राज आणि उद्धव यांच्या एकत्रित मेळाव्याचा अर्थ काय? राजकीय जाणकारांना काय वाटतं?

- Author, दीपाली जगताप आणि मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर सरकारनं हा निर्णय रद्द केला. या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा झाला.
या मेळाव्यात शिवसेना उबाठा, मनसे आणि इतर राजकीय पक्षांचेही काही नेते उपस्थित होते.
"कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षांनी आम्ही एकत्र येतोय. जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं", असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.
तर, "आमच्यातला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, आता एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठी. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार," असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं.
असं असलं तरी या दोघांच्या एकत्र येण्यानं नक्की काय होणार, या मेळाव्यातून कोणाला संदेश दिला गेला, हे प्रश्न शिल्लक राहतातच.
या दोघांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यायचं ठरवलं, तर ते आजवरचे मतभेद कसे बाजूला ठेवणार, याबद्दल आम्ही काही राजकीय तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यातून या मेळाव्याचे कोणते अर्थ निघतात हे जाणून घेऊ. त्या आधी या मेळाव्यात राज आणि उद्धव यांनी काय भूमिका मांडली ते समजून घेऊ.
काय म्हणाले उद्धव आणि राज ठाकरे?
वरळी येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
"महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये भाजपानं 'बटेंगे तो कटेंगे'सारख्या घोषणा देऊन, लोकांमध्ये भांडणं लावून निवडणूका जिंकल्या आहेत. भाजपा हे राजकारणातले व्यापारी आहेत. ते वापरून फेकून देतात."
"एका गद्दारानं काल 'जय गुजरात'ची घोषणा दिली. आपला मालक आल्यावर 'जय गुजरात' म्हणणारा माणूस मराठीचा पाईक कसा असू शकेल?" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
"कोणावर अन्याय करू नका. पण अंगावर हात उगारला, तर तो हात जागेवर ठेवू नका, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. मराठी भाषेच्या नावावर गुंडगिरी करू नका म्हणता, पण मराठी माणसानं महाराष्ट्राबाहेर कधी दादागिरी केली आहे?"
"वाटेल ते करा. पण मी महाराष्ट्राला विनंती करतोय. कोणत्याही पक्षाचे आपण असू, पण आता संयुक्त महाराष्ट्राच्या एकजुटीप्रमाणे एकजूट केली पाहिजे. भाजपातल्या मराठी लोकांनीही त्यात यायला हवं. मराठीचे हे धिंडवडे काढणार असले आणि आपण त्यांना पायघड्या घालणार असू, तर मेलेलं बरं."
"आम्ही दादागिरी करणार नाही, कुणी दादागिरी केली, तर सहन करणार नाही. सर्व मतभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. सर्व मराठीप्रेमींनी तुटू नका, फुटू नका, मराठी ठसा पुसू नका हे विसरू नये."
या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सुरुवात "सन्माननीय उद्धव ठाकरे आणि जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो" अशी केली.
ते म्हणाले, "खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं चित्र मोठ्याप्रमाणावर उभं राहिलं असतं. मात्र, नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थवर व्हायला पाहिजे होता, पण पाऊस आहे. बाहेर उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो."
"मी माझ्या मुलाखतीत म्हटल्यानंतर सर्व गोष्टी सुरू झाल्या. कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षांनी आम्ही एकत्र येतोय. जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं."
"कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही."
आजवरचे मतभेद विसरणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले असले, तरी इतक्या वर्षांचे मतभेद ते विसरणार का? सर्व राजकीय निवडणुकांमध्ये एकमेकांना विरोध करणारे कार्यकर्ते, शाखा पातळीवर एकमेकांशी भांडणारे दोन पक्ष इतक्या चटकन कसे एकत्र येऊ शकतात, असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना विचारला.
आणीबाणीनंतर काही महिन्यात जनता पक्ष एकत्रित आला. त्यामुळे 17-18 वर्षांच्या विरोधानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, असं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं.
ते सांगतात, "2 वर्षांपासून दोन्ही एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू होते. बाळा नांदगावकर यांनी एकत्र येण्याचं थेट विधान केलं. आता राज ठाकरे यांनी एकत्र मोर्चा-मेळावा करण्याचा संदेश दिल्यानंतर परवापर्यंत एकमेकांविरोधात विधानं करणारे चटकन एकत्र आले. म्हणजे हे पक्ष आदेशावर चालतात. लोकांनी ठरवलं, तर त्यांना ते करावंही लागेल."
