मजरूह सुल्तानपुरी : पंडित नेहरूंविरोधात नज्म लिहिली म्हणून तुरुंगात गेलेला शायर

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

मजरूह सुल्तानपुरी त्यांच्या शायरी किंवा काव्याबद्दल म्हणायचे, "हे काम मी कसंबसं पूर्ण तर केलं. मात्र, एवढं नक्की की, मी पूर्ण कवी झालो नाही आणि पूर्ण गीतकारसुद्धा झालो नाही."

व्यावसायिक चित्रपटांसाठी लेखन करण्याबाबत त्यांच्या मनात कोणताही संकोच किंवा लज्जेचा भाव नव्हता. मात्र, तरीदेखील त्यांनी चित्रपटातील कामांसाठी मिळालेल्या पुरस्काराच्या ट्रॉफीबरोबर कधीही फोटो काढले नाहीत. ते म्हणायचे, "मी चित्रपटांच्या दुनियेचा माणूस नाही."

मजरूह सुल्तानपुरी यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 झाला होता. त्यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खाँ असं होतं. त्यांचे वडील मोहम्मद हुसैन पोलीस शिपाई होते.

त्यांचं सुरुवातीचं शिक्षण अरबी, फारसी आणि उर्दू भाषांमध्ये झालं होतं. 1933 मध्ये ते मौलवी, आलिम आणि फाजिलचं शिक्षण घेण्यासाठी अलाहाबादला (आताचं प्रयागराज) गेले होते. मात्र, त्यांना तिथून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी वैद्य होण्याचं ठरवलं.

त्यांनी लखनौमध्ये तीन वर्षे यूनानी म्हणजे ग्रीक वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. नंतर त्यांनी तिथे एक क्लिनिकदेखील सुरू केलं. मात्र, ते काही महिनेच चाललं. कारण मजरूह सुल्तानपुरी यांच्या नशिबात शायर होणं लिहिलं होतं.

जिगर मुरादाबादींचे झाले शिष्य

त्याकाळी लखनौ शहर शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र होतं. मजरूह यांनी मुशायरांमध्ये जाण्यास सुरूवात केली. तिथून प्रेरणा घेऊन ते शायरी म्हणजे कवितादेखील करू लागले.

पहिल्यांदा जेव्हा त्यांनी एका व्यासपीठावर त्यांची शायरी ऐकवली तेव्हा त्यांचं खूप कौतुक झालं.

उर्दूतील प्रसिद्ध शायर जिगर मुरादाबादी मजरूह यांच्या प्रतिभेनं इतके प्रभावित झाले की त्यांनी मजरूह यांना त्यांचा शिष्य करून घेतलं.

मानेक प्रेमचंद यांनी 'मजरूह सुत्लानपुरी द पोएट फॉर ऑल रीजन्स' हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात ते लिहितात, "1939 मध्ये जिगर मुरादाबादी मजरूह यांना घेऊन अलीगडला गेले. तिथे त्यांनी या तरुण शायरचा परिचय शहरातील शायरीसंपन्न वातावरणाशी करून दिलं. 1945 मध्ये ते प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन (पीडब्ल्यूए) चे सदस्य झाले."

कुलदीप कुमार यांचा 'मजरूह सुल्तानपुरी द वूंडेड हार्ट' हा लेख 20 फेब्रुवारी 2020 ला 'द हिंदू' या वृत्तपत्रात छापला होता.

या लेखात त्यांनी लिहिलं होतं, "असरार उल हसन यांनी खूप तरुण वयात शायरी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळेस ते 'नासेह' या टोपणनावानं शायरी करायचे. मग ते एका मुलीच्या प्रेमात पडले, मात्र तिचं प्रेम त्यांना मिळू शकलं नाही. त्यानंतर त्यांनी स्वत:चं नाव 'मजरूह' असं ठेवलं. त्याचा अर्थ 'जखमी' असा होतो."

