अंध रुग्णांना पुन्हा दिसणार जग, संशोधकांचा क्रांतिकारी प्रयोग चर्चेत

- Author, फर्गस वॉल्श
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आयुष्य बदलून टाकणारा एक इम्प्लांट डोळ्याच्या मागील भागात बसवल्यानंतर काही अंध रुग्णांना पुन्हा वाचता येऊ लागले आहे.
लंडनमधील मूरफिल्ड्स आय हॉस्पिटलमध्ये पाच रुग्णांच्या डोळ्यात मायक्रोचिप बसवणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, या आंतरराष्ट्रीय चाचणीचे परिणाम 'विस्मयचकित' करणारे आहेत.
अंध असलेल्या 70 वर्षीय शिला आयर्विन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, पुन्हा वाचता येणं आणि शब्दकोडी सोडवता येणं हे जणू काही "दुसऱ्याच जगात असल्यासारखं" आहे. "हे खूप सुंदर आहे, अद्भुत आहे. मी खूप आनंदी आहे."
हे तंत्रज्ञान जिओग्राफिक अॅट्रॉफी (GA) असलेल्या लोकांसाठी एक आशेचा किरण आहे.
वाढत्या वयामुळे होणाऱ्या ड्राय एज-रिलेटेड मॅक्युलर डीजेनेरेशनची (AMD) ही पुढची अवस्था आहे. त्यामुळे यूकेमधील जवळपास 3 लाख 50 हजार लोकांची दृष्टी प्रभावित असल्याचा अंदाज आहे.
या स्थितीत डोळ्याच्या मागील भागातील रेटिनाचा एक छोटा भाग हळूहळू खराब होतो. त्यामुळे दृष्टी धूसर किंवा खराब होते. नंतर, रंग आणि बारीकसारीक तपशील बऱ्याचदा दिसेनासा होतो.
इम्प्लांटच्या या नव्या प्रक्रियेमध्ये डोळ्याच्या रेटिनाखाली मानवी केसाच्या जाडीइतकी लहानशी, 2 मिलीमीटर आकाराची फोटोव्होल्टाइक मायक्रोचिप बसवली जाते.
रुग्ण मग व्हीडिओ कॅमेरा असलेले चष्मे घालतात.

फोटो स्रोत, Getty Images
यातील कॅमेरा इन्फ्रारेड बीमद्वारे व्हीडिओ इमेज डोळ्याच्या मागील भागातील इम्प्लांटला पाठवतो. तेथून या इमेज एका छोट्या पॉकेट प्रोसेसरकडे पाठवल्या जातात. तिथे त्या स्पष्ट आणि मोठ्या केल्या जातात.
नंतर त्या इमेज इम्प्लांट आणि ऑप्टिक नर्व्हद्वारे रुग्णाच्या मेंदूकडे पाठवल्या जातात. त्यामुळे त्यांना पुन्हा काही प्रमाणात दृष्टी मिळते.
या इमेज समजून कशा घ्यायच्या यासाठी रुग्णांनी अनेक महिने प्रशिक्षण घेतलं आहे.
युकेमधील या चाचणीचे प्रमुख असणारे मूरफिल्ड्स आय हॉस्पिटलमधील डोळ्यांचे सर्जन माही मुकित यांनी बीबीसीला सांगितलं की हे "मूलभूत आणि आयुष्य बदलणारे तंत्रज्ञान" आहे.
"हे असं पहिलं इम्प्लांट आहे ज्याने रुग्णांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात वापरता येईल अशी म्हणजे वाचन, लेखन करता येईल अशी पुरेशी दृष्टी दिली आहे."
"माझ्या मते, हे एक मोठं प्रगत पाऊल आहे," असं त्यांनी सांगितलं.
इम्प्लांट तंत्रज्ञान कसे काम करते?
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात युरोपमधील पाच देशांतील 38 रुग्णांनी प्राइमा (Prima) इम्प्लांटच्या चाचणीत भाग घेतला.
हे इम्प्लांट कॅलिफोर्नियातील सायन्स कॉर्पोरेशन या बायोटेक कंपनीनं तयार केलं आहे.
एकूण 32 रुग्णांना इम्प्लांट दिले गेले, त्यापैकी 27 रुग्णांना त्यांच्या सेंट्रल व्हिजनचा वापर करून पुन्हा वाचता येऊ लागलं.
एका वर्षानंतर, याची क्षमता 25 अक्षरांपर्यंत किंवा डोळ्याच्या चाचणीच्या चार्टवरील 5 ओळींपर्यंत पोहोचली.
शिलासाठी ही सुधारणा आणखी सक्षम करणारी ठरली. इम्प्लांटशिवाय त्या पूर्णतः वाचू शकत नाहीत.
पण जेव्हा बीबीसीनं शिलाचा मूरफिल्ड्स हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या चार्टवर वाचन करताना व्हीडिओ घेतला, तेव्हा त्यांनी एकही चूक केली नाही.
वाचन पूर्ण झाल्यावर त्यांनी आनंदानं हवेत मूठ उंचावून आपला आनंद व्यक्त केला.

