You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टिंडर डेटचा भयानक शेवट: '20 मिनिटांच्या त्या भेटीचा माझ्या आयुष्यावर इतका वाईट परिणाम झाला की...'
- Author, कॅट्रिओना मॅकफी आणि रेचल कोबर्न, बीबीसी डिस्क्लोजर
सोशल मीडियाच्या माध्यमातून डेटिंग करणं एका महिलेला खूपच महागात पडलं. अवघ्या 20 मिनिटांची ती 'डेट' त्या महिलेच्या जीवावर बेतली होती.
'टिंडर'वरील ख्रिस्तोफर हार्किन्सशी कनेक्ट झालेल्या एका महिलेने तिला आलेला भीतीदायक अनुभव सांगितला. ख्रिस्तोफरबरोबर 20 मिनिटं घालवल्यानंतर त्या महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. याचा तिच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला.
नादिया असं या महिलेचं नाव आहे. ती 2018 मध्ये एका कुख्यात फसवणूक आणि बलात्कार करणाऱ्या व्यक्तीसोबत डेटला गेली होती. त्या अनुभवाबद्दल पहिल्यांदाच तिने भाष्य केलं आहे. नादियाने सांगितलं की, तिने 'रेड फ्लॅग' पाहून डेट लवकर संपवली पण नंतर तिला याचा त्रास सुरू झाला.
स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट असलेली नादिया ही त्या सहा महिलांपैकी एक आहे, जिने स्कॉटलंडमधील एक अत्यंत कुख्यात अशा 'रोमान्स फ्रॉडस्टार' (फसवणूक) करणाऱ्याबद्दल आपले भयंकर, भीतीदायक आणि विचित्र अनुभव बीबीसीच्या 'डिस्क्लोजर: मॅच्ड विथ अ प्रीडेटर' पॉडकास्टमध्ये सांगितले.
तक्रारींकडे पोलिसांचे दुर्लक्ष
बीबीसीच्या तपासात समोर आलं की, 2012 पासूनच 11 महिलांनी हार्किन्सबाबत स्कॉटलंड पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता.
शारीरिक हल्ले, फसवणूक, धमक्या आणि गैरवर्तनाचे आरोप असूनही, पोलिसांनी हार्किन्सची 2019 पर्यंत चौकशीही केली नव्हती.
पोलीस स्कॉटलंड म्हणाले की, 'आधीच्या तक्रारी प्रामुख्याने आर्थिक बाबींशी संबंधित' होत्या आणि त्या सर्व स्वतंत्रपणे हाताळल्या गेल्या. अशी परिस्थिती 'आता पुन्हा होऊ नये' अशी त्यांची अपेक्षा होती.
हार्किन्सने स्कॉटलंड आणि लंडनमध्ये ऑनलाइन भेटलेल्या महिलांविरुद्ध जवळपास दहा वर्षे गुन्हे केले, आणि नंतर 2024 मध्ये त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली.
त्याला या आधीच थांबवायला हवं होतं, असं नादियाला वाटतं.
ती त्या अनेक पीडित महिलांपैकी एक आहे, जिने पोलिसांनी तक्रार करणाऱ्या महिलांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
आता 34 वर्षांची असलेली नादिया आणि 38 वर्षीय हार्किन्स यांची सात वर्षांपूर्वी टिंडरच्या माध्यमातून ओळख झाली होती.
ते अनेक आठवडे मेसेजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. नंतर त्यांनी ग्लासगोमध्ये 'डिनर'ला जाण्याचा निर्णय घेतला.
नादियाला पहिला 'रेड फ्लॅग' तेव्हा दिसला, जेव्हा ती हार्किन्सला त्याच्या कंबरनॉल्डमधील फ्लॅटवर घेण्यासाठी गेली.
अन् गोष्टी विचित्र घडू लागल्या...
जेव्हा त्याच्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा तो जॉगिंग ट्राउझर्स आणि बनियान घातलेल्या अवस्थेत होता. मी खूप थकलो आहे, बाहेर जाण्याऐवजी फ्लॅटवरच जेवणाची ऑर्डर मागवू असं त्यानं नादियाला सुचवलं.
