घराजवळ 'या' जंगली वनस्पती असतील, तर खरंच साप दूर राहतात का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लक्कोजू श्रीनिवास
- Role, बीबीसीसाठी
'ही' झाडं किंवा वनस्पती लावल्यास साप घराजवळ येत नाहीत', 'शेतातून साप हाकलून लावणारी विशेष वनस्पती', असे मथळे असलेले फोटो आपण सोशल मीडियावर अनेकदा पाहत असतो. दैनंदिन जीवनातही अशा वनस्पतींबद्दल वेळोवेळी आपण ऐकत असतो.
अशा वेळी लोक तेल ईश्वरी, नल्ल ईश्वरी, पडग अशा काही वनस्पतींची नावं सांगतात. मग प्रश्न असा पडतो की, ही वनस्पती असलेल्या ठिकाणी खरंच साप येत नाहीत का?
मोगली, संपेंगासारखी वनस्पती असली की तिकडे साप येतात असं लोक म्हणतात. मग त्याचप्रमाणे, तेल ईश्वरी किंवा पडगसारखी वनस्पती असेल तर साप येत नाहीत का? म्हणजे खरंच सापांचं येणं-जाणं वनस्पती ठरवतात का?
या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे? याला काही वैज्ञानिक पुरावे आहेत का? साप नेमके कुठून येतात? साप न येणारी ठिकाणं आहेत का? याबद्दल प्राणीशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ काय सांगतात?
साप आणि वनस्पती- श्रद्धा आणि तथ्य
काही वनस्पती सापांना दूर ठेवतात, असा लोकांमध्ये एक समज आहे. पण या विश्वासाला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, असं आंध्र विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. जे. प्रकाशराव यांनी बीबीसीला सांगितलं.
ते म्हणाले, "आम्ही विद्यार्थ्यांसोबत संशोधनासाठी पूर्व-पश्चिम घाटात गेलो तेव्हा तिथे काही वनस्पती दिसल्या. या वनस्पती सापांना दूर ठेवतात, असं स्थानिक लोक मानतात."

फोटो स्रोत, Getty Images
"हीच वनस्पती मैदानी भागातील लोकही घरात लावतात. ऑनलाइनसुद्धा 'साप प्रतिबंधक' म्हणून काही वनस्पती विकल्या जातात. पण ही वनस्पती सापांना दूर ठेवते किंवा त्यांना घराजवळ येऊ देत नाहीत, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. या विषयावर मोठ्या प्रमाणावर संशोधनही झालेलं नाही," असं डॉ. प्रकाशराव म्हणाले.
काही वनस्पतींना काही खास गुणधर्म असतात म्हणून साप त्या वनस्पतींना घाबरतात, जवळ येत नाहीत, असा समज लोकांमध्ये पसरला आहे. पण हा सर्व लोकांचा फक्त विश्वास किंवा श्रद्धा असून, त्याला वैज्ञानिक आधार नाही, असं डॉ. प्रकाशराव यांनी बीबीसीला सांगितलं.
सापांना दूर ठेवणारी वनस्पती म्हणून प्रसिद्ध
क्रॉथलेरिया व्हेरुकोसा म्हणजेच पांढरी ईश्वरी, ही एक जंगली वनस्पती आहे. अनेक लोकं ही वनस्पती सापांना दूर ठेवते असं मानतात. याच प्रजातीतील दुसरी वनस्पती म्हणजे काळी ईश्वरी (ब्लॅक क्रॉथलेरिया).
काळी ईश्वरीबद्दलही सापांपासून संरक्षण मिळतं, असा समज आहे. अलीकडे पांढरी ईश्वरीबद्दल सोशल मीडियावर खूप व्हीडिओ दिसतात. परंतु, आतापर्यंत पांढरी किंवा काळी ईश्वरी सापांना दूर ठेवते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. या झाडातील अल्कलॉइड्सचा वास थोडा तीक्ष्ण असतो, इतकंच ज्ञात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
'स्नेक प्लांट' (पॉलीगोनम पर्सिकारिया किंवा पर्सिकारिया मॅक्युलोसा)
या वनस्पतीच्या पानांवर 'व्ही' आकाराचा गडद ठिपका असतो. हा ठिपका कधी कधी सापाच्या चिन्हासारखा वाटतो. म्हणूनच याला 'सापाचं चिन्ह' असंही लोक म्हणतात.
