आबालवृद्धांना भुरळ घालणारा सांताक्लॉज जगाला कधी आणि कसा मिळाला? त्याचं मूळ गाव कुठलं?

    • Author, इल्का सिरेन
    • Role, फिचर्स प्रतिनिधी

सांताक्लॉज कुठून येतो? असा प्रश्न जर तुम्ही फिनलंडमधील लोकांना विचारला, तर ते म्हणतील, तो लॅपलँडमधील कोर्वातुंतुरी या डोंगरावरून येतो.

लॅपलँड हा फिनलंडच्या अगदी उत्तरेकडील प्रदेश आहे.

डच लोक सांताक्लॉजला सिंटरक्लास म्हणतात, तर जर्मनीत त्याला वाईनॅक्ट्समन म्हणतात. तुम्ही त्याला सांता म्हणून ओळखत असाल.

सांताक्लॉजची अशी अनेक नावं आहेत. त्याचप्रमाणे अनेक देशांना वाटतं की, सांताक्लॉज त्यांचाच आहे. मात्र, एक देश असा आहे की, जो सांताक्लॉज त्यांच्या देशातला आहे, सांताचे मूळ अधिकृत घर त्यांच्याच देशात आहे असा अधिक दावा करू शकतात.

सेंट निकोलस हे मध्ययुगीन काळातील उदार आणि परोपकारी ख्रिश्चन संत होते. ते चौथ्या शतकात सध्याच्या तुर्कीमधील मायरा या छोट्या रोमन शहराचे बिशप होते. तेच या सांताक्लॉज मागची प्रेरणा असल्याचं मानलं जातं.

सेंट निकोलसच्या अवशेषांवरील तुर्कीचा दावा

अर्थात सेंट निकोलस यांना कुठे दफन करण्यात आलं होतं, त्यांचे अवशेष नेमके कुठे आहेत याबद्दल वाद आहे. काहींच्या मते ते इटलीमध्ये आहेत तर काहींचा दावा आहे की त्यांना आयर्लंडमध्ये दफन करण्यात आलं होतं.

ऑक्टोबर 2017 मध्ये तुर्कीमधील पुरातत्वशास्त्रज्ञांना अंटालिया प्रांतातील सेंट निकोलस चर्चखाली एक कबर सापडली होती. ती जागा प्राचीन मायराच्या अवशेषांपासून फार दूर नाही. त्यांना वाटतं की ही कबर सेंट निकोलस यांचीच आहे.

जर तुर्कीला सेंट निकोलस यांच्या दफनस्थानावरचा त्यांचा दावा सिद्ध करता आला, तर जगभरातील सांताक्लॉजप्रेमींना एक नवीन तीर्थस्थळ मिळेल. मात्र जर फिनलंडचा त्यावर आक्षेप असला, तर मात्र तसं होणार नाही.

जर तुम्ही फिनलंडमधील लोकांना सांताक्लॉजबद्दल विचारलं तर ते सांगतील की त्यांच्या देशातील लॅपलँडमधील कोर्वातुंतुरी हे सांताक्लॉजचं मूळ ठिकाण आहे.

बर्फाच्छादित डोंगरावरचं सांताक्लॉजचं गाव

कोर्वातुंतरी डोंगर हा अनेकदा बर्फानं आच्छादलेला असतो, तिथे रेनडियरचे कळप असतात. फिनलंडमधील अनेकजणांना वाटतं की या डोंगरावरच सांताक्लॉजचं गुप्त वर्कशॉप आहे. कोर्वातुंतरी हे वर्कशॉपचं ठिकाण म्हणून 1927 साली समोर आलं होतं.

रेडिओवरील निवेदक मार्कस रॉशिओ यांनी एका प्रसारणादरम्यान ते जाहीर केलं होतं. मात्र असं असलं, तरी फिनलंडमधील सांताक्लॉजची परंपरा त्यापेक्षा कितीतरी जुनी आहे.

