You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ खडसे म्हणतात, 'फडणवीस महत्त्वाकांक्षी, ते अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत'
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं दिसत आहे. या सगळ्या घडामोडींमागे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा शरद पवार यांनी आरोप केला आहे.
गेली 40 वर्षं भाजपमध्ये काम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना काय वाटतं? ते कोणत्या पवारांसोबत आहेत?
बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी एकनाथ खडसे यांची मुलाखत घेऊन, याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. तसंच, सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर संवादही साधला. ही मुलाखत जशीच्या तशी पुढीलप्रमाणे :
प्रश्न - अजित पवार सरकारमध्ये जाणार आहेत, याविषयी तुम्हाला कल्पना होती का?
एकनाथ खडसे - राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल आणि अजित पवार सरकारमध्ये सामील होतील याची मला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. याची शक्यताही मला वाटत नव्हती.
याआधी त्यांनी विरोधी पक्षनेत्याऐवजी पक्षातली जबाबदारी द्यावी, असं म्हटलं होतं. तेव्हा त्यांची नाराजी दिसली होती. पण ते एवढं मोठं पाऊल उचलतील असं मला वाटलं नव्हतं.
प्रश्न – सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष म्हणून निवडलं तेव्हा पक्षात नाराजीचा सूर दिसला का?
एकनाथ खडसे - पक्षात असा नाराजीचा सूर दिसला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार जातील असंही वाटलं नाही. अशा घटना राष्ट्रवादीमध्ये आधी घडल्या होत्या.
अजित पवारांचा पहाटे शपथविधी पार पडला होता. त्यामुळे अजित पवार स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात, असं काहीजणांना वाटत होतं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल असं वाटलं नाही.
प्रश्न – तुमची बरीच राजकीय काराकीर्द भाजपात गेली आहे. तुमचे भाजपच्या नेत्यांशी अजूनही चांगले संबंध आहेत. तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून याविषयी काही सुगावा लागला होता का?
एकनाथ खडसे - भाजपमध्ये मी गेली 40 वर्षं काम केलं. पक्षातील मोठ्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. आमच्यात वेगवेगळ्या चर्चा होतात. पण याविषयी बोलणं झालं नाही. अलिकडं नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये एक भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी NCP ही ‘नॅशनल करप्ट पार्टी’ आहे असं म्हटलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा मोदींनी आरोप केला. त्या भाषणात ते म्हणाले की मी यांना तुरुंगात पाठवणार, मी त्यांना सोडणार नाही.
27 जूनला ते भाषण झालं आणि 28 जूनला राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी. जेलमध्ये जायचं की राजभवनात जायचं? यावर चर्चा झाली असावी. या सगळ्या घटना झटपट झाल्याने याची कुणाला कल्पना लागली नाही.
प्रश्न – एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार तसं पाहायला गेलं तर स्थिर होतं. विधानसभा निवडणुकीला आता कमी कालावधी राहिला आहे. तरीही भाजपने एवढा मोठा गट आपल्याकडे का वळवला?
एकनाथ खडसे - मला वाटतं त्यांना राज्यातल्या राजकारणात जास्त रस नाहीये. ते लोकसभेची तयारी करत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी तयारी केल्याचं दिसतं. त्यांना लोकसभा खासदारांची संख्या आणखी वाढवायची आहे.
प्रश्न – अजित पवारांकडून आता आमदारांची जुळवाजुळव होताना दिसत आहे. यामध्ये तुम्हाला कुणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला का?
एकनाथ खडसे - मला फक्त शरद पवारांचा फोन आला होता. त्यांनी मला बोलावून घेतलं. त्याशिवाय मला इतर कुणाशीही संपर्क झाला नाही.
प्रश्न – भविष्यात तुमच्याशी कुणी संपर्क केला तर तुम्ही पुन्हा भाजपसोबत सत्तेत सामील होणार का?
एकनाथ खडसे - नाही. मी शरद पवार साहेबांसोबतच राहणार आहे. भविष्यात ते कुठंही असतील कोणत्याही स्थितीत असले तरी मी त्यांच्यासोबतच राहणार.
प्रश्न – सध्या अनेक घडामोडी होतायत. तर यात अजित पवार मुख्यमंत्री होतील का?
एकनाथ खडसे - अजित पवार मुख्यमंत्री होण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण देवेंद्र फडणवीस महत्त्वाकांक्षी आहेत. मुख्यमंत्रिपदाची त्यांची लालसा त्यांना कधी लपवली नाहीये. सत्तेसाठी तडजोड केल्याने ते सध्या उपमुख्यमंत्री बनले आहेत. पण भविष्यात एकनाथ शिंदे गटाचे आमदार अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यात एकनाथ शिंदे पण अपात्र ठरू शकतात. त्यानंतर अजितदादांऐवजी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असा आमचा अंदाज आहे.
प्रश्न – सध्याची परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय भवितव्य कसं असू शकतं?
एकनाथ खडसे - असा अंदाज व्यक्त करणं फार कठीण झालं आहे. देवेंद्रजी यांना राज्यात जेवढा रस आहे तेवढा केंद्रात दिसत नाही. त्यामुळे ते इथेच फोडाफोडीचं राजकारण करतील. पण केंद्रात स्वत:हून जाणार नाहीत.
प्रश्न – या घडामोडीनंतर महाविकास आघाडीचं भविष्य काय असू शकतं?
एकनाथ खडसे - सध्या महाविकास आघाडीला काहीही होऊ शकत नाही. नेते जरी गेले असले तरी मतदार आमच्यासोबत आहेत. या किळसवाण्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. म्हणून महाविकास आघाडीची लोकप्रियता वाढली आहे. फक्त तीनही पक्षांना एकत्र राहायाला पाहिजेत.
प्रश्न – तुम्ही जेव्हा भाजपमध्ये होता तेव्हाचं राजकारण आणि आताच्या भाजपच्या राजकारणात काय फरक जाणवतो?
एकनाथ खडसे - पूर्वीचे राजकारणी सत्तेचे लालची नव्हते. सत्तेसाठी इतर पक्ष फोडण्याचा त्यांचा विचार नव्हता. वाजपेयी, अडवाणी, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन या सगळ्यांचं राजकारण मी जवळून पाहिलं आहे. मी त्यांच्यासोबत काम केलं आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांनी एक मतासाठी राजीनामा दिला होता. पण त्यांनी शक्य असतानाही तोडफोडीचं राजकारण केलं नाही. उलट पंतप्रधान पद सोडलं.
नैतिकता पाळून भाजपात राजकारण व्हायचं. पण 2014 मध्ये नरेंद्र मोदी आल्यानंतर देशाच्या राजकारणाने एक वेगळीच कलाटणी घेतली. त्यामुळे आधीच्या गोष्टी आता दिसत नाहीत.
प्रश्न – राष्ट्रवादी पक्षासमोर आता कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. शिवसेनेप्रमाणे यांचीही स्थिती झालीये. तर याकडे तुम्ही कसं पाहता?
एकनाथ खडसे - सुप्रीम कोर्टाने सेनेबाबत जो निर्णय दिला तोच इथेही लागू होतो. सुप्रीम कोर्टाने मूळ पक्ष उद्धव ठाकरेंचा असल्याचं सांगतलं. तसंच मूळ राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचा आहे आणइ तो त्यांचाच राहील. 55 पैकी 54 आमदार जरी तिकडे गेले तरी मूळ पक्ष शरद पवारांचाच राहील.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)