भारत-अमेरिका व्यापार करारात नेमकं काय ठरलं? जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, AFP via Getty Images
अमेरिका आणि भारताने अंतरिम (तात्पुरत्या) व्यापार कराराची (ट्रेड डील) अधिकृत घोषणा केली आहे. दोन्ही देशांनी याबाबत संयुक्त निवेदन जारी केलं आहे.
2 फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार करारावर (ट्रेड डील) सहमती झाल्याची घोषणा केली होती. यासोबतच भारतावरील 50 टक्के टॅरिफ 18 टक्के करणार असल्याचेही जाहीर केले होते.
त्या वेळी ट्रेड डीलबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नव्हती. पण आता संयुक्त निवदेन जारी केल्याने अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
भारताचे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी एक्सवर सांगितलं की, हा करार भारतीय निर्यातदारांसाठी- विशेषतः एमएसएमई, शेतकरी आणि मच्छिमारांसाठी- 30 ट्रिलियन डॉलर्सची (सुमारे 30 लाख कोटी रुपये) बाजारपेठ खुली होईल.
व्हाइट हाऊसने जारी केलेल्या कार्यकारी आदेशात ट्रम्प यांनी म्हटलं, "भारत रशियाकडून थेट किंवा अप्रत्यक्ष तेल आयात थांबवण्यास वचनबद्ध आहे. भारत अमेरिकेकडून ऊर्जा उत्पादने खरेदी करेल आणि पुढील 10 वर्षांसाठी संरक्षण सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे."
अमेरिकेने भारतातून येणाऱ्या उत्पादनांवरील रेसिप्रोकल टॅरिफ (परस्पर शूल्क) कमी करणार असल्याचे सांगितले. या कपातीनुसार 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ हटवण्याचा निर्णय वॉशिंग्टनच्या वेळेनुसार 7 फेब्रुवारी रोजी रात्री 12:01 पासून लागू होईल. तसेच भारतीय वस्तूंवरील टॅरिफ 18 टक्के असेल.
व्हाइट हाऊसच्या निवेदनानुसार अंतरिम ट्रेड डीलची रूपरेषा ठरली आहे आणि त्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.
अंतरिम ट्रेड डीलमधील महत्त्वाचे मुद्दे

फोटो स्रोत, AFP via Getty Images
- व्हाइट हाऊसच्या निवेदनानुसार, भारत अमेरिकेतील सर्व टेक उत्पादने आणि अनेक कृषी उत्पादनांवरील टॅरिफ पूर्णपणे रद्द करेल किंवा कमी करेल. यात पशुखाद्यासाठी वापरली जाणारी धान्ये (लाल ज्वारी), ड्राय डिस्टिलर्स ग्रेन्स, ट्री नट्स, ताजी आणि प्रक्रिया केलेली फळे, सोयाबीन तेल, वाइन, स्पिरिट्स आणि इतर उत्पादनांचा समावेश आहे.
- भारताकडून अमेरिकेतील ऊर्जा उत्पादने, विमाने व त्यांचे सुटे भाग, मौल्यवान धातू, तंत्रज्ञान उत्पादने आणि कोळसा खरेदी यांच्या समावेशाची शक्यता आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान उत्पादनांचा व्यापार वाढण्याची अपेक्षा आहे. ज्यात डेटा सेंटर्ससाठी लागणाऱ्या प्रगत चिप्सचा समावेश आहे.
- तरीही भारताचा गुंतवणूक करार अद्याप अस्पष्ट आहे. 500 अब्ज डॉलरची खरेदी 5 वर्षांत केली जाईल. यात डेटा सेंटर्स, ऊर्जा यांसारखी क्षेत्रे असतील आणि काही सुरू असलेल्या (विद्यमान) प्रकल्पांचाही यात समावेश असेल.
- भारताच्या टेक्स्टाइल (कापड), लेदर (चामडे), फूटवेअर (पादत्राणे), प्लास्टिक, रबर, ऑर्गेनिक केमिकल्स (सेंद्रिय रसायने), होम डेकोर (गृह सजावट) आणि हस्तकला उत्पादनांवर अमेरिकेत 18 टक्के टॅरिफ लागू राहील.