या आकारामुळे साप या वनस्पतींपासून दूर राहतात, असा समज आहे. ही धारणा इतकी वाढली की, काही नर्सरींमध्ये ही वनस्पती थेट सापांना दूर ठेवण्यासाठी विकली जाते. पण ही फक्त लोकांची धारणा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जगभर स्नेक प्लांट म्हणून ओळखली जाणारी ही शोभेची वनस्पती आहे. याची पानं उंच, सरळ आणि सुरीसारखी टोकदार असतात. त्यामुळे साप जवळ आला तर त्याच्या शरीराला इजा होईल, म्हणून साप या वनस्पतीपासून दूर राहतो, असा समज आहे.
म्हणूनच ही वनस्पती ठेवलेल्या ठिकाणी साप येत नाहीत, असं लोक मानतात. पण या विश्वासाला कसलाही वैज्ञानिक पुरावा नाही. हा फक्त नावावर आधारित पसरलेला मानसिक किंवा 'मानसशास्त्रीय प्रचार' आहे.
पिट्टोस्पोरम (पिटोस्पोरम टेट्रास्पर्मम)
पूर्व घाटातील काही आदिवासींनी वाढवलेली ही एक तीव्र वासाची वनस्पती आहे. या झाडाची फांदी किंवा पानं तोडली की उग्र वास पसरतो. स्थानिकांच्या मते, या तीक्ष्ण वासामुळे काही लहान प्राणी आणि कीटक दूर राहतात.

ही वनस्पती असलेल्या जागी कधीही साप आला नसल्याचा स्थानिकांचा अनुभव आहे. मात्र या वासाचा सापांवर काही परिणाम होतो का, याबद्दल कोणतंही वैज्ञानिक संशोधन झालेलं नाही.
"या सर्व वनस्पती सापांना दूर ठेवतात, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. म्हणजेच, 'ही वनस्पती असेल तर साप येणारच नाहीत', असं मानणं हे फक्त एक मिथक, म्हणजेच आधार नसलेली धारणा आहे," असं डॉ. जे. प्रकाशराव यांनी सांगितलं.
साप वनस्पतींना घाबरतात का, हा प्रश्न बीबीसीने आंध्र विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील प्रा. सी. मंजुलता यांना विचारला.
"सापांची नजर फारशी चांगली नसते. पण गंध किंवा वास ओळखण्यात ते खूप तीक्ष्ण असतात. काही वनस्पतींमधील कडवट वास देणारे अल्कलॉइड्स, तिखट रसायनं, तसेच संत्री–लिंबाच्या सालींमधून येणारे वास सापांना 'त्रासदायक' वाटू शकतात.
वास अचूक ओळखण्यासाठी सापाच्या तोंडाच्या वरच्या दाढेजवळ जेकब्सन ऑर्गन नावाचा एक विशेष अवयव असतो. तो वास ओळखणाऱ्या सेन्सरसारखं काम करतो," असं प्रा. सी. मंजुलता यांनी सांगितलं.
"साप जेव्हा आपली जीभ बाहेर काढतो आणि परत आत घेतो, तेव्हा ते फक्त वास ओळखण्यासाठी नसून त्या वासातील रसायनं जाणून घेण्यासाठी तसे करतात. काही वनस्पतींमधून कडवट, उग्र वास येतात. त्या ठिकाणी साप जाणं टाळतो," असं त्यांनी सांगितलं.
"केवळ सापच नव्हे, तर अनेक कीटकही काही वनस्पतींमधून येणाऱ्या वासामुळे त्या ठिकाणी येत नाहीत," असंही प्रा. मंजुलता नमूद करतात.
या वनस्पतींचा मानवाला धोका नाही का?
आतापर्यंत उल्लेख केलेल्या पांढरी ईश्वरी, पडग सारख्या वनस्पतींमधून येणाऱ्या उग्र वासामुळे साप दूर राहतात, हे समजलं. पण हा गंध किंवा वास माणसांसाठी पूर्ण सुरक्षित आहे का?