'इथून गोष्टी विचित्र होऊ लागल्या,' असं नादियानं सांगितलं.
"मी आत गेले. जागा खूपच रिकामी होती. खोलीत फर्निचर नव्हतं. लिव्हिंग रूम पूर्णपणे रिकामी होती, टीव्ही शिवाय काही बॉक्स ठेवलेलं होतं."
हार्किन्सने नादियाला व्होडकाची ऑफर दिली. परंतु, नादियाने अल्कोहोलला नकार दिला आणि स्वतःसाठी डाएट कोक घेतलं. आणि तिथूनच सगळं वातावरण बदललं, असं ती म्हणाली.
'या नकारामुळे त्याचा पुरुषी अहंकार जागा झाला'
तो माझ्याकडे बघत होता अन् जणू असं म्हणत असावा की, 'तू स्वतःला काय समजेतस? स्वतःसाठी ड्रिंक का घेत आहेस?'
मी थोडंसं घाबरले नंतर मी ग्लास पूर्ण भरला. मी वळताच थोडं डाएट कोक खाली सांडलं.
"त्याची नजर वेड्यासारखी होती. 'तू इतकी बिनडोक आहेस, माझ्या वस्तूंचा आदर करत नाहीस. तू तर जोकर आहेस,' असं त्यानं काहीतरी मला म्हटलं."
माझ्या मनात विचार आला, 'हा खरा आहे का?' की फक्त त्याचा मुखवटा होता.
"मी म्हणाले, 'बघ, मी आताच जाईन.' त्यावर त्याने दरवाज्याकडे बोट दाखवत गलिच्छ शब्दसुद्धा वापरले."
नादियाने सांगितलं की, "मी खूप घाबरले होते. मला वाटलं की, तो आता माझ्या मागे येईल. मी माझ्या कारमध्ये पटकन उडी मारली, सर्व दरवाजे लॉक केले.
'त्या' 20 मिनिटांचा आयुष्यावर परिणाम
मला वाटलं की, आता हे सगळं इथेच संपेल, पण परिस्थिती आणखी वाईट होत गेली.
"तुम्ही विश्वास बसणार नाही की, अवघ्या 20 मिनिटांच्या या व्यक्तीसोबतच्या भेटीचा माझ्या आयुष्यावर इतका वाईट परिणाम झाला."
नादियाने नाकारल्यामुळे हार्किन्स खूपच रागावला. ती निघून गेल्यानंतर लगेचच तिला कॉल्स आणि मेसेजेस पाठवायला लागला.
पहिल्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं, "तुझ्यासारखी व्यक्ती माझ्यासोबतची डेट सोडून जाण्याचं धाडस कसं करते?"
पुढील काही तासांत परिस्थिती आणखी बिघडली. नादियाने सांगितलं की, हार्किन्सने तिच्या घरावर 'पेट्रोल बॉम्ब' टाकून तिला ठार मारण्याची आणि वडिलांवर हल्ला करण्याची धमकी दिली.
त्याने तिच्या दिसण्याबद्दलही अनेक अपमानजनक शब्द असलेले मेसेजेस पाठवले.
नादिया तिच्या आयुष्यातील कठीण काळातून बाहेर आल्यावर, ती हळूहळू पुन्हा आत्मसन्मान मिळवण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी हार्किन्सच्या या कृत्यामुळे तिच्या आत्मसन्मानावर वाईट परिणाम झाला.
"मी एक लठ्ठ गाय असल्याचा मला मेसेज आला," असं ती म्हणाली.
"तू एक कॅटिफिश आहेस. तू डुकरासारखी दिसतेस, तू खूप मेकअप करतेस. असे मेसेजस संपूर्ण रात्रभर तो करत होता. मी इतकी रडले की मला डोकदुखी सुरू झाली. सकाळी सहा वाजताही तो मला त्रास देत होता," असं तिने सांगितलं.
"मला आठवतं, मी आरशात पाहिलं आणि त्यावेळी मला स्वतःचीच लाज वाटली."
"त्याला माहिती होतं की, मी वजन कमी केलं आहे आणि जिमला जात आहे."
जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला
डेटच्या दुसऱ्या दिवशी, नादियाने तिला आलेल्या धमक्या आणि त्रासाची माहिती पोलीस स्कॉटलंडला दिली. तिने हार्किन्सच्या फोन कॉलचे रेकॉर्डही ऐकवलं.
मी तिच्या वडिलांच्या घरी जाईल, त्यांना बाहेर ओढून मारेल, असं त्या रेकॉर्डिंगमध्ये तो म्हणताना ऐकू येतं.
"यासाठी काहीच करता येणार नाही, अंस मला सांगण्यात आलं", असं नादियाने सांगितलं.
"त्यांनी सांगितलं की ही थेट धमकी नाही, पण काहीही घडलं तर लगेच त्यांना कॉल करा."
"कोणालाच माझी तक्रार नोंदवून घ्यायची नव्हती. त्यांना मला मदत करायची नव्हती. मी छतावरून ओरडले, 'हे मला सहन करायचं नाही, तुम्हाला ठाऊक नाही तो काय करू शकतो, तो मला धमकावत आहे'."
नादियाने सांगितलं, "जर त्यांनी तेव्हा काही केलं असत, तर माझ्यानंतरच्या मुलींना खूप मदत करता आली असती."
डेट संपल्यानंतरही हार्किन्सने तिला त्रास देणं सुरू ठेवलं.
नादियाने त्याचा नंबर ब्लॉक केला. परंतु, एका वर्षानंतरही तो सोशल मीडियावर तिच्या ओळखीच्या लोकांशी संपर्क करून तिला त्रास देत राहिला.
ती म्हणाली, "त्याने मला इतका मानसिक त्रास दिला की, माझी मुलगी नसती, तर मी माझं आयुष्य संपवलं असतं."
आता 12 वर्षांची भोगतोय शिक्षा
हार्किन्स सध्या 12 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्याला 10 महिलांवरील 19 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं, ज्यात शारीरिक आणि लैंगिक हिंसाचाराचा समावेश आहे.
त्याच्यावर सुरुवातीला नादियाला धमकावणं आणि त्रास देणं, तसेच तिच्या कुटुंबाला धमकी देणं असे आरोप केले गेले.
प्ली-डीलचा भाग म्हणून, त्या आरोपाबाबत 'दोषी नाही' अशी याचिका मान्य करण्यात आली आणि हार्किन्सने महिलांकडून हॉलिडे स्कॅम, खोट्या गुंतवणूक योजना आणि त्यांच्या ओळखीचा वापर करून बँकेकडून कर्ज घेणं यांसारख्या फसवणुकीतून 214,000 पौंडांपेक्षा जास्तीची रक्कम चोरल्याबद्दल दोषी ठरवलं.
शेवटी पोलीस तपास सुरू झाला, कारण एका महिलेनं हार्किन्सचे गुन्हे उघड करण्यासाठी आणि इतर महिलांना वाचवण्यासाठी माध्यमांची मदत घेतली होती.
हार्किन्सने खोट्या सुट्टीसाठी (फेक हॉलिडे) तिच्याकडून 3,247 पौंड घेतले असतानाही पोलिसांनी तिला मदत केली नव्हती.
तिचे हे वृत्त ऑक्टोबर 2019 मध्ये प्रसिद्ध झाले.
हार्किन्सचे गुन्हे किती मोठे आणि गंभीर आहेत, हे लगेच स्पष्ट झाले आणि पोलिसांनी औपचारिक तपासही सुरू केला.
नादिया आणि इतरांनी, ज्यांनी आधी तक्रारी केल्या होत्या, त्यांच्या पुन्हा भेटी घेण्यात आल्या आणि या वेळी त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलं.
2024 मध्ये हार्किन्सवर खटला चालवला गेला.
नादियाने हार्किन्सने बलात्कार केलेल्या एका महिलेबद्दल वाचलं तेव्हा तिला भयंकर गोष्टीची जाणीव झाली. ती घटना तिच्या 'डेट'नंतर अवघ्या दोन महिन्यांत घडली होती.
"त्या मुलीला वाचवता आलं असतं," असं ती म्हणाली.
तेव्हा जर त्याला अटक झाली असती, तर तिचा त्याच्याशी कधीच सामना झाला नसता.
