ट्रम्प म्हणतात, भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला; मात्र मोदींनी दिली फक्त टॅरिफ कमी केल्याची माहिती

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील टॅरिफ कमी करून 18 टक्के केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करारावर सहमती झाल्याचंही सांगितलं आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या 'एक्स'वरील पोस्टमध्ये व्यापार कराराबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिलं आहे की, अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार झाला असून, त्याअंतर्गत अमेरिकेने रेसिप्रोकल टॅरिफ 25 टक्क्यांवरून कमी करून 18 टक्के केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारतीय उत्पादनांवरील टॅरिफ 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे."
दुसरीकडे, या घोषणेनंतर काँग्रेस पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींवरचा दबाव स्पष्टपणे दिसून येत असल्याचं म्हटलं आहे.
यावर प्रतिक्रया देताना भारतामधील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी 'एक्स'वर लिहिलं की, "मी याआधीही अनेकदा म्हटलंय की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पंतप्रधान मोदींना खूप चांगला मित्र मानतात. आज संध्याकाळी व्यापार कराराच्या बातमीने मी अत्यंत उत्साहित आहे. अमेरिका-भारत संबंध अगणित क्षमतांनी भरलेले आहेत."
दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी सोमवारी (2 फेब्रुवारी) केलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण गेल्या वर्षभरात दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले आहेत.
अमेरिकेने भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्यासोबतच रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला होता. त्यामुळे एकूण टॅरिफ 50 टक्के झाला होता.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये लिहिले, "आज सकाळी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलणे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. ते माझ्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक आहेत आणि ते त्यांच्या देशातील ताकदवान आणि सन्मानीय नेते आहेत. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली, ज्यामध्ये व्यापार आणि रशिया–युक्रेन युद्ध समाप्त करण्याचा मुद्दाही होता. त्यांनी रशियन तेलाची खरेदी थांबवण्यास, तसेच अमेरिकेकडून आणि कदाचित व्हेनेझुएलाकडून अधिक प्रमाणात तेल खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे."
"यामुळे युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्यास मदत होईल, जिथे दर आठवड्याला हजारो लोक मारले जात आहेत. पंतप्रधान मोदींप्रती असलेल्या मैत्री आणि आदरामुळे, तसेच त्यांच्या विनंतीवरून, तत्काळ प्रभावाने आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे. याअंतर्गत अमेरिकेने रेसिप्रोकल टॅरिफ 25 टक्क्यांवरून कमी करून 18 टक्के केला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प यांनी पुढे लिहिलं की, "भारतही अमेरिकेच्या दृष्टीने आपले टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्यावर आणण्याच्या दिशेने पुढे जाईल. पंतप्रधानांनी 'बाय अमेरिकन' धोरणांतर्गत अमेरिकेकडून अधिक खरेदी करण्याची वचनबद्धताही व्यक्त केली आहे. यामध्ये 500 अब्ज डॉलरपेक्षा अधिक किमतीची अमेरिकन ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती, कोळसा आणि इतर अनेक उत्पादनांची खरेदी केली जाईल."
ते पुढे म्हणाले, "भारतासोबतचे आमचे उत्तम संबंध येत्या काळात आणखी मजबूत होतील. पंतप्रधान मोदी आणि मी असे नेते आहोत, जे काम पूर्णत्वास नेतात, जे अनेकांबाबत म्हणता येत नाही."
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले, "आज माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलून अत्यंत आनंद झाला. 'मेड इन इंडिया' उत्पादनांवरील टॅरिफ आता 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याने आनंद झाला आहे. या घोषणेसाठी भारतातील 140 कोटी लोकांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार."
मोदी पुढे लिहितात, "जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा त्याचा लाभ आपल्या लोकांना होतो आणि परस्पर हिताच्या संधी दरवाजे उघडतात.
"जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वाचे आहे. शांततेच्या प्रयत्नांमध्ये भारत त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभा आहे. त्यांच्यासोबत भागीदारीला अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी मी तयार आहे."

फोटो स्रोत, Getty Images
या घोषणेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं, "त्यांनी (ट्रम्प यांनी) 'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्याची घोषणा वॉशिंग्टन डीसीमधून केली. त्यांनी रशिया आणि व्हेनेझुएलाकडून भारताच्या तेलखरेदीबाबतची माहितीही वॉशिंग्टनमधूनच दिली. आणि आता त्यांनी भारत–अमेरिका व्यापार कराराची घोषणाही वॉशिंग्टनमधूनच केली आहे, ज्याचे संपूर्ण तपशील अजून प्रतीक्षेत आहेत."
ते पुढे लिहितात, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींवर काहीतरी दबाव किंवा पकड स्पष्टपणे दिसून येते. मोदी आता त्यांच्यापासून दूरच दिसत आहेत; पूर्वीसारखी गळाभेटीची मैत्रीपूर्ण शैली तर दूरची गोष्ट. यावेळी मोदीजी झुकले आहेत असेच वाटते. निश्चितच हे 'सर्वात मोठे करार' असू शकत नाही. वॉशिंग्टनमध्ये मात्र स्पष्ट दिसत आहे, मोगॅम्बो खुश हुआ."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











