माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावाचा वापर करून वृद्ध महिलेची कोट्यवधींची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईमध्ये असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. यावेळी सायबर गुन्हेगारांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावाखाली एका वृद्ध महिलेला कोट्यावधी रूपयांना लुटलं आहे.
    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली आजकाल अनेक लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना वारंवार कानावर येत असतात.

यात बऱ्याचदा ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केलं जातं आणि पोलीस किंवा सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून अक्षरक्ष: त्यांची आयुष्यभराची कमाई लुटली जाते.

मुंबईमध्ये असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. यावेळी सायबर गुन्हेगारांनी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावाखाली एका वृद्ध महिलेला कोट्यवधी रुपयांना लुटलं आहे.

या महिलेला, तुमचं बँक खातं मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरलं जात आहे. यासाठी तुम्हाला अटक केली जाऊ शकते अशी धमकी देण्यात आली.

आणि त्यानंतर चौकशीच्या नावाखाली घाबरलेल्या या वृद्ध महिलेकडून त्यांनी तब्बल 3 कोटी 71 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले.

हा सगळा प्रकार नेमका कसा घडला, आरोपी कोण होते, पोलीस तपासात काय समोर आलं, जाणून घेऊयात.

आम्ही संबंधित महिलेची बाजू समजून घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

गुन्हा कसा घडला?

एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वृद्ध महिला या मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात गेल्या 26 वर्षापासून राहतात. त्यांना मिळालेल्या फंडातून त्यांचा आणि कुटुबांचा उदरनिर्वाह चालतो.

18 ऑगस्ट रोजी तिला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तुमचा कॉल कुलाबा पोलीस ठाण्याशी कनेक्ट करतो असं सांगून त्या व्यक्तीनं कॉल कट केला.

त्यानंतर या महिलेला एक व्हॉट्सअप व्हिडियो कॉल आला. समोरील व्यक्तीनं आपण कुलाबा पोलीस ठाण्यामधून बोलत असल्याचं सांगून तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे, असं या वृद्ध महिलेला सांगितलं.

त्या आधार कार्डचा वापर करून एका बँकेत खातं उघडण्यात आलं आणि ज्याचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जात आहे, असे त्यांना सांगण्यात आले.

हे प्रकरण बेकायदेशीर आहे, त्यामुळे तुमच्या नावावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सगळं ऐकल्यानंतर पीडित वृद्ध महिला घाबरली. त्या बँकेत आपलं कोणत्याही प्रकारचं खातं नाही आणि आपण कुठलाही गैरप्रकार केला नाही, असं त्यांनी आरोपींना सांगण्याचा प्रयत्न केला.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यावेळेस त्यांनी या महिलेला सांगितलं की मनी लाँड्रिंग प्रकरणात एका व्यक्तीला अटक झाली आहे.

सदरच्या केसमध्ये तुमचंही नाव असल्यानं तुम्हाला सुद्धा कधीही अटक होऊ शकते. आरोपींनी या महिलेला तसं पत्र देखील पाठवलं.

या महिलेला, "आम्ही तुमची चौकशी करणार असून आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दया नाहीतर आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना अटक करू," अशी धमकी दिली.

शिवाय, या प्रकरणासंदर्भात कोणालाही काहीही सांगितलं तर त्यांनाही अटक करू अशीही धमकी या महिलेला आरोपींनी दिली.

त्यांनी या महिलेकडून तिच्या नावावर असलेल्या बँक खात्यांची सगळी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण गंभीर असून या महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना कधीही अटक होऊ शकते, असं सांगितलं.

ही महिला राहत असलेल्या ठिकाणाची सर्व माहिती आरोपींनी त्यांच्याकडून घेतली. सदर केस संदर्भात सीबीआय तपास करत आहे, त्यामुळे 24 तास त्यांच्या देखरेखीखाली रहावं लागेल असंही आरोपींनी या महिलेला सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीनं, या महिलेला आपलं नाव एस. के. जयस्वाल असल्याचं सांगितलं होतं.

