You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन, राणेंचा अजित पवारांना इशारा
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1) माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन, राणेंचा अजित पवारांना इशारा
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचारात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली होती. या टीकेला नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिलीय. लोकमतनं ही बातमी दिलीय.
नारायण राणे म्हणाले, “अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहीत नाही. ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहावेळा निवडून आलो आहे.”
दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांनी चिंचवडमध्ये बोलताना राणेंवर टीका केली होती. शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले हे सांगताना अजित पवारांनी नारायण राणेंचा दाखला दिला आणि म्हणाले, “राणेंना तर वांद्रेत बाईनं पाडलं.”
वांद्रे पोटनिवडणुकीत 2015 मध्ये काँग्रेस उमेदवार नारायण राणेंचा शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी पराभव केला होता.
दरम्यान, यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
“ठाकरेंकडे राहिलं काय? कुठलंही अस्तित्व नाही. पक्षातून गेलेले लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, अडीच वर्षात आपण काय केलं ते पाहा म्हणावं,” असंही राणे म्हणाले.
2) राष्ट्रवादी काँग्रेसही शिल्लक राहणार नाही – भाजप खासदार
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहणारे अनेक मुंगेरीलाल आहेत. स्वप्न पाहणं हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. स्वप्न पाहून शिवसेना संपली, अगदी तो पक्षही राहिला नाही आणि पक्षचिन्हही राहिलं नाही. त्याप्रमाणे भविष्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक असेल,” असं भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
निंबाळकर म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मग मुख्यमंत्री काय आणि मंत्री काय. पक्ष शिल्लक ठेवणे ही त्यांची सध्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये हुरूप राहावा म्हणून ते असे वक्तव्य करत आहेत आणि बॅनरबाजी करत आहेत.”
निंबाळकरांचं हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरील बॅनर्सच्या पार्श्वभूमीवर आलं. या कार्यालयाबाहेर गेल्या महिन्याभरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लावण्यात आले होते.
3) सिंधुताईंच्या निधनानंतर मदतीचा ओघ आटला – ममता सपकाळ
“माई गेल्यानंतर आयुष्याचे दोन भाग झाले. माई असताना एक निश्चितता होती. शांत झोप होती, त्या गेल्यानंतर आता काळजी व्यापून उरली आहे. आज माझी मुले पोटभर जेवत आहेत. परंतु, उद्याचं काय असा प्रश्न सतत उपस्थित होतो,” असं सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ म्हणाल्या. त्या एबीपी माझावरील माझा कट्टा या कार्यक्रमात उपस्थित होत्या.
ममता सपकाळ पुढे म्हणाल्या की, “माई गेल्यानंतर डोक्यावरचं छप्पर जावं आणि पायाखालची जमीन सरकावी अशी परिस्थिती निर्माण झाली. संस्थेसाठी अन्न धान्य मिळतं पण भविष्याची चिंता आहे. सिंधुताईंच्या निधनानंतर मदतीचा ओघ कमी झाला.”
“सिंधुताई गेल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात चांगली मदत झाली. परंतु, माई गेल्यानंतर यंदाची पहिली दिवाळी दर वर्षीच्या दिवाळीसारखी साजरी झाली नाही. त्यामुळे त्यांची पोकळी जाणवली. सिंधुताई गेल्यानंतर संस्थेसाठी येत असलेल्या मतदीचा ओघ कमी झाला. परंतु, माईंच्या कामावर प्रेम करणाऱ्या ठराविक लोक आणि संस्थांकडून अजूनही मदत सुरू आहे. सरकारी अनुदान मिळतं परंतु, ही मदत फार कमी आहे,” असंही त्या म्हणाल्या.
4) 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन डॉलरची होईल – गोयल
पुढच्या तीन वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. ते एशिया इकोनॉमिक डायलॉगमध्ये बोलत होते.
पियुष गोयल पुढे म्हणाले की, “भारताच्या अर्थव्यवस्थेची अशीच वाढ होत राहिली, तर 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन डॉलर होईल.” इकोनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.
“आम्ही आधीच 10 व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवरून 5 व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत गेलो आहोत आणि भारतात मोठा तरुण वर्ग आहे, जी आपली संपत्ती आहे,” असंही पियुष गोयल म्हणाले.
5) नितीशकुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद – अमित शाह
“बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) हातमिळवणी केली आहे,’’ असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
नितीशकुमारांची ही महत्त्वाकांक्षा दर तीन वर्षांनी उचल खाते, अशी टीकाही शाह यांनी केली. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लौरियामध्ये अमित शाह यांची जाहीर सभा होती. तिथे ते बोलत होते.
अमित शाह म्हणाले, “तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यास नितीशकुमार यांची सहमती आहे. त्यांना ते कधी करायचे आहे ते त्यांनी जाहीर करावे.”
नितीशकुमार यांनीही बिहारला ‘जंगल राज’मध्ये ढकलल्याचा आरोप करून शहा म्हणाले की, “आधीच्या काँग्रेस व राजद सरकारने बिहारला जंगल बनवल्याचा आरोप नितीशकुमारच करत असत. आता त्यांचे आयाराम-गयाराम खूप झाले. नितीशकुमारांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.”