"मी खूप आनंदी आहे"
शिला सांगतात की, त्या रोजची कामं लवकर आटोपतात जेणेकरून त्या खास चष्मा घालून बसू शकतील.
या प्रक्रियेसाठी प्रचंड एकाग्रतेची गरज होती. शिला यांना त्यांच्या हनुवटीखाली उशी ठेवावी लागली जेणेकरून कॅमेराचा फीड स्थिर राहील.कारण कॅमेरा एकावेळी फक्त एक-दोन अक्षरांवर लक्ष केंद्रित करू शकतो.
काही वेळा त्यांना अक्षरे ओळखण्यासाठी डिव्हाईसच्या झूम इन मोडमध्ये जावं लागलं, विशेषतः 'C' आणि 'O' मधील फरक ओळखण्यासाठी.
शिला यांची दृष्टी रेटिनातील पेशी नष्ट झाल्यामुळे 30 वर्षांपूर्वीच कमी होऊ लागली होती. त्या सांगतात की त्यांना डोळ्यांत दोन काळी वर्तुळं असल्यासारखं दिसतं.
शिला पांढऱ्या काठीच्या मदतीनं फिरतात कारण त्यांना आजूबाजूच्या गोष्टी पूर्णतः धूसर दिसतात.
त्या बाहेर पडल्यावर रस्त्यांच्या नावाच्या मोठ्या पाट्याही वाचू शकत नाहीत.
त्या सांगतात की, जेव्हा त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करावं लागलं तेव्हा त्या अक्षरश: रडल्या होत्या.
सुमारे 3 वर्षांपूर्वी इम्प्लांट बसवल्यानंतर, त्या त्यांच्या दृष्टीतील प्रगतीबद्दल अत्यंत आनंदी आहेत आणि मूरफिल्ड्समधील वैद्यकीय टीमही.
त्या सांगतात, "मी माझी पत्रं, पुस्तकं वाचू शकते, शब्दकोडी आणि सुडोकू सोडवू शकते."

जेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला वाटलं होतं का की, तुम्ही पुन्हा वाचू शकाल, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, "कधीच नाही."
"हे अद्भुत आहे. मी खूप आनंदी आहे."
"तंत्रज्ञान इतक्या वेगानं पुढं जात आहे आणि मी त्याचा भाग आहे हाच विलक्षण अनुभव आहे."
शिला हे डिव्हाइस बाहेर जाताना वापरत नाहीत. याचं एक कारण म्हणजे हे वापरताना डोक्याची हालचाल न करता स्थिर ठेवावं लागतं आणि त्यासाठी खूप एकाग्रता लागते. त्यांना या डिव्हाइसवर फार अवलंबूनही राहायचं नाहीये.
त्याऐवजी त्या रोजची घरकामं लवकर आटोपतात आणि मग आरामात बसून खास चष्मा वापरतात.
प्राइमाच्या या इम्प्लांटला अद्याप परवाना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे ते क्लिनिकल चाचण्यांसाठीच मर्यादित असून बाहेर उपलब्ध नाही. तसेच याची किंमत किती असेल हेही अजून स्पष्ट नाही.
तरीही, माही मुकित यांनी आशा व्यक्त केली की, हे एनएचएसमधील (NHS) काही रुग्णांसाठी "पुढील काही वर्षांतच" उपलब्ध होईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











