देवभूमीच्या आकाश मढवालची गगनभरारी; 5 विकेट्ससह विक्रमांच्या मांदियाळीत

फोटो स्रोत, Getty Images
आयपीएल स्पर्धेत खेळणारा उत्तराखंडचा पहिला क्रिकेटपटू ठरलेल्या आकाश मढवालने बुधवारी झालेल्या एलिमिनेटर लढतीत 5 विकेट्स घेण्याची किमया केली. 24 वर्षीय आकाशने 3.3 षटकात अवघ्या 5 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या.
जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त झाल्याने मुंबईची गोलंदाजी कमकुवत झाली होती.
याचा फटका त्यांना प्राथमिक फेरीत बसला. पण आकाश मढवालने ही उणीव भरून काढत खळबळजनक कामगिरीची नोंद केली.
आयपीएल सामन्यात गोलंदाजांने पाच विकेट्स पटकावण्याची ही 31वी वेळ आहे.
याआधी मुंबईकरता डावाच पाच विकेट्स घेण्याची करामत लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, मुनाफ पटेल, अल्झारी जोसेफ, जसप्रीत बुमराह यांनी केली आहे.
यंदाच्या हंगामात डावात 5 विकेट्स घेणारा आकाश तिसराच गोलंदाज ठरला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याआधी मार्क वूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी असा विक्रम केला होता.
आयपीएल स्पर्धेतील सामन्यात फक्त 5 धावा देत 5 विकेट्स घेण्याचा विक्रम याआधी महान गोलंदाज अनिल कुंबळे यांच्या नावावर होता.
आकाशने अनिल यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
सामनावीर पुरस्कार पटकावल्यानंतर बोलताना आकाश म्हणाला, "मी सराव करत होतो आणि संधीची वाट पाहत होतो. मी इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ते सुरू असतानाच आवड म्हणून टेनिस बॉल क्रिकेट खेळत असे. आजच्या कामगिरीने प्रचंड आनंदी आहे. मी कामगिरीत सुधारणा करत राहीन. जसप्रीत बुमराह खूप मोठा खेळाडू आहे. त्याची उणीव नक्कीच भासते. सगळ्या विकेट्सपैकी निकोलस पूरनची विकेट सर्वाधिक भावली

फोटो स्रोत, Getty Images
आकाश अगदी आतापर्यंत उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात टेनिस बॉल स्पर्धांमध्ये खेळत असे. रुरकी या उत्तराखंडमधल्या शहरात तो राहतो.
योगायोग म्हणजे भारतीय संघाचा तडाखेबंद बॅट्समन विकेटकीपर ऋषभ पंतचा तो सख्खा शेजारी आहे. उत्तराखंडचे माजी प्रशिक्षक वासिम जाफर आणि आताचे प्रशिक्षक मनीष झा यांनी आकाशचं नैपुण्य हेरलं.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मनीष झा यांनी आकाशच्या कारकीर्दीतील सुरुवातीच्या दिवसांविषयी सांगितलं.
"2019 मध्ये वासिम जाफर यांनी आकाशच्या नावाची शिफारस केली. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तो खेळला. पण तेव्हा त्याची तयारी पुरेशी नव्हती. मी प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर त्याला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळवण्याचं ठरवलं. त्याने त्याच्या कौशल्यांवर काम केलं. वेग आणि अचूकता हा मिलाफ साधला".
गेल्या वर्षी आकाश मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात समाविष्ट झाला.
सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्याने आकाशला संघात घेण्यात आलं. यंदा त्याला अंतिम अकरात खेळण्याची संधी मिळाली.
प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी मुंबईला हैदराबादविरुद्ध विजय मिळवणं अनिवार्य होतं. त्या दडपणाच्या लढतीत आकाशने विव्रांत शर्मा, मयांक अगरवाल आणि तुफान फॉर्मात असलेल्या हेनरिच लासेनला बाद केलं.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत आकाशने जबरदस्त फॉर्मात असलेला शुबमन गिल, अनुभवी वृद्धिमान साहा आणि फिनिशर डेव्हिड मिलर यांना तंबूत धाडलं.