सहगलनं गायलं मजरूह यांचं गीत 'जब दिल ही टूट गया'

1944 मध्ये आह सीतापुरी, जिया सरहदी आणि जोश मलीहाबादीसारखे अनेक बडे शायर मुंबईत नावलौकिक कमावत होते. त्यामुळे पुढच्याच वर्षी जेव्हा जिगर यांनी मजरूह यांना मुंबईला येण्याबद्दल विचारलं, तर ते लगेचच तयार झाले.

मजरूह मुंबईत चित्रपटांमुळे आले नव्हते तर तिथे होणाऱ्या मुशायऱ्यांमुळे आले होते.

त्याच काळात, चित्रपट निर्माते ए आर कारदार आणि संगीतकार नौशाद, नव्या गीतकारांच्या शोधात होते. कारण प्रस्थापित झालेले गीतकार जास्त मोबदला मागू लागले होते.

कारदार आणि नौशाद यांनी मजरूह यांची शायरी एका मुशायऱ्यात ऐकली आणि ते मजरूह यांचे चाहते झाले. त्यांच्या 'शाहजहाँ' या चित्रपटासाठी गीतं लिहिण्याविषयी मजरूह यांना विचारलं.

मजरूह यांनी सुरुवातीला तर नकार दिला मात्र जिगर मुरादाबादी यांच्या सांगण्यावरून ते चित्रपटासाठी गीत लिहिण्यास तयार झाले.

मानेक प्रेमचंद लिहितात, "खुमार बाराबंकवी आणि मजरूह सुल्तानपुरी या दोघांनाही जिगर मुरादाबादी यांनी फक्त शोधून काढलं नाही तर स्वत:चं शिष्यदेखील केलं. 1945 मध्ये हे दोन्ही शायर मुशायऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत आले होते."

"इथे कारदार आणि नौशाद यांच्या नजरेत ते आले होते. त्यानंतर या दोघांनाही चित्रपटाची गीतं लिहिण्याचं काम देण्यात आलं होतं."

"खुमार यांनी सहगलसाठी 'ऐ दिल-ए-बेकरार झूम' हे गीत लिहिलं होतं. तर मजरूह यांनी सहगलसाठी 'जब दिल ही टूट गया' हे गीत लिहिलं होतं. हे गीत सहगल यांना इतकं आवडायचं की त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की जेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील तेव्हा 'जब दिल ही टूट गया, हम जी के क्या करेंगे' हे गीत वाजवण्यात यावं."

मजरूह यांना एक वर्षाचा तुरुंगवास

मजरूह यांना भारताच्या भवितव्याबद्दल खूप चिंता वाटायची. त्यांना वाटायचं की देशाचं नेतृत्व चुकीच्या हाती आहे.

त्याच काळात त्यांनी एक गीत लिहिलं होतं, ज्यात त्यांनी नेहरूंची तुलना हिटलरशी केली होती.

मजरूह यांचं गीत होतं,

अमन का झंडा इस धरती पे किसने कहा लहराने ना पाए

ये भी कोई हिटलर का है चेला, मार ले साथी, जाने न पाए

कॉमनवेल्थ का दास है नेहरू, मार ले साथी जाने ना पाए

मानेक प्रेमचंद लिहितात, "त्यावेळेस मुंबईत कामगारांचं आंदोलन सुरू होतं. कामगारांच्या एका सभेत मजरूह यांनी नेहरू यांच्या विरोधातील ही कविता म्हटली. त्यानंतर मुंबई सरकारनं त्यांच्याविरोधात अटकेचा वॉरंट जारी केला."

"मग मजरूह भूमिगत झाले आणि पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यादरम्यान प्रसिद्ध लेखक राजेंदर सिंह बेदी, ज्यांनी नंतर 'दस्तक' आणि 'फागुन' हे चित्रपट बनवले, ते गुपचूप मजरूह यांच्या कुटुंबाला पैसे पाठवत राहिले."

