'नासा'ची आर्टेमिस-2 चांद्र मोहीम काय आहे? माणूस चंद्रावर पुन्हा उतरण्याच्या दृष्टीने ती किती महत्त्वाची?

फोटो स्रोत, NASA
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
तब्बल 50 वर्षांनी नासाची पहिली चांद्र मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेचं नाव आहे आर्टेमिस-2.
कशी असेल ही मोहीम? चंद्रावर माणूस पुन्हा उतरण्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची का आहे? आणि चंद्रापर्यंत जाऊनही हे यान चंद्रावर का उतरणार नाही? जाणून घेऊया.
1960 आणि 70 च्या दशकात नासाने अपोलो मोहीम राबवली. यातल्या 6 मोहिमा चंद्रावर उतरल्या.
सगळ्यात आधी 1969 साली अपोलो 11 आणि मग अपोलो 12. त्यानंतरच अपोलो 13 यान भरकटल्यानंतर त्यांनी चंद्रावर लँडिंग रद्द केलं. दरम्यान, अपोलो 14, 15,16,17 या मोहिमा देखील चंद्रावर उतरल्या होत्या.
या अपोलो मोहिमांद्वारे आजवर 24 अंतराळवीर चांद्रमोहिमेवर गेलेयत. त्यापैकी 12 जण चंद्रावर उतरले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर चालून आले.
या चांद्र मोहिमांमागे अंतराळ संशोधनापेक्षा सोव्हिएत युनियनवर पृथ्वीवरचं भू-राजकीय वर्चस्व, तांत्रिक आघाडी मिळवणं हा हेतू मोठा होता.
हा हेतू साध्य झाल्यावर या मोहिमांसाठीचा राजकीय उत्साह मावळला, लोकांचाही रस कमी झाला आणि चांद्र मोहिमांना मिळणारा निधीही कमी झाला.
1972 च्या अपोलो 17 नंतर मात्र नासाने चंद्रावर माणसांचा सहभाग असणारी मोहीम पाठवली नाही.

फोटो स्रोत, NASA
मात्र, आता आर्टेमिस-2 मिशन लाँच होत आहे. या मिशन लाँचसाठी संभाव्य तारखा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या ठेवण्यात आल्या आहेत.
कारण हे रॉकेट लाँच करण्यासाठी चंद्र पृथ्वीपासून एका ठराविक अंतरावर ठराविक स्थितीत असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला आठवडाभर अशी स्थिती असते, म्हणून या तारखा ठरवल्या गेल्या आहेत.
आर्टेमिस 2 संभाव्य लाँच तारीख
- फेब्रुवारी - 6, 7, 8, 10 आणि 11
- मार्च - 6, 7, 8, 9 आणि 11
- एप्रिल - 1, 3, 4, 5 आणि 6

फोटो स्रोत, NASA/Science Photo Library
आर्टेमिस 2 मधून 4 अंतराळवीर अवकाशात झेपावतील. नासाचे कमांडर रीड वाईजमन, पायलट व्हिक्टर ग्लोवर आणि मिशन स्पेशलिस्ट क्रिस्टिना कॉच. कॅनेडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हेन्सनही या यानात असतील.
SLS म्हणजे Space Launch System Moon rocket आणि Orion Space Capsule ची ही पहिलीच मानवी सहभाग असणारी मोहीम आहे.

अंतराळात सुरक्षितपणे पोहोचल्यानंतर हे अंतराळवीर या ओरायन यानाची कामगिरी कशी आहे, याची चाचणी घेतील. कारण मुळात हेच या आर्टेमिस 2 मोहिमेचं उद्दिष्ट आहे.
चंद्रावर उतरणाऱ्या मोहिमेची आखणी करण्यासाठीची सगळी चाचपणी, यंत्रणांची - यानाची तपासणी ही मोहीम करेल. म्हणजे पुढच्या आर्टेमिस 3 मोहिमेचा पाया भक्कम करणारी ही मोहीम असेल.
याचसाठी पृथ्वीच्या कक्षेमध्ये ओरायन स्पेस कॅप्सूल मॅन्युअली उडवून, म्हणजे अंतराळवीरांकडे ताबा देऊन उडवलं जाईल आणि भविष्यात चंद्रावर उतरण्यासाठीची प्रॅक्टिस केली जाईल.
त्यानंतर हे यान चंद्रापासून हजारो किलोमीटर दूर जाऊन ओरायन यानाचा लाईफ-सपोर्ट कसा आहे, पुढे जाण्याची प्रक्रिया, यानाची एकूणच शक्ती, दिशादर्शक यंत्रणा या सगळ्यांची तपासणी केली जाईल.