ते पुढं म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मिता पकडून धरली, नितीशकुमार यांनी बिहारी अस्मिता धरून ठेवली, तेच इथंही होऊ शकतं. मराठी लोक आता मुंबईतल्या बदलांकडे पाहात आहेत. ज्या लोकांची लुटण्याची वृत्ती आहे, दादागिरी करत आहे, त्याविरोधात गोरगरिब आणि मध्यमवर्गीयांमध्ये प्रचंड राग आहे. तो या दोन भावांनी पंखाखाली घेतला आहे."
पर्यायी अजेंडा द्यावा लागेल - अमेय तिरोडकर
पत्रकार अमेय तिरोडकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "आता या दोन पक्षांना एकत्र येऊन फक्त भाषेचा मुद्दा चालवता येणार नाही. आपण महाराष्ट्राला आणि मुंबईला काय देणार याचा एक पर्यायी अजेंडा त्यांना द्यावा लागेल."
"जर भाजपा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर या दोघांनी एकत्र येण्यात काय अवघड आहे. हे दोघे एकत्र आले, तर एकनाथ शिंदे यांचं मुंबईतच नाही, तर ठाण्यातलं राजकारणही अवघड होईल. या दोघांनी स्टॅलिन, रेवंत रेड्डी अशा नेत्यांना बोलावून इथं अस्मितेचा मुद्दा जागता ठेवला पाहिजे."
"भाजपा फार स्मार्ट राजकारण करत आहे. मुंबईत मराठीबरोबर इतरही भाषिक लोक आहेत. मराठी ध्रुवीकरणाविरोधात याचा भाजपा वापर करू शकतो. भाजपाचं मुंबईबरोबर एमएमआर भागातही असलेल्या पालिकांवर लक्ष आहे," असं मत अमेय तिरोडकर यांनी व्यक्त केलं.
"एकनाथ शिंदे यांचं महत्त्व दूर करण्यासाठी भाजपानं हे केलं असेल, तर याचा फटका भाजपालाही बसेल."
"परंतु आता या दोन्ही भावांना आपण एकत्र आलो, असं सांगून चालणार नाही, तर भाजपाला पर्यायी अजेंडा द्यावा लागेल. भाषेच्या एका मुद्द्यावर चालणार नाही, तर महाराष्ट्राला, मुंबईला आम्ही काय देणार हे सांगितलं पाहिजे," असंही त्यांनी नमूद केलं.
पर्सेप्शनच्या लढाईत उतरावंच लागेल - आशिष जाधव
या मुद्द्यावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव म्हणाले, "मुंबईचे मतदार पाहाता मराठी भाषिकांबरोबर मुसलमान मतदारांचाही कल उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे."
मुंबईतील कोकणी मुसलमान, महाराष्ट्रातील इतर भागातून आलेले मुसलमान आणि उत्तर भारतीय मुसलमान यांचा कल कोव्हिड काळापासून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे, असं जाधव यांना वाटतं.
ते म्हणाले, "आज गरज आहे पर्सेप्शन तयार करण्याची. भाजपा ज्या पद्धतीनं पर्सेप्शन तयार करतं, तसं आपण विरोधात पर्सेप्शन तयार करू शकतो यासाठी हे दोन पक्ष प्रयत्न करत आहेत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं राज ठाकरे म्हणाले हे मोठं वाक्य आहे. हा फेविकॉलचा जोड झाला आहे."
"भाजपानं आपण प्रो-गव्हर्नन्स आहोत, असा भास निर्माण केला होता. त्याला या मेळाव्यानं छेद दिला आहे. महाराष्ट्र यात कुठे आहे असा प्रश्न मराठी लोकांना पडलेला असू शकतो. हे दोन्ही नेते मध्यंतरी एकाचवेळी परदेशात होते. ते पाहाता तिकडे त्यांची चर्चा झाली का असाही प्रश्न पडू शकतो. आता राज ठाकरे भाजपाचं ऐकणारे राहिलेले नाहीत," असंही त्यांनी नमूद केलं.
दोन्ही भावांनी आपली स्क्रिप्ट लिहूनच आणली होती. जातीधर्माच्या फुटीचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी मांडला. मुंबई पालिकेत जेव्हा या दोघांची युती होईल तेव्हा मराठी-अमराठी असं ध्रुवीकरण भाजपा करू शकतं, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आता या दोन्ही पक्षांची राजकीय युती 100 टक्के होणार असा विश्वास व्यक्त केला.
त्या म्हणाल्या, "होय आता दोघांची राजकीय युतीही होईल. दोन्ही भावांनी ते कबूल केलं आहे. या दोघांनी 'मन की बात' लोकांच्यासमोर केली आहे. आम्ही मराठी माणसांसाठी एकत्र आलो."
"राजकीयदृष्ट्या एकत्र आलो आहोत. ज्या पक्षावर पंतप्रधान 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत होते, ते एकत्र आले तर आम्ही का येऊ शकत नाही?" असा प्रश्न पेडणेकर यांनी विचारला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
