निबंध लिहायला सांगितला

थोडा वेळ बोलणं झाल्यानंतर, आरोपीनं या महिलेला तिच्या आयुष्यावर एक 2 ते 3 पानांचा निबंध लिहिण्यास सांगितलं.

तसेच, "तुम्ही निर्दोष असल्याची आपल्याला खात्री असून लवकरात लवकर सुनावणी होऊन तुम्हाला जामीनही मिळेल," असा विश्वास आरोपीनं या महिलेला दिला.

मग काही काळानंतर ऑनलाईन सुनावणी सुरू झाली, व्हिडिओ कॉलवरील व्यक्तीनं आपण स्वतः माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याचं सांगितलं.

त्या बनावट न्यायाधीशानं या महिलेकडून तिच्या गुंतवणूकीसंदर्भातील काही कागदपत्रं मागवली.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

काही वेळानंतर आरोपीनं या महिलेला सायबर अटॅक झाला असल्याचं सांगून, चौकशीचं कारण देत त्यांनी तिला तिचे सर्व म्युच्युअल फंड रिडीम करण्यास सांगितले.

त्यानंतर जवळपास 90 ते 95% निधी काही काळासाठी आरोपींनी दिलेल्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितला. त्यानंतर घाबरलेल्या या महिलेनं त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवले.

त्यानंतर आरोपीनं या महिलेला कॉल करून पुन्हा वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे टाकण्यास सांगितलं.

पैसे न दिल्यास तिला अटकेची धमकी दिली. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान तब्बल 3 कोटी 71 लाख रूपये या वृद्ध महिलेकडून घेण्यात आले.

जेव्हा तिनं आपण पाठवलेले पैसे पुन्हा परत करण्याबाबत आरोपींना विचारलं असता त्यांनी नवीन बहाणे करून पेसै देण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर तिनं 13 ऑक्टोबरला वेस्ट रिजन सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सदर फसवणुकीबाबत झालेले सर्व चॅट, बँक व्यवहार व इतर स्क्रीन शॉट व बँक खात्यांचे बँक स्टेटमेंट तिने पोलिसांसमोर सादर केले.

दरम्यान, या महिलेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 61(2), 204, 205, 340(2), 336 (3), 318 (4), 336 (2), 338, 319 (2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील कलम 66 (सी), 66 (डी) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

असा कॉल आल्यावर काय खबरदारी घ्यावी

पोलीस असल्याची बतावणी करून संपर्क करणाऱ्या कोणत्याही व्हॉटसअ‍ॅप खातेधारकांच्या कॉल किंवा मेसेजेसला प्रत्युत्तर देऊ नये.

पोलीस कधीही व्हॉटसअ‍ॅप किंवा तत्सम सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यातून ऑनलाइन तपास किंवा अटक करत नाहीत. असे कोणी करत असल्यास सदरचे अकाऊंट धारकास कोणतीही माहिती न देता ते अकाऊंट ब्लॉक करावे.

वरिष्ठ अधिकारी यांचा व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडिया प्रोफाईल फोटो असलेल्या अनोळखी मोबाईल क्रमांकाची पडताळणी करूनच प्रत्युत्तर द्यावे.

सायबर फसवणुकीचा धोका वाटल्यास या ठिकाणी संपर्क करा

जर कोणी अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलंच तर काही पावलं उचलणं गरजेचं आहे.

केंद्र सरकारने https://cybercrime.gov.in/webform/Crime_NodalGrivanceList.aspx नावाचं एक पोर्टल तयार केलं आहे.

तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीमध्ये अडकले असाल तर तक्रार नोंदवता येते. प्रत्येक राज्यासाठी वेगळा क्रमांक दिला आहे. त्यामुळे फोनवरुनही तक्रार नोंदवू शकता.

महाराष्ट्रासाठी 022-22160080 हा क्रमांक आहे. दिल्ली पोलिसांनी 1930 क्रमांकाची हेल्पलाइनही सुरू केली आहे. याशिवाय थेट 112 क्रमांकावरही फोन करू शकता.

फसवणूक झाल्यानंतर जितकी लवकर तक्रार दाखल कराल, तितके पैसै परत मिळण्याच्या शक्यता वाढतात, असं सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.