फोटो स्रोत, NASA
या काळात आर्टेमिसचा क्रू वैद्यकीय संशोधनासाठीचा डेटा अंतराळातून पाठवत राहील. कारण हे चार जण मोहिमेदरम्यान लहानशा जागेत असतील.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या तुलनेत त्यांना जास्त किरणोत्सर्गाला सामोरं जावं लागेल. आणि पृथ्वीवर परताना अंतराळातून पृथ्वीच्या कक्षेत, वातावरणात शिरणं आणि नंतर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर पॅसिफिक महासागरात कोसळण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास असेल.
मग आर्टेमिस 3 मिशन कधी लाँच होणार आहे? 2027 च्या आधी आर्टेमिस 3 मिशन लाँच होणार नसल्याचं नासाने म्हटलंय. पण तज्ज्ञांच्या मते हा लाँच 2028 वर जाण्याचा अंदाज आहे.
कारण चंद्रावर क्रू घेऊन उतरणारं अंतराळयान कोणतं असेल, हे अजून ठरलेलं नाही. स्पेस एक्स कंपनीचं Starship Lander किंवा जेफ बेझोस यांची ब्लू ओरिजिन कंपनी तयार करत असलेल्या यानापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे.
शिवाय, Axiom या अमेरिकन कंपनीने तयार केलेले नवीन स्पेससूट्ही अजून तयार नाहीत.

आर्टेमिस 3 मोहीम ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. आणि चंद्रावर माणूस दीर्घकाळ कसा राहू शकेल, नवीन तंत्रज्ञान, व्यावसायिक संधी आणि भागीदारी याचा शोध ती घेईल. गेटवे हे चंद्राभोवती फेऱ्या मारणारं लहान स्पेस स्टेशन उभारण्यात येणार आहे. आणि आर्टेमिस 4 आणि 5 मोहिमा याची उभारणी सुरू करतील.
इतर अनेक देशही 2030 च्या दशकात चंद्रावर त्यांचे अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीत आहेत.
आर्टेमिसच्या पुढच्या मोहिमांमध्ये युरोपियन अंतराळवीर सहभागी होतील. जपाननेही या मोहिमेत सीट पटकावली आहे.
चीन स्वतःचं यान तयार करतोय आणि 2030 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा त्यांचा इरादा आहे.
2030-2035 दरम्यान चंद्रावर कॉस्मोनॉट्स पाठण्याबद्दल, चंद्रावर लहान तळ उभारण्याबद्दल रशियानेही बोलून दाखवलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
इस्रोने चांद्रयान 4 मोहिमेची तयारी सुरू केलीय. ही मोहीम चंद्रावर उतरेल आणि तिथून नमुने गोळा करून पृथ्वीवर परतेल. 2028 च्या लाँचचं उद्दिष्टं ठेवण्यात आलंय. 2040 पर्यंत चंद्रावर उतरण्याचं उद्दिष्टही इस्रोने ठेवलंय.
नासाच्या या आर्टेमिस 2 मोहिमेमध्ये तुम्हीही व्हर्च्युअली सहभागी होऊ शकता. तुमचं नाव या यानासोबत जाईल आणि त्याचा बोर्डिंग पासही तुम्हाला मिळू शकेल. त्याकरिता तुम्हाला https://www3.nasa.gov/send-your-name-with-artemis या लिंकवर किंवा Send your name with artemis असं सर्च करुन मिळणाऱ्या लिंकवर जावं लागेल. त्यानंतर तिथे तुमचं नाव, पिन कोड घातलात की तुमचा बोर्डिंग पास तुम्हाला मिळेल.
नासाच्या वेबसाईटवर सबमिट केलेली ही नावं एका SD कार्डवरून यानातून पाठवली जातील. तुमच्या बोर्डिंग पासवरचा QR कोड स्कॅन करून तुम्हाला या मोहिमेच्या प्रगतीचे अपडेट् मिळवता येतील आणि नासाच्या Virtual Guest Program मध्ये सहभागी होता येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











