'सही कुठे गायब झाली?' उज्ज्वला थिटेंचा सवाल; अनगरच्या नगराध्यक्षपदावरुन काय सुरू आहे?

"मी अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी चार ते पाच दिवस संघर्ष करत होते. त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही. पहिल्यांदा कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता.
कागदपत्रं मिळाल्यानंतर मी माझ्या वकिलाकडून तीन-चार वेळा ती तपासून घेतली होती. प्रत्येक कागदावर माझ्या मुलाची सही होती. सूचक म्हणून तो माझ्यासोबत होता, मग त्याची सही कशी गायब झाली?
माझा अर्ज कसा बाद झाला किंवा केला गेला यासाठी मी आता न्यायालयात दाद मागणार आहे."
अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे यांनी आता आपण न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं म्हटलं आहे.
17 नोव्हेंबरला पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अवघ्या 24 तासात बाद ठरवला गेला.
अर्थात, हे राजकीय नाट्य केवळ या 24 तासातलं नाहीये.
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं अनगर हे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.
इथली नगरपंचायतीची निवडणूक, भाजप आमदार राजन पाटील यांचं राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटे यांचे आरोप अशा अनेक घटनांमुळे अनगरची चर्चा सुरू आहे.
अनगरमधल्या याच राजकीय घडामोडींबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
नगरपंचायतीची निवडणूक
अनगरमध्ये नगरपंचायतीची निवडणूक लागली. आधी ग्रामपंचायत असलेल्या अनगरमध्ये पहिल्यांदाच नगरपंचायतीची निवडणूक होत आहे.
गेली कित्येक वर्षे अनगरमध्ये मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचेच वर्चस्व राहिले होते.
अनगर ग्रामपंचायतीचं रुपांतर आता नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतर इथे पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये असलेल्या राजन पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अनगरमध्ये कायमच बिनविरोध निवडणुका होत असल्याचं ग्रामस्थांकडून तसंच राजन पाटील यांच्याकडून वारंवार सांगितलं जात आहे.
नगरपंचायतीची निवडणूकही बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या नगरपंचायतीमधे 17 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले.
नगराध्यक्षपदासाठी राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
नगराध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध होईल, असं वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
तिथून इथल्या राजकीय घडामोडींनी वेग घेतला.
कोण आहेत उज्ज्वला थिटे?
उज्ज्वला थिटे या मूळच्या सोलापूरमधल्या. 2020 साली त्यांचं लग्न अनगरमधील महादेव थिटे यांच्याशी झालं.
2020 साली महादेव थिटे यांचं कोरोना आणि कावीळ झाल्याने निधन झालं.
2023 साली शिवजयंती कार्यक्रमाच्या मिरवणुकीदरम्यान उज्ज्वला यांचा मुलगा आणि पाटील यांचे समर्थक यांच्यात वाद झाला.

या वादानंतर पाटील यांच्या समर्थकांकडून सातत्याने त्रास देणं सुरू असल्याने गाव सोडल्याचा दावा थिटे यांनी केला होता.
उज्ज्वला थिटे यांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी मागितली. त्यांनी मला एबी फॉर्म दिला.
राजन पाटील यांचे वर्चस्व
राजन पाटील हे जवळपास पंचेचाळीस वर्षांपासून राजकारणात आहेत. मोहोळचे ते माजी आमदार.
1995, 1999 आणि 2004 असे तीन वेळा ते मोहोळचे आमदार म्हणून निवडून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले होते. 2024 मध्ये त्यांना सहकार परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं.
गेल्या महिन्यात ते अजित पवारांची साथ सोडून भाजपसोबत आले होते.
अर्ज भरण्यापासून अडविल्याचा आरोप
राज्यात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप सत्तेत सोबत असले तरी अनगरमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले.
नगराध्यक्षपदासाठी राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.
त्यांची निवड बिनविरोध व्हावी म्हणून आपल्याला अर्ज भरण्यात पाटील यांनी अडथळे आणल्याचा दावा उज्ज्वला थिटे यांनी केला होता.
माध्यमांशी बोलताना उज्ज्वला थिटे यांनी म्हटलं होतं की, "मी अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत होते. पण मला गेले तीन ते चार दिवस तो दाखल करू दिला जात नव्हता. मी त्यासाठी बाहेर पडले पण रस्त्यावर वेगवेगळ्या गाड्या लावल्या होत्या. माणसं मागे येत होती. शेवटी पोलिसांच्या संरक्षणात मी अर्ज भरला."

