'50 खोक्यां'च्या आरोपावर शिंदे गटाचा अब्रू नुकसानीच्या दाव्याचा इशारा #5 मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आलेल्या महत्त्वाच्या बातम्या
1. सुप्रिया सुळेंवर शिंदे गटाचा अब्रू नुकसानीचा दावा करण्याचा शिंदे गटाचा इशारा
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तयार केलेली घोषणा 50 खोके एकदम ओके, यावरून तयार झालेला वाद अद्यापही मिटण्याची चिन्हं नाहीत.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात यावरुनच वाद निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाणार असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनाही इशारा दिला.
विजय शिवतारे म्हणाले, “काल सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, जर माझ्यावर कोणी असे आरोप केले असते तर मी त्याला नोटीस दिली असती. मी त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला असता, मानहानीचा खटला केला असता. सुप्रिया सुळेंचा हा सल्ला आम्ही ऐकलेला आहे. माझी बऱ्याच आमदारांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.
"हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जर इतक्या ताकदीने महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जे हिंदुत्वाचं नैसर्गिक सरकार बनलेलं आहे, त्याला जर अशाप्रकारे दोष दिले जात असतील आणि त्याची बदनामी केली जात असेल तर निश्चितपणे 50 आमदारांच्यावतीने प्रत्येकी 50 कोटी असे 2 हजार 500 कोटींचे अब्रुनुकसानीचे दावे, मानहानीचे खटले, उद्या त्याची प्रक्रिया सुरू होत आहे, नोटीस दिल्या जातील.”
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
2. शिवसेना नेते संजय राऊतांच्या जामिनावर आज सुनावणी

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी होणार असून आज न्यायालय आपला निर्णय सुनावणार आहे. दरम्यान, तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
तर, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं (ED) केला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे.
एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
3. नितीन गडकरी: देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं खुलेआम कौतुक केलं.
गडकरी म्हणाले की, आर्थिक सुधारणांसाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे. गडकरी मंगळवारी TIOL पुरस्कार 2022 कार्यक्रमाला संबोधित करत होते. हा कार्यक्रम 'TaxIndiaOnline' पोर्टलने आयोजित केला होता.
भारतातील गरीब लोकांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने उदार आर्थिक धोरणाची गरज असल्याचंही केंद्रीय मंत्री म्हणाले. मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांनी भारताला एक नवी दिशा दिली, ज्यामुळे उदारमतवादी अर्थव्यवस्था झाली, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
ही बातमी आज तकनेदिली आहे.
4. न्या. चंद्रचूड होणार देशाचे 50वे सरन्यायाधीश, आज शपथविधी

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Dhananjay Yashwant आज देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ देतील. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असतील.
चंद्रचूड हे न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची जागा घेतील, ज्यांनी 11 ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून 1998 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
29 मार्च 2000 ते 31 ऑक्टोबर 2013 या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
ही बातमी इंडिया न्यूजने दिली आहे.
5. ‘हिंदू’ वादावर माफीनाम्यास जारकीहोळी यांचा नकार; भाजपची टीका, काँग्रेसनेही हात झटकले
कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी ‘हिंदू’ शब्दाच्या व्युत्पत्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागण्यास सपशेल नकार दिला. आपण जे छापले गेले आणि प्रकाशित केले त्या आधारावर बोलल्याचे सांगत आपण विधानावर ठाम असल्याचेही ते म्हणाले. हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सांगत काँग्रेसने हात झटकले, तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले. सोमवारी निपाणीमधील एका सभेत ‘हिंदू हा शब्द मूळचा फारसी असून त्याची उत्पत्ती इराण-इराक-कझाकस्तान या भागात झाली. याचा मूळ अर्थ इथे सांगू शकत नाही,’ असे विधान जारकीहोळी यांनी केले होते. यावर मंगळवारी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जारकीहोळीवर जोरदार टीका केली. ‘वक्तव्याबद्दल काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. सर्व स्तरांतून या वक्तव्याचा निषेध झाला पाहिजे. या वक्तव्यानंतर राहुल गांधी व सिद्धरामैयांसह काँग्रेस नेत्यांनी मौन बाळगल्याबद्दल मला आश्चर्य वाटते. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.