"त्याच दिवसांमध्ये राज कपूर यांनीदेखील मजरूह यांना एका गीतासाठी 1,000 रुपये दिले होते. विशेष म्हणजे त्यावेळेस अगदी टॉपच्या गीतकारालादेखील एका गीतासाठी 500 रुपये मिळायचे."

"ते गाणं होतं - 'दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई.' नंतर 1966 मध्ये या गीताच्या मुखड्याला शैलेंद्र यांच्या 'तिसरी कसम' या चित्रपटात वापरण्यात आलं."

1951 मध्ये सज्जाद जहीर आणि फैज अहमद फैज या कम्युनिस्ट लेखकांना रावळपिंडी कॉन्स्पीरसी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याच्याविरोधात प्रोग्रेसिव्ह रायटर्सची एक सभा झाली होती. त्यात मजरूह सहभागी झाले होते.

त्यांना व्यासपीठावरच अटक करण्यात आली होती. त्यानंतर एक वर्षभर त्यांना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

मुंबईचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी मजरूह यांना त्यांच्या गीतासाठी माफी मागण्यास सांगितलं होतं. मात्र मजरूह यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.

मजरूह यांच्याबरोबर प्रसिद्ध अभिनेते बलराज साहनी यांना देखील कम्युनिस्ट पार्टीच्या मोर्चात हिंसा भडकावण्याच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आलं होतं.

पीडब्ल्यूएच्या बैठकांमध्ये जोमानं सहभाग

तुरुंगात असतानादेखील मजरूह यांनी चित्रपटांसाठी गीतं लिहिणं सुरू ठेवलं होतं.

1952 मध्ये ते तुरुंगातून बाहेर येताच कमाल अमरोही यांनी त्यांच्या 'दायरा' या चित्रपटासाठी गीत लिहिण्याचं काम मजरूह यांना दिलं.

त्याकाळी दर रविवारी पीडब्ल्यूएशी संबंधित लेखकांची बैठक व्हायची. मजरूह यांनी तिथेच दोन ओळी म्हटल्या होत्या, ज्यामुळे ते संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले होते.

त्या ओळी होत्या,

मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर

ग़ैर साथ आते गए और कारवाँ बनता गया

या ओळींवर जेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लेखकांचं मत विचारण्यात आलं, तेव्हा तरुण कवी जफर गोरखपुरी यांनी हात वर केला. ते म्हणाले की मजरूह यांच्या ओळींमध्ये असलेला 'गैर' हा शब्द योग्य नाही. कवीसाठी कोणीही 'गैर' म्हणजे परका असू शकत नाही.

तिथे उपस्थित असलेले अली सरदार जाफरी म्हणाले की ते गोरखपुरी यांच्याशी सहमत आहेत. त्यांनी मजरूह यांना सल्ला दिला की 'गैर' या शब्दाऐवजी दुसऱ्या एखाद्या शब्दाचा वापर करावा.

मग मजरूह यांनी 'गैर' या शब्दाऐवजी 'लोग' हा शब्द वापरला.

मजरूह यांची जबरदस्त प्रतिभा

उर्दू साहित्यात मजरूह सुल्तानपुरी यांना जे स्थान मिळायलं हवं होतं, ते मिळू शकलं नाही.

मात्र मजरूह सुल्तानपुरी असे गीतकार होते, ज्यांनी सर्व काळांनुरुप गीतं लिहिली.

'फिर वो जब दिल ही टूट गया', 'इक लड़की भीगी भागी सी', 'बाबूजी धीरे चलना प्यार में ज़रा संभलना', 'तेरे-मेरे मिलन की ये रैना', 'आजा पिया तोहे प्यार दूं', 'चुरा लिया है तुमने जो दिल को', 'ओ मेरे दिल के चैन' सारखी अप्रतिम गाणी मजरूह यांनी लिहिली आहेतच.

त्याचबरोबर 1990 च्या दशकातील 'राजा को रानी से प्यार हो गया', 'पहला नशा पहला ख़ुमार', 'आज मैं ऊपर आसमां नीचे'...सारखी लोकप्रिय आणि हिट गाणीदेखील त्यांनी लिहिली.