फोटो स्रोत, Getty Images
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अलीकडेच प्रवेश झालेल्या उत्तराखंड संघाचा आकाश कर्णधार आहे.
क्रिकेटमध्ये मुशाफिरी करण्यापूर्वी आकाशने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. अवतार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आकाशने गोलंदाजीची धुळाक्षरं गिरवली. 2013 मध्ये आकाशच्या वडिलांचं निधन झालं.
3 मे रोजी मुंबई आणि पंजाब यांच्यादरम्यान मोहाली इथे झालेल्या मुकाबल्यात आकाशने आयपीएल पदार्पण केलं.
आकाशच्या पहिल्याच षटकात 16 धावा कुटल्या गेल्या. पण कर्णधार रोहित शर्माने त्याच्यावर विश्वास ठेवला.
आकाशने त्या सामन्यात 3 षचकात 37 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही.
6 मे रोजी चेन्नईविरुद्धच्या लढतीत आकाशला संघात कायम ठेवण्यात आलं.
उत्तम फॉर्मात असलेला चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला बाद करत आकाशने आयपीएलमधली पहिली विकेट पटकावली.
हैदराबादविरुद्ध ड्रेसिंगरुमचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना आकाशने कर्णधार रोहित शर्माचे आवर्जून आभार मानले.
तो म्हणाला, "रोहितने मला सातत्याने पाठिंबा दिला. तू तुझ्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित कर असं त्याने सांगितलं. त्याने माझ्यासाठी जी आखणी केली त्यानुसार गोलंदाजी केली. त्यामुळेच हे यश मिळवू शकलो. मला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद".
लखनौचं लोटांगण;मुंबईची आगेकूच
मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौने पॉवरप्लेच्या 6 षटकात 62 धावांची मजल मारली होती. पुढच्या दहा षटकात लखनौच्या खेळाडूंनी अक्षरश: हाराकिरी केली.
पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा लखनौचा डाव कोसळत गेला. 62/2 अशा सुस्थितीतून लखनौची घसरण होऊन त्यांचा डाव 101 धावांतच आटोपला.
मुंबईने 81 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला आकाश मढवाल.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईकडे वलयांकित फलंदाजांचा भरणा होता. कर्णधार रोहित शर्मा (11) तर इशान शर्मा (15) यांनी छोट्या खेळी केल्या. सूर्यकुमार यादव आणि कॅमेरुन ग्रीन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 33 चेंडूत 66 धावांची भागीदारी केली.
नवीन उल हकने एकाच षटकात या दोघांना माघारी धाडत लखनौला पुनरागमनाची संधी दिली. कॅमेरुनने 41 तर सूर्यकुमारने 33 धावांची खेळी केली. तिलक वर्माने 22 चेंडूत 26 धावांची खेळी केली.
टीम डेव्हिड फुलटॉस चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मुंबईने सूर्यकुमारऐवजी नेहल वढेराला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समाविष्ट केलं. त्याने 12 चेंडूत 23 धावा करत मुंबईला पावणेदोनशेचा टप्पा ओलांडून दिला. लखनौतर्फे नवीन उल हकने 4 तर यश ठाकूरने 3 विकेट्स पटकावल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रेरक मंकड आणि कायले मायर्स झटपट तंबूत परतले. कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉइनस यांनी संयमी भागीदारी केली.
पीयूष चावलाने कृणालचा अडथळा दूर केला. त्यानंतर लखनौच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. त्यांचे तीन फलंदाज धावचीत झाले.
स्टॉइनसच्या 40 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता लखनौच्या एकाही फलंदाजाला सन्मान वाचवता आला नाही. मुंबईकडून आकाशने 5 विकेट्स घेत लखनौच्या डावाला खिंडारच पाडलं.
कर्णधार रोहित शर्मा आणि कॅमेरुन ग्रीन यांनी क्षेत्ररक्षणात कमालीची चुणूक दाखवली.
शुक्रवारी क्वालिफायर2च्या लढतीत गुजरात आणि मुंबई अहमदाबाद इथे आमनेसामने असतील.
मुंबईच्या नावावर आयपीएलची पाच जेतेपदं आहेत तर गुजरातने गेल्या वर्षी पहिल्याच मोहिमेत जेतेपदावर नाव कोरलं होतं.
गुजरात-मुंबई या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो चेन्नईविरुद्ध अंतिम सामन्यात खेळेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








