You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोटरीत असतं शरीरातलं 'दुसरं हृदय', ते कसं काम करतं ते जाणून घेऊया
- Author, राफेल अबुचाबे
- Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड
तुमच्या शरीरात आणखी एक हृदय आहे, असं सांगितलं तर तुम्हाला काय वाटेल? हो, आज आपण एका अवयवातील महत्त्वाच्या स्नायूबद्दल माहिती घेणार आहोत. हा स्नायू फक्त उभं राहाण्यासाठी, चालण्यासाठी उपयोगी पडतो, असं नाही तर तो यापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे.
हा आहे पोटरीमध्ये असलेला सॉलियस स्नायू. आपल्या पायातला हा एक शक्तिशाली आणि महत्त्वाची भूमिका बजावणारा स्नायू आहे. रक्तपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दोन वाहिन्या इथं असतात.
त्यामुळेच याला माणसाचं 'दुसरं हृदय' असं म्हटलं जातं.
याबद्दल स्पेनमधील बार्सिलोना विद्यापीठातील क्रीडाऔषधी विभागातील डॉक्टर कार्ल्स पेड्रेट यांनी बीबीसीला माहिती दिली. ते अवयव प्रत्यारोपणतज्ज्ञ मानले जातात.
पोटरीबद्दल ते म्हणाले, हा एक मोठा स्नायू आहे आणि त्यात मसलमास म्हणजे स्नायूचे वस्तुमानही जास्त असते. हा पूर्णतः स्नायूउतींनी (मसलटिश्यू) बनलेला असतो. त्यामध्ये इतर स्नायूंइतक्या प्रमाणात कनेक्टिंग टिश्यू नसतात.
पोटऱ्यांबद्दल टेक्सस येथील युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनमधील डॉक्टर मार्क हॅमिल्टन यांनीही माहिती दिली. ते म्हणाले, “हा स्नायू अनेक कामांसाठी लागतो, मग ते चालणं असो किंवा उभं राहाणं. याची गरज लागतेच.
आपले अवयव अनेक प्रकारच्या तंतूंनी म्हणजे फायबर्सनी बनलेले असतात. हे तंतू त्यांच्या कामांवर अवलंबून असतात. शरीराची ढब म्हणजे ठेवण राखण्यासाठी आपलं शरीर स्लो ट्विच फायबर्सचा वापर करतं यात रेड मसल फायबर्सचा समावेश होतो.
जरी हे तंतू अचानक हालचाल करण्यासाठी बनलेले नसले तरी ते इतर क्रिया करतात. त्यामुळे त्यांचा दीर्घकाळ उभं राहाणे, चालण्यासाठी वापर केला जातो.”
“दुसरीकडे तुमच्या हातातील, पायातील किंवा तळहातातील स्नायू हे जलदगतीने कृती करणाऱ्या तंतूंनी बनलेले असतात. ते आपल्या क्षमतेनुसार अनेक हालचाली जलद गतीने करत असतात.”
"पोटरीमध्ये असलेला स्नायू (सॉलियस) तुम्हाला सरळ उभं राहाण्यासाठी मदत करतो. तो स्लो ट्विच तंतूंनी बनलेला असतो. न थकता अधिक ऊर्जा निर्माण करण्याची ताकद त्यामध्ये असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात स्नायू तंतू म्हणजेच मसल फायबर्स असतात. हे स्नायू तंतू ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. याला मायटोकॉंड्रिया म्हणजेच तंतूकणिका असं म्हणतात. मायटोकॉंड्रिया भरपूर असल्यामुळे आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो" असं डॉ. पेड्रेट सांगतात.
या तंतूंच्या घनतेमुळे शरीराच्या एकूण वजनाच्या एक टक्का इतकं वजन या स्नायूचं असूनही शरीरातील सर्वाधीक ऊर्जा इथं निर्माण होते.
हा स्नायू एक महत्त्वाचं काम करतो ते म्हणजे हृदयाला संपूर्ण शरीरात रक्त पाठवण्यासाठी मदत करणं.
डॉ. हॅमिल्टन सांगतात, "हा सॉलियस स्नायू इतरांच्या तुलनेत वेगळा आहे. तो पिंडरीमध्ये (वरच्या बाजूला) असतो. यामध्ये मोठ्या रक्तवाहिन्या असतात.
त्यात अडथळा आला तर पायांना, ओटीपोटाला जाणाऱ्या प्रवाहात बिघाड होतो. वृद्ध लोकांमध्ये हा त्रास जास्त दिसतो. तरुणांमध्येही ही समस्य़ा दिसून येते."
या वाहिन्यांच्या सोलियस स्नायूतील विशिष्ट रचनेमुळे जेव्हा हा स्नायू आकुंचित पावतो तेव्हा त्या दबल्या जातात. या आकुंचनामुळे या वाहिन्या भरल्या जातात आणि रिकाम्या होतात आणि नंतर रक्त पुन्हा हृदयाकडे वाहून नेले जाते.
म्हणजेच तुम्ही टाकलेलं प्रत्येक पाऊल रक्त पायाकडून हृदयाकडे परत नेण्यास मदत करतं.
पायतल्या या रचनेमध्ये गॅस्ट्रॉकनिमस नावाचा स्नायूही असतो.
शरीरातील इतर स्नायूंप्रमाणे सोलियस स्नायूही चांगल्या स्थितीत असणं आवश्यक आहे.
डॉ. पेड्रेट सांगतात, "अनेक लोकांना वाटतं की या स्नायूला जास्त वापरलं किंवा त्याचा व्यायाम केला की तो जास्त चांगला होतो. हा थोडा वेगळा स्नायू आहे. त्याला सतत काम करावं लागत असतं म्हणून त्यावर फार ताण येईल असं काही करू नये."
ते सांगतात, "बैठी जीवनशैली वाईट आहे. परंतु अतीताण येईल असा व्यायामही स्नायूंवर परिणाम करतो. स्नायू चांगले असले तर चांगलं आयुष्य जगायला मिळतं."
स्नायूंची सगळी व्यवस्था उत्तम असेल तर आपलं चयापचयही नीटराहातं. आजार होण्याचा धोका कमी होतो. मेंदू कार्यरत राहातो. त्यामुळे डिमेन्शिया म्हणजे विस्मरणाचा आजार होत नाही. स्नायू चांगले राहिल्यामुळे मानसिक आरोग्यही चांगलं राहातं.