26 जुलै 2005 : जेव्हा अख्खी मुंबईच बुडाली पाण्याखाली, प्रलयाबाबत बीबीसी प्रतिनिधींच्या आठवणी

26 जुलै 2005 : मुंबईचा महापूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विमानतळाकडे जाणाऱ्या महामार्गाला असं नदीचं रूप आलं होतं.

एखादा दिवस आठवणींत राहतो, तो तुमचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टोकोनच बदलून टाकतो. 26 जुलै 2005 चा दिवस मुंबईकरांसाठी असाच एक दिवस ठरला.

मुंबईत, विशेषतः उपनगरांत, त्या दिवशी अभूतपूर्व पाऊस झाला होता आणि जणू प्रलयच आला होता. सांताक्रुझच्या हवामान केंद्रात तेव्हा अवघ्या चोविस तासांतच 944 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

फक्त मुंबईच नाही, तर आसपासच्या परिसरात, अगदी मिरा-भाईंदरपासून ते कल्याण-अंबरनाथ-बदलापूरपर्यंत अनेक ठिकाणी तेव्हा पूर आला होता.

त्यात 1000 हून अधिक जणांचा जीव गेला, हजारो वाहनं निकामी झाली आणि 14,000 हून अधिक घरांचं नुकसान झालं, असं आकडेवारी सांगते.

अतीवृष्टी, ढगफुटी, महापूर हे आता हवामान बदलासोबत परिचयाचे होत चाललेले शब्द, अनेक मुंबईकरांनी त्या दिवशी पहिल्यांदाच अनुभवले.

बीबीसी मराठीचे काही प्रतिनिधी तेव्हा मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहात होते. त्यांच्या आठवणींतून त्या दिवसाची कहाणी.

पाणी माझ्या छातीपर्यंत आलं होतं – अमृता दुर्वे, परळ

मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये नोकरीला लागून दोनच महिने झाले होते. तो मंगळवारचा दिवस होता, हे अजूनही आठवतंय. कारण दर मंगळवारी सकाळी मुंबईतल्या फोर्ट परिसरातल्या ऑफिसात आमची मीटिंग व्हायची, आणि मग ऑफिसच्या गाडीनं आम्ही लोअर परळच्या ऑफिसात यायचो.

त्यादिवशी मीटिंगनंतर तीन-चार सहकाऱ्यांसोबत निघाले, पण काही अंतरावरच जेजे फ्लायओव्हरवर खूप ट्रॅफिक लागलं, गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या.

26 जुलै 2005 : मुंबईचा महापूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सगळीकडे लोक साखळी करून एकमेकांच्या आधारानं पाण्यातून वाट काढत होते.

बराच वेळ गाडी हलेना म्हणून शेवटी चालतच निघालो. परळला गौरीशंकर छित्तरमलच्या चौकात पोहोचलो, तोवर माझ्या छातीपर्यंत पाणी आलं होतं. हे काहीतरी वेगळं आहे, याची तेव्हा जाणीव झाली.

तोवर परळमधली स्थानिक मुलं खाली उतरली होती. मानवी साखळ्या करून ते लोकांना मदत करत होते. पाण्याखाली ड्रेनेज कुठे उघडं आहे, कुठून जाता येईल, याचं मार्गदर्शन करत होते.

परळच्या ऑफिसजवळ पोहोचलो, तेव्हा ऑफिसातले सगळे वरून खालीच पाहात होते. आम्ही सगळे निघालोय हे त्यांना कळलं होतं पण आम्ही पाहोचलो नव्हतो.

फोर्ट ते परळ हे जेमतेम आठ किलोमीटरचं अंतर. पण ते पार करून आम्ही तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती.

मुंबई 27 जुलै 2005

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लोक पायीच घरी निघाले होते, त्यांना स्थानिक रहिवाशांनी अन्न-पाणी पुरवलं.

कसंबसं स्वच्छ होऊन घरचे कुठे आहेत हे पाहायला सुरुवात केली. माझे आईवडील दोघंही नोकरी करायचे.

वडील चेंबूरला कंपनीतच थांबले होते. आई फोर्टमधल्या ऑफिसातून निघाली होती पण तिची ट्रेन जीटीबी स्टेशनला येऊन थांबली होती.

तेव्हा मोबाईल नव्हते आणि तिनं स्टेशनवरच्या लँडलाईनवरून बाबाला फोन केला होता, त्यांच्याकडून मला माहिती मिळाली.

अख्खी रात्र आई आणि तिच्या सोबतच्या बायका जीटीबी स्टेशनला लेडीज डब्यातच बसून होत्या. जवळच्या गुरुद्वारातून सर्वांना खिचडीचं जेवण, पाणी, अंग पुसायला पंचे, असं सगळं दिलं होतं.

26 जुलै 2005 : मुंबईचा महापूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पुरानं भरलेल्या रस्त्यावरून जाणारी बोट.

पुढचे दीड दिवस मी ऑफिसातच होते. बाहेर सगळीकडेच खूप गोंधळ होता. ऑफिसात जेवढे लोक होते, त्यांनी मिळूनच आवृत्ती काढली होती.

