दक्षिण कोरियात पदच्युत राष्ट्राध्यक्षांना अटक, काटेरी तारा तोडत निवासस्थानात शिरले अधिकारी

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष यून सुक योल
    • Author, शाइमा खलील आणि जोएल गुइंटो
    • Role, बीबीसी न्यूज, सेऊल आणि सिंगापूरहून

दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. अटक होणारे ते दक्षिण कोरियातील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

या अटकेबरोबरच गेल्या आठवडाभरापासून पोलीस अधिकारी आणि यून यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच आणि संघर्ष संपला आहे.

डिसेंबर 2024 मध्ये यून यांनी दक्षिण कोरियात मार्शल लॉ लावत सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र मार्शल लॉ लावण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर देशभरात अशांतता निर्माण झाली.

त्यानंतर जनतेत उद्रेक झाला आणि राष्ट्राध्यक्ष यून यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला होता. सध्या यून यांच्या विरोधात देशद्रोहावरील आरोपांचा तपास सुरू आहे.

घटनात्मक न्यायालयानं महाभियोगाद्वारे यून यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवले जाणं वैध असण्याबाबत किंवा ते कायदेशीर असण्याबाबत अद्याप आदेश दिलेला नाही. त्यामुळेच तांत्रिकदृष्ट्या यून सुक सोल अजूनही दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.

असं असलं तरी यून यांची अटक नाट्यमय ठरली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी यून यांना अटक करण्यासाठी प्रचंड थंडीत राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात प्रवेश करण्यासाठी शिड्या आणि काटेरी तारा कापण्यासाठीच्या अवजारांचा वापर केला.

दुसऱ्या बाजूला यून यांची अटक रोखण्यासाठी प्रेसिडेन्शियल सिक्युरिटी सर्व्हिस (पीएसएस) म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा पथकातील कर्मचाऱ्यांनी बॅरिकेड्स म्हणजे अडथळे उभे केले होते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

अटक होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांचा संदेश

राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी त्यांच्या अटकेपूर्वी देशाला संबोधित करत एक व्हिडिओ संदेश जारी केला.

64 वर्षांच्या यून यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे की रक्तपात थांबवण्यासाठी ते उच्चपदस्थांचा समावेश असलेल्या समितीसमोर करप्शन इन्व्हेस्टिगेशन ऑफिस म्हणजे सीआयओमध्ये चौकशीसाठी जाण्यास तयार आहेत.

त्यांचा हा व्हिडिओ तीन मिनिटांचा आहे. त्यात यून म्हणाले की त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीला ते सहकार्य करतील. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मात्र त्यांनी फेटाळले आहेत.

ते सातत्यानं म्हणत आले आहेत की त्यांच्या अटकेसाठी जारी करण्यात आलेला वॉरंट कायदेशीर नाही.

राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यासाठी पोलीस कर्मचारी काटेरी तारा तोडून राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात शिरले.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यासाठी पोलीस कर्मचारी काटेरी तारा तोडून राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात शिरले

यून म्हणाले की त्यांनी पाहिलं की पोलीस अधिकारी कसं आग शमवण्याच्या उपकरणांनिशी त्यांच्या निवासस्थानात शिरले.

ते म्हणाले, "मी सीआयओसमोर हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ही चौकशी बेकायदेशीर आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा रक्तपात रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे."

अटक करण्यासाठी हजारो अधिकारी, पोलीस कर्मचारी

बुधवारी (15 जानेवारी) सकाळी राष्ट्राध्यक्ष यून यांना अटक करण्यासाठी एक हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले होते. यून सुक योल यांना अटक करण्याचा हा दुसरा प्रयत्न होता.

यून यांच्याविरोधात तपास करत असलेल्या सीआयओनं याआधी 3 जानेवारीला देखील राष्ट्राध्यक्षांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता.

सीआयओनं तपासासंदर्भात यून यांना अनेक समन्स पाठवले होते. मात्र यून यांनी त्याकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे अखेर सीआयओनं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढला होता.

राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी आले होते

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी आले होते

यून यांच्या पीपल्स पॉवर पार्टीनं त्यांच्या नेत्याची अटक "बेकायदेशीर" असल्याचं म्हटलं आहे. पीपल्स पॉवर पार्टीचे नेते क्वेओन सियोंग-डोंग यांनी बुधवारी (15 जानेवारी) झालेल्या घडामोडी 'दुर्दैवी' असल्याचं संसदेत सांगितलं.

दुसरीकडे डेमोक्रॅटिक पार्टी या विरोधी पक्षाचे सभागृहातील नेते पार्क चान-डे म्हणाले की यून यांच्या अटकेनं दाखवून दिलं आहे की दक्षिण कोरियात 'न्याय अस्तित्वात आहे'.

पक्षाच्या बैठकीत ते म्हणाले, "यून यांची अटक घटनात्मक व्यवस्था, लोकशाही आणि कायद्याच्या राज्यं लागू करण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे."

दक्षिण कोरियाचे विद्यमान अर्थमंत्री चोई सांग-मोक हे सध्या देशाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या आधी हान डक-सू यांना काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष बनवण्यात आलं होतं. मात्र विरोधी पक्षांनी हान डक-सू यांच्यावर देखील महाभियोग चालवून त्यांना पदच्युत केलं होतं.

दक्षिण कोरियात पुढे काय होणार?

चौकशीनंतर यून सुक योल यांना सीआयओच्या कार्यलयापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जियोंगी प्रांतातील सोल डिटेंशन सेंटरमध्ये अटकेत ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

जर यून यांच्या अटकेच्या 48 तासांच्या आत न्यायालयानं त्यांच्या अटकेसाठीचा वॉरंट जारी केला नाही, तर कदाचित त्यांची सुटका देखील होऊ शकते. त्यानंतर यून यांना राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी परतण्याचं देखील स्वातंत्र्य असेल.

राष्ट्राध्यक्षपदावर असलेल्या यून सुक योल यांना झालेली अटक हा दक्षिण कोरियाच्या राजकारणातील महत्त्वाचा क्षण आहे.

अर्थात यून यांना अटक झाली असली तरी दक्षिण कोरियातील राजकीय संकट लवकरच दूर होण्याची शक्यता नाही. किंबहुना ही अटक म्हणजे दक्षिण कोरियातील राजकारणात दररोज होत असलेल्या नाट्यमय घटनांचाच एक पैलू आहे.

राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना अटक झाल्यानंतर तपास यंत्रणेच्या कार्यालयात नेण्यात आलं

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना अटक झाल्यानंतर तपास यंत्रणेच्या कार्यालयात नेण्यात आलं

बुधवारी (15 जानेवारी) यून सुक योल यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या गर्दीमुळे देशातील लोकांमध्ये खोलवर निर्माण झालेल्या विभागणीची झलक दिसली आहे.

यून यांच्या विरोधात जमलेले लोक आनंद साजरा करत होते, टाळ्या वाजवत होते. यून यांना अटक झाल्याचं जाहीर होताच हा जमाव आनंदात गाणं गाऊ लागला होता.

तर दुसऱ्या बाजूला एकदम उलटी परिस्थिती होती.

यून यांच्या एका पाठिराख्यानं बीबीसीला सांगितलं की "आम्ही खूप चिडलेलो आहोत आणि निराश आहोत. इथे कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन झालं आहे."

राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले यून सुक योल यांचे समर्थक

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले यून सुक योल यांचे समर्थक

या विरोधामुळे खुद्द सरकारमधीलच दोन घटक देखील एकमेकांसमोर उभे ठाकले. एका बाजूला यून यांचा अटक वॉरंट असलेले तपास अधिकारी आणि पोलीस होते. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्षांचे सुरक्षा रक्षक होते. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा रक्षकांचं म्हणणं होतं की ते राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत.

यून यांनी मार्शल लॉ ची घोषणा करण्यापूर्वी, ते निष्प्रभ झाले होते. कारण दक्षिण कोरियाच्या संसदेत विरोधी पक्षाकडे बहुमत होतं. यून यांच्या पत्नीला एक महागडी बॅग भेट म्हणून मिळाली होती. त्यावरून निर्माण झालेल्या वादाला देखील यून यांना तोंड द्यावं लागलं होतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.