यावरून वेगवेगळ्या दशकातील वेगवेगळ्या पिढ्यांना भावणारी आणि त्या काळाला साजेशी अशी गाणी लिहिण्याची त्यांची प्रतिभा दिसून येते.

उर्दूचे प्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक वारिस किरमानी यांनी 'कुलह काज का बाँकपन' मध्ये लिहिलं आहे, "हीच स्थिती इंग्रजी साहित्यात सॅम्युअल जॉन्सन आणि टॉमस ग्रे यांची होती. उर्दू साहित्यात मजरूह यांना वरचं स्थान मिळालं नाही. कारण त्यांनी कमी साहित्य लिहिलं. चित्रपटांसाठी त्यांनी सुंदर लिहिलं आहे. मात्र चित्रपटांबाहेर त्यांनी 150 पेक्षा कमी कविता किंवा गीतं लिहिली आहेत."

प्रसिद्ध पत्रकार सुभाष राव 'युग्तेवर' यांनी जानेवारी-मार्च 2020 च्या अंकात लिहिलं आहे, "साहित्यिक अनेकदा चित्रपट गीतकारांना गांभीर्यानं घेत नाहीत. मला वाटतं की हे योग्य नाही."

"शैलेंद्र, साहिर, शकील बदायूँनी आणि मजरूह यांची गीतं सर्वसामान्यांना फक्त यामुळेच भावली नाहीत की त्या गीतांमध्ये यमक साधण्यात आलं होतं."

अली सरदार जाफरी लिहितात, "सर्वसाधारणपणे शायर सामाजिक आणि राजकीय समस्या व्यक्त करण्यामुळे कंटाळवाणे होतात. मात्र त्यांच्या अभिव्यक्तीची शैली अशी होते की नज्म आणि गजल मध्ये फरकच राहत नाही. मजरूह यांच्या बाबतीत मात्र असं नाही."

दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले, मजरूह सुल्तानपुरी हे पहिले गीतकार होते.

अश्लील आणि द्वयर्थी गाण्यांना स्थान न देणारे मजरूह

1948 मध्ये मजरूह सुल्तानपुरी यांनी राज कपूर यांच्या 'आग' या चित्रपटातील गीतं लिहिली होती.

राजीव विजयकर यांनी 'मैं शायर तो नहीं' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात राजीव लिहितात, "एकदा मजरूह नर्गिस यांच्याबरोबर 'आग' चित्रपटाच्या सेटवर गेले होते. त्यावेळेस राज कपूर यांच्याबरोबर त्यांची भेट घालून देण्यात आली होती. त्यावेळेस राज कपूर यांनी मजरूह यांना एक गीत लिहिण्याची विनंती केली. त्यांनी त्याचवेळी गीत लिहिलं. ते गीत होतं- 'रात को जी चमके तारे'."

60 आणि 70 च्या दशकात मजरूह यांची कारकीर्द शिखरावर होती. त्याकाळात त्यांनी आर डी बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, ओ पी नय्यर, रोशन आणि एस डी बर्मन सारख्या ख्यातनाम संगीतकारांबरोबर काम केलं.

राजीव विजयकर पुढे लिहितात, "ज्यावेळेस मजरूह यांनी जगाचा निरोप घेतला, त्यावेळेस त्यांनी लिहिलेली गाणी जे तरुण-तरुणी गात होते, ते मजरूह यांच्या नातवंडांच्या-पतवंडांच्या वयाचे होते. मी जेव्हा जेव्हा मजरूह यांना भेटलो, तेव्हा त्यांच्या सभ्यपणाचा, सौजन्याचा माझ्यावर खूपच प्रभाव पडला."

"त्यांचं म्हणणं होतं की मी माझ्या गीतांच्या साहित्यिक मांडणीशी तडजोड करण्यास भलेही तयार असेन, मात्र मी कधीही अश्लील आणि द्वयर्थी गाणी लिहिणार नाही."

