्हा ऐकलं नाही. माझ्या 17 हजार मनसैनिकांवर केसेस केल्या."

फोटो स्रोत, MNS ADHIKRUT/YOUTUBE
राज ठाकरे पुढे म्हणाले, "आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान भोंगे वाजणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. मात्र ते वाजतच नाहीत. प्रश्न सकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान वाजणाऱ्या भोंग्यांचा आहे. सततच्या लाऊड स्पिकरचा लोकांना त्रास होतो. सणवार असेल तर आपण समजू शकतो. मात्र सरकार म्हणून कोणतंही पाऊल उचलण्यात आलं नाही. पाऊल उत्तर प्रदेशनं उचललं. आम्ही इकडे घोषणा केली आणि तिकडे योगींनी पाऊल उचललं. आमच्याकडे तसेच सुरू आहेत."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