दुसऱ्या दिवशी मी आणि माझी एक मैत्रिण दादरला राहणाऱ्या माझ्या काकाकडे चालत गेलो होतो. तेव्हाही लोक बाहेर येऊन मदत करत होते. कोणी बिस्किटं वाटत होते, रस्ता दाखवत होते.

कुठलंतरी दुकान उघडं दिसलं, तिथून आम्ही काही कपडे घेतले, पुढची अनेक वर्ष तो टीशर्ट माझ्याकडे होता.

26 जुलै 2005 : मुंबईचा महापूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईच्या तीन्ही मार्गावरच्या लोकल गाड्या पुरामुळे बंद पडल्या.

काकाकडे एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी मिळेल त्या बसने पुढे पुढे जात मी वाशीला घरी गेले. रस्ताभर सगळीकडे बंद पडलेल्या गाड्या, पायी निघालेले लोक, वाहात आलेला कचरा दिसत होता.

घराजवळ पोहोचले, तेव्हा अख्खी गल्ली लोकांनी भरली होती. माझ्या पोटात खड्डा पडला कारण माझ्या इमारतीसमोरच गर्दी होती.

तिथेच राहणारा एक तरूण मुलगा खारघरच्या पांडवकड्याला त्याच दिवशी फिरायला गेला होता आणि डोंगरावरून माती कोसळून आमच्या परिसरात राहणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला होता.

अख्खी मुंबई ठप्प होती – शरद बढे, काळाचौकी

तेव्हा मी CNBC साठी लोअर परेल ऑफिसमध्ये व्हिडिओ एडिटर म्हणून काम करत होतो. लोअर परळ - करी रोड - लालबाग मार्गे काळाचौकी, घरापर्यंत एरवी 20 मिनिटात पोहोचायचो.

दोन वाजल्यापासूनच जोरदार पाऊस सुरू होता. बाईकने घरी जायचं होतं म्हणून वाट पाहात होतो. पण काही चिन्हं दिसत नव्हतं. मग चार वाजता भर पावसात निघालो.

26 जुलै 2005 : मुंबईचा महापूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाण्यातून बंद पडलेली टॅक्सी ढकलत नेणारे चालक

योगायोगाने माझी बायको मिली तेव्हा करी रोड ब्रिजवर भेटली. ती सहा महिन्यांची गरोदर होती. त्या संध्याकाळी ती ऑफिसवरून घरी निघाली होती.

इतर वाहनं नसल्यामुळे ती लोअर परळहून चालतच निघाली होती. तिला सोबत घेतलं आणि पावसात आम्ही डबलसीट निघालो.

रस्त्यावर पाणी साचायला लागलं होतं. पण घरी पोहोचू थोड्याच वेळात म्हणून पुढे जात राहिलो.

26 जुलै 2005 : मुंबईचा महापूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबई विमानतळ पुन्हा सुरू झाल्यानंतरचं दृश्यं त्या दिवशी रस्ता, रेल्वे आणि हवा अशा सर्व मार्गांनी मुंबईचा देशाशी संपर्क तुटला होता.

सरदार हॉटेलपर्यंत पोहोचलो, तसं ट्रॅफिक जाम झालं होतं. बाईकची चाकं अर्धी पाण्यात होती. गाड्या पुढे जात नव्हत्या, मागे अजून गाड्या साचल्या. संध्याकाळी पाचच्या सुमारासची ही गोष्ट आहे.

पुढच्या काही गाड्या पाणी जाऊन बंद पडल्यामुळे रस्ता बंद झाला होता. तासभर तसेच होतो. मिलीला अजून त्रास नको, म्हणून तिला जवळच एका माझ्या मित्राच्या घरी सोडायचं ठरलं.

बाईक पाण्यातच स्टॅंडवर लावून आम्ही पाण्यातून रस्ता ओलांडून मित्राच्या बिल्डिंगजवळ पोहोचलो. तिला मित्राच्या घरी थांबवून मी परत बाइक जवळ आलो.

26 जुलै 2005 : मुंबईचा महापूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काही भागांत दरड कोसळण्याच्या घटना घडल्या, मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं.

बाईक आता पेट्रोल टाकीपर्यंत पाण्यात होती. ती सुरू होणारच नव्हती. कसंबसं ढकलत बाईक फुटपाथवर आणली आणि एका भिंतीजवळ सोडून दिली. आसपास असंख्य कार बंद पडल्या होत्या, बाईक पाण्यात बुडाल्या होत्या.

लोक गाड्या तिथेच सोडून घरी चालत गेले. अनेक ठिकाणी झाडं पडली होती. स्कूलबस अडकलेल्या होत्या आणि पालक मुलांना शोधायला शाळेकडे निघाले होते. सगळीकडेच इतकं पाणी होतं की मुंबई ठप्प झाली होती.

मिली आणि मी रात्री उशिरा चालत घरी पोहोचलो.