- पुढे जाऊन अमेरिका जेनेरिक औषधं, रत्ने-हिरे आणि विमानांचे सुटे भाग यांसह अनेक वस्तूंवरील शुल्क काढून टाकेल.
- फार्मा आणि त्याच्या कच्च्या मालावर झालेल्या सेक्शन 232 च्या तपासणीच्या निकालांनुसार भारताला जेनेरिक औषधांसाठी ठराविक अटींवर फायदा मिळेल.
- अमेरिका आणि भारत आपापल्या हितसंबंधांच्या क्षेत्रांत एकमेकांना कायमस्वरूपी प्राथमिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बांधील आहेत.
- दोन्ही देश असे 'रूल्स ऑफ ओरिजिन' ठरवतील, ज्यामुळे या कराराचे फायदे प्रामुख्याने भारत आणि अमेरिकेलाच मिळतील.
- अमेरिका आणि भारत द्विपक्षीय व्यापारात अडथळा ठरणाऱ्या नॉन-टॅरिफ (गैर-शुल्क) अडचणी दूर करतील. भारत अमेरिकन वैद्यकीय उपकरणांच्या व्यापारातील जुने अडथळे काढून टाकण्यास तयार झाला आहे.
- तसेच आयटी आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील अमेरिकन उत्पादनांसाठी आयात परवाना प्रक्रिया सोपी करून विलंब किंवा मर्यादा आणणाऱ्या अटी रद्द केल्या जातील.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
निवेदनात असंही सांगण्यात आलं आहे की, अमेरिका आणि भारत चर्चेच्या माध्यमातून बाजारपेठेतील प्रवेश वाढवण्यासाठी एकत्र काम करतील.
चर्चेदरम्यान भारतीय उत्पादनांवरील टॅरिफ कमी करण्याच्या मागणीवर विचार केला जाईल, असं अमेरिकेनं सांगितलं आहे.
दोन्ही देश आर्थिक सुरक्षेतील समन्वय मजबूत करण्यावर सहमत झाले आहेत, जेणेकरून पुरवठा साखळी मजबूत होईल आणि नवकल्पनांना चालना मिळेल.
यात तिसऱ्या पक्षांच्या गैर-बाजार धोरणांना तोंड देण्यासाठी उपाय, गुंतवणूक तपासणीत सहकार्य आणि निर्यात नियंत्रणावरील समन्वय यांचाही समावेश असेल.
दोन्ही देश मजबूत, महत्त्वाकांक्षी आणि एकमेकांना फायदेशीर ठरणारे डिजिटल व्यापार नियम ठरवण्यासाठी स्पष्ट मार्ग निश्चित करतील.
अमेरिका आणि भारत हा फ्रेमवर्क लवकर अमलात आणतील आणि अंतरिम कराराला अंतिम रूप देण्यासाठी काम करतील, जेणेकरून ठरवलेल्या रोडमॅपनुसार दोन्ही देशांना फायदेशीर ठरणारी द्विपक्षीय चर्चा पूर्ण होऊ शकेल.
हा करार भारत आणि युरोपीय संघामधील (इयू) 'एफटीए'नंतर झाला आहे. त्या करारानुसार दोन्ही बाजूंनी काही वर्षांत आयात होणाऱ्या वस्तूंवरील टॅरिफ जवळपास शून्यावर आणण्यास सहमती दर्शवली होती.
भारतातील विरोधी पक्षांनी अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलला शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याची टीका केली होती.
मात्र पियूष गोयल यांनी सांगितले, "हा करार शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा आणि ग्रामीण जीवनमान सुरक्षित ठेवणारा आहे. या करारात संवेदनशील कृषी व दुग्धजन्य उत्पादने पूर्णपणे संरक्षित ठेवण्यात आली आहेत. यात मका, गहू, तांदूळ, सोयाबीन, कुक्कुटपालन उत्पादने, दूध, चीज, इथेनॉल इंधन, तंबाखू, काही भाज्या आणि मांस यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे."
दुसरीकडे, अमेरिकन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हच्या एक्स हँडलवर दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, 'भारताने कृषी उत्पादनांवरील टॅरिफ कमी करण्याची किंवा रद्द करण्याची तयारी दाखवली आहे आणि दीर्घकाळापासून असलेल्या नॉन-टॅरिफ अडथळे दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.'
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