समकालीन गीतकारांशी निरोगी स्पर्धा

मजरूह यांनी त्यांचे समकालीन गीतकार, सहकारी आणि त्यांच्या स्वत:वर पडलेल्या प्रभावाबद्दल खूपच प्रामाणिकपणे मतं मांडली आहेत.

एका मुलाखतीत मजरूह म्हणाले होते, "ज्यावेळेस शकील बदायूँनी यांनी 'चौदहवी का चाँद' हे गीत लिहिलं होतं, तेव्हा मला त्यांच्यापुढे जायचं होतं. त्यामुळे मी 'अब क्या मिसाल दूँ मैं तुम्हारे शबाब की' हे गीत लिहिलं.'

"जेव्हा साहिर यांनी 'चुरा ले ना तुमको ये मौसम सुहाना' हे गीत लिहिलं, त्यावेळेस त्याला टक्कर देण्यासाठी मी, 'इन बहारों में अकेले न फिरो, राह में काली घटा रोक ना ले' हे गीत लिहिलं."

मदन मोहन आणि सचिव देव बर्मन यांचं संगीत मजरूह यांना प्रचंड आवडायचं. देव आनंद यांच्यावर चित्रित झालेलं 'हम बेख़ुदी में तुमको पुकारे चले गए' हे गाणं देखील त्यांना खूपच आवडायचं. मात्र जेव्हा त्यांच्या गीताला कोणताही पुरस्कार मिळाला नाही, तेव्हा ते खूपच निराश झाले.

चित्रपटसृष्टीतील अनेक गायकांनी त्यांच्या करियरमध्ये गायलेलं पहिलं गाणं, मजरूह सुल्तानपुरी यांचंच होतं. सुधा मल्होत्रा यांच्या चित्रपट कारकीर्दीतील, 'मिला गए नैन' हे पहिलं गाणं मजरूह यांनीच लिहिलं होतं.

त्याचप्रमाणे संगीतकार म्हणून उषा खन्ना यांच्या 'दिल देके देखो' या पहिल्या चित्रपटातील सर्व गाणी मजरूह यांनीच लिहिली होती.

'मेरे सपनों की रानी' हे मोहम्मद रफी यांच्याबरोबर के एल सहगल यांनी गायलेलं एकमेव गाणं देखील मजरूह यांनीच लिहिलं होतं.

सचिन देव बर्मन आणि मजरूह सुल्तानपुरी यांची जोडी

सचिन देव बर्मन यांच्याबरोबर मजरूह यांनी अनेक चित्रपट केले.

विशेष म्हणजे 1 ऑक्टोबर हाच या दोन्ही दिग्गजांचा जन्मदिवस होता. दोघांनाही पान खायला आवडायचं, तसंच दोघांनी खोडकर गाणी बनवायला आवडायचं.

अंतारा नंदा मंडल यांनी 'मिसचिफ अँड मेलोडीज विथ एस डी बर्मन' हा लेख लिहिला आहे.

त्यात त्या लिहितात, "कल्पना करा, गाण्यामध्ये नायक प्रश्न विचारतो आहे, 'आँचल में क्या जी' आणि नायिका त्याला उत्तर देते आहे, 'अजब सी हलचल जी'. शिवाय त्या दिवसांमधील कडक सेन्सॉरनं हे गाणं पासदेखील केलं होतं."

"याचप्रकारे मजरूह-बर्मन यांच्या जोडीचं एक गाणं राज खोसला यांनी काला पानी या चित्रपटात चित्रित केलं होतं. ते गाणं होतं - अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना."

या दोघांच्या जोडीनं चलती का नाम गाडी या चित्रपटादेखील धमाल उडवून दिली होती. चित्रपटात मजरूह यांनी 'एक लडकी भीगी भागी सी' हे गीत लिहिलं होतं.