विसरता न येणारा प्रलय – जान्हवी मुळे, कर्जत

मी तेव्हा कर्जतला राहायचे, तिथून रोज लोकल ट्रेननं घाटकोपरला कॉलेजमध्ये जायचे. शेवटच्या वर्षात शिकत होते.

24-25 जुलैपासूनच कर्जतला आणि वर घाटात लोणावळ्यात मुसळधार पाऊस झाला होता. 25 जुलैला लोकलही काही काळ बंद पडल्या होत्या.

कर्जत परिसरात 4 ऑगस्टला टिपलेलं दृश्यं. इथे रेल्वे ट्रेन्सची वाहतूक दहा दिवस बंद होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कर्जत परिसरात 4 ऑगस्टला टिपलेलं दृश्यं. इथे रेल्वे ट्रेन्सची वाहतूक दहा दिवस बंद होती.

त्यामुळे 26 तारखेला सकाळी पावसाचा रागरंग बघून मी आणि बदलापूरला राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीनं आम्ही येत नसल्याचं कॉलेजमध्ये कळवलं.

उल्हास नदी दुथडी भरून वाहात होती, सगळे कर्जतकर नदीवर लक्ष ठेवून होते.

1989 साली इथे महापुराचा अनुभव घेतलेला असल्यानं सगळे पुराची तयारी करत होते. म्हणजे जिथे पाणी शिरतं, तिथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करणं, खाण्यापिण्याची व्यवस्था करणं अशी कामं लोक स्वतःहूनच करत होते.

पाऊस एवढा होता की काही फुटांवरचं दिसत नव्हतं. दुपारी दोननंतर नदीचं पाणी झपाट्यानं वाढू लागलं आणि चारच्या सुमारास ते गावात शिरायला सुरुवात झाली.

26 जुलै 2005 : मुंबईचा महापूर

फोटो स्रोत, Getty Images

पोलीस लाऊड स्पीकरवरून माहिती देत होते. तसं सगळे पाण्यापासून दूर मागे फिरले. आम्हीही घरी परतलो.

आपलंही आज काही खरं नाही, असा विचार करत होते. पण साधारण तासाभरातच गावातलं पाणी ओसरल्याचं कळलं. मग रात्री उशीरानं त्याचं कारण समजलं.

उल्हास नदीवर पुढे बदलापूरच्या आधी बॅरेज धरण आहे. पुराच्या वेगानं त्या धरणाचे लोखंडी दरवाजे तुटून वाहून गेले होते आणि खाली बदलापूर-अंबरनाथ-उल्हासनगर आणि कल्याणमध्ये पसरून अक्षरशः प्रलय आला होता.

26 जुलै 2005 : मुंबईचा महापूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चर्चगेट स्टेशनात ट्रेनमध्ये अडकलेले लोक.

इकडे अंधारात बुडालेलं कर्जत पुढचे काही दिवस अंधारातच राहिलं. फोन लागत नव्हते, सकाळीच वीज पुरवठा बंद झाल्यामुळे टीव्हीही बंद. फक्त रेडिओवर बाहेरच्या वारा-पावसाच्या आवाजात जेवढं ऐकता येईल तेवढं कानावर पडत होतं.

मुंबईत खूपच पाऊस पडत असल्याची माहिती रेडियोवरूनच मिळाली. तिथे राहणारे नातेवाईक मजल दरमजल करत घरी कसे पोहोचले हे रात्री उशीरा फोन लागला तेव्हाच समजू शकलं.

मुंबईत मिठी नदीनं प्रलय आणला तर इकडे उल्हास नदीनं साधारण 25-30 किलोमीटर परिसरातली सगळी शहरं धुवून काढली. गावा-वस्त्यांचा संपर्क तुटला होता, कुठे दरड कोसळली होती, कुणाच्या घरात मृतदेह वाहून आले होते.

26 जुलै 2005 : मुंबईचा महापूर

फोटो स्रोत, Getty Images

कर्जतमध्ये जमा केलेली मदत काहींनी मग बदलापूरला पोहोचवली.

मध्य रेल्वेच्या मार्गावर नुकसान झाल्यामुळे कर्जतहून जाणाऱ्या गाड्या आठवडाभर बंद होत्या.

6 ऑगस्टला रेल्वेसेवा सुरू झाल्यावर 7 ऑगस्टला सकाळी अखेर पुन्हा ट्रेननं कॉलेजला निघाले. तेव्हा वाटेत सगळीकडे पुराच्या खुणा अजूनही स्पष्ट दिसत होत्या. एरवी गाडीतून हिरवागार दिसणारा उल्हास नदीचा परिसर भकास झाला होता.

नदीच्या कडेनं कित्येक किलोमीटरपर्यंत झाडांवर एकही पान उरलं नव्हतं. कुठे कुठे कचरा, सामान आणि प्राण्यांचे अवशेष अडकले होते. निसर्गासमोर आपण किती खुजे आहोत, याची आठवण करून देणारा तो अनुभव होता.

मुंबईत त्यानंतर असा पाऊस झाला नाही. पण त्यापेक्षाही कमी पावसात अलीकडे शहर विस्कळीत होताना मात्र वारंवार पाहिलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)