क्रेडिट स्कोअर मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरतील 'हे' 6 उपाय, जाणून घ्या

सध्या तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणं महत्त्वाचं असतं.

भारतात सिबिल, इक्विफॅक्स, एक्सपीरियन आणि सीआरआयएफ हायमार्क अशा काही एजन्सी तुमच्या आर्थिक रेकॉर्डच्या आधाराने तुमचा क्रेडिट स्कोअर तयार करतात.

CIBIL ही यातील सर्वांत प्रसिद्ध कंपनी आहे. CIBILच्या रेटिंगची व्याप्ती 300 ते 900 अशी आहे. CIBILच्या निकषांनुसार 800हून अधिक स्कोअर असलेल्या लोकांना चांगले लाभ मिळवता येतात.

Equifax आणि CRIF या कंपन्यांच्या रेटिंगची व्याप्तीसुद्धा 300 ते 900 आहे. Experian ही संस्था 300 ते 850 या दरम्यान रेटिंग देते.

विशिष्ट रक्कम भरून कोणालाही स्वतःचा क्रेडिट स्कोअर ऑनलाइन तपासता येतो. सर्व कंपन्या ही सेवा पुरवतात.

वरील सर्व कंपन्या बँकांसोबत करार करतात आणि ग्राहकांची माहिती गोळा करतात, त्यानंतर आपापल्या पद्धतीने या ग्राहकांचं रेटिंग काढलं जातं.

जर स्कोअर कमी असेल तर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवणे कठीण होते. पण जर स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर सहजपणे आणि कमी व्याजदरावर कर्ज मिळते.

त्यामुळेच तुमचा क्रेडिट स्कोअर कसा सुधारायचा याबद्दल जाणून घेऊया.

सहा गोष्टी पाळल्या तर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त करू शकता आणि योग्य दरात तसेच अनुकूल अटींवर कर्ज मिळवू शकता.

'सोहम कॅपिटल सर्व्हिसेस'चे चार्टर्ड फायनान्शियल गोल प्लॅनर प्रियांक ठक्कर सांगतात, "क्रेडिट स्कोअर कमी असला तरी शिस्तबद्ध प्रयत्नांनी तो सुधारता येतो.

तुमची परतफेडीची (repayment) हिस्ट्री ही क्रेडिट स्कोअरमधली सर्वांत महत्त्वाची बाब आहे.

कर्जाचे ईएमआय, क्रेडिट कार्डचे बिल किंवा इतर कोणतीही देणी वेळेवर भरा. एखादा हप्ता उशिरा भरला तरी स्कोअरवर परिणाम होतो.

या सगळ्या गोष्टींची वेळ पाळण्यासाठी तुम्ही रिमाइंडर लावू शकता किंवा ऑटो-डेबिटची सुविधा वापरू शकता."

सर्टिफाइड फायनान्स प्लॅनर विनोद फोगलाही हेच सांगतात.

ते म्हणतात, "शक्यतो पर्सनल लोन घेण्यासाठी किंवा अनावश्यक खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरणे टाळा. त्यामुळे आर्थिक शिस्त राखता येते आणि परतफेडीत अडचण येत नाही.

एकदा ईएमआय चुकला की अडचण वाढते आणि स्कोअर सुधारायला जास्त वेळ लागतो."

प्रियांक ठक्कर सांगतात की, "क्रेडिट कार्डवर कधीही तुमच्या मर्यादेच्या 30 ते 40 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करू नका. उदाहरणार्थ- जर तुमची लिमिट 1 लाख रुपये असेल, तर महिन्याला 30 ते 40 हजारांपर्यंतच खर्च करा.

त्यापेक्षा जास्त खर्च झाला तर तुम्ही कर्जांवर जास्त अवलंबून आहात असं वाटतं. जर लिमिट कमी असेल आणि पूर्ण वापरली, तर स्कोअर खाली येतो. यासाठी लिमिट वाढवता येते."

फोगला म्हणतात, "तुमच्या क्रेडिट लिमिटच्या तिसऱ्या भागापर्यंतच खर्च करा आणि वेळेवर परतफेड करा."

कधी कधी इतर कोणी कर्ज घेत असेल तर आपण जामीन राहतो. जर ती व्यक्ती वेळेवर हप्ते भरत नसेल तर त्याची जबाबदारी जामीनदारावर येते.

त्यामुळे जामीनदाराचा क्रेडिट स्कोअरही बिघडतो. त्यामुळेच ज्यांची आर्थिक सक्षमता खात्रीशीर आहे, त्यांच्याच कर्जाला हमीदार व्हा.

कमी काळात अनेक कर्जांसाठी अर्ज केल्यास क्रेडिट स्कोअर कमी होतो. बँका आणि आर्थिक संस्था तुमच्याकडे आर्थिक स्थैर्य नाही असा अंदाज काढतात.

प्रत्येक कर्जाच्या अर्जाच्या वेळी बँक तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासते, याला 'हार्ड इन्क्वायरी' म्हणतात. थोड्या काळात जास्त चौकशा झाल्या तर स्कोअर घटतो. त्यामुळे केवळ आवश्यक असेल तेव्हाच अर्ज करा.

फोगला सांगतात, "जुनी क्रेडिट खाती बंद करू नका. जुना क्रेडिट इतिहास असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही दीर्घकालीन कर्ज कसे व्यवस्थापित करता हे दिसते."

ठक्कर म्हणतात, "स्कोअर सुधारायचा असेल तर जोखीम असलेल्या कर्जांवर (जसे पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड) अवलंबून राहू नका.

होम लोन, कार लोनसारखी सुरक्षित कर्जेही घ्या. यामुळे जबाबदारीने कर्ज घेत असल्याची प्रतिमा तयार होते आणि स्कोअर वाढतो."

भारतात रिझर्व्ह बँकेने परवाना दिलेले चार मुख्य क्रेडिट ब्युरो आहेत — CIBIL, Equifax, Experian आणि CRIF Highmark.

जर रिपोर्टमध्ये चूक असेल, जसे की चुकीची थकबाकी दाखवली असेल, बंद झालेले खाते चालू दाखवले असेल किंवा वैयक्तिक तपशील चुकीचे असतील, तर तक्रार करता येते.

योग्य कारणे असल्यास स्कोअर सुधारतो, पण यासाठी साधारण 30 दिवस किंवा अधिक वेळ लागू शकतो.

ठक्कर सांगतात, "अशा चुका वारंवार होतात. वर्षातून किमान एकदा CIBIL, Experian किंवा Equifaxचा रिपोर्ट तपासा आणि त्रुटी असल्यास दुरुस्ती करा."

फोगला सांगतात, "जर तुमचा सिबिल स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला अनुकूल अटींवर कर्ज मिळते आणि अनेक बँका कर्ज देण्यासाठी तयार असतात.

जर स्कोअर कमी असेल, तर योग्य पावले उचलून तो 700 पेक्षा जास्त करता येतो. मात्र यासाठी 6 ते 12 महिने लागू शकतात."

(सूचना- हे सर्व तपशील केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)