या चित्रपटातील गीतांचं वैशिष्ट्यं असं होतं की मजरूह यांनी सर्वसामान्य वापरातील शब्दांचा दोन-दोन वेळा वापर केला होता- 'डगमग-डगमग लहकी-लहकी, भूली- भटकी बहकी-बहकी.'

बर्मन, मजरूह यांना 'मुज़रू' म्हणून हाक मारायचे.

बंगाली चित्रपटांचे पटकथाकार नबेंदु घोष यांनी याबद्दलची एक आठवण लिहिली आहे, "सचिन दा यांनी डोळे बंद करून हार्मोनियमवर बोटं फिरवत गायला सुरूवात केली. दादा उर्दूमधील 'की' आणि 'का' या शब्दांच्या उच्चारणात चूक करत होते. मजरूह त्यांची चूक वारंवार दुरुस्त करत होते. त्यानंतर बर्मन योग्य उच्चारणासह गात होते. मात्र पुन्हा त्यांच्याकडून चूक झाली."

"मजरूह यांनी त्यांना ती चूक लगेचच लक्षात आणून दिली. त्यावर वैतागून दादा म्हणाले, 'ओहहह मुज़रू. उर्दू में जेंडर का मसला बार बार क्यों आ जाता है? अगली बार अपने गाने बांग्ला में लिखना.' त्यावर मजरूह जोरात हसू लागले."

कार चालवण्याची आवड

मजरूह यांचं, सबा या त्यांच्या मुलीवर खूप प्रेम होतं. सबा जेव्हा शाळेतून घरी यायची, तेव्हा तिला पाहून मजरूह गायचे, 'ये कौन आया रौशन हो गई महफ़िल किस के नाम से.'

सबा सांगतात की, "त्यांनी माझ्यासाठी 'नन्ही कली सोने चली' हे अंगाई गीत लिहिलं होतं. माझी आई मला झोपवायचा प्रयत्न करत होती. तेव्हा त्यांनी दोन मिनिटात हे अंगाई गीत लिहिलं होतं."

मजरूह यांचे पुत्र अंदलीब सुल्तानपुरी सांगतात, "वडिलांकडे एक शेवर्ले कार होती. त्या काळी चित्रपटाच्या गीतकाराकडे कार असणं ही मोठी गोष्ट मानली जायची. त्यांना स्वत:च्या कारमधून फिरायला खूप आवडायचं. ते त्यांच्या शेवर्ले मधून जाताना ड्रायव्हरला बाजूला बसवायचे आणि स्वत:च कार चालवायचे."

वयाच्या 80 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मजरूह यांना मांसाहार करायला फार आवडायचं. विशेषकरून खीमा, कबाब आणि कोरमा हे त्यांच्या आवडीचे पदार्थ होते. मात्र ते खूप कमी खायचे.

17 मे 2000 ला त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे फक्त शाकाहारी जेवणच दिलं जात होतं. त्यामुळे ते खूप त्रासले होते.

तीन दिवसांनी जेव्हा त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली, तेव्हा ते खूप खूश झाले. त्यांनी त्यांच्या आवडीचं जेवण केलंच होतं की तितक्यात त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

24 मे 2000 ला या प्रतिभावान गीतकारानं शेवटचा श्वास घेतला.

उर्दूतील प्रसिद्ध समीक्षक गोपीचंद नारंग यांनी लिहिलं, "मजरूह यांच्या जाण्यामुळे प्रोग्रेसिव्ह युगातील गजलांचा मीर तकी मीर गेला, ही खूपच दु:खाची गोष्ट आहे."

1953 मध्ये मजरूह यांनी 'बागी' या चित्रपटासाठी एक गीत लिहिलं होतं. ते गीत त्यांच्या बाबतीत पूर्णपणे लागू पडतं.

ते गीत होतं -

हमारे बाद अब महफ़िल में अफ़साने बयां होंगे

बहारें हमको ढूंढेंगी न जाने हम कहाँ होंगे..

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)