श्रेयस अय्यरनं तब्येतीबाबत स्वत:च दिली माहिती; त्याला झालेली दुखापत किती धोकादायक?

फोटो स्रोत, Getty Images
दुखापतीतून सावरत असून प्रत्येक दिवसागणिक स्वतःला बरं वाटत असल्याचे टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरनं म्हटलं आहे.
अय्यरने 'एक्स'वर लिहिलं की, "माझ्यासाठी ज्यांनी प्रार्थना केल्या आणि साथ दिली, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझी दखल घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद."
25 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात झेल घेताना श्रेयसला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
34व्या षटकात अॅलेक्स कॅरीचा झेल घेताना श्रेयस जोरात पडला होता, त्यावेळी तो जखमी झाला होता.
अय्यरला प्रचंड वेदना होत होत्या, त्यामुळे त्याच्यावर आधी मैदानावरच उपचार करण्यात आले. नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.
बीसीसीआयने सोमवारी (27 ऑक्टोबर) दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, "25 ऑक्टोबर 2025 रोजी सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या डाव्या बाजूच्या खालच्या बरगड्यांना दुखापत झाली. त्यानंतर पुढील तपासणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं."
निवेदनात म्हटलं होतं, "स्कॅनमध्ये त्याच्या स्प्लीनला (प्लीहा) दुखापत झाल्याचं दिसलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो हळूहळू बरा होत आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
श्रेयसच्या 'स्प्लीन' म्हणजेच प्लीहेला दुखापत झाली आहे.
श्रेयसला अय्यरला ही दुखापत 34 व्या षटकात झाली, जेव्हा तो अॅलेक्स केरीचा झेल घेण्यासाठी मागे धावत गेला आणि डाव्या बाजूला पडला. श्रेयसला एवढ्या तीव्रपणे दुखापत झाली की, त्याच्यावर मैदानातच उपचार करण्यात आले, नंतर रुग्णालयात नेण्यात आलं.
बीसीसीआयने सोमवारी (27 ऑक्टोबर) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, "श्रेयस अय्यरला 25 ऑक्टोबर 2025 रोजी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डाव्या बरगडीच्या खालच्या भागात दुखापत झाली. त्यानंतर पुढील तपासणीसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय."

फोटो स्रोत, Getty Images
स्प्लीन म्हणजे काय?
स्पीनला मराठीत 'प्लीहा' म्हणतात. तसा सर्वसाधारणपणे वापरात नसलेला शब्द किंवा सहजी कानावर न पडलेला शब्द.
मराठी विश्वकोशातील माहितीनुसार, प्लीहा हे सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये आढळणारे एक इंद्रिय आहे. प्लीहा हे माणसाच्या लसीका संस्थेतील सर्वांत मोठे इंद्रिय असून ते उदरपोकळीच्या डाव्या बाजूला नवव्या आणि बाराव्या बरगड्यांदरम्यान असते. तिचा आकार साधारणपणे त्या व्यक्तीच्या मुठीएवढा असून वजन 150 ते 200 ग्रॅम असते.
प्लीहा ही ग्रंथी रक्ताभिसरण संस्था आणि प्रतिक्षम संस्था यांच्या कार्यांत मदत करते. जुन्या लाल रक्तपेशींचा नाश करणे आणि आणीबाणीच्या परिस्थितीसाठी रक्ताचा साठा करून ठेवणे ही तिची कार्ये आहेत. या इंद्रियात पुनर्जनन-क्षमता असते. प्लीहेच्या अभावी काही रोगांचे संक्रामण होऊ शकते.
थोडक्यात सांगायचं तर, प्लीहा रक्तासाठी फिल्टरचं काम करते. रक्तातील जीवाणू, विषाणू आणि इतर हानिकारक घटक काढून टाकते. परिणामी रक्त स्वच्छ राहतं आणि शरीराला संसर्गांपासून संरक्षण मिळतं.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींचं आयुष्य साधारण 120 दिवसांचं असतं, त्यानंतर प्लीहा त्यांना वेगळं करते. या वेगळं पाडलेल्या लाल रक्तपेशींचे अवशेष शरीरात इतरत्र पाठवले जातात, जिथे त्यांचं पुनर्निर्माण होऊन नवीन रक्तपेशी तयार होतात.
बाळाच्या जन्मापूर्वी भ्रूणाच्या शरीरात लाल आणि पांढऱ्या रक्तपेशींचं उत्पादन प्लीहेतच होतं. पण जन्माच्या आधीच प्लीहा ही क्षमता गमावते आणि पुढे हा कार्यभार अस्थिमज्जा सांभाळते.
प्लीहेशिवाय जगणं शक्य आहे?
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, प्लीहेशिवाय जगणं शक्य आहे, कारण तिचं बहुतेक काम शरीरातील इतर अवयव करतात. मात्र, प्लीहा नसलेल्या लोकांना संसर्गांचा धोका अधिक असतो.
कधी कधी एखाद्या दुखापतीमुळे प्लीहेला इजा पोहोचू शकते किंवा ती फुटू शकते. असं लगेचही होऊ शकतं किंवा दुखापतीनंतर काही आठवड्यांनीही.
NHS नुसार, प्लीहा फुटण्याची लक्षणं अशी असतात :
- डाव्या बरगडीच्या मागील बाजूस तीव्र वेदना
- चक्कर येणं आणि हृदयाचे ठोके वाढणं
प्लीहेचं फुटणं ही वैद्यकीय आपत्ती मानली जाते, कारण यात जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
दुखापतीनंतर प्लीहा सुजून मोठी होऊ शकते. काही वेळा इतर कारणांमुळेही तिचा आकार वाढतो.
प्लीहेचा आकार वाढल्याची काही थेट अशी लक्षणं नाहीत. पण तरीही काही लक्षणं आहेत, ज्यांच्याकडे लक्ष ठेवता येऊ शकतं. जसं की,
- जेवायला सुरुवात केल्या केल्याच पोट भरल्यासारखं वाटणं
- डाव्या बरगडीखाली अस्वस्थता किंवा वेदना जाणवणं
- अॅनिमिया आणि थकवा
- वारंवार संसर्ग होणं
- सहज रक्तस्त्राव होणं
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











