जागतिक तंबाखूविरोधी दिन : पंधराव्या शतकातली वनौषधी तंबाखू अशी ठरत गेली आरोग्याला हानिकारक

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कुठल्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्या निम्म्या लोकांचा तंबाखूमुळे बळी जातो. दरवर्षी जवळपास 60 लाख लोकांचा तंबाखूसेवनामुळे मृत्यू होतो. तर जवळपास 9 लाख लोकांचा अप्रत्यक्ष स्मोकिंगमुळे (पॅसिव्ह स्मोकिंग - स्मोकिंग करणाऱ्यांच्या सान्निध्यात जास्तीत जास्त वेळ घालवल्यामुळे) मृत्यू होतो.
ही झाली आजची परिस्थिती. मात्र अनेक शतकं तंबाखू सेवन 'आरोग्यदायी' मानलं जायचं. ज्या झाडापासून तंबाखू मिळते त्या निकोटिना वनस्पतीला सोळाव्या शतकात 'the holy herb' म्हणजे पवित्र औषधी वनस्पती किंवा 'God's remedy' देवाचं औषध म्हटलं जायचं.
त्याकाळचे डच वैद्यकीय संशोधक गिल्स एव्हेरार्ड यांना अशा विश्वास होता की निकोटिनामध्ये इतके गुण आहेत की त्याचा वापर केल्यास लोकांना डॉक्टरांची फारशी गरज पडणार नाही.
1587 साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'Panacea' म्हणजेच 'वैश्विक औषध' या पुस्तकात ते लिहितात, "याच्या धुरात विष आणि संसर्गजन्य रोगांसाठीची प्रतिजैवकं (antidote) आहेत."
रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन या नियतकालिकात प्रा.अनी कार्लटन यांनी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे, तंबाखूचा औषध म्हणून सर्वांत पहिल्यांदा वापर करणारा युरोपीयन होता अमेरिकेचा शोध लावणारा क्रिस्टोफर कोलंबस.
ज्यांना आपण आज क्युबा, हैती, बहामास म्हणतो, त्या बेटांवरचे लोक तंबाखू पाईपमध्ये टाकून तो ओढत असल्याचं कोलंबसच्या लक्षात आलं. ती माणसं कधीकधी एखादी जागा निर्जंतुक करण्यासाठी आणि रोग दूर करण्यासाठी तंबाखूची पानं जाळायची.
तसंच आज ज्याला आपण व्हेनेझुएला म्हणून ओळखतो तिथे पूर्वी चुनखडीमध्ये तंबाखू मिसळून त्याचा टूथपेस्ट म्हणून वापर व्हायचा. भारतात अजूनही ही पद्धत आहे.
भूतकाळातली अशी अनेक उदाहरणं आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
इ.स. 1500 मध्ये पोर्तुगिज शोधकर्ता पेड्रो अल्वारेस कॅब्रल ब्राझिलला पोहोचला. त्याने असं निरीक्षण नोंदवलं की त्या भागात शरिरावर येणारी फोडं किंवा चामखिळींसाठीसुद्धा बेटमचा (तंबाखूच्या झाडाला बेटमही म्हणतात) वापर व्हायचा.
इतकंच नाही तर फ्रान्सचे मिशनरी बर्नार्डिनो डी सॅहगन मेक्सिकोमधल्या काही वैदूंकडून गळ्यातल्या ग्रंथींचा आजार दूर करण्यासाठी तंबाखूच्या पानांचा वापर कसा करायचा, हे शिकले होते. गळ्यावर छोटासा काप देऊन त्या ठिकाणी तंबाखूची पानं गरम करून मिठात टाकून लावल्यास आराम मिळतो, असं त्याकाळी मानलं जाई.
तंबाखूचा हा औषधी गुणधर्म कळताच युरोपातले डॉक्टर आणि औषध तयार करणारे तज्ज्ञ त्याचा औषध म्हणून वापर करण्यास उत्सुक होते.

फोटो स्रोत, Wellcome Collection
Wellcome Collection या आरोग्यविषयक संग्रहालय आणि वाचनालयाच्या माहितीनुसार त्यानंतर अनेक शतकं डॉक्टर्स, सर्जन्स आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सिगारेट किंवा पाईप सोबत ठेवणं, महत्त्वाचं मानलं जाई.
मृतदेहाचा अंगाला लागलेला वास घालवण्यासाठी आणि मृतदेहातून पसरणाऱ्या जंतूंमुळे संसर्ग होऊ नये, यासाठी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना मुक्तपणे धुम्रपान करण्याचा सल्ला दिला जायचा.
1665 साली युरोपात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी लहान मुलांनाही वर्गामध्ये स्मोकिंग करण्याचा सल्ला देण्यात आला होता. हा रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून तंबाखू रक्षण करते, असा त्याकाळी समज होता. प्लेगमुळे मृत्यू झालेल्यांचं पार्थिव पुरण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती तेदेखील प्लेगपासून बचाव व्हावा, यासाठी मातीच्या पाईपमधून तंबाखूचे झुरके घ्यायचे.