"अत्यंत घृणास्पद. एवढंच मी त्याबद्दल सांगू शकते. हे खूपच वाईट आहे."
आमच्या तपासात हार्किन्सवर जवळपास 70,000 पौंडांपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीचे आणखी आरोप उघड झाले आहेत.
त्याने किमान 30 महिलांना फसवले असण्याची शक्यता बीबीसीला समजली आहे.
आम्ही या आरोपांविषयी हार्किन्सला तुरुंगात पत्र लिहिलं, पण त्याने याचे उत्तर दिले नाही.
डीसीआय लिंडसे लेर्ड यांनी हार्किन्सविरुद्ध पोलीस स्कॉटलंडच्या तपासाचे नेतृत्व केले आहे.
या तक्रारींचा आधी तपास का केला गेला नाही, हे सांगणं कठीण असल्याचे त्यांनी म्हटले.
"प्रत्येक तक्रार वेगवेगळ्या टप्प्यांवर नोंदवली गेली, त्यामुळे सर्व तक्रारी एकत्र नोंदवलेल्या नव्हत्या. त्या पोलीस स्कॉटलंडच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये नोंदवल्या गेल्या."
"त्या वेळी पोलिसांकडे शारीरिक किंवा लैंगिक शोषणाची कुठलीही तक्रार केली करण्यात आली नव्हती."
"त्या वेळच्या बहुतांश तक्रारी या आर्थिक बाबींशी संबंधित होत्या, आणि जेव्हा त्या स्वतंत्ररित्या पाहिल्या जातात, तेव्हा त्या नागरी तपास म्हणून घेतल्या जातात."
"मला वाटतं, त्या सुरुवातीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या तेव्हापासून पोलीस कामकाज खूप सुधारलं आहे."
न्यायालयात यश
अनेक महिलांनी बीबीसीला सांगितलं की, पोलीस तपासापूर्वीच त्यांनी शारीरिक अत्याचार आणि लैंगिक गैरवर्तनाची तक्रार केली होती.
हार्किन्सची तक्रार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीडित महिलांची पोलीस स्कॉटलंड माफी मागतील का, असा प्रश्न विचारल्यावर डीसीआय लेर्ड यांनी, 'याचं उत्तर देणं खूप कठीण' असल्याचं म्हटलं.
"मला वाटतं, त्यांनी केलेल्या तपासाच्या आधारे त्यांना आता न्यायालयात यशस्वी निकाल मिळाला आहे."
"आम्ही नंतर जे उपाय केले आहेत, त्यावरून मला वाटतं की अशा घटनांची आता पुनरावृत्ती होणार नाही."
त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नादिया म्हणाली, "मला माहीत आहे, त्यांनी नंतर खूप मेहनत घेतली. पण हे त्यांनी खूप आधी केलं असतं तर बरं झालं असतं."
"तो वर्षानुवर्षे हे करत होता. हे टाळता आलं असतं. त्यांनी माफी मागायला हवी. ते त्याला थांबवू शकले असते."
हर्किन्सला गेल्या वर्षी तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याला अटक झाल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी हा निकाल लागला. 10 महिलांच्या पुराव्यावरून त्याला दोषी ठरवण्यात आलं.
नादियाला निकालाबद्दल सांगण्यासाठी फोन आला.
"त्या महिलांनी लोकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठं काम केलं," असं ती म्हणाली.
ती म्हणाली की, "आता भविष्यात त्याला भेटू शकणाऱ्या इतर लोकांना त्याचा त्रास होणार नाही. त्यांनी जे केलं ते खरंच खूपच विलक्षण आणि खूप मोठं आहे."
दोन मुलांची आई असलेली नादिया आता आपलं आयुष्य आणि आत्मविश्वास पुन्हा निर्माण करत आहे, पण त्या अनुभवाने तिच्या मनावर खोल छाप सोडली आहे.
ती म्हणते, "मला आता खूप बरं वाटत आहे."
"आता मी आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी झाली आहे, आत्मविश्वास खूप वाढला आहे. मी आता बोलायला घाबरत नाही आणि यापुढे कधीच 'रेड फ्लॅग' म्हणजेच धोक्याचा इशारा देणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.