मध्ययुगीन कालखंडात फिनलंडमध्ये ख्रिश्चन धर्म येण्यापूर्वी, फिनलंडमधील लोक 'यूल' नावाचा एक सण साजरा करत असत. तो हिवाळ्याच्या मध्यात साजरा होत असे. या सणात एका भव्य मेजवानीचं आयोजन केलं जात असे. त्यावेळेस फिनलंडमधील लोक जगातील कोणत्याही मुख्य धर्माचं पालन करत नव्हते.

नुट्टीपुक्कीची परंपरा

सेंट नट्सचा दिवस म्हणजे 13 जानेवारीला अनेक नॉर्डिक देशांमध्ये 'नुट्टीपुक्की' घरोघरी जातात आणि भेटवस्तू मागतात, उरलेलं अन्न मागतात किंवा गोळा करतात. नुट्टीपुक्की म्हणजे पुरुष विशिष्ट प्रकारचा पेहराव करतात. ते फरचं जॅकेट घालतात, बर्चच्या सालीपासून तयार केलेले मुखवटे आणि शिंगं घालतात.

हा पेहराव करून ते घरोघरी जातात. नुट्टीपुक्कींना दुष्ट आत्मा मानलं जात असे. जर त्यांना जे हवं असेल ते मिळालं नाही तर खूप मोठ्यानं आवाज करत आणि लहान मुलांना घाबरत असत.

1800 च्या दशकात परोपकारी असे सेंट निकोलस फिनलंडमध्ये प्रसिद्ध झाले. मुखवटा घालून करायच्या आणि आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या नुट्टीपुक्कीच्या पंरपरेत सेंट निकोलस यांची ही प्रतिमा मिसळली आणि त्यातून जॉलुपुक्कीची निर्मिती झाली. त्याचा अर्थ 'यूलचा बोकड'.

प्रेमळ जॉलुपुक्की

जॉलुपुक्कीचं वर्तन नुट्टीपुक्कीच्या उलट होतं. नुट्टीपुक्की वस्तू मागत असे तर त्याउलट जॉलुपुक्की वस्तू वाटायचे. सांताक्लॉज घराच्या चिमणीतून खाली उतरतात. त्याच्या विपरित लांल रंगाचे कपडे घातलेला जॉलुपुक्की दार ठोठावून विचारायचा "ओन्को टाल्ला किल्टेजा लाप्सिया?" म्हणजे "इथे कोणी चांगलं वर्तन करणारी मुलं आहेत का?"

मग या भेटवस्तू दिल्यानंतर जॉलुपुक्की पुन्हा कोर्वातुंतुरी डोंगरावर परतायचा. कोर्वातुंतुरीचा अर्थ फिनलंडमधील भाषेत 'कानांचा डोंगर' असा होतो. फिनलंडमधील लोकांची धारणा आहे की कोर्वातुंतुरी हे असं ठिकाण आहे जिथे जॉलुपुक्की सर्वकाही ऐकू शकतो.

नोव्हेंबर 2017 मध्ये फिनलंडमधील शिक्षण आणि संस्कृती मंत्रालयानं जॉलुपुक्कीचा (किंवा आज ती फिनिश सांताक्लॉज परंपरा म्हणून ओळखली जाते) समावेश नॅशनल इन्व्हेंटरी ऑफ लिव्हिंग हेरिटेजमध्ये करण्यास मंजूरी दिली.

ही एक यादी आहे, ज्याची जपणूक युनेस्को कन्व्हेन्शन फॉर द सेफगार्डिंग ऑफ द इनटॅंजिबल कल्चरल हेरिटेज (अमूर्त सांस्कृतिक वारशाचं जतन करण्यासाठीचा करार) चा एक भाग म्हणून नॅशनल बोर्ड ऑफ अँटिक्विटीजकडून केली जाते.

"फिनलंडचा सांताक्लॉज आणि आमच्यासाठी हे एक मोठं पाऊल होतं. अखेरीस युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या आंतरराष्ट्रीय यादीत फिनलंडच्या सांताक्लॉजच्या परंपरेचा समावेश केला जाईल, अशी आम्हाला आशा आहे," असं जॅरी अहजोहारजू म्हणतात. ते फिनलंडच्या सांताक्लॉज फाउंडेशनचे प्रतिनिधी आहेत.

फिनलंडच्या पर्यटन उद्योगातील सांताक्लॉजचं महत्त्व

अहजोहारजू यांच्या मते, युनेस्कोच्या यादीमुळे सांताक्लॉज हा फक्त फिनलंडचा वारसा आहे अशी मान्यता मिळणार नसली तरीदेखील, तो फिनलंडसाठी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक सन्मान असेल. सांताक्लॉजचं वास्तव्यं असणारा देश म्हणून फिनलंडचं स्थान त्यामुळे अधिक मजबूत होईल.

पण मग, सांताक्लॉजवर हक्क का सांगावा? कदाचित यापेक्षा अधिक योग्य प्रश्न असा आहे की, सांताक्लॉजवर हक्क कोण सांगणार नाही? मात्र, एक गोष्ट नक्की आहे. ती म्हणजे अनेकांसाठी सांताक्लॉज हे एक अतिशय आनंददायी, भेटवस्तू देणारं, शांतताप्रिय व्यक्तिमत्व आहे.

ती एक अशी व्यक्ती आहे जिला आनंद वाटायचा आहे, सर्व वातावरण आनंदी करायचं आहे. अर्थात, काहीजण सांताक्लॉजला व्यावसायिकतेचा आधुनिक चेहरा मानतात. मात्र सांताक्लॉजच्या आनंदी, प्रसन्न वृत्तीचा संसर्ग टाळणं खूपच कठीण आहे.

शेवटी सांताक्लॉज हा खरा असो की काल्पनिक असो, तो सदिच्छेचा, चांगल्या वृत्तीचा दूत आहे.

यात पर्यटन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 'व्हिजिट फिनलंड'नुसार, गेल्या वर्षी लॅपलँडमध्ये रात्रभर मुक्काम करण्यांची संख्या जवळपास 18 टक्क्यांनी वाढली.

तिथले नॉर्दर्न लाईट्स हे पर्यटकांसाठीचं एक मोठं आकर्षण असलं तरीदेखील लॅपलँडला येणारे बहुतांश पर्यटक रोव्हेनिमीमधील फिनिश सांताक्लॉजला भेटण्यासाठी उत्सुक असतात. रोव्हेनिमी हे फिनलंडच्या लॅपलँडमधील एक शहर आहे. एकप्रकारे ते सांताक्लॉजचं गाव आहे.

फिनलंडच्या वाढत्या पर्यटन उद्योगासाठी सांताक्लॉज हे एक महत्त्वाचं आकर्षण आहे आणि त्यामुळेच त्यांच्यासाठी ती एक अमूल्य संपत्तीदेखील आहे.

फिनलंडच्या भौगोलिक परिस्थितीचं सांताक्लॉजच्या परंपरेशी साधर्म्य

सेंट निकोलस यांचे अवशेष जर खरोखरच अंटालियामध्ये सापडले, तर ते सांताक्लॉजवरील तुर्कीच्या दाव्याला त्यामुळे निश्चितच बळ मिळेल.

मात्र, तरीदेखील तुर्किमध्ये बर्फ किंवा हिमवर्षाव नाही, रेनडियर नाही आणि नॉर्दर्न लाईट्सदेखील नाहीत. ही सर्व वैशिष्ट्यं सांताक्लॉजच्या घराशी अतिशय घट्टपणे जोडलेली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व फिनलंडमध्ये आढळतं.

आपल्या या आनंदी, प्रसन्न मित्रासाठी भविष्यात काय असेल हे कोणास ठाऊक. मात्र एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे, जॉलुपुक्की लवकरच लॅपलँडमधून त्याचा लांबचा प्रवास लवकरच सुरू करेल.

तो उडत येणार नाही, तर त्याच्या स्लेजगाडीतून (बर्फावरून घसरत चालणारी विनाचाकाची घोडा किंवा इतर प्राण्यांकडून ओढली जाणारी गाडी) बर्फामधून वाट काढत येईल. तो येईल आणि सर्व फिनलंडमधील घरांचे दरवाजे ठोठावून विचारेल, "ओन्को टाल्ला किल्टेजा लाप्सिया?" म्हणजेच "इथे चांगली मुलं आहेत का?"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)