फोटो स्रोत, Wellcome Collection
अनेकांना तंबाखूचा वापर उपयोगी वाटत असला तरी त्याकाळीदेखील काही जण असे होते ज्यांनी तंबाखूच्या औषधी गुणधर्मावर प्रश्न उपस्थित केले होते.
त्याकाळी एक ब्रिटिश डॉक्टर होते. जॉन कॉटा. त्यांनी औषधं आणि जादूटोणा यावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. तर या डॉक्टर जॉन यांचं तंबाखूविषयी मत होतं की ज्या वनस्पतीला तुम्ही वैश्विक औषध मानताय तो 'अनेक आजारांना निमंत्रण देणारा राक्षसही' असू शकतो.
अनेकांनी शंका उपस्थित करूनही तंबाखूची मागणी वाढतच होती आणि औषध विक्रेतेदेखील आपल्याकडे तंबाखूचा पुरेसा साठा राहील, याची पुरेपूर काळजी घेत होते.
तंबाखूचा वापर एनिमा देण्यासाठीही व्हायचा. पाण्यात बुडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी त्याच्या गुद्दद्वारात तंबाखूचा धूर सोडला जायचा.
तंबाखूचा धूर रुग्णाच्या शरिरातली थंडी आणि गुंगी दूर करून शरिराला उब देऊन उत्तेजित करतो, असा समज होता. थेम्स नदीकाठी या एनिमा कीट तेव्हा मोफत मिळायच्या.
अठराव्या शतकात कानदुखी बरी करण्यासाठी कानात तंबाखूचा धूर सोडण्याचीही प्रथा होती.
1828 मध्ये तंबाखूच्या पानातून निकोटिन वेगळं करण्यात यश आलं. त्यानंतर तंबाखूवर वैद्यकीय तज्ज्ञांचा विश्वास कमी होत गेला.

फोटो स्रोत, Wellcome Collection
मात्र, तंबाखूवर आधारित औषधोपचार सुरूच होते. बद्धकोष्ठ, जंत आणि गुद्दद्वारातून होणारा रक्तस्राव अशा आजारांच्या उपचारांमध्ये तंबाखूचा वापर व्हायचा.
1920-1930च्या दरम्यान, तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाविषयी काळजी वाढू लागली. त्याकाळी कॅमल हा सिगरेटचा मोठा ब्रांड होता. तंबाखूच्या दुष्परिणामांवर संशोधन सुरू झाल्यावर कॅमलने डॉक्टर स्मोकिंग करायचा सल्ला देतात आणि स्वतः डॉक्टरही कॅमल ब्रँडची सिगरेट ओढतात, अशी जाहिरात करायला सुरुवात केली.
तसंच गायकही "गळ्यातल्या नाजूक पेशींना हानी पोचवणाऱ्या घटकांचा नाश करण्यासाठी" स्मोकिंगचा सल्ला देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या तीस वर्षांत धुम्रपानाचे दुष्परिणाम तर स्पष्ट झाले आहेतच. शिवाय पॅसिव्ह स्मोकिंगवरही बरंच संशोधन झालंय.
यानंतर अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लोकांना धूम्रपानच्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी जागृतीचे कार्यक्रम आखण्यात आले.
काही देशांमध्ये सिगरेट, गुटखा, जर्दा, पान मसाला यासारख्या तंबाखूचा वापर करण्यात आलेल्या उत्पादनांच्या पॅकेटवर तोंडाचा, फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा अशाच काही जीवघेण्या आजारांमुळे मरणाच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णांचे फोटो लावणं, बंधनकारक करण्यात आलं.
इंग्लंडमध्ये गर्भारपणात धुम्रपान केल्याने पोटातल्या बाळावर होणाऱ्या परिणामांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी 'स्मोकी सू' नावाची बाहुली तयार करण्यात आली.

फोटो स्रोत, Wellcome Collection
गेल्या काही वर्षांत सिगरेटची सवय मोडण्यासाठी ई-सिगरेटचा वापर वाढला आहे. ई-सिगरेट बॅटरी असलेले रिचार्जेबल उपकरण आहे. यामुळे तंबाखूचं थेट सेवन न करता निकोटीनचे झुरके घेता येतात.
तंबाखूच्या धुरातून बाहेर पडणारे टार आणि कार्बन मोनॉक्साईड हे दोन विषारी घटक ई-सिगरेटमधून तयार होत नाहीत. मात्र, ई-सिगरेटही पूर्णपणे सुरक्षित नसल्याचं ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्विसचं (NHS) म्हणणं आहे.
ई-सिगरेटच्या वापराला 'vaping' (वॅपिंग) म्हणतात. मात्र, वॅपिंगही वादातीत नाही.

फोटो स्रोत, Science Museum London
जगातली सर्वांत मोठी सिगरेट कंपनी असलेली फिलीप मोरीस इंटरनॅशनलने आता ई-सिगरेट मार्केटमध्येही प्रवेश केला आहे. या फिलीप मोरीस आणि ज्युल अशा दोन कंपन्यांवर अमेरिकेत कायदेशीर खटला दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर मार्केटिंग करून तरुणांना लक्ष्य करत असल्याचा आरोप या कंपन्यांवर करण्यात आला आहे.
तरुण आणि किशोरवयीन मुलांना ई-सिगरेट सहजासहजी उपलब्ध करून देणाऱ्या छोट्या दुकानदारांवरही अमेरिकेत कडक कारवाई करण्यात येते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते तंबाखू सर्वांत मोठा साथीचा आजार आहे. तसंच सार्वजनिक आरोग्याला आतापर्यंतचा सर्वांत मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
लोकांना तंबाखूपासून परावृत्त करण्यासाठी सरकारने तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालणं, अशी उत्पादनं तयार करणाऱ्या कंपन्यांना प्रायोजकत्व नाकारणं, विडी, सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवर वाढीव कर आकारणं, अशी धोरणं स्वीकारावी, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलंय.
तंबाखूचा वापर कमी होत असल्याचं म्हटलं जातंय. 2016 साली जगातले 20% लोक सिगरेट ओढायचे. तर हेच प्रमाण 2000 साली 27% इतकं होतं. मात्र, जागतिक उद्दिष्टाच्या दृष्टीने हा वेग खूप कमी आहे.
जगभरात 1.1 अब्ज प्रौढ स्मोकर्स आहेत. यातले 80% मध्यम किंवी कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