पण, राजन पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
त्यांनी म्हटलं होतं की, तो मोठा हायवे आहे. इथे कायद्याचं राज्य आहे. त्यांना एवढं वाटत होतं तर त्यांनी पोलिसांना अर्ज द्यायला हवा होता. पोलीस तर आमचे नाहीयेत. त्यांनी तसं काही केलं नाही.
उज्ज्वला थिटे या मूळ अनगरच्या नाहीत, त्या बाहेरून येऊन इथं राजकारण करत असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते उमेश पाटील यांनी हा आरोप फेटाळून लावला होता.
उमेश पाटील यांनी म्हटलं होतं की, अनगर हे त्यांचं गाव आहे. त्या इथल्या मतदार आहेत, त्यांची शेती इथं आहे.
नवरा गेल्यानंतरही त्या इथे राहिल्या. त्यांनी शेती केली. पण त्यांना त्रास दिला गेला. त्यांचं उसाचं बिल दिलं गेलं नाही. त्यांना गाव सोडून जायला भाग पाडलं.
'या गावामध्ये आमच्या जन्माच्या आधीपासूनच निवडणुकच झालेली नाही'
उज्ज्वला थिटे यांचा वाद मिटवण्यासंदर्भात विचारलं असता राजन पाटील म्हणाले की, "आमच्या गावात वाद मिटवणाऱ्या ज्या कमिट्या असतात त्यांच्याकडे ती आलीच नाही. काल इथं आली. तेव्हा आमच्या ज्या महिलांनी फॉर्म भरला होता, त्या सुद्धा म्हणाल्या की, 'तू आम्हाला सांगितलं असतं की मला उभं रहायचं आहे, तर एखादी विड्रॉ केली असती.' तिचा वाद काय आहे तो मला तर कळला पाहिजे ना."
पुढे ते म्हणाले, "हा निर्णय एकट्या उज्ज्वला थिटेचा नाही, किंवा एकट्या राजन पाटलाचा नाही, हे गावानं ठरवायचं असतं, त्यामुळे गावानं तिला ठरवलं असतं तर आम्ही पण तिला आनंदानं स्विकारलं असतं. आम्ही सत्तेच्या फार मागं लागलेली माणसं नाहीये."

अनगरमध्ये कायमच बिनविरोध निवडणुका होत असल्याचं राजन पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
राजन पाटील म्हणाले, "या गावात आमच्या जन्माच्या आधीपासूनच निवडणुकच झालेली नाही. सगळ्या निवडणुका या अविरोधच होतात. नगरपंचायत झाल्यानंतरची पहिली ही निवडणूक. ही निवडणूक ही अविरोध करायची असा आमचा गाव, परिसर ही परंपरा टिकवायची म्हणून प्रयत्न करत असताना काही तालुक्यातील मंडळींनी इथं निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यात अपयश आलं."
पुढे ते म्हणाले, "या गावामध्ये सर्व जाती, धर्म आणि सगळ्या विचारांची माणसं एकत्रित येऊन, निवडणूक लागली तर सलोखा बिघडतो म्हणून निवडणूक न लावता एकामतानं आपण या निवडणुका पार करायच्या अशा विचारानं हे गाव गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून काम करतं. त्यामुळे तशाच प्रकारची निवडणूक व्हावी ही ग्रामस्थांची इच्छा होती. त्या इच्छेला भगवंताच्या इच्छेनं यश आलं असं मी समजतो."
उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद कसा झाला?
17 नोव्हेंबरला पहाटे पाच वाजता नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज 18 नोव्हेंबरला संध्याकाळी बाद झाला.
तहसीलदार सचिन मुळीक यांनी यासंबंधी माहिती देताना म्हटलं की, छाननीदरम्यान तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.
थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नव्हती असं मुळीक यांनी सांगितलं.

सचिन मुळीक यांनी त्यांचा अर्ज बाद होण्याची इतरही कारणं सांगितलं. उज्ज्वला थिटेंनी प्रभाग क्रमांक चुकीचा लिहिला होता.
त्यांनी मतदार यादीतला अनुक्रमांकही चुकीचा दिला होता. त्यांनी वय नमूद केले होते, पण पुरावा दिला नव्हता.
मात्र, उज्ज्वला थिटेंनी या आक्षेपांना विरोध केला असून त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा विचार बोलून दाखवला आहे.
बिनविरोध निवडणुकीची परंपरा
या सगळ्या घडामोडींमध्ये बिनविरोध निवडणुकीचा मुद्दा ग्रामस्थांकडून पुढे आणला जात आहे.
अनगरमध्ये गेल्या 68 वर्षांपासून बिनविरोध निवडणूक होत असल्याचं ग्रामस्थांकडून सांगितलं जात आहे.
राजन पाटीलही तेच सांगतात. त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. इथे आपली दहशत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
त्यांनी म्हटलं होतं की, एखादं गाव दहशतीत पाच ते दहा वर्षे चालू शकतं. मात्र दोन-दोन पिढ्या गाव दहशतीत चालू शकत नाही. इथल्या लोकांना विचारा की इथे दादागिरी आहे की लोकशाही ते.
आमच्या गावात जे उमेदवार निवडले जातात ते सगळ्या धर्माच्या लोकांना बोलवून.
एकमत नाही झालं तर आम्ही चिठ्ठ्या टाकतो आणि ज्याची चिठ्ठी येईल त्याला लॉटरी लागते, असं सांगत त्यांनी इथली बिनविरोध निवडणुकीची प्रक्रियाही सांगितली होती.

पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दाही विचारात घ्यायला हवा. निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा आहे.
अशावेळी सतत बिनविरोध निवडणुका या लोकशाहीसाठी घातक आहेत का, याचाही विचार करायला हवा.
याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांनी म्हटलं की, "हे निश्चितच लोकशाहीसाठी मारक आहे. अनेकदा परंपरेच्या नावाखाली अत्याचार होत असतो. ही गुंडगिरी झाली. हे केवळ या निवडणुकीसाठी मी बोलत नाहीये.
कधीकधी हे एक गाव, एक पाणवठा, शांतता समितीच्या नावाखालीही गुंडगिरी होते. हे थांबायला हवं. कायद्याचं पालन व्हायला हवं. आणि त्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहायला नको. कायद्याचं पालन ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