यावर प्राणी आणि वनस्पतिशास्त्र तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की, श्वासातून जास्तप्रमाणात हा वास घेतल्यास डोकेदुखी, चक्कर, जुलाब, पोटदुखी, उलट्या यासारखी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे ही वनस्पती घरात किंवा लहान मुलांच्या आसपास ठेवू नये."
साप कुठून येतात?
"मोगली, संपेंगा अशा वनस्पती असलेल्या ठिकाणी साप येतात असं म्हणतात. ते वनस्पती किंवा फुलं यामुळे नाही, तर त्या ठिकाणी राहण्यासाठी योग्य परिस्थिती असल्यामुळे साप तिकडे येतात. म्हणून केवळ मोगली किंवा संपेंगा वनस्पतींजवळच नाही, तर अशा परिस्थिती जिथे असते, तिथे साप येऊ शकतात," असं प्राध्यापक सी. मंजुलता यांनी सांगितलं.
"मोगली, संपेंगा अशी वनस्पती असलेल्या ठिकाणी गडद, दाट सावली असते, माती थोडी ओलसर असते आणि लहान कीटक जास्त प्रमाणात असतात. वनस्पतीमुळे अशी ठिकाणे दाट होतात, ज्यामुळे सापांना तिथे लपणं सोयीस्कर असतं," असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
प्रा. मंजुलता म्हणाल्या की, "खरं म्हणजे, साप वनस्पतींच्या वासामुळे नाही तर त्यांचं अन्न म्हणजेच उंदीर, सरडे किंवा इतर प्राणी आढळणाऱ्या ठिकाणांवर जास्त येतात. तसेच, साप जिथे सुरक्षित वाटतं, तिथे जास्त आकर्षित होतात."
साप येऊ नये म्हणून काय करावं?
साप घरात किंवा घराभोवती येण्याची अनेक कारणं असतात, असं प्रा.मंजुलता यांनी सांगितलं.
"साप सहसा जिथे अन्न मिळू शकतं अशा ठिकाणी येतात. उंदीर, चिमण्यांची घरटी, पाण्याची गळती, कचरा, लाकडांचे ढिगारे असतील तर साप येऊ शकतात. उंदीर आणि सरडे सापांचं मुख्य अन्न आहे, तसेच ओलसर ठिकाणं सापांसाठी योग्य असतात."
"तसेच पेरू, आंबा, जर्दाळू, ताडी अशी झाडं असलेल्या ठिकाणी साप जास्त दिसतात. पण साप फळांसाठी येत नाहीत. खाली पडलेले फळं उंदीर खातात, आणि उंदरांसाठी साप येतात," असं प्राध्यापक मंजुलता यांनी सांगितलं.

"जिथे कचरा असतो किंवा स्वच्छता नसते, तिथे उंदीर आणि कीटकांचा संख्या जास्त असते. अशा ठिकाणी साप येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घर किंवा परिसर स्वच्छ न ठेवता कोणतंही झाड किंवा वनस्पती लावली तरी साप येण्याची शक्यता नाकारता येत नाही."
वनस्पती किंवा झाडांचा वास नाही तर परिसराची परिस्थितीच सापांना जास्त आकर्षित करते किंवा दूर ठेवते. त्यामुळे वनस्पती असलेली जागा स्वच्छ ठेवली तर साप येण्याची शक्यता खूप कमी होते.
वनस्पती आणि साप यांचा खरंच संबंध आहे का?
सापांना थेट आकर्षित करणारी कोणतीही वनस्पती नाही. तसेच, कोणतेही झाड असल्यामुळे साप तिथे येत नाहीत, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
काही वनस्पती ज्या परिसरात किंवा वातावरणात आहेत, ते सापांना आकर्षित करतात, तर काही वनस्पतींच्या गुणधर्मांमुळे साप आणि कीटक त्या ठिकाणी येत नाहीत.
सापांचा कोणत्या झाडाशी किंवा वनस्पतीशी थेट संबंध आहे, किंवा कोणती वनस्पती साप दूर ठेवते, यासंबंधी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, असं डॉ. जे. प्रकाशराव यांनी बीबीसीला सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











