पान, मावा आणि बिडीचं व्यसन असेल तर ही बातमी वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रुचिता पुरबिया
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
मावा, मसाला, खैनी, सिगारेट, बिडीच्या पाकिटावर तुम्हाला एक इशारा दिसतो, तो म्हणजे 'या गोष्टींचं सेवन आरोग्यासाठी घातक आहे.' पण हा इशारा वाचून त्याच्याकडे दुर्लक्ष करत तंबाखूचं सेवन करणाऱ्यांची संख्या भारतात कमी नाहीये.
धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो आणि तो किती धोकादायक असू शकतो हे त्याच्या आकडेवारीवरून कळतं.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, भारतात 2020 मध्ये ज्या कर्करोगांच्या प्रकरणांचं निदान झालं त्यापैकी 27 टक्के कर्करोग तंबाखूशी निगडित होते.
पान (तंबाखूसह), बिडी, मावा-मसाला, गुटखा हे सर्व प्रकार तंबाखूच्या श्रेणीत येतात.

फोटो स्रोत, BIPIN TANKARIA
भारतात तंबाखूचं उत्पादन तर जास्त होतंच पण याचं सेवन करणाऱ्या ग्राहकांच्या यादीतही भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात तंबाखूचे विविध प्रकार अतिशय कमी दरात उपलब्ध आहेत.
जर भारतातील राज्यनिहाय आकडेवारी पाहिली तर तंबाखूच्या उत्पादनात गुजरात आघाडीवर आहे. गुजरातमधील बिडीबद्दल बोलायचं झाल्यास, 1.92 लाख हेक्टर क्षेत्रावर लाल आणि काळ्या चापडीया, गडाकू, (हुक्का तंबाखू), आणि रस्टिका तंबाखूचं पीक घेतलं जातं.
ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे इंडियाच्या 2016-17 च्या अहवालानुसार, भारतात सुमारे 2 कोटी 67 लाख प्रौढ (किंवा त्याहून अधिक) तंबाखूचं सेवन करतात.
भारत सरकार, जागतिक आरोग्य संघटना आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
2009-10 मध्ये देखील एक सर्वेक्षण करण्यात आलं होता. त्यानुसार, भारतीय प्रौढ व्यक्तींपैकी 35 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचं सेवन करत होते. त्यापैकी 21 टक्के लोक धूरविरहित तंबाखूचं सेवन करत होते. 9 टक्के लोक धुम्रपान करत होते तर 5 टक्के लोक दोन्हींचं सेवन करायचे.
डॉ. ख्याती वासवदा या ऑन्कोलॉजिस्ट सर्जन आणि राजकोट कॅन्सर सोसायटीच्या वैद्यकीय संचालक आहेत. त्यांच्या मते, 35 टक्के संख्या ही अगदीच किरकोळ नोंद आहे. तंबाखूचं सेवन करणाऱ्या लोकांची वास्तविक टक्केवारी यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल.
तंबाखू हे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार आणि पक्षाघात यांसारख्या अनेक जुनाट आजारांचं कारण मानलं जातं. तंबाखूमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतात. भारतात दरवर्षी सुमारे 13.5 लाख मृत्यू तंबाखूशी संबंधित समस्यांमुळे होतात.
तंबाखूचं सेवन दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे धूम्रपान आणि दुसरं धूररहित तंबाखू. भारतात तंबाखूच्या सेवनातील सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू. यात जर्दा, खैनी, गुटखा, तंबाखू आणि सुपारी यांचा समावेश होतो.
तंबाखूमुळे शरीराचं नुकसान होतं...
तंबाखूमध्ये निकोटीन नामक घटक असतो. निकोटीनमुळे माणसाला त्याचं वारंवार सेवन करावं वाटतं. आणि कालांतराने त्याला याचं व्यसन जडतं.
धूररहित तंबाखूचे बहुतेक सेवनकर्ते ही तंबाखू गाल आणि हिरड्यांच्या फटीत ठेवतात.
बिडी सिगारेट ओढताना तंबाखू जाळली जाते आणि त्याचा धूर शरीरात ओढून घेतला जातो. या धुरातील निकोटीन हळूहळू रक्तात शोषलं जातं.
त्यामुळे धूम्रपान करताना आपल्या शरीरात इतर जंतूंचाही प्रवेश होतो. यातून फुफ्फुसाचा दाह आणि संसर्ग होऊ शकतो.
धूररहित तंबाखूमुळे बऱ्याच लोकांना हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या इतर समस्या उद्भवतात. यामुळे अनेक जंतू शरीरात सहजपणे प्रवेश करतात.
पान, मावा, बिडीचा आरोग्यावर गंभीर परिणाम कसा होतो?
तंबाखूच्या सेवनामुळे शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर नकारात्मक परिणाम होतो. तर काही प्रकरणांमध्ये मृत्यूही होतो.
तज्ज्ञांच्या मते, तंबाखूच्या सेवनामुळे प्रामुख्याने तीन आजार बळावतात :
- कर्करोग
- श्वसन रोग
- हृदयरोग
तंबाखूमुळे शरीराची जी हानी होते त्यावर बीबीसीने पल्मोनोलॉजिस्ट डॉ. पार्थिव मेहता यांच्याशी तपशीलवार चर्चा केली.
यावर डॉ. पार्थिव मेहता सांगतात, "तंबाखूमुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला हानी पोहोचते. तंबाखूच्या सेवनामुळे प्रामुख्याने दोन आजार होतात, एक म्हणजे कर्करोग आणि दुसरा फुफ्फुसाचा आजार. तंबाखूच्या सेवनामुळे घशाचा, तोंडाचा, आतड्यांचा कर्करोग होतो."

फोटो स्रोत, Getty Images
घशाचा आणि तोंडाचा कर्करोग झालेल्या जगभरातील एकूण रुग्णांपैकी 57.5 टक्के रुग्ण एकट्या भारतात आहेत. भारतात या रुग्णांचं प्रमाण 30 टक्के आहे.
अहमदाबाद हॉस्पिटल्स अँड नर्सिंग होम्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भरत गढवी याबद्दल सविस्तर माहिती देताना सांगतात की, "अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय की, धूरविरहित तंबाखू, गुटखा, गुडाकू, खैनी आदी पदार्थांमुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. स्वादुपिंड, घसा हे अवयव कर्करोगासाठी फारच संवेदनशील आहेत. तर धूम्रपानामुळे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका तीन ते चार पटीने वाढतो असं अभ्यासात दिसून आलं आहे."
पान, बिडी, मसाल्यात काय फरक आहे?
अभ्यासात दिसून आलंय की, तंबाखूमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांना धोका उद्भवतो.
डॉ. मेहता सांगतात, "त्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या कमकुवत होतात, रक्तदाबासारख्या समस्या निर्माण होतात."
या पदार्थांच्या दीर्घकालीन सेवनामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो.
डॉ. मेहता म्हणतात, "तंबाखूच्या दुष्परिणामांचा विचार केला तर पूर्वी लोकांना वयाच्या चाळिशी नंतर सीओपीडी म्हणजेच श्वसन आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार व्हायचे. पण आजकाल 30 वर्षांखालील तरुणही सीओपीडी सारख्या आजारांनी त्रस्त आहेत."
तंबाखूच्या सेवनामुळे पोट, ब्राँकायटिस आणि फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात, असं डॉ. गढवी सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय तंबाखूचं सेवन करणाऱ्या लोकांच्या हिरड्यांमध्ये सूज, रक्तस्त्राव, पस तयार होतो. नियमित तंबाखूच्या सेवनाने उच्च रक्तदाब आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
डॉ. मेहता सांगतात, "महिलांमध्ये तंबाखूचं व्यसन तुलनेने कमी असलं तरी या पदार्थांच्या सेवनामुळे गर्भधारणेदरम्यान अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. यात बाळाचा अकाली जन्म, अशक्तपणा, गर्भपाताचा धोका, कमी वजनाची बाळं अशा समस्या असतात ."
तर पुरुषांच्या तंबाखूच्या सेवनाने शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या कमी होते.
डॉ. मेहता म्हणतात, "मानसिक आणि शारीरिक आरोग्यासोबतच व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. आधी व्यसनावर 2-3 लाख रुपये खर्च होतात आणि नंतर त्यातून उद्भवणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात."
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिलीच्या अहवालानुसार, तंबाखूमध्ये हानिकारक पदार्थ असतात. तंबाखू सुंगंधी आणि चविष्ट बनवण्यासाठी त्यात मशेरी, चुना, खैनी, जर्दा, मरस, नसवार, सुपारी, गुटखा, मावा यांचा वापर केला जातो.
तंबाखूची पानं चघळताना या पानांमध्ये सुपारी आणि चुन्याचं मिश्